मानवासहित सर्व समाजप्रिय प्राण्यामध्ये सहकार आणि एकी या पायाभूत प्रेरणा आहेत. मुंग्या आणि मधमाशांमध्ये या प्रेरणा पूर्णत्व पावलेल्या दिसतात. या कीटकांमध्ये समाजविरोधी कृती करण्याची प्रवृत्ती दिसून येत नाही. ते आपल्या घरट्याशी किंवा पोळ्याशी पूर्णपणे एकनिष्ठ असतात. एका मर्यादेपर्यंत या सार्वजनिक कर्तव्याचे, एकनिष्ठतेचे कौतुक वाटणे स्वाभाविक आहे. पण त्यात एक मोठ्ठी त्रुटी आहे. ती अशी की, मुंग्या आणि माशा उत्तम कलानिर्मिती करत नाहीत. शास्त्रीय शोध पण हे कीटक लावत नाहीत. फार काय, सर्व मुंग्या किंवा माशा या भगिनी आहेत, अशा विचारसरणीवर आधारित धर्माची रचना पण त्यांनी केलेली दिसत नाही. वस्तूत: त्यांचे समाजजीवन हे स्थिर, यांत्रिक आणि अतिशय अचूक असते. आपण माणसे (म्हणूनच) इच्छा करतो की, जीवनात थोडी तरी अस्थिरता असावी, जेणे करून उत्क्रांतीमधिल अशा अडथळ्यांपासून आपली सुटका होईल.
फार पूर्वी मानवप्राणी हा दूर्बळ आणि दूर्मिळ असा होता. त्याचे अस्तित्व अतिशय डळमळीत होते. काळाच्या ओघात त्याचे पूर्वज झाडांवरून खाली आले आणि घट्ट पकडीचे पंजे सोडून हात आणि पाय वापरू लागले. या बदलांचा फायदा असा झाला की, मनुष्यप्राण्याचे अस्तित्व जंगलांपुरते न राहता मोकळ्या प्रदेशात, जिथे आफ्रिकेतील उष्णकटिबंधातील जंगलांच्या तुलनेने अन्न कमी प्रमाणात होते, तिथे वाढायला लागले. सर आर्थर कीथ यांच्या अंदाजानुसार एका मनुष्यप्राण्यास सुमारे २ वर्गमैल इतका भूप्रदेश अन्नाची गरज भागविण्यास आवश्यक असे. मनुष्य सदृश माकडे (anthropoid ape) आणि काही अजूनही अस्तित्व टिकून असलेल्या आदिम जमातींच्या निरीक्षणावरून, आपले पूर्वज ५०-१०० च्या कळपामध्ये राहत असावेत. आपल्या कळपामध्ये एकोपा, सहकार्य आणि दूसर्या कळपाशी गाठ पडल्यास वैर असे या मनुष्य प्राण्यांचे वर्तन असे. जोपर्यंत मनुष्यप्राणी दूर्मिळ होता तोपर्यंत दोन कळपांची गाठ पडणे तसे अकस्मातच घडून येई. प्रत्येक कळपाचा वावर विशिष्ट प्रदेशापुरता मर्यादित होता. दोन कळपांमधला संघर्ष अशा प्रदेशाच्या हद्दीवर घडत असे. याकाळात प्रजोत्पादन हे कळपापुरतेच सहसा मर्यादित होते. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात आंतरजनन (inbreeding) तेव्हा झाले असणार. प्रजोत्पादनाच्या निर्माण झालेल्या चालीरीती कळपामध्ये तशाच पुढे चालू राहिल्या असणार. एखाद्या कळपाचा आकार जसा वाढत जाई, तेव्हा जागा अपुरी पडायला लागल्यावर तो कळप अन्य कळपांच्या संपर्कात येत असे. अशा वेळेस दोन कळपांमध्ये संघर्ष निर्माण होऊन आंतरजननामुळे फायदा मिळालेला सामर्थ्यशाली कळप आपल्या चालीरीती पुढे चालू ठेवत असे. सर आर्थर कीथ यांनी आपल्यासमोर हे सर्व अतिशय खुलासेवार मांडले आहे. आता हे ओघानेच आले की आपले रानटी पूर्वज कोणतेही विचारपूर्वक धोरण न स्वीकारता, केवळ सहज प्रेरणेने, आपल्या कळपाशी निष्ठा आणि दूसर्या कळपाचा तिरस्कार किंवा वैर, असे परस्परविरोधी वर्तन करत असत. [१,२]
या काळात निर्माण झालेला सर्वात ताकदवान आणि सहजप्रेरणेने प्रवृत्त असा गट म्हणजे कुटुम्ब होय. प्रदीर्घ बाल्यावस्थेमुळे मनुष्यप्राण्यात कुटुम्बसंस्थेची निर्मिती झाली. अन्न गोळा करण्यावर स्त्रीच्या पालनपोषणाच्या जबाबदारीमुळे मर्यादा आल्या. याचवेळेस, मनुष्यप्राण्याने पक्ष्यामध्ये दिसते त्याप्रमाणे पिता या घटकाचा कुटुम्बात अंतर्भाव केला, आणि पालनपोषणाच्या श्रमांची विभागणी या टप्प्यापासून सुरू झाली. कुटुम्ब ते जमात हे स्थित्यंतर शिकार करताना, सहकार्याचे महत्त्व मनुष्यप्राण्यास जसे उमगत गेले तसे घडत गेले. तसेच टोळीमधला एकोपा अन्य टोळ्यांशी अचानक संपर्कामुळे निर्माण होणार्या संघर्षातून वाढत गेला. [३]
मर्कटमानव ते आदिमानव या उत्क्रांतीमधिल टप्पे आज उपलब्ध असलेल्या अवशेषांवरून पुरेसे स्पष्ट होतात. आज सापडलेले मानवाचे सर्वात जुने अवशेष सुमारे एक कोटी वर्षांपूर्वीचे आहेत. त्यापूर्वी काही कोटी वर्षांपूर्वी मर्कटमानवाने वृक्ष सोडून जमिनीवर संचार करण्यास सुरुवात केली. उत्क्रांतीमधिल टप्प्यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मानवाच्या मेंदूचा आकार वाढत जाउन तो सध्या आहे त्या स्थितीपर्यंत कित्येक हजार वर्षांपूर्वी स्थिरावला. या हजारो वर्षांत माणसाचे ज्ञान, कौशल्ये, सामाजिक जडणघडणीचा विकास झाला, पण तस बघितलं तर जन्मजात बौद्धिक क्षमतेचा विकास मात्र तेवढा झालेला दिसत नाही. बौद्धिक क्षमता वाढीची प्रक्रिया काही हजार वर्षांपुर्वी थांबल्याचे आढळून येते. आपण जे शिकतो ते अश्मयुगीन मानवापेक्षा काही फार वेगळे आहे असे मानायचे काही कारण देता येत नाही [४]. ज्या प्रेरणानी आदिमानवाला आपल्या टोळीपुरता एकोपा आणि बाहेर इतरांशी वैर असे वर्तन करायला लावले, त्या प्रेरणा आजही अस्तित्वात आहेत. जे वर्तनातील बदल सुरुवातीच्या काळापासून होत आले आहेत ते पण एकतर सहजप्रेरणेने आहेत किंवा जाणीवपूर्वक समूहस्वार्थापोटी आहेत. मानवी सामाजिक जीवनात ताणतणावास कारण ठरणारी एक महत्त्वाची गोष्ट अशी की, एका ठराविक मर्यादेपर्यंतच ज्याला नैसर्गिक प्रेरणा नाहीत अशा वर्तनाला विवेकाच्या चौकटीतून जाणून घेता येते. ज्या वर्तनाने नैसर्गिक प्रेरणेवर ताण पडतो, तेव्हा निसर्ग अतिशय थंडपणा किंवा विध्वंस याद्वारे सूड काढतो, जेणेकरून विवेकाने प्रेरित रचना मोडून पडते.
सामाजिक एकोप्याची सुरुवात समूहनिष्ठेतून होते. शत्रुभयाने त्याची गरज अधोरेखित होते. नैसर्गिक आणि जाणीवपूर्वक प्रक्रियांतून सामाजिक एकोप्याचा आज आपल्याला ठाऊक असलेल्या 'राष्ट्र' संकल्पनेपर्यंत विकास झाल्याचे जगभर दिसून येते. या विकास प्रक्रियेत अनेक प्रवाह मिसळले गेले आहेत. सुरुवातीला समूहाच्या नेत्याशी निष्ठा म्हणजे समूहनिष्ठा असे मानले गेले. एखाद्या टोळीचा प्रमुख किंवा राजा त्या टोळीच्या सर्व सदस्याना ओळखत असे. अशा प्रकारे समूहनिष्ठे ऐवजी व्यक्तीनिष्ठेने, मूळ प्रेरणेला धक्का न लागता, टोळ्यांचा आकार वाढायला मदत झाली.
विकासाच्या पुढील टप्प्यात अस्तित्व पुसून टाकणार्या लढाया हळुहळु जय-विजयाच्या लढाया बनल्या. पराभूतांना मृत्युदंड देण्याऐवजी गुलाम म्हणून ठेवणे त्यांच्या जेत्यांनी पसंत केले. हे झाले तेव्हा टोळीत दोन प्रकारचे लोक दिसू लागले. ते म्हणजे, मुक्त असलेले टोळीचे मूळ सदस्य आणि केवळ भीतिपोटी आणि इच्छेविरूद्ध त्यांच्या आज्ञा पाळणारे गुलाम. निनव्हा[५] आणि बॅबिलोनची सत्ता खुप मोठ्या प्रदेशावर पसरली होती. ही सत्ता त्याप्रजेच्या स्वयंप्रेरणेने किंवा सामाजिक एकोप्याच्या भावनेतून निर्माण झाली नव्हती तर जेत्यांच्या युद्धसामर्थ्याने निर्माण झालेल्या दहशतीतून होती. त्या काळापासून युद्धाने टोळीचा किंवा जमातीचा आकार वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भीतीने एकजुटीच्या भावनेवर विजय मिळविला. हा बदल फक्त मोठ्या जमातींपूरता मर्यादित नव्हता तर स्पार्टासारख्या ठिकाणी जिथे मुक्त नागरिक संख्येने कमी होते तिथे हेलट समाजाचे लोक निष्ठूरपणे दडपले गेले होते. स्पार्टाची सामाजिक एकोप्यासाठी कायम प्रशंसा केली गेली आहे पण हा एकोपा, दहशतीने निर्माण केलेल्या निष्ठेचा अपवाद वगळता, स्पार्टाच्या संपूर्ण लोक समुदायासाठी कधीच नव्हता.
नंतर मानवी संस्कृतीचा विकास होत असताना निष्ठेचे नवे रूप अस्तित्वात आले. ही निष्ठा एखाद्या भूप्रदेशाच्या ओढीतून किंवा वांशिक साधर्म्यावर आधारलेली नव्हती तर विचारसरणीवर आधारीत होती. पश्चिमेपुरते बोलायचे झाले तर ऑर्फिक संप्रदायात गुलामाना समान दर्जा मिळाला होता, तिथे या नव्या निष्ठेचा उगम झालेला दिसतो. त्यांच्या शिवाय धर्मसंस्था, राजसत्तेच्या इतक्या जवळ होती की धर्माच्या अनुयायांचे पंथ पण रानटी टोळयांच्या धर्तीवर विकास पावले. हळुहळु सांप्रदायिक ओळख ही खूप ताकदवान बनत गेली. इस्लामने ७व्या, ८व्या शतकात जिंकलेल्या लढायांवरून हेच सिद्ध होते. धार्मिक युद्धाना खतपाणी या नव्या निष्ठेतून मिळाले. सोळाव्या शतकात धार्मिक/दैवतवादी निष्ठा राष्ट्रीय निष्ठेपेक्षा श्रेष्ठ बनल्या. सध्या वैचारिक निष्ठा मात्र दोन मोठ्या गटात गेल्या आहेत. त्यातली पहिली म्हणजे साम्यवादी विचारसरणीची 'पवित्र ग्रंथा'[६] वरील निष्ठा आणि दुसरी म्हणजे अमेरीकन जीवन पद्धतीवरील निष्ठा. स्थलांतरीतांनी जन्माला घातलेल्या अमेरीकेला जैविक एकता नाही, पण तेथिल एकतेची भावना युरोपिअन राष्ट्रांप्रमाणेच तीव्र आहे. अब्राहम लिंकनने म्हटल्याप्रमाणे अमेरीका 'प्रमेया'शी एकनिष्ठ आहे. अमेरीकेचे स्थलांतरीत आपल्या युरोपातील मूलस्थानांबद्दल नेहमीच झुरत असतात तर त्यांची पुढची पिढी मात्र आपली अमेरीकन जीवनशैली वैश्विक व्हावी असा ठाम विश्वास बाळगून आहे. अमेरीकेत आणि रशियात वैचारिक आणि राष्ट्रीय एकता यातील भेद नाहीसा झाल्याने दोन्ही विचारसरणींमध्ये नवी ताकद निर्माण झाली. या स्पर्धक विचारसरणींचे आकर्षण मात्र भौगोलिक सीमा पार करून गेले आहे.
आधुनिक काळातील ज्या सांप्रदायिक निष्टा आपल्याला व्यक्तीगत पातळीवर समाधान देत असतात, त्यांचे स्वरूप प्राचीन काळातील टोळ्यांमध्ये विकास पावलेल्या मानसिक जडणघडणीप्रमाणेच असते. अजूनही जन्मजात मनुष्यस्वभाव, शालेय शिक्षण, धर्म, आर्थिक विचारसरणीचा प्रचार यांचा फारसा प्रभाव न पडता, आजच्या मेंदूच्या विकासपूर्व अवस्थेतील स्वभावाशी मिळताजुळता आहे. अगदी सहजपणे आपण मानवीसमाजाची मित्र-शत्रु अशी विभागणी करतो. मित्रांच्या बाबत आपली नीति सहकार्यावर आधारलेली असते तर शत्रूंच्या बाबतीत आपली नीति स्पर्धेवर आधारित असते. पण ही विभागणी सतत बदलत असते. एका क्षणापर्यंत स्पर्धक असलेले दोन व्यावसायिक काही आह्वान निर्माण होऊन अस्तित्व धोक्यात आले तर एकत्र येतात आणि एकमेकांकडे बंधुभावाने बघू लागतात. कुटुम्बाच्या सीमारेषेबाहेर पडल्यावर शत्रू हा नेहमी एकीला कारणीभूत ठरलेला मोठा घटक आहे.
जागतिक पातळीवर एकीकरणाचे प्रयत्न सफल का होत नाहीत याचे कारण आता स्पष्ट होईल. एक वैश्विक राष्ट्र, जर अस्तित्वात आणले गेले, तर शत्रू नसल्यामूळे मोडून पडायचीच शक्यता आहे. दोन थोर धर्मांनी - ख्रिश्चन आणि बौद्ध - आपल्या अनुयायांद्वारे बंधुभाव संपूर्ण मानवजातीपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. बंधुत्वाचा पुरस्कार करून माणसामाणसातील दरी संपवण्याचा प्रयत्न या दोन धर्मांनी केला आहे [७]. आपण सर्व माणसे परमेश्वराची लेकरे आहोत म्हणून आपण एकाच कुटुंम्बाचे घटक आहोत. पण ज्यांनी हा विचार स्वीकारला नाही त्यांना ते परमेश्वराची लेकरे नाहीत असे मानून, प्राचीन टोळ्यांच्या अपपरभावाच्या मानसिकतेने, वैरी बनवले गेले. यात मूळ भावनेला (आपण सर्व माणसे परमेश्वराची लेकरे आहोत) तडा गेला.
धर्म, नीति, आर्थिक हितसंबंध आणि अस्तित्वाचा लढा यातून आपल्याला वैश्विक सहकाराचे समर्थन करून निरुत्तर करणारा युक्तिवाद पुढे करता येतो पण आपल्या जुन्या रानटी पूर्वजांच्या जैविक प्रेरणा अधूनमधून डोके वर काढतात. कदाचित जीवन बेचव होण्याच्या भीतीने आपण वैर, तिरस्कार सोडून द्यायला तयार होत नाही. संपूर्ण मानवजातीची एकी आपल्याला जर साधायची तर अंशत: कायद्याने आणि अंशत: मानवी आदिम भावनाना न दबवता त्यांचा निचरा होईल असे अभिनव मार्ग शोधूनच ते साध्य होईल.
हा प्रश्न सोडवणे सोपे नाही आणि केवळ नैतिकतेच्या मदतीने तर अजिबातच नाही. भरपूर गवागवा झालेल्या मनोविश्लेषण तंत्राने एक मौल्यवान सत्य आपल्या समोर आणले आहे. एक जुनी म्हण आहे की निसर्गाला चिमट्याने उचलून जरी बाजूला केले तरी तो परत प्रकट होतोच [८]. याचे सर्वात सुलभ स्पष्टीकरण मनोविश्लेषणाखेरीज दूसरे कोणतेही तंत्र आपल्याला देऊ शकत नाही. नैसर्गिक प्रेरणांच्या एकदम विरूद्ध जाणारे जीवन हे अत्यंत तणावकारक असते [९]. एका मर्यादेपलिकडे अनैसर्गिक जीवन जगणारे लोक हे मत्सर, द्वेष इत्यादि भावनानी ग्रासले जातात. काही वेळा त्यांचा जगण्यातला उत्साह संपून जातो. काही वन्यजमाती जेव्हा अचानक आधुनिक सुसंस्कृत समाजाच्या संपर्कात आल्या तेव्हा हे निरीक्षण करण्यात आले. श्वेतवर्णीयांनी पापुआतील नरभक्षक जमातीना त्यांच्या शिकारक्रीडेपासून जेव्हा वंचित ठेवले तेव्हा या जमातीतील लोकांमधिल चैतन्य संपुष्टात आल्याचे मानववंशशास्त्रज्ञांनी नोंदवून ठेवले आहे [१०]. या नरभक्षकांनी त्यांच्या हिंस्र चालीरीती पूर्ण बंद कराव्यात असे मला म्हणायचे नाही पण या चालीरीतींच्य जागी या लोकाना दूसरा पर्याय मनोवैज्ञानिकांनी द्यावा एवढेच मला सूचवायचे आहे. सुसंस्कृत मनुष्य हा पापुआतील नरभक्षकांप्रमाणे सद्प्रवृत्तीचा बळी ठरलेला असतो. आपल्यामध्ये सर्व प्रकारच्या आक्रमक प्रवृत्ती असतात तसेच रचनात्मक प्रेरणा पण असतात. समाज त्या दडपून टाकतो आणि जे पर्याय कुस्ती आणि फुट्बॉल मॅचच्या रुपात पुढे येतात ते अपुरे असतात. ज्यांना कुणाला युद्ध पृथ्वीतलावरुन नाहीसे करायचे आहे त्यांनी आपल्या उपजत नैसर्गिक प्रेरणांचे काय करायचे याचे उत्तर शोधायला हवे. माझ्यापुरते बोलायचे झाले तर मी हेरांच्या चातुर्यकथा वाचून माझ्या प्रेरणांना वाट देत असतो. त्या वाचत असताना मी आलटुन पालटुन गुन्हेगार आणि पोलीस या भूमिका वठवतो आणि तेवढ्याने माझे भागते. पण अशी काही माणसे आहेत की त्यांच्यासाठी हे फारच सौम्य आहे.
सामान्य माणसे स्पर्धेशिवाय आनंदी होऊ शकतील असे मला वाटत नाही कारण स्पर्धा ही अनेक मानवी उद्योगांचे मूळ आहे. स्पर्धा थांबवणे हे आपले ध्येय न ठेवता ती हानीकारक कशी होणार नाही याकडे लक्ष द्यायला हवे. खेळ आणि कलात्मक आविष्कारातील स्पर्धा या तूलनेने कमी हानीकारक आहेत. त्यातून युद्ध-प्रवृत्तींचा बर्याच प्रमाणात निचरा होतो.
युद्धानंतर आधुनिक मानवी संस्कृतीने सुरक्षिततेला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. जीवनातील सर्व धोके आपण बाजूला करू शकलो तर आयुष्यात फारसा आनंद उरेल असे मला वाटत नाही. सर आर्थर कीथ यांच्या New Theory of Human Evolution या पुस्तकातील एक परिच्छेद मला येथे द्यावासा वाटतो.
"जंगल न्यायाखाली जी माणसे जगत आहेत ती अधिक सुखी समाधानी असल्याचे मत अनेक अभ्यासकांनी नोंदवले आहे. फ्रेया स्टार्क यांनी दक्षिण अरेबियातील लोकांना सुरक्षितपणा ठाऊक नाही. पण तरीही ते सुखी आणि समाधानी असतात. डॉ. एच्. के. फ्राय यांनी ऑस्ट्रेलियातील आदिम जमातींबद्दल असेच म्हटले आहे. आणखी एक उदाहरण मला अमेरीकेतील क्रो-इंडियन जमातीचे द्यावेसे वाटते. क्रो-इंडियन आता काही प्रमाणात सुरक्षिततेचा अनुभव घेत आहेत. या जमातीचा अभ्यास डॉ. लॉरी करत आहेत. एखाद्या क्रो-इंडियनला आपण जर विचारले की तो धोका आणि सुरक्षितता यात काय पसंत करेल तर धोका हे उत्तर ऐकायला मिळते. माणसाच्या उत्क्रांतीचा फार मोठा काळ जंगली अवस्थेत गेल्यामुळे आजच्या माणसात रक्ताच्या बदल्याची चटक टिकून आहे."
१९१४ साली जेव्हा प्रथम मी याबद्दल वाचले तेव्हा मी तरी आश्चर्यचकीत झालो होतो. बरेच लोक जोपर्यंत झळा बसत नाहीत तोपर्यंत युद्धकाळात जास्त आनंदी असतात. शांत आयुष्य लोकाना कदाचित कंटाळवाणे होत असावे. चांगली वर्तणूक, धाडसशून्य अस्तित्व, आणि पुरेशी कमाई असलेल्या आणि तरी पण असमाधानी असलेल्या नागरीकांना ४००००० वर्षापूर्वी मागे नेऊन ठेवले तर त्यांना अन्नाचा शोध, शत्रूचा शिरच्छेद आणि श्वापदांपासून संरक्षण इत्यादी जीवनक्रम नक्कीच समाधानकारक वाटेल. जेव्हा युद्धाचे वारे वाहू लागतात तेव्हा एखादा कारकून
सैन्यात भरती होऊन, त्याच्या नैसर्गिक प्रेरणांना अनुकूल असे जीवन जगू शकतो. पण आज वैज्ञानिक प्रगतीने अशी काही साधने उपलब्ध झाली आहेत की त्यांच्या मुक्त वापराने उत्क्रांतीचा कोणताही हेतू साध्य होत नाही. आपल्या अनियंत्रित प्रेरणांशी जुळवून घेण्यात असलेल्या प्रश्नांचा पुरेसा अभ्यास झालेला नाही. वैज्ञानिक तंत्र जसे विकसित पावत आहे तशी या अभ्यासाची आवश्यकता वाढत आहे. जैविक बाजूने पाहिले तर असे लक्षात येते की वैज्ञानिक तंत्राची विनाशकारी रूपे ज्या वेगाने विकास पावली त्या वेगाने रचनात्मक रुपांचा विकास झाला नाही. एका घटकेत आज ५००००० माणसे मारता येतात. पण मनुष्य जन्माला यायला लागणारा लागणारा वेळ अजून कमी करता आलेला नाही.
त्यामुळे समाजसुधारकांपुढचा खरा प्रश्न हा सुरक्षिततेची साधने, उपाय शोधणे हा नाही. कारण जेव्हा सुरक्षितपणातून कोणतेही समाधान मिळत नाही तेव्हा लोक धाडसाकडे वळतात. त्यामूळे सुरक्षेची भावना आणि नागरी जीवनास धक्का देणार नाहीत अशा धैर्य, शौर्य आणि स्पर्धा प्रवृत्तीना वाट देणारी योग्य जीवनपद्धती शोधणे हा खरा प्रश्न आहे. आणि हे सर्व करत असताना आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपली जीवन पद्धती, सामाजिक संस्था, ज्ञान हे सर्व बदलले असले तरीही आपल्या नैसर्गिक प्रेरणा मात्र हजारो वर्षांपूर्वीच्या आपल्या पूर्वजांसरख्याच आहेत. त्यात यत्किंचितही बदल झालेला नाही. हे असाध्य आहे असे मला वाटत नाही. मानववंशशास्त्रातील आजवरचे संशोधन हेच सिद्ध करते की मानवी स्वभाव हा अतिशय लवचिक आहे. मानवी जीवनपद्धतील जगभर दिसणारे वैविध्य हे याचे पुरेसे निदर्शक आहे. एखाद्याच नैसर्गिक प्रेरणेचे पूर्ण उच्चाट्न करुन हे साध्य होईल असे मला वाटत नाही. धाडसाशिवाय आयुष्य हे नीरस असले तरी वाट्टेल ते स्वरूप घेणारे धाडस हे मात्र आयुष्याच्या मूळावरच घाव घालते.
मी पूर्वी उल्लेख केलेल्या रेड इंडियनच्या उदाहरणात या सर्व गोष्टींचा उत्तम परिपोष आढळतो - रेड इंडियनना जुन्या जीवनपद्धतीची ओढ वाटते कारण त्यातच त्याना 'जान' सापडते. प्रत्येक उत्साही माणसाला 'जान' किंवा चैतन्याचा स्रोत म्हणून दाखवता येईल असे आयुष्यात काही हवे असते [११]. काही जणाना हे सर्व मिळते ते बहुधा नट, खेळाडू, सैन्यातील अधिकारी, राजकारणी म्हणून आपल्यापुढे येतात. बाकीच्याना दिवास्वप्ने रंगवत आपले आयुष्य घालवण्याशिवाय पर्याय नसतो. स्वप्ने रंगवणे यात अयोग्य काही नाही; कल्पकपणे जीवन जगण्यासाठी ते आवश्यक असते. पण वास्तवाची आणि स्वप्नांची सांगड घालता आली नाही तर मात्र मॊठ्या समस्याना तोंड द्यावे लागते कारण त्यामुळे मन:स्वास्थ्याला धक्का बसतो. कदाचित आपल्या यांत्रिक जीवनात नैसर्गिक प्रेरणांना वाट देण्याचे मार्ग काढता येणे अजूनही शक्य आहे. तसं जर झालं नाही तर विनाशकारी विचारसरणी माणसाच्या कर्तृत्वावरून केव्हाच बोळा फिरवून मोकळ्या होतील.
टीपा -
[१] मनुष्यप्राणी कितीही पुढारला असला तरीही अनेक जैविकप्रेरणा आधुनिक
मानवामध्ये तश्शाऽच टिकून आहेत. स्वजातीप्रेम, अन्य धर्मांचा द्वेष, तिरस्कार
मराठी-अमराठी वाद ही याच प्रेरणांची आधुनिक रूपे आहेत असे मला वाटते.
[२] जिथे पोषण होते किंवा अस्तित्वाच्या गरजा भागतात तिथे निष्ठा, प्रेम
इत्यादि भावनांचा विकास होतो असे निरीक्षण डेस्मण्ड मॉरीस (Human Zoo ) या
मानववंशशास्त्रज्ञाने मांडले आहे. हे निरीक्षण व्यक्तीपासून समष्टीपर्यंत
सर्वांना लागू पडते.
[३] ब्राह्मणांमध्ये वाढणारा एकोपा हा ब्राह्मणद्वेषातून वाढत आहे. त्यामुळे तो
प्रतिक्रियात्मक स्वरूपाचा आहे. शंकराचार्यांनी केलेली वैदिक धर्माची
प्रतिस्थापना अशीच प्रतिक्रियात्मक स्वरूपाची होती. राष्ट्रीय पातळीवर व्यक्त
होणारी दलितांची अस्मिता आणि जागतिक पातळीवर दिसून येणारी हिंदूची अस्मिता यात
गुणात्मक फरक करता येत नाही असे मत एका प्रसिद्ध मराठी तत्वज्ञाने नोंदवले
आहे. ते कसे याचा येथे खुलासा होतो.
[४] लेव्ही स्ट्रॉस या फ्रेंच मानववंशशास्त्रज्ञाने अशाच स्वरूपाचा युक्तिवाद
आपल्या Primitive Thinking and Civilized Mind या निबंधात केला आहे.
[५] असिरीयन संस्कृतीची राजधानी
[६] तेव्हा 'दास कापिटाल' आणि सोविएत युनियनचे अस्तित्व संपल्यामूळे ही जागा
आता 'पवित्र कुराणा'ने घेतली आहे.
[७] एका तिबेटी बौद्ध पंडिताने निर्वाण या कल्पनेचा सांगितलेला अर्थ मला खूप
भावला. कोणतीही दरी पार करणे किंवा बंधनातून बाहेर पडणे म्हणजेच निर्वाण असे
त्याने म्हटले आहे. निर्वाणाला समांतर असलेली मोक्ष ही भ्रांत कल्पना आहे, तर
निर्वाण हे वास्तववादी आहे. वर्णभेदाने निर्माण केलेली सामाजिक दरी पार करायची
ताकद आणि संधी बुद्धाने दिली म्हणून त्याचा 'धम्म' लोकप्रियतेस पात्र झाला.
[८] हा मुद्दा या निबंधातील परमोच्च बिंदू आहे असे मला वाटते. निसर्गाचे नियम
समाजाच्या नियमांपेक्षा नेहमीच श्रेष्ठ असतात. निसर्गाचे नियम दडपायचे असतील तर
माणसाला फार मोठी किंमत मोजावी लागेल.
[९] आपल्याकडे आचार्य रजनीशांनी हे ओळखले होते. आधुनिक सुसंस्कृत माणसाच्या काम-ऊर्जेचा कोंडमारा लग्नसंस्थेतून कसा होतो हे त्यांनी दाखवून दिले.
[१०] इथे मला माझे स्वत:चे निरीक्षण मांडायचे आहे. जंगली श्वापदे जेव्हा नागरी
संपर्कात येतात तेव्हा त्यांना पकडून पुन्हा 'सन्मानाने' जंगलात पाठवले जाते.
त्यांची शिकार करून उपजीविका करण्याची प्रेरणा नाहीशी होणार नाही याची काळजी
घेतली जाते. पण माणसे मात्र इतर माणसांच्या प्रेरणा आपल्या नियंत्रणाखाली
आणायच्या उद्योगात गुंतलेली असतात.
[११] धन, प्रतिष्ठा, अनुरूप जॊडीदार हे आधुनिक सामान्य माणसाच्या आयुष्यात
चैतन्य आणतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा