मंगळवार, २१ जुलै, २००९

एक किस्सा - पोथीनिष्ठेच्या पराभवाचा

ही घटना एकदम खरीखुरी आहे...

झालं काय, काही महिन्यांपूर्वी MSEBच्या कृपेने चालू असलेल्या वीजेच्या चढ उतारामुले माझ्या ब्रॅन्डेड पीसीने मान टाकली. मी कंपनीला फोन केला आणि तक्रार नोंदविली. माझ्या तक्रारीची त्वरीत दखल घेउन कंपनीने त्यांच्या हार्ड-वेअर इंजिनिअरला माझ्याकडे पाठवले.

त्या इंजिनिअरने मशिनची पहाणी करून मला त्याचे निदान सांगितले. पीसीच्या मदर-बोर्ड वरील एक चिप बहूधा जळाली असावी. सर्विस सेंटरला मदर-बोर्ड नेउन खरे कारण तपासता येईल व खर्चाचा अंदाज देता येईल, असे त्याने मला सांगितले.

मला होकार देण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

दोन दिवसांनी कबुल केल्या प्रमाणे इंजिनिअरने दूरुस्त केलेला मदर-बोर्ड आणला. बिलाची रक्कम फार नसल्याने मी पण खुशीत होतो. दोन दिवस जगाशी संपर्क तुटल्यामुळे सैरभैर झाल्यासारखे झाले होते.

प्रथम मला त्या इंजिनिअरने मदर-बोर्ड वर कोणता भाग बदलला ते दाखवले. मदर-बोर्डला मेमरी चिप बसवल्या आणि एक एक करत इतर उपकरणे- म्हणजे हार्ड डिस्क, सीडी रायटर इ. बसवायला सुरुवात केली.

सर्व जोडणी झाल्यावर त्याने स्वीच ऑन केला. पण पीसीने डॊळे काही उघडले नाही. मला थोडा धीर धरणे भागच होते. करणार काय?

इंजिनिअरने पुन्हा मेन सप्लाय बंद करून सर्व केबल्स व्यवस्थित बसल्या आहेत याची खात्री केली आणि पुन्हा बटन ऑन केले.

पण पीसीने डॊळे काही उघडले नाहीत...

आता इंजिनिअरने बाह्या सरसावल्या. यावेळेला त्याने कोणती तरी केबल बदलायचे ठरवले. ती बदलून परत सर्व उपकरणांची जोडणी केली आणि बटन ऑन केले.

पण पीसीने डॊळे काही उघडले नाही...

मी एकंदर प्रकाराचा अंदाज घेउन त्या दिवशी योजलेले सर्व कौटुम्बिक कार्यक्रम रद्द करायचे ठरवले.

इंजिनिअरने आता पूर्ण एकाग्रतेने लढायचा निर्धार केला असावा. मी पण त्याला टेन्शन नको म्हणून हलक्या फुलक्या गप्पा मारायला सुरुवात केली. मधेच तो आशेने स्वीच ऑन करी.

पण काही केल्या पीसी डॊळे काही उघडेना...

होता होता रात्रीचे नउ वाजले. घरातले सर्व जण बाहेर जायचा कार्यक्रम रद्द झाल्याने नाराज होते. माझी मनस्थिती पण चमत्कारिक झाली होती. मी इंजिनिअरला दूसर्‍या दिवशी येण्याविषयी सुचवले.

त्याला हो म्हणण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

त्याने बहूधा मला बरे वाटावे म्हणून पुन्हा मदर-बोर्ड तपासून आणतो असे सांगितले. या पर्यायाला माझी काहीच हरकत नव्हती.

दूसरा दिवस शनिवार होता. नव्या हूरुपाने इंजिनिअरने कामाला सुरुवात केली. आज त्याने नव्या केबल्स आणल्या होत्या. peripheralsच्या काही कॉम्बिनेशन्स्ची नवी यादी कागदावर लिहून आणली होती. एकेक पर्याय पायरीपायरीने एलिमिनेट करायचा आणि पीसीला जिवंत करायचेच असे त्याने ठरवले होते. त्याच्याकडची ती पर्यायांची यादी (check list) बघून मी पण हादरलो. कारण सुट्टी वाया जायची शक्यता होती. पण पीसी जिवंत होणे आता आवश्यक होते. मी सदस्य असलेल्या एका याहू ग्रुपवर लावलेली (वैचारिक) आग माझ्या अनुपस्थितीत विझून जायची शक्यता होती. रणछॊडदास म्हणून माझी संभावना झाली असती तर ती मला खपली नसती.

तरी पण त्या इंजिनिअरने नियोजनबद्धरितीने चालू ठेवलेले प्रयत्न पाहून मला उतावीळ होऊन चालणार नव्हते. पण आज त्या इंजिनिअरचे तारे शुभ स्थानातून आणि शुभ दृष्टीने चमकत होते. एक हार्ड डिस्क आणि ५०० mb मेमरी या रचनेला पीसीने डोळे किलकिले केले. पीसी बूट होऊ लागला. इंजिनिअरला हायसे वाटले. त्याने मला हाक मारून हा चमत्कार दाखवला. मी पण थोडा सुखावलो.

पण घोडा मैदान अजून बरेच दूर होते. कारण अजून बरीच peripherals जोडायची शिल्लक होती. कारण पीसीने मान टाकायच्या अगोदर ती सर्व गुण्यागोविंदाने काम करत होती. मी नम्रपणे इंजिनिअरच्या ते लक्षात आणून दिले. इंजिनीअर मानेनेच हॊ म्हणून परत पीसीला भिडला...

त्याच वेळेस माझ्या डोक्यात एक विचार चमकून गेला. पण तो त्या इंजिनीअरला सांगायचे धारिष्ट्य माझ्यात नव्हते. ज्या विषयातले आपल्याला कळत नाही त्यातल्या समस्येला उपाय सूचवणे याला quackery म्हणतात असे मी अलिकडेच कुठे तरी वाचले होते. शिवाय आजवरच्या विज्ञानाचा इतिहास बघितला तर पोथिनिष्ठेला प्रतिभेने किंवा क्लृप्तीने जेव्हा जेव्हा टक्कर दिली आहे तेव्हा तेव्हा टक्कर देणार्‍या लोकांनी जबरदस्त किंमत मोजली आहे असेच दिसते. शिवाय मला हार्डवेअर मधले काही कळत नाही. म्हणून मी गप्प बसणे पसंत केले.

एव्हाना जवळ जवळ चार तास उलटले होते. मी आम्हा दोघांसाठी चहा केला. चहा पिताना इंजिनिअरच्या कपाळावर घामाचे थेंब जमून चमकताना दिसत होते. मी त्याला बोलते करण्यासाठी परत इकड्च्या गप्पा मारायला सुरुवात केली.

बोलता बोलता मी विचारले,

"ही सर्व कॉम्बिनेशन्स तपासून झाली का?"

"हो"

" मग आत काय करायचं?"

इंजिनिअरअने मला आता एक नवा पर्याय सुचवला. सर्वच्या सर्व कंप्युटर service centre मध्ये न्यायचा आणि तिथे सगळ्या गोष्टी परत तपासायच्या.

हा पर्याय मला तितकासा पटला नाही. कारण माझी हार्ड डिस्क तो घेउन जाणार म्हणजे बोंबला!

मी शेवटी त्याने केलेल्य प्रयत्नांचे भान ठेउन त्याला माझ्या डॊक्यात चमकून गेलेला विचार सांगायचे ठरवले.


" हे बघा! तुम्ही तुमच्याकडून तुमचे प्रयत्न करत आहात ते मी बघतोच आहे. पण माझ्यासाठी
म्हणून मला सुचलेला एक पर्याय तुम्ही ट्राय करावा असे मला वाटते. मला हा पर्याय का करावासा वाटतो याचे तुम्हाला पटेल असे कोणतेच स्पष्टीकरण माझ्याकडे नाही कारण मला हार्डवेअर मधले काही कळत नाही. पण तुमचा आणि माझा दोन दिवस बराच वेळ यात गेला आहे."

माझ्याकडे हताशपणे नजर टाकून 'हा काय आता सांगणार आहे' अशा आविर्भावात इंजिनिअरने एका बाजूला मान कलती करून होकारार्थी खांदे उडवले.

मी त्याला म्हटले,

" हे पहा हा पीसी मी बराच अपग्रेड केला आहे आणि तो टप्प्याटप्प्याने अपग्रेड केला आहे. असे करत असताना प्रत्येक टप्प्यावर तो व्यवस्थित काम करत होता."

इंजिनिअरने मानेनेच होकार दर्शवला.

"तेव्हा आपण त्याच क्रमाने तो असेंबल करत जाऊ आणि एक एक peripheral ऍड करत जाऊ."

इंजिनिअरला आता "हो" म्हणण्याशिवाय गत्यंतर नव्हते. पण त्याच्या समृद्ध अनुभवविश्वाच्या पलिकडचा आणि तो पण हार्डवेअर मधले ओ की ठो न कळणार्‍या customer ने सुचवलेल्या पर्यायाबद्दलची नाखुषी त्याच्या चेहर्‍यावर मला स्पष्ट दिसत होती. पण तो हा प्रयत्न करायला तयार झाला होता.

मी त्याला ज्या क्रमाने पीसीचे अपग्रेडेशन झाले होते तो क्रम सांगितला. त्याने त्या क्रमाने एक एक peripheral जोडत असताना पीसी बूट होतो का ते बघितले आणि गम्मत म्हणजे तसे घडत गेले. माझा पीसी पूर्ण जिवंत झाला. या नव्या अनुभवाने इंजिनिअरच्या पोथीनिष्ठेला आणि आजवरच्या अनुभवाला एक धक्का बसला होता. थोडेसे ओशाळून का होईना त्याला ते स्वीकारणे भाग होते.

माझ्या अंत:प्रेरणा शाबूत असल्याचा अनुभव आल्याने मी पण सुखावला गेलो होतो.

२ टिप्पण्या:

mugdha म्हणाले...

husshhsshh!! jhala ekadacha PC suru..

chhan lihilayat..pothinishtha vaachun mala aadhyatmaavar kahi lihila asava asa vatala..;P

Prakash Ghatpande म्हणाले...

मस्त अनुभव! लॊजिकल चाचणी पद्धत