काही काही कोडी सुटायला अनेक वर्षे जावी लागतात.
मला एक खोड आहे ती अशी की एखादा उपचार किंवा एखादे औषध कसे काम करते हे जोपर्यंत कळत नाही तो पर्यंत मी बेचैन असतो. त्यामुळे न बोलणार्या किंवा कमी बोलणार्या डॉक्टरांबरोबर माझे जुळत नाही. प्राणायमाच्या उपयुक्ततेबद्द्ल पण माझे असेच काहीसे झाले होते.
प्राणायमाची महती लहानपणापासून अनेक वर्षे कानावर ऐकू येत आहे. अनेक योगी आणि देशी विदेशी डॉक्टर प्राणायमाचे महत्त्व गाताना ऐकले आहेत. हृद्रोग निवारणासाठी प्रसिद्ध असलेला अमेरीकन डॉक्टर डीन ऑर्निश देखिल प्राणायमाचा पुरस्कार करताना आढळतो. तरी पण प्राणायमाचा उपयोग हृदयविकारामध्ये का आणि कसा होतो याचे समाधानकारक उत्तर काही केल्या मिळत नव्हते. दरम्यान वैद्यकाचे शिक्षण घेत असलेल्या माझ्या मामेभावाने मला त्यांच्या एका प्राध्यापकानी प्राणायमातील संभाव्य कारणपरंपरेबद्द्ल सांगितले आणि माझी उत्सुकता आणखी वाढली. त्याने सांगितले ते असे की योगाच्या विशिष्ट अवस्थांमध्ये मन वेगवेगळ्या पेशीं बरोबर संवाद साधते. हा संवाद नेमका कसा साधला जातो आणि त्यामुळे बरे होण्याची प्रक्रिया जलद गतीने का घडून येते हे कळायला पुढे ४-५ वर्षे जावी लागली. कॅण्डेस पर्ट या बाईंनी केलेल्या न्युरोट्रान्समीटर वरील संशोधनानंतर या कोड्याचा उलगडा झाला.
प्राणायमाच्या कोड्यामध्ये प्राणवायुचा पुरवठा वाढतो हे एकच पालुपद सर्व तज्ज्ञ गाताना दिसतात. पण प्राणायमात असे काय होते की हृदयविकारात अर्धमेल्या स्नायुना प्राणवायुचा पुरवठा नवीन समांतर रक्तवाहिन्यांद्वारे होऊ लागतो? आणि हृदयविकाराचा झटका टाळता येतो. या कोड्याचे उत्तर मात्र मला नुकतेच मिळाले आहे.
युट्युब वर डॉ. प्रकाश मालशे यांच्या सादरीकरणाची एक क्लीप मला नुकतीच पहायला मिळाली. या क्लिप मध्ये त्यांनी प्राणायमातील कुंभकाने हायपोऑक्ज़िया कसा निर्माण होतो हे दाखवले आहे. या कृत्रिम हायपोऑक्ज़ियामुळे मानवी किडनीतील एरिथ्रोपॉयेटीन नावाच्या संप्रेरकाने अस्थिमज्जेला चेतना मिळून रक्तातील तांबड्यापेशींचे प्रमाण वाढते आणि पर्यायाने रक्ताची प्राणवायुधारणक्षमता वाढते, असे स्पष्टीकरण डॉ. प्रकाश मालशे यांच्या युट्युबवरील क्लिप खाली दिले आहे. याला नेट्वर अन्य ठिकाणी दूजोरा दिला आहे. याचा आणखी एक परीणाम म्हणून हृदयाच्या अर्धमेल्या स्नायुमध्ये रक्तवाहिन्यांची वाढ होऊ लागते आणि समांतर पुरवठा चालू झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका टाळायला मदत होते.
1 टिप्पणी:
विवेकानंदानी सांगितलेल्या योगसूत्रांवरील टीकेत हेच विवरण दिले आहे.
टिप्पणी पोस्ट करा