रविवार, २७ मार्च, २०११

Miller of The Dee या सुप्रसिद्ध इंग्लिश कवितेचे मी केलेले मराठी स्वैर रुपांतर

कुण्या नदीच्या तीरावरती एक पिठाची गिरणी वसे
मालक त्या हो पिठगिरणीचा स्वछंदी आनंदी असे
जात्याच्या तो सुरात मिसळी स्वानंदाचे गीत कसे
ना हेवा मी करी कुणाचा, कुणी न माझा करीतसे

कुशल प्रजेचे बघण्या राजा येई एकदा नदीतीरी
श्रमपरिहारक सुरावटी त्या राजहृदयी मात्सर्य भरी
"चुकसी मित्रा" राजा वदला "हेवा वाटे तव मजला,
वैभव सारे भोगत असुनी कष्टी कसा मी? सांग मला"

चकित होउनी गिरणीवाला टोपी काढत घाम पुसे
"खाई भाकरी मम कष्टांची" वदूनी असे मिष्किल हसे
"कधी न मजला कर्ज कुणाचे, साथ नदीची या जन्मी,
ओघावर त्या गिरणी चाले ऐसे असता काय कमी"

उत्तर त्याचे ऐकुन राजा निजांतरी तो सुखावला
सद्गगद हृदये पुन: पुन: हे स्वत:शीच तो पुटपुटला
"ऐशा तुजसम प्रजाननांचे कौतुक वाटे मज मोठे,
पीठमंडित तव टोपी पुढती रत्नजडित मम मुकुट कुठे"

नीज सदनी मग येई राजा, मनात त्याच्या हेच असे
"ना हेवा तो करी कुणाचा कुणी न त्याचा करीतसे"

1 टिप्पणी:

प्रशांत म्हणाले...

मस्त. जमलाय अनुवाद.