सोमवार, १२ सप्टेंबर, २०११

अभद्र ग्रह रचनेचा एक किस्सा (ज्योतिष)

ज्योतिषावर विश्वास न ठेवणारे अनेक लोक ज्योतिषाच्या प्रभावाखाली येतात तेव्हा ज्योतिषाबद्दल माझी श्रद्धा अधिकाधिक दृढ होत जाते. त्याचे असे झाले, की मी नुकतेच "गोचर मंगळ, शनी आणि नेपच्यून यांची अभद्र रचना" हे टिपण तयार करत असताना माझ्या गणितात या अभद्र रचनेच्या प्रभावाखालील दोन जन्म तारखानी माझे लक्ष वेधले. ५ ऑक्टोबर आणि ११ ऑक्टोबर या त्या दोन जन्मतारखा. पैकी १ली माझ्या नात्यातील एका स्त्रीची आहे आणि दूसरी माझा मित्र मनोज पदकी याची आहे. या दोनही जातकांचा ज्योतिषावर विश्वास अजिबात नाही. साहजिकच या दोघांच्या आयुष्यात "गोचर मंगळ, शनी आणि नेपच्यून यांची अभद्र रचना" काय प्रभाव टाकते याबद्दल मला मोठी उत्सूकता निर्माण झाली होती.

हे ब्लॉग (इंग्रजी मसूदा) टिपण तयार झाले आणि मी सवयीने फेसबुकवर नजर टाकली. विचित्र योगायोग असा की त्याचे पुढील प्रमाणे स्टेटस अपडेट वाचायला मिळाले - My mom's situation is going from bad to worse. She has been moved to a nearby hospital (in Pune, India). I am booking my plane ticket now...

साहजिकच पदक्या एकदोन दिवसात पुण्याला येऊन पोचला. मी त्याचा फोन आल्यावर त्याला (आणि त्याच्या आईला) हॉस्पीटल मध्ये भेटायला गेलो होतो. त्या दिवशी आईची एक सर्जरी होणार होती. मी गेलो त्या दिवशी तो खूप तणावाखाली दिसला. बर्‍याच गोष्टींची जुळवाजुळव करून एक दोन आठवड्यात परत जायची इच्छा त्याला होती. आईचे वय आणि त्यामुळे बदललेला स्वभाव यामुळे निर्माण झालेले गुंते त्याला लपवता येत नव्हते. मला मी लिहीलेल्या ब्लॉग-लेखाची आठवण झाली आणि मी त्याबद्दल त्याला सांगितले तेव्हा त्याला पण आश्चर्य लपवता आले नाही. त्याने मला विचारले की हा त्रासदायक कालावधी किती आहे. मला अचूक गणित करून उत्तर देता येणे शक्य नव्हते. मंदगती ग्रह या रचनेत अंतर्भूत असल्याने दिड-दोन महिने ही फेज टिकायला काहीच हरकत नव्हती. मी त्याला तशी कल्पना दिली. तो म्हणाला, "डॉक्टर तर म्हणतायत की जखम भरली की लगेच घरी सोडतील." मी म्हटले, "बाबा रे, ज्योतिष तर तसे सांगत नाही". काही वेळ हॉस्पीटल मध्ये बसून मी घरी आलो. दूसर्‍या दिवशी त्याचे खालील स्टेटस अपडेट वाचायला मिळाले - "There is a chance she will be out of ICU in a day or two and then to the general ward for a couple more days. I am lining up the rest of the support system once she gets home. It's lovely monsoon season out here, but I am too stressed to enjoy it..."

मला पण हे वाचून बरे वाटले. पण ज्योतिषामुळे तयार झालेली संशयाची पाल मनात चुकचुकत होतीच. दोन-चार दिवस गेले. पदक्याचा मोठा भाऊ चॅट करायला फेसबुक वर आला होता. आईचा विषय निघाला, तेव्हा त्याने धक्कादायक बातमी दिली, की आईला कॅन्सर डिटेक्ट झालाय. मी पण ते ऐकून हादरलो. कारण वरवर सोपी वाटणारी केस आता आणखी गुंतागुतीची बनली होती. त्यातून निर्माण होणारे प्रश्न मला दिसत होते. ज्योतिषाच्या प्रचितीने मी परत एकदा थक्क झालो.

या अनुभवाच्या संदर्भात काही जण शंका काढतील की मित्राच्या पत्रिकेत त्रास असताना आईला त्रास का व्हावा? याचे उत्तर असे आहे की, दोन पत्रिकेतील रवि-चंद्रादि व्यक्तीगत ग्रह आणि काही बिंदू एकमेकांशी connected असतील तर असे अनुभव हमखास येतात. माझ्या मित्राची आणि त्याच्या आईची सविस्तर पत्रिका मांडणे शक्य नाही कारण त्याना त्यांच्या वेळा माहिती नाहीत. पण केवळ जन्म रवीशी होणारे योग किती जोरदार अनुभवाला येतात हे कळण्यासाठी या लेखाचा प्रपंच...

टीप - वर उल्लेख केलेल्या दूसर्‍या जातकाचे याच कालावधीत गुडघ्याच्या प्रत्यारोपणाचे ऑपरेशन झाल्याचे कळले. जास्त तपशील कळलेला नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: