काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी तेव्हा संगणक-संगीत या विषयात प्रा. एच व्ही सहस्रबुद्धे (एचव्हीएस) यांच्या बरोबर संशोधन करत होतो. एचव्हीएसनी मला या प्रकल्पाच्या आरेखनात बराच मोकळा हात दिला होता. मी मला सुचणार्या वेड्यावाकड्या कल्पना सरांना सांगत असे. कधी कधी एचव्हीएस त्यातली हवा काढत तर एखाद्या कल्पनेत तथ्य वाटले तर अधिक तपास करण्यास ते उत्तेजन देत असत. या प्रकारात आमच्यात बराच युक्तीवाद होत असे, आणि त्यातून मला बरेच काही शिकायला मिळाले.
असंच एकदा मी सरांशी बोलताना विधान केले की, "मला अमुक एका गायकाचे गाणे आवडते" असे एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या संगीतातल्या आवडीविषयी सांगते, तेव्हा ती आवड त्या व्यक्तीची खरी आवड नसण्याची शक्यता बरीच आहे. सरांनी मला चमकून विचारले, "तुला नक्की काय म्हणायचे आहे"?
मी त्यावर खुलासा केला की बहुतांश लोकांच्या गाण्यातल्या आवडीनिवडी या जाणीवपूर्वक विकास पावलेल्या नसतात, तर त्या आवडीनिवडी निर्माण होण्यात त्या त्या कलाकाराभोवती निर्माण झालेले वलय कारणीभूत ठरते किंवा संगीतेतर कारणे यात प्रभाव पाडतात.
"Can you elaborate this further" - एचव्हीएसनी मला चावी मारली.
मी त्यांना म्हटले की, बरेच कलाकार हे लहरीपणासाठी प्रसिद्ध असतात. त्यांच्या स्वभावातील विक्षिप्तपणा कधीकधी आवडायला लागून त्या कलाकाराची कला आवडायला लागली असे होण्याची बर्याच जणांच्या बाबतीत शक्यता आहे. मग मी अनेक कलाकारांचे दाखले देऊन माझा मुद्दा त्यांना पटविण्याचा प्रयत्न केला. त्यावर एचव्हीएस म्हणाले की "केवळ एक दावा केला आहे म्हणून हे स्वीकारता येणार नाही. हे प्रयोग करून सिद्ध करता आले पाहिजे".
माझा मुद्दा प्रयोगाने कसा सिद्ध करता येईल या विचारानी माझ्या डोक्याला चालना मिळाली आणि मी काही दिवसानी एका प्रयोगाचा आराखडा सरांच्या पुढे ठेवला. तो साधारणपणे असा होता -
- शास्त्रीय संगीत आवडते पण कळत नाही असे सांगणार्या जेव्हढ्या मिळतील तेव्हढ्या व्यक्ती गोळा करायच्या.
- एक प्रसिद्ध आणि अप्रसिद्ध कलाकरांची यादी तयार करायची
- या व्यक्तींना प्रथम वरील यादीतून त्यांना आवडणारे पाच शास्त्रीय गायक/गायिका प्राधान्यक्रमाने घोषित करायला सांगायचे.
- यानंतर या सर्व व्यक्तीना यादीतील गायकांच्या गाण्याचे नमुने निश्चित कालावधीसाठी ऐकवायचे. हे नमूने असे निवडायचे ठरले की त्यातून गायक कोण हे सहज ओळखता येणार नाही. यासाठी प्रत्येक गायकाच्या गाण्याचा सुरवातीला फक्त तंबोर्याची साथ असलेला आलापीचा भाग ३० सेकंद ऐकवायचा असे ठरले.
- प्रत्येक तुकडा ऐकल्यावर प्रयोगात सहभागी झालेल्या सदस्यांनी ० ते ५ गुण प्रत्येक गायकाला आपल्या आवडी प्रमाणे द्यायचे. सर्व तुकडे ऐकून झाले की सर्वात जास्त गुण मिळालेल्या तुकड्यांची एक यादी तयार करायची. ही यादी तयार झाली की प्रत्येक तुकड्यातील कलाकाराचे नाव घोषित करायचे. आणि मग प्रयोगापूर्वी घोषित केलेली आवड आणि प्रयोगोत्तर लक्षात आलेली आवड ही सारखीच की वेगवेगळी हे तपासायचे.
या प्रयोगाला प्रा. एच व्ही सहस्रबुद्धयानी संमती दिली.
हा प्रयोग केल्यानंतर असे लक्षात आले की जवळजवळ सर्वच सहभागींची प्रयोगपूर्व घोषित आवड आणि प्रयोगोत्तर आवड यात मोठ्ठी तफावत आहे. बहुतेक सर्वच जणांनी प्रयोगापूर्वी आवडतात म्हणून घोषित केलेले कलाकार प्रयोगानंतर कमी पसंतीचे ठरवले होते. या प्रयोगातील सर्वच सहभागी त्यांची गाण्यातली खरी आवड वेगळीच असल्याचे लक्षात आल्याने आश्चर्यचकित झाले. याला वीसेक वर्षे झाल्यामूळे मला आता आकडेवारीचा तपशील देता येणार नाही. पण माझा दावा खरा ठरला होता.
हे सर्व सांगायचे एव्हढयासाठी की एखादी व्यक्ती प्रसिद्ध होते किंवा आपल्याला आवडते ती तिच्या अंगभूत गुणांमुळेच असे नाही. त्याव्यक्ती भोवती वेगवेगळ्या कारणांनी (मग त्या माकडचेष्टा का असेनात) निर्माण होणारे वलय पण प्रसिद्धीला पूरक ठरते.
1 टिप्पणी:
तुमच्या दाव्यात तथ्य असू शकेन. अनेक बाष्कळ व उथळ प्रसारमाध्यमांना आजकाल कलाकार डोक्यावर मिरे वाटण्यासाठी चढवून घेतात.
तुमचे अजून निष्कर्ष वाचायला आवडतील.
टिप्पणी पोस्ट करा