आत्ताच फेसबुकवर एक प्रतिष्ठित प्रोफाइल बघत होतो. त्या प्रोफाइलच्या फोटोत एक मी काढलेला एक फोटो दिसला म्हणुन फोटोवर क्लिक केले आणि प्रतिक्रिया बघितल्या. फोटोवर ~७० लाईक्स आलेले बघुन मला गुद्गुल्या झाल्या. फोटो सदर प्रोफाइलधारकाच्या मित्र यादीतील एका व्यक्तीने शेअर पण केला होता.
असे मी काढलेल्या काही फोटोंच्या बाबतीत झाले आहे. मला माझ्या फोटोंची चोरी झाली तर फारसे वाईट वाट्त नाही. कारण ती माझ्या कामाला मिळालेली एक पावती आहे असे मी समजतो. सदर प्रतिष्ठित व्यक्तीने प्रामाणिकपणे "हा फोटो मी काढलेला नाही" असे घोषित केले असल्याने सध्या माझा पर्दाफाश वगैरे करायचा पण विचार नाही. पण गमतीचा भाग असा की हाच फोटो माझ्या फेसबुकवरील फोटोग्राफी पेजवर टाकलेला आहे आणि तिथे त्याला फक्त २च लाईक्स आलेले आहेत.
थोडक्यात मी केलेले काम मीच केलेले आहे यावर लोक विश्वास ठेवत नाहीत की याला नशीब म्हणायचे की आणखी काही? मला माहित नाही...
हा लहानपणापासुन सातत्याने येणारा हा अनुभव. या प्रकारातला १ला अनुभव मला शाळेत नववीत असताना आला. मला शाळेच्या मासिकात आपले लिखाण यावे अशी माझी तेव्हा खूप इच्छा होती. तेव्हा त्याचे खूप अप्रूप होते हे मात्र खरे. मी तेव्हा माझे पणजोबा कै. विठठल सीताराम गुर्जर यांच्या लेखनकर्तृत्वाने खुप प्रभावित झालो होतो. घरात आई आणि आजोबा त्यांच्या कथा-कादंबर्यांच्या गोष्टी अर्धवट सांगुन बाकी भाग मुळापासुन वाचायला प्रवृत्त करायचे. सुदैवाने माझ्या शाळेच्या ग्रंथालयाने माझी ही गरज मोठ्या प्रमाणात भागवली. मी "सावर्यातल्या मामांवर" (गुर्जरांवर) लेख लिहायचा मनोदय आजोबाना सांगितला तेव्हा ते मला पणजीकडे (इंदिराबाई गुर्जरांच्याकडे) आणि इतर नातेवाईकांकडे उत्साहाने घेऊन गेले. इंदिराबाई गुर्जरांनी त्यांच्याकडे असलेले फोटो, अत्र्यांनी मराठात लिहीलेला अग्रलेख, ध्रुव मासिकातील मुलाखत आनंदाने दिली.
घरातुन उत्तेजन मिळाल्याने मी तो लेख एका आठवड्यात एकट्याने लिहून पूर्ण केला. नंतर एक दिवस शाळेच्या वार्षिकासाठी मजकुर पाठवा अशी सूचना वर्गावर्गात फिरली तेव्हा मी मांडकेसरांना जाऊन भेटलो आणि लेख देऊन आलो आणी विसरुन पण गेलो. नंतर ३-४ आठवड्यानी मांडकेसर अचानक वर्गावर आले आणि "राजीव उपाध्ये कोण आहे. जरा बाहेर ये पाहू" असं म्हणुन मला बाहेर बोलावले. नंतर त्यांनी माझी प्राथमिक चवकशी केली आणि "तुझ्या घरात कुणी मराठी घेऊन एमए करत आहे का" असा प्रश्न विचारला. मी गोंधळलो. मी एकुलता एक असल्याने भाऊ-बहीण असण्याचा प्रश्न नव्हता. मग मांडके सर पुढे म्हणाले, "हा लेख मला नववीतल्या मुलाने लिहीलेला वाटत नाही. तु हा एखाद्या एमेच्या विद्यार्थ्याकडुन लिहुन घेतला असावा असे वाटते." त्यावर मी मात्र उडालोच. मग मी सरांना लेख लिहीण्यासाठी काय काय कष्ट घेतले ते कसेबसे समजावले. सरांची समजुत पटली असावी. सरांनी मग तो लेख काटछाट करून परत लिहून आण मग मी तो घेईन असे फर्मावले. मी पडत्या फळाची आज्ञा मानुन तो लेख संपादित केला आणि तो छापुन आल्यावर माझ्या आनंदाला पारावर उरला नाही.
पण गमतीचा भाग अजुन पुढेच होता. उन्हाळ्याची सुट्टी लागली आणि मी शिरस्त्याप्रमाणे कवठेकर सरांच्या घरी गेलो तेव्हा सरांनी माझे नेहेमीपेक्षा जास्त कौतुकाने स्वागत केले. सरांनी माझा लेख वाचला होता. सर मला तसेच त्यांच्या दिवाणखान्यात घेऊन गेले. तिथे त्यांच्या वडिलांशी म्हणजे दत्त रघुनाथ कवठेकरांशी गप्पा मारायला प्रा. म. ना. अदवंत आले होते. कवठेकर सरांनी प्रा. अदवंतांशी माझी ओळख करुन दिली आणि नूमवीय वार्षिक अंकातील माझा लेख त्यांना कौतुकाने वाचायला दिला. प्रा. अदवंतांनी त्यातले अक्षर-अन्-अक्षर वाचले आणि म्हणाले, "अभ्यासपूर्वक लिहीला आहेस, एमेचे विद्यार्थी पण असे लिखाण करत नाहीत". मला मांडके सरांबरोबर झालेला संवाद आठवला आणि अंगावर काटा उभा राहीला.
असे प्रसंग नंतर माझ्या आयुष्यात अनेक आले.
मी कॅलिग्राफी करायचो तेव्हा माझ्या कामाचे श्रेय माझ्या एका मित्राला मिळायचे. तो प्रसिद्ध सुलेखनकार प्रा. र. कृ. जोशींचा विद्यार्थी होता. मी र. कृंकडे एक (ती पण एक दिवसाची) कार्यशाळा वगळता शिकलो असं म्हणता येणार नाही. पण त्यांना काम करताना जेव्हा जेव्हा बघितले, तेव्हा र. कृ माझ्या डोक्यात भिनले. आणि त्यामुळे र.कृ. माझे मानस-गुरु बनले.
नंतर मग अचानक एकदा साक्षात र. कृ. जोशीना माझी कॅलिग्राफी दृष्टीला पडली. ते थबकून ती बराच वेळ न्याहाळत होते. मी तिथेच उभा होतो.
र. कृ. नी विचारले, "हे कुणाचे आर्ट्वर्क आहे?"
मी म्हटले, "सर, माझेच आहे"
"अरे! व्वा. कुणाकडे शिकलात?"
"सर, तुमच्याचकडे" असं म्हणुन मी त्यांना वाकुन नमस्कार केला. त्यावर रकृ गोंधळले आणि बाजुची खुर्ची ओढुन बसले आणि म्हणाले
"तुम्ही माझ्याकडे कधी येत होता?"
मग मी त्यांना सर्व खुलासा केला. त्यावर ते प्रसन्नपणे हसले आणि माझ्या इतर कामाची आस्थेने चवकशी केली आणि कॅलिग्राफी पुढे चालु ठेवायला उत्तेजन दिले. असो.
या सर्व प्रसंगांचा मथितार्थ एकच - आपल्या क्षमतेचे नकारात्मक मूल्यमापन करायला हिरीरीने पुढे येणारे शेकड्याने असतात पण खरे मूल्यमापन फकत अशा अनुभवांतुनच होत असते.