रविवार, ५ जानेवारी, २०१४

शेपूट

एकदा करटक आणि दमनक नावाचे दोन कोल्हे एका वृक्षाच्या स्निग्ध छायेत निवांतपणे काव्यशास्त्रविनोद करत बसले होते. करटकाने दमनकाला विचारले, "दमनका, कानावर आलं आहे की पलिकडच्या जंगलातला एक कोल्ह्यांचा कळप आता फुटला आहे आणि आता त्यातले आपले बांधव स्वतंत्रपणे शिकार करून आपला जीवनक्रम व्यतीत करत आहेत. कळपाला सोडायची अशी दूर्बुद्धी त्यांना का बरे झाली असावी?"

दमनक म्हणाला, "समूहात राहण्याचे फायदे  तोपर्यंतच असतात जोपर्यंत कळप त्या सदस्याची कसली ना कसली गरज भागवतो. ही गरज भागेनाशी झाली किंवा कळप जर सदस्याच्या अस्मितेला खुडायचे काम करत असेल तर कळप फुटतो."

करटकाने विचारले, "हे कसे?"

दमनक म्हणाला, "ऐक तर! एक घनदाट जंगल होतं...त्यात अनेक हिंस्र श्वापदे वास्तव्य करुन होती. त्यात पीतपुच्छ नावाचा एक देखणा कोल्हा आपल्या जातभाईंबरोबर शिकार करुन जीवन व्यतीत करत होता.

पीतपुच्छाची कोल्हेकुई ऐकुन अनेक कोल्हीणी घायाळ होतच, पण त्याची रुबाबदार, झुबकेदार शेपूट पण अनेक कोल्ह्यांच्या वैषम्याचा विषय ठरली होती. पीतपुच्छ कधी कळपाबरोबर शिकारीला जाई, तर कधी आपली रुबाबदार शेपटी उंचावुन हुंदडत बसे.

एके दिवशी कळपाबरोबर शिकारीला गेला असताना पीतपुच्छ कोल्ह्याच्या कळपावर गिधाडांनी हल्ला चढवला. जिवाच्या आकांताने पीतपुच्छाने धुम ठोकली. पळतापळता कळपापासुन तो वेगळा झाला आणि काटेकुटे, डोंगरदर्‍यांची पर्वा न करता तो पळत राहिला. एकटा पडलेल्या पीतपुच्छाला सोडतील तर ती गिधाडे कसली? त्या गिधाडांनी पण आकाशातुन त्याचा पाठलाग करायचा आणि जमेल तेव्हा झडप घालायचा प्रयत्न चालु ठेवला. त्या झटापटीत एक गिधाडाने पीतपुच्छाची शेपटी पकडली आणि करकचुन चावली. त्या चाव्याने खरं तर शेपटीचा तुकडाच पडायचा पण सुदैवाने मध्येच आलेल्या दगडाच्या कपारीमध्ये पीतपुच्छ शिरला आणि प्रतिहल्ला करुन गिधाडाना परतवुन लावले.

या झटापटित पीतपुच्छाची रुबाबदार शेपूट रक्तबंबाळ झाली. खरं तर ती तुटायचीच... पण दैव बलवत्तर होते म्हणुन वाचली.

त्याच दगडाच्या कपारीत कशीबशी रक्तस्राव थांबेपर्यंत त्याने वाट बघितली. नंतर मग ठणकणारी शेपूट घेऊन त्याने ३-४ दिवस आपला कळप शोधण्यात घालवली. शेवटी एकदाचा त्याला आपला कळप सापडला. पीतपुच्छाला पाहताच सर्व कोल्हीणी आनंदित झाल्या. पण हा आनंद फार टिकणार नव्हता. दुखर्‍या शेपटीच्या वेदनेने पीतपुच्छाचे गायन बंद पडले, तसेच कळपाबरोबर शिकार करणे पण पीतपुच्छाला कठीण झाले. पीतपुच्छ शिकारीला येईना तेव्हा बाकीच्या कोल्ह्याना त्याचा राग आला. एका वृद्ध आणि जाणत्या कोल्ह्याने त्याला सुचविले की, "ही शेपूट तू तोडुन का टाकत नाहीस?"

"आपल्या कळपात किती तरी जणांची शेपूट तुटली आहे. आणि ते सुखाने आयुष्य जगत आहेत".
एक-दोन शेपूट तुटलेल्या कोल्हयानी माना डोलवुन दुजोरा दिला.

त्यावर दुसरा एक अनुभवी कोल्हा म्हणाला, "केवळ वेदना आहे म्हणुन शेपटी तोडुन टाकणे हे शहाणपणाचे नक्कीच नाही. आज ना उद्या वेदना थांबु शकते. एकदा शेपटी तुटली की टिंगलटवाळी करायला सर्वाना निमित्त मिळते. तेव्हा शेपूट तोडुन टाकू नये असे मला वाटते. पीतपुच्छाची जखम बरी होईपर्यंत आपण त्याला सवलत द्यायलाच हवी कारण आजवर त्याने आपल्याला शिकारीत केलेली मदत विसरून चालणार नाही."

यावर कळपात मग बरेच चर्वितचर्वण झाले. शेपूट तुटलेल्या कोल्ह्यानी शेपूट नसण्याचे फायदे उच्चरवाने सांगितले. तेव्हा शेपूट असलेले आणि नसलेले कोल्हे-कोल्हीणी एकमेकांना फिदीफिदी हसलेच..

पीतपुच्छाला केवळ दुखते म्हणुन शेपूट तोडुन टाकणे पसंत नव्हते. "कळपावर माझी जबाबदारी अशी किती आहे की मी त्यांच्या मर्जी प्रमाणे माझे आयुष्य जगावे", असा विचार त्याने केला. आज ना उद्या दुखणे थांबेल मग आपण पूर्ववत शिकार करू शकु अशी त्याला आशा होती. त्याने शिकारीत आपला भार नको म्हणुन  कळपाला रामराम ठोकला. पुढे त्याची शेपूट बर्‍यापैकी बरी झाली आणि त्याने पूर्ववत् जीवनक्रम आरंभिला."

येथवर गोष्ट सांगुन दमनक म्हणाला, " म्हणुनच कळपाने आपण सदस्याची गरज किती भागवतो याची वेळोवेळी तपासणी करावी आणि मगच शहाणपणा शिकवावा. नाहीतर कळपाची शकले व्हायला वेळ लागत नाही".

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: