गोष्ट १ली
काल दुपारची ३ ची वेळ
बाहेर अंगणात गलका ऐकु आला म्हणुन बाहेर आलो तर १५-२० जणांचा एक घोळका आमच्या बंगल्याच्या आवरात शिरून आमच्याच बागेतल्या अशोकाच्या शेड्यांकडे नजर लावुन गहन चर्चा करण्यात मग्न झाला होता.
मी त्यांना हटकले तेव्हा त्यातल्या एकाने मला सांगितले की एक कावळा उडता उडता पतंगाच्या मांजाला अडकुन अशोकाच्या झाडाला लटकला होतात. मी त्यांना परवानगीशिवाय आत आले म्हणुन झाडले आणि घरात आलो. पण थोड्या वेळाने गलका परत वाढला म्हणुन परत बाहेर आलो. घोळक्यात कामधाम सोडुन सुमारे १०० जण गोळा झाले. पूर्ण वाढलेल्या अशोकाच्या शेंड्यावरऊन कावळ्याला कसे सोडवायचे याची मसलत माझ्या घराच्या अंगणात रंगली होती.
कावळा फारच नशीबवान... त्यांच्या जिवावरचा प्रसंग एका पक्षीप्रेमीने पाहिला म्हणुन ... कारण काही मिनीटातच अग्निशमनदलाची गाडी घंटा वाजवत दारात हजर.
अग्निशमनदलाच्या जवानांनी (बहुधा मनातल्या मनात कपाळावर हात मारत) गर्दी पाहुन भराभर हालचाली केल्या. प्रथम काही जण आमच्या गच्चीवरुन ३ मोठे बांबू एकत्र बांधुन शेड्यापर्यंत पोचता येत का अजमावु लागले. तरी पण कावळ्यापर्यंत पोचता येईना तेव्हा शेजारच्या घराच्या गच्चीवरून काही पक्षीमित्र आणि अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करू लागले.
एव्हाना आजुबाजुच्या इमारतीमधुन हे ’नाट्य’ बघायला आणखी १००+ जण गोळा झाले होते.
कावळ्याचे नशीब खरेच बलवत्तर...
सलग २ तासांच्या प्रयत्नानंतर कावळ्याची सुटका झाली तेव्हा जमावाने शिट्ट्या आणि टाळ्या वाजवल्या. मला मात्र दोन प्रश्न सतावत होते - ही भूतदया माणसे अडचणीत असताना कुठे जाते. आणि जमलेल्या घोळक्यातले किती पक्षीप्रेमी शाकहारी असतील?
-----------------------------------------------
गोष्ट दुसरी
सन १९८८-८९.
आय आय टी मुंबईचा परिसर
माझे काम संपले तोपर्यंत रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. मी हॉस्टेल कडे जाताना मुलांचा एक घोळका हातात कसले तरी फलक घेऊन रस्त्यावरून विरूद्ध दिशेने निघाला होता.
मी दुर्लक्षकरून तडक मेसमध्ये जेवायला गेलो. तेव्हा काही जणांनी मेसमध्ये एका निषेधसभेचे पोस्टर लावले होते.
मी चोकशी केली. तेव्हा कळले की,
एका वन्यजीवप्रेमीने हॉस्टेल क्र. ८ च्या आवारात एका छोट्या अजगराला पकडले आणि दुसर्या दिवशी बोरीवलीच्या उद्यानात सोडुन द्यायचा विचार करून एका पोत्यात बांधुन ठेवले. पण अजगर भुकेला राहिला तर काय म्हणुन त्याने सरळ मेस मधल्या मार्जारकुळातल्या एका मार्जार शिशुला पकडुन अजगराच्या तोंडी दिले आणि त्याच्या पोटापाण्याची व्यवस्था केली.
कॅम्पस मधल्या भूतदयावादी वन्यजीवप्रेमीना ही "अनैतिक" हकीकत समजली तेव्हा ते संतापले. त्यांनी मोर्चा काढुन निषेध सभा बोलवली होती...
मी तेव्हा पण कपाळाला हात मारून घेतला होता...