आज मला तिसर्यांदा ’मेडिकल लिटरेचर’ वाचु नको असा सल्ला मिळाला. हा सल्ला देणारे तिघेही डॉ आहेत आणि त्या तिघांबद्दल मला अतिशय आदर आहे.
पण मला याबाबत थोडे लाऊड थिंकींग करावेसे वाटते. -
० माझा मूळ स्वभाव - माझा मूळ स्वभाव अतिशय चौकस असल्याने का, केव्हा, कशाला अशा प्रश्नांची **पटतील अशी उत्तरे मिळणे** माझ्या एकंदर स्वास्थ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्त्वाचे आहे. ही जित्याची खोड मी जिवंत आहे तोपर्यंत तशीच राहणार आहे.
० मी जे ’मेडिकल लिटरेचर’ वाचतो त्याचा मी कोणताही गैरवापर करत नाही. उदा. इतरांना परस्पर सल्ले देणे, स्वत:ला किती कळते हे याचे प्रदर्शन करणे इत्यादि. पण मला कळलेली माहिती मला योग्य वाटल्यास सावधगिरीचा इशारा देउन प्रसृत करणे मला गैर वाटत नाही. तिचा उपयोग कुणी किती करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
० मी स्वत: अत्यंत संवेदनशील व्यक्ती आहे. मला स्वत:ला माझे शरीर जे सांगत असते ते सर्व डॉक्टरांना समजते का या विषयी मला शंका आहे.
० डॉक्टरांना त्यांचा त्यांचा जीवनसंघर्ष असतो याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे मी त्यांच्याकडुन मला पूर्ण क्षमतेने सल्ला/सेवा मिळेल अशी अपेक्षा ठेऊ शकत नाही. शिवाय त्यांना व्यवसायाने घालुन दिलेल्या मर्यादा पण असतात. मग माझ्या प्रश्नांची उत्तरे त्यामर्यांदाच्या बाहेर असल्यास मी हातावर घडी घालुन स्वस्थ बसायचे की माझ्या निसर्गदत्त कुवतीनुसार त्या प्रश्नांची उत्तरे शोधायची? ( आजवरच्या इतिहासानुसार मी शोधलेली ही उत्तरे आजवर तरी ’बरोबर’च निघाली आहेत.)
० मेडिसिन हे क्षेत्र किती खोल आणि व्यापक आहे याची अनुभूती ही मला आजवरच्या वाचनानेच आली आहे. माझ्या आकलन शक्तीच्या मर्यांदांची मला पूर्ण जाणीव आहे. (उदा - मला संख्याशास्त्र कळत नाही हे कबुल करायला मला लाज वाटत नाही. ) माझी ही धडपड डॉक्टरांची फी टाळण्यासाठी पण नक्कीच नाही.
जाता जाता दोन व्याख्यानांचे किस्से नमूद करावेसे वाटतात- त्यातले एक प्रा. श्रीराम अभ्यंकरांचे आणि दूसरे व्याख्यान डॉ. चंद्रशेखर यांचे. मला सारखे आठवते (विषय आता विसरलो आहे). त्यांनी सुरुवात शालेय बीजगणितापासुन केली आणि व्याख्यान अत्यंत गुंतागुतीच्या Algebraic Geometry तील तात्कालीन संशोधनापर्यंत नेऊन संपवले. त्या व्याख्यानात एक वाक्य ते पुन:पुन: उच्चारत राहिले - "This is all high school algebra". डॉक्टर चंद्रशेखरांनी त्यांचे व्याख्यान कृष्णविवरांवरील ताज्या संशोधनावरच दिले आणि साठाव्या मिनिटाला खिशातुन घड्याळ काढले आणि म्हणाले "Black holes are the most simple objects in our universe".
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा