शनिवार, १ जुलै, २०१७

प्राणायाम आणि संगीताचे पारंपरिक शिक्षणप्राणायामाबद्दल मला लहानपणापासून एक जबरदस्त आकर्षण आणि कुतूहल होते. पण तेव्हाच्या प्रचलित समज आणि गैरसमजामुळे (लहान मुलांनी प्राणायाम करू नये, तो ’गुरु’च्या मार्गदर्शनाखालीच करावा, इ० इ०) प्राणायामाचा पूर्ण फायदा कधीच मिळवता आला नाही. पण सध्या डॉ. दीक्षितांबरोबर करत असलेल्या एका लेखनप्रकल्पामुळे प्राणायामाचे आकर्षण परत एकदा जागे झाले आहे

डॉ. दीक्षितांनी सांगितलेल्या तंत्रानुसार मला प्राणायामाच्या सरावाचा फायदा तात्काळ झाला असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही. सध्या मला ७०%-८०% वेळा रक्तदाब आणि हृदयगति हूकमी (at will) कमी करून नियंत्रणात आणता येते. फेबुवर मी माझ्या प्राणायामोत्तर रक्तदाबाच्या आकड्यांचे फोटो शेअर केले आहेतच पण जनुकीय पातळीवर होणारा फायदा वेगळाच (तो मोजायचा खर्च रु २०,०००/ असल्याने सध्या तो विचार लांबणीवर टाकला आहे).

पण सांगण्यासारखा गमतीचा भाग आणखी वेगळाच आहे...

काही वर्षांपूर्वी उदय भवाळकरांच्याकडे धृपद शिकत असताना आम्ही आवाजाच्या तयारीसाठी पहाटे पाच वाजता तंबोरे घेऊन खर्जाचा सराव करत असू. पहाटे पाच वाजता उठून खर्जाचा अभ्यास करण्यामागे परंपरेचे एक तर्कशास्त्र आहे - पहाटेची वेळ मंद्रसप्तकातल्या सुरांच्या अभ्यासाठी आदर्श असते. मन स्वरावर एकाग्र करता येते वगैरे वगैरे.

पण खरी गंमत पुढे आहे...

थोडा खोल विचार केला तेव्हा असे लक्षात आले की खरजाचा अभ्यास हा एक उत्तम प्राणायाम आहे.  त्याचा शारीरपातळीवर होणारा परिणाम मात्र शरीर शांत करणारा आणि मेंदू बंद करणारा आहे. होय! मेंदू बंद करणारा आहे. प्राणायाम २० मि.पेक्षा जास्त वेळ करायचा नसतो. पण आमचा खर्जाचा अभ्यास  पहाटे पाचला सुरु होऊन सातवाजेपर्यंत चालत असे. म्हणजे प्राणायामाच्या ओव्हरडोसमुळे आम्ही खर्जाचा अभ्यास करून जेव्हा इतर रियाज करायचो तेव्हा आमचा मेंदू अर्धसुप्त किंवा पूर्णसुप्त नक्कीच असायचा. थोडक्यात ब्रेकवर पाय ठेवून गाडी ऍक्सिलरेट करण्याचा प्रकार...

सांगायचे तात्पर्य एव्हढेच की वर्षानुवर्षे मेंदूला inefficient करून मग तालमात्रांची गणिते सोडवत जे पुढे मोठे धृपदीये झाले ते केवळ थोरच नाहीत तर निसर्गाचा एक महान चमत्कार आहेत. एखादी कला काळाच्या ओघात जेव्हा टिकत नाही अशी ओरड जेव्हा होते तेव्हा त्यामागे डोके बंद करणारी शिक्षणपद्धती तर नसेल?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: