बुधवार, ३० ऑगस्ट, २०१७

श्राव्यपुस्तके


गेले काही दिवस मला ’श्राव्यपुस्तक’ या कल्पनेने खुप पछाडलेले आहे. हा प्रकार जाम आवडला.  blinklist आणि audible  या दोन सेवांचे मी एका वर्षाचे शुल्क मोजून सभासदत्व पण घेऊन टाकले. blinklist वरील पुस्तके संक्षिप्त स्वरूपात असतात तर audible वरील पुस्तके ही पूर्ण स्वरूपात असतात.

गमतीचा भाग म्हणजे, या नंतर पुस्तक श्रवणाचा जो सपाटा सुरु झाला, त्यामुळे माझा मीच कोड्यात पडलो - हे मला यापूर्वीच का सुचले नाही? एक प्रश्न असाही पडला की श्राव्यपुस्तके आवडायला लागली म्हणजे आता वय झाले असे समजायचे का?

काय असेल ते असो. गेली काही वर्षे पुस्तक वाचन वेगवेगळ्या कारणांमुळे इतके मंदावले की आता ते बंद पडेल की काय अशी भीति निर्माण झाली होती. त्यात फेसबुकावरचा वापर वाढल्यामुळे तिथल्या विद्वानांनी न्यूनगंड निर्माण केला होता, तो वेगळाच.  पुस्तके ठेवायला लागणारी घरातली उपयुक्त जागा कमी होणे, पाठदूखी, माझी वाचनाची आवडती खुर्ची मोडणे आणि तशीच खुर्ची परत न मिळणे, अशी अनेक कारणे वाचन कमी होण्यामागे आहेत. पण वाचन झाल्याची अस्वस्थता काय असते, हे मात्र शब्दात मांडता येणे आहे. माझी मुलगी शिक्षणासाठी परगावी असल्यामुळे निर्माण झालेला मोकळा वेळ ही अस्वस्थता जास्त गहिरी करतो.

सहसा अव्यंग व्यक्ती, दृष्य आणि श्राव्य या दोन संवेदनांचा वापर ज्ञानसंपादनासाठी करते. यात श्रेष्ठ काय यात मला पडायचे नाही. पण या दोन संवेदनांद्वारे ज्ञानग्रहणाची क्षमता मात्र सारखी नसते, हे मात्र नक्की. सध्याच्या युगात दृष्य संवेदनांद्वारे ज्ञानसंपादनाचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. पण  आमची पिढी आणि त्याअगोदरच्या कमीकमी एकदोन पिढ्या रेडीओ ऐकता-ऐकत लहानाच्या मोठ्या झाल्या. रेडीओने आमच्यावर केलेले संस्कार अनन्यसाधारण आहेत. माझ्या मेंदूचा श्राव्य-बाह्यक (auditory cortext) विकसित होण्यात रेडीओचा वाटा मोठा आहे. सकाळी वंदेमातरम्, उत्तमशेती, प्रादेशिक बातम्या, नाट्यसंगीत मग शालेय कार्यक्रम, शाळेतून घरी आल्यावर मराठी बातम्या किंवा न कळणार्‍या हिंदी/इंग्रजी बातम्या, मग नभोनाट्य, आपली आवड किंवा माझी आवड, युववाणी  हे ऐकतऐकत आमची पिढी घडली. यात  बाजारभाव, हवामानाचा अंदाज याबरोबर प्रासंगिक भाषणे किंवा चर्चा किंवा रात्रीच्या संगीतसभा, पुणे विद्यापीठाचे संस्कृत मधुन होणारे दीक्षांत समारंभाचे आणि इंदिरा गांधीच्या जाहिर सभांचे, क्रिकेट सामन्यांचे रेडीओवृत्तांत हे सगळे श्राव्य ज्ञानसंपादानाचे, मनोरंजनाचे विशेष मेनूआयटेम होते.

बरं तेव्हा रेडीओला रिमोट नव्हता. रेडीओ घरातली मोठी माणसे लावायची. मोठी माणसे सांगतील तेव्हा ऐकायचा आणि बंद करायचा. आपला रेडीओ बंद असेल तेव्हा शेजारच्यांचे रेडीओ त्यांचे काम करत असायचे. रेडीओने कुटुंब (टिव्ही मग कंप्युटर/स्मार्टफोनच्या तूलनेत) एका अदृष्य धाग्याने बांधले गेलेले असायचे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मुख्य म्हणजे आज माणसागणिक कंप्युटर/स्मार्टफोन असतो किंवा कुटुंबागणिक टिव्ही असतो तसे रेडीओच्या बाबतीत नव्हते. कारमध्ये रेडीओ होता पण तो काही अंतरावर होता त्यामुळे मोबाईल सारखा धोकादायक बनला नव्हता.

श्राव्यपुस्तकांना निश्चित काही मर्यादा आहेत. ही पुस्तके आकृत्या, कोष्टके, चित्रे किंवा फोटोशिवाय आपल्याशी संवाद साधतात पण प्रभावीपणे साधतात. ही पुस्तके चाळता येत नाहीत आणि घरातली जागा पण अडवून ठेवत नाहीत. संदर्भ म्हणून पण श्राव्यपुस्तके वापरता येणे अवघड आहे पण श्राव्यपुस्तके लोळत ऐकता येतात. ही पुस्तके हूंगता येत नाहीत पण त्यांना वाळवी लागत नाही.

तात्पर्य एव्हढेच की रेडीओच्या श्रवणातली एकाग्रता श्रवणेंद्रियांच्या विकासात महत्त्वाची ठरली. ही विकास पावलेली श्रवणेंद्रिये मधल्या काळात कुठेतरी हरवली आणि निपचित पडली पडली होती. श्राव्यपुस्तकांनी ती आता परत खडबडून झाली आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: