सोमवार, २५ जून, २०१८

एक (न घडलेला) विनयभंग!





दोन दिवसांपूर्वीचा प्रसंग.


आमच्या भागातल्या ’राजश्री’ या दूकानात खरेदी साठी गेलो होतो. माझी खरेदी झाल्यावर दोन्ही हातात घेतलेल्या वस्तू आणि डाव्या खांद्यावर भरलेली पिशवी सावरत आतल्या काऊंटरवर पैसे द्यायला जाऊन उभा राहीलो तेव्हा एक तिशीची बाई माझ्यापुढे हिशेब करत उभी होती. तिथल्या काउंटरवर दोघे तिघेजण जमले की दूकानात आत-बाहेर करणे अवघड असते. स्वत:चा नंबर सांभाळत आत बाहेर करणार्‍या नोकरांना रस्ता देताना माझ्या खांद्यावरच्या पिशवीचा माझ्या समोरच्या बाईला ( बहुधा नको त्या ठिकाणी) स्पर्श झाला. दोन्ही हातात वस्तू असल्याने पिशवी सावरणे पण शक्य नव्हते. मग मागे वळून ती बाई माझ्या रागाने बघायला लागली. तिच्या नजरेतला विखार अजून डोक्यातून गेला नाहीये.

तिची भयानक नजर मला हतबुद्ध करून गेली. माझं नशीब असं की काही बोलाचाली न होता ती बाई तिचा व्यवहार पूर्ण करून निघून गेली.

नंतर रात्रभर , जे घडले नाही ते घडले असते तर काय? या भीतीने झोप लागली नाही. मन खूप समजावत होते, "अरे, तुझ्या दोन्ही हातात वस्तू होत्या आणि त्या दूकानात सीसीटीव्ही आहेत. पण पुरूषाला कायम आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणार्‍या समाजाने साक्षी-पुरावे तपासायची तसदी घेतली असती का? जरी निर्दोषत्व सिध्द झाले तरी झालेली मानहानी कधीच भरून येत नाही... भारतीय समाजात तर नाहीच नाही.

अजून ही त्या बाईचा चेहेरा आठवला की अंगावर काटा येतो...