आज कै. चंद्रकांत गोखल्यांच्या हिशेबी स्वभावाची एक इथे आठवण वाचल्यावर माझी एक आठवण जागी झाली.
८३-८४ साल होते. माझ्या वडिलांना दोन मोठे हार्ट-ॲटॅक येऊन गेले होते. तेव्हाच्या प्रचलित उपचार-पद्धतीनुसार हार्ट-ॲटॅक आलेल्या व्यक्तीना कष्ट जास्त करायचे नाहीत, जिने चढायचे नाहीत, वजन उचलायचे नाही इ० निर्बंध पाळावे लागत. माझ्या वडिलांचा स्वभाव स्वस्थ न बसण्याचा होता आणि त्यामुळे आम्हाला कायम चिंता आणि भीतीने ग्रासलेले असायचे.
"गेलेला दिवस आपला समजा. येईल तो दिवस कसा असेल हे सांगता येत नाही" असे डॉक्टरांनी स्पष्ट सांगीतल्यामुळे वडिलांना एका जागी स्वस्थ बसविण्यासाठी आम्ही टिव्ही घ्यायचे ठरवले. पण टिव्हीसाठी पाच हजार कमी पडत होते. तेव्हा माझ्या नावावर एक पाच हजाराची एफडी होती आणि तेव्हा बॅंकेत १४-१५% व्याज मिळायचे. आईला ते ठाऊक असल्याने आईने माझ्यापुढे एक प्रस्ताव ठेवला की माझी एफडी मोडायची आणि ते पैसे टिव्हीसाठी वापरायचे. ते पैसे परत माझ्या नावाने गुंतवेपर्यंत आईवडिल मला बॅंकेइतकेच व्याज देत जातील. मी हा पर्याय स्वीकारला.
मग आमचा १ला टिव्ही ८४ साली आला आणि नंतर ८६ सालच्या डिसेंबरमध्ये वडिल गेले. पण नंतर आईने मला २-३ वर्षे व्याज दिले आणि पूर्ण रक्कम परत केली. आईने नंतर दरवर्षी जायबंदी झालेल्या जवानांच्या पुनर्वसनासाठी काम करणार्या संस्थेला जशी जमेल तशी मदत केली आणि मला पण करायला सांगितले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा