अनुलोम-विलोमविषयी थोडसे...
===============
===============
-- राजीव उपाध्ये
डॉ० दीक्षितांबरोबर प्राणायामावरील लेखमाला लिहून झाली त्याला आता वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे. आमच्या लेखमालेत प्राणायामातील टरफले (गूढता) काढून टाकल्याने हा सगळा उद्योग अनेकांना रुचला नाही किंवा डोक्यावरून तरी गेला (त्यामुळे लोकांना शहाणे करायचा माझा उत्साह पण संपला). पण या विषयाचे माझे कुतूहल पूर्वी इतकेच जागे असून स्वत:चे प्रयोग आणि ताज्या संशोधनाचा वेध घेणे माझ्या कुवतीनुसार चालुच आहे. या सगळ्या उपद्व्यापाचा महत्त्वाचा निष्कर्ष असा की प्राणायाम होण्यासाठी श्वसन जाणीवपूर्वक, एकाग्र आणि संथपणे होणेपणे आवश्यक आहे. यात "जाणीवपूर्वक" हे शब्द उपाग्रखण्ड (Prefrontal lobe) आणि "संथपणे" हे शब्द परानुकम्पी नाडीसंस्थेशी (para sympathetic nervous system) निगडीत आहेत. ज्यांना शरीरातील या दोन घटकांचे कार्य समजणार नाही त्यांना प्राणायाम कशी जादू करतो, हे कधीही कळणार नाही आणि प्राणायामाचा फायदा पण मिळवता येणार नाही. (अशा व्यक्ती प्राणायामाची कुचेष्टा करण्यात सहसा पुढे असतात. त्यांनी प्राणायामाच्या वाटेला जाऊ नये, अशी माझी स्पष्ट सूचना आहे.)
वरील लेखमाला लिहीताना मी केवळ स्वत:पाशी माझ्यापुरते काही अंदाज बांधले होते - त्यातला एक महत्त्वाचा असा, की एकच प्राणायाम पद्धत सर्वांना सारखीच उपयोगी पडेल असे नाही. याचा अर्थ असा की प्रत्येक व्यक्तीला योग्य अशी जास्तीत उपयोगी पडणारी पद्धत शोधता येणे आवश्यक आहे. त्यात पुन्हा ही पद्धत वस्तुनिष्ठपणे निवडता आली पाहीजे. मी बांधलेले अंदाज तपासण्यासाठी जे आवश्यक संशोधन करायला हवे ते अनेक कारणांनी मला सध्या शक्य नाही, या जाणीवेने अस्वस्थ असताना काही महत्त्वाचे दूवे हाती लागले आणि माझे अंदाज बरोबर ठरल्याचा आनंद झाला.
मी प्राणायामाच्या तंत्रात अनेक प्रयोग केले आणि काही पारंपरिक तंत्रे पण तपासली. या सर्व वेगवेगळ्या तंत्राची परिणामकारकता सारखी नाही. तसेच त्यात वेगवेगळे धोकेही आहेत. तरीही मला डॉ. दीक्षितांचे तंत्र आणि पारंपरिक अनुलोम-विलोम जास्त लाभदायक ठरत असल्याचे लक्षात आले. डॉ. दीक्षितांच्या तंत्राने मला रक्तदाब नियंत्रणात ठेवता येतो आणि हुकुमी झोप मिळवता येते ( मी घेत असलेल्या एका औषधाचा डोस (melatonin) आता शून्यावर आला आहे, तसेच सध्या कित्येक महिने रक्तदाबा्च्या औषधाचा डोस नगण्य आहे.)
अलिकडे मी पारंपरिक अनुलोम-विलोमची परिणामकारकता कशात असावी याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. योगतज्ञ यावर प्रकाश टाकताना काही वादग्रस्त कल्पनांचा आधार घेतात - चंद्र नाडी, सूर्य नाडी, वेगवेगळी चक्रे इ०
पण मला वर केलेल्या व्याख्येच्या चौकटीतच हे उत्तर सापडले. ते असे - दोन्ही नाकपुड्या मोकळ्या असताना फुप्फुसातील हवा बाहेर पट्कन टाकली जाते. त्यामुळे दोन्ही नाकपुड्यांनी संथपणे श्वसन थोडे अवघड बनते. एका नाकपुडीने श्वसन करताना हवा आत घेण्यास किंवा बाहेर टाकण्यास साहजिकच जास्त वेळ लागतो आणि ते आपोआप दीर्घ आणि संथ बनते. नाकपुड्या बदलण्याने कोणतेही चंद्र-सूर्य उगवत नसून, त्या क्रियेवर एकाग्रता झाल्याने उपाग्रखण्डाचे अधिपत्य श्वसनावर निर्माण होते. श्वसनाची गती संथ झाल्याने परानुकम्पी नाडीसंस्थेची हितकारक कार्ये चालु होतात.
यात आणखी महत्त्वाचा भाग असा की श्वसनाची गती नेमकी किती असावी याचे उत्तरही आधुनिक विज्ञानच आता देते. ही गती खुप कमी झाली तर परानुकम्पी नाडीसंस्था अति-उत्तेजित होऊन भ्रम, वेड किंवा मृत्यु उद्भभवू शकतो.
मी अलिकडेच https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC5575449/ या दुव्या वरील ताजे संशोधन वाचले. यात resonance breathing frequency ची कल्पना मांडली आहे. त्यात मिनिटाला सहा श्वास ही सरासरी resonance breathing frequency असल्याचे म्हटले आहे. व्यक्तीच्या शरीररचनेनुसार ही frequency बदलु शकते. एका मिनिटाला सहा वेळा श्वास घेतल्याने हृदतगतीची लवचिकता (heart rate variability) प्राप्त होऊन परानुकम्पी नाडीसंस्थेला योग्य तेव्हढीच चालना मिळते. मी अनुलोम-विलोम करतो तेव्हा अंत:श्वसन-अंतर्कुंभक (२-३ सेकंद) - बहिर्श्वसन हे एक चक्र १० सेकंदात पूर्ण होते म्ह० आपोआपच मिनिटाला सहा श्वास ही गती निर्माण होते. मला अनुलोम-विलोम लाभदायक का ठरतो याचे उत्तर अखेर सापडले.
लोक हो, कुचेष्टा थांबवा, आणि प्राणायामाकडे डोळसपणे बघा...