बुधवार, २० मे, २०२०

डी जीवनसत्त्व

डी जीवनसत्त्व
==========

काही वर्षांपूर्वी जेव्हा डी जीवनसत्त्वाबद्दल नवे ज्ञान निर्माण झाले आणि माझ्या वाचनात आले तेव्हा मी ते वाटायला सुरुवात केली होती. माझी तेव्हा यथेच्छ टिंगलटवाळी झाली.


इतकच नव्हे तर तेव्हा डॉ०ना न सांगता मी माझी डी जीवनसत्त्वाची चाचणी करून घेतली होती. आणि (प्रथमच केलेल्या) चाचणीत डी जीवनसत्त्व प्रचंड कमी आढळले होते म्हणून डॉ० ना दाखवले तेव्हा "न विचारता चाचणी केली" म्हणून डॉक्टरांनी कपाळाला आठ्या पाडून डोळे वटारले होते...पण आज मी शहाणा ठरलो आहे आणि निर्लज्जपणे स्वत: स्वत:चीच पाठ थोपटून घेताना मला अतिशय आनंद होत आहे.

या डी जीवनसत्त्वाने माझ्याबाबतीत झालेला एक महत्त्वाचा चमत्कार म्हणजे मला अचानक अंडी पचायला सुरुवात झाली. तेव्हापासून आजतागायत मला अंडी पोटात गेली नाही तर जीव कासाविस होतो. विश्वास बसत नसेल तर माझ्या बायकोला विचारावे...

ॲलोपथी समस्येच्या मुळाशी जात नाही असे बोलले जाते. पण जनुकीय पातळीवर काम करणारी औषधे आणि द्रव्ये मुळाशीच काम करतात अशी आता माझी ठाम समजूत आहे. डी जीवनसत्त्व जनुकीय पातळीवर आणि म्हणून असंख्य आघाड्यांवर काम करते.

अजुनही बरेच मूर्ख लोक डी जीवनसत्त्वाची चाचणी करायला, तसेच त्याचा पूरक पुरवठा करायला नाखूष असतात. सूर्यप्रकाशात हे जीवनसत्त्व तयार होत असले तरी सध्याच्या काळात सूर्यप्रकाश आणि तो मिळवण्यासाठी आवश्यक असलेला वेळ आणि जागेची अनुपलब्धता, कातडीचा वर्ण, अंग उघडे न टाकण्याबद्दलच्या (विशेषत: स्त्रियांच्या बाबतीत) आचरट कल्पना यामुळे आपण कायम याबाबतीत वंचित राहतो.

आज करोनाच्यासाथीमध्ये काही डॉक्टर डी जीवनसत्त्व आपल्या आजुबाजुच्या लोकांना भेट म्हणून वाटा असे सांगतात, तेव्हा आपले सरकार याबाबत मूग गिळून गप्प राहते याचे वाईट वाटते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: