सोमवार, २५ जानेवारी, २०२१

कृष्णाला माफ करा...

कृष्णाला माफ करा...

==============

आत्ताच तूनळीवर एक "प्रेरणादायी व्हिडीओ" बघितला. स्वप्ने बघून ती सत्यात उतरवण्यासाठी केलेल्या ढोर मेहनतीची ती एक कहाणी होती. स्वप्ने सत्यात आणायला कष्ट महत्त्वाचे आहेत, असा काहीसा संदेश या व्हिडीओमधून दिला गेला. कष्ट उपसले तर यश तुमचेच आहे, असे काहीसे तत्त्वज्ञान अशा त-हेच्या प्रेरणादायी कथनातून सतत दिले जाते.  पण यशामध्ये कष्टांशिवाय काही  महत्त्वाच्या घटकांचा समावेश होतो. हे घटक भ० गी० मध्ये शेवटच्या अध्यायात एका श्लोकात आहेत. माझ्यामते आणि आधुनिक जनुकशास्त्राच्या संदर्भात हा श्लोक अत्यंत महत्त्वाचा आहे. तो असा -

अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम्। विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम्।।१८.१४॥ 

अर्थ - योग्य जागा (पोषक वातावरण), प्रयत्न करणारा स्वत:, विविध साधने (रिसोर्सेस),  कष्ट आणि सर्वात शेवटी दैव किंवा नशीब हे यशासाठी आवश्यक घटक आहेत. 

आधुनिक जनुकशास्त्र तुमच्या क्षमता विकसित होण्यासाठी पोषक वातावरणाची, ताणमुक्त वातावरणाची गरज अधोरेखित करते. दूर्दैवाने भारतीय समाजाने, तसेच गीतेला डोक्यावर घेणा-या धर्मगुरूंनी या सर्वात महत्त्वाच्या श्लोकाला "फाट्यावर मारले" आहे.

अलिकडेच माझा आणि जनुकशास्त्राचा ब-यापैकी परिचय झाला. मला अजुनही खगोलशास्त्राऐवजी जनुकशास्त्र लोकाभिमुख झाले तर मानवाचे जास्त कल्याण होईल याची मला खात्री आहे. या अभ्यासाच्या पार्श्वभूमीवर मी यशाचे वरील लोकप्रिय तत्त्वज्ञान तपासले तेव्हा "कष्ट उपसले तर यश तुमचेच आहे"  हे धादांत खोटे आहे, असे लक्षात येते. 

कारण साधे आहे, 

अपार कष्ट = अपार ताण 

अपार ताण = वाढलेली कॉर्टीसॉल पातळी

वाढलेली कॉर्टीसॉल पातळी = जनुकीय आणि पेशीय बदल व त्यातून शारीरिक आणि मानसिक प्रकृतीची हानी   

शारीरिक आणि मानसिक प्रकृतीची हानी = अनारोग्य, वैफल्य इ० इ०

याला एक किंचित अपवाद आहे - तो म्हणजे अपार कष्टातून तुम्हाला जर आनंद मिळत असेल किंवा मेहनतीचा कैफ चढत असेल तर तुमचा संघर्ष थोडाफार सुलभ होतो.

अपार कष्ट करून धनुर्विद्या मिळवलेल्या एकलव्याला अंगठा गमवावा लागला, हे लक्षात ठेवा. हजार सूर्यांच्या तेजाची बरोबरी करणा-या कृष्णाचे जीवशास्त्राचे/जनुकशास्त्राचे ज्ञान शून्यच होतं! तेव्हा फळाची अपेक्षा ठेऊ नको म्हणून सांगणा-या कृष्णाला माफ करा...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: