सोमवार, ७ फेब्रुवारी, २०२२

एका भेटीची गोष्ट ७ फेब्रु० २०२२



एका भेटीची गोष्ट

==========
-राजीव उपाध्ये ७ फेब्रु० २०२२
मला काहीजणांनी आत्मकथा लिही असं सुचवलं आहे. आत्मकथा हे काही साधे सोपे काम नाही. सत्याशी प्रामाणिक राहायचे तर अनेक मर्यादा येतात. रुपकाचा आधार घेतला तर सत्याची तीव्रता कमी होते आणि ते बोथट बनते. शिवाय आपले सत्य पटले नाही की "वेडा ठरवायचे" प्रयत्न होतात, ती डोकेदूखी वेगळीच. उदा० एका जगद्विख्यात आणि मराठी समाजाच्या लाडक्या व्यक्तीच्या घरातील सासू-सुनेच्या वादाचे एकदा माझ्यापुढे प्रदर्शन झाले होते. अशा गोष्टी आत्मकथेत सांगायच्या म्हणजे मोठीच पंचाईतच असते. असो. पण आज अनेक कारणांमुळे राहून गेलेल्या एका प्रसंगाबद्दल लिहायचे आहे. ही आठवण लता मंगेशकरांच्या अंत्यविधीचे प्रसारण बघताना जागी झाली. ती मात्र मी माझ्याबाजूने जशीच्यातशी कोणतेही रुपक न वापरता सांगणार आहे.
 
आज इतक्या वर्षांनी मागे वळून बघितल्यावर विजय भटकर या व्यक्तीबद्दल माझ्या शब्दकोशात एकही चांगला शब्द नाही, असे लक्षात येते. फारच ओढूनताणून सांगायचे झाले तर "नीच" किंवा "हलकट" इतका एकच शब्द या व्यक्तीबद्दल पुरेसा आहे. एखाद्याचे पंख कापायचे आणि उडून दाखव म्हणून सांगायचे ही या माणसाची विकृत खासियत!

माझे संगणक संगीतामधले काम गुंडाळल्यानंतर माझ्याकडे विजय भटकरांनी एका नव्या प्रकल्पाची जबाबदारी सोपवली. तो प्रकल्प म्हणजे कुमारकोशाचा प्रकल्प. हा प्रकल्प सीडॅकला मिळावा याची जबाबदारी माझ्यावर टाकली होती. पण मी परत एकदा हे आह्वान घ्यायचे ठरवले.

नंतर या प्रकल्पाच्या निमित्ताने विश्वकोषाचे तेव्हाचे संपादक कै० मे० पुं० रेगे यांच्याशी नियमित भेटीगाठी चालू झाल्या. नंतर आमचा हळुहळु रॅपो पण तयार झाला. विश्वकोशाच्या संगणकीकरणासाठी सरकार उत्सूक असल्याचे रेगे मला वारंवार सांगत असत.

या प्रकल्पाचा पाठ्पुरावा करत असताना रेगे मला एकदा म्हणाले की, "अरे या शिवसेनेच्या सरकारचे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे फार सख्य नाही. तुमची संस्था जर आमच्या सांस्कृतिक खात्याच्या मंत्र्यानी प्रत्यक्ष बघितली तर सरकार अनुकूल निर्णय जास्त लवकर घेईल असे वाटते. आपण नवलकरांना एकदा सीडॅक दाखवूया!" नवलकर तेव्हा महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री होते.

आपल्या प्रकल्पासाठी चक्क एक मंत्री संस्थेत येणार याचा मला भयानक आनंद झाला. मी हर्षातिशयाने सगळ्यांना वेड्यासारखा सांगत सुटलो. पण कदाचित माझी ती चूक ठरली. नंतर मला रेग्यांबरोबर पाठपुरावा करताना आणखी एक नवा विषय मिळाला - नवलकर कधी येणार?

नंतर रेग्यांनी मात्र एक भेटीची संभाव्य तारीख मला सांगितली. मी ती परत वेड्यासारखी जाहिर केली. पण अचानक ती भेट रद्द झाली. तसं का झालं असावे याचे माझे काही अंदाज आहेत पण त्याविषयी उघड बोलणे योग्य होणार नाही.

यानंतर मात्र माझ्यावरचा दबाव वाढू लागला- "हे काय झालं? तू तर म्हणत होतास की मंत्री आपल्याला भेट देणार आहेत. कुठे आहेत नवलकर?" या भडिमारामुळे साहजिकच मी पण घायकुतीला आलो. मी माझी अस्वस्थता रेग्यांना बोलून दाखवली, ते मला म्हणाले की "हे बघ मी एकदा तुला प्रमोद नवलकरांकडे घेऊन जाईन. तेव्हा तू त्यांना तुमच्या संस्थेच्यावतीने भेटीचे आमंत्रण दे".

पुढे माझ्या नशीबाने हा योग लवकरच प्रत्यक्षात आला. या प्रकल्पाच्या निमित्ताने मी रेग्यांना एक परिषद करावी असे सुचविले होते. रेग्यांनी या कल्पनेला उत्साहाने उचलून धरले. सुरुवातीला सीडॅक आणि विश्वकोश निर्मिती मंडळ यांच्या सहयोगाने ही परिषद करायचे ठरले. पण अचानक भटकरांनी यातून काढता पाय घेतला आणि सीडॅक यात सहभागी होऊ शकणार नाही, असे एका मिटींगमध्ये जाहिर केले. मी चमत्कारिक पेचात सापडलो. पण रेग्यांनी माझी अवघड स्थिती ओळखली. ते मला म्हणाले, "हे बघ सीडॅकला सहकार्य शक्य नसले तरी ही परिषद होईलच. आपण तुला एक्स्पर्ट म्हणून बोलवू!".

पुढे ही परिषद ठरली आणि मला रितसर आमंत्रण पण आले, पण आमंत्रण देताना विजया राजाध्यक्षानी मी कुणाबरोबर पेपर लिहायचा हे परस्पर ठरवून (कुणाच्या तरी सांगण्यावरून हे नक्की) मला तसा जणु आदेशच दिला. या आदेशाने माझा फ्युजच उडाला. मी काळा की गोरा हे या बाईनी बघितले नाही आणि ज्या व्यक्तीशी माझा कसलाही संबंध नाही, त्या व्यक्तीबरोबर पेपर लिहायची सक्ती मला संयोजक कसे काय करू शकतात? तसेच या परिषदेचे कळल्यावर एक प्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ मी त्यांच्या "मार्गदर्शना"खाली पेपर लिहावा म्हणून दबाव टाकत होते. ("तू ओरिजिनल पेपर लिहू नको" हे त्यांचे वाक्य मी अजून्ही विसरलो नाही.) मी परत रेग्यांकडे जाऊन चक्क थयथयाटच केला. त्यावर ते मला म्हणाले, की "मी काय करायचे ते बघतो. पण तू स्वतंत्र पणे पेपर लिही."

पुढे ही कॉन्फरन्स मुंबईला झाली आणि माझा मराठीतला स्वतंत्र पेपर प्रसिद्ध झाला. राज्य मराठी संस्थेने प्रकाशित केलेल्या ग्रंथात तो समाविष्ट पण झाला.

कॉन्फरन्सचे निश्चित झाले तेव्हा रेगे मला म्हणाले की, "तू मुंबईत येशील तेव्हा मी नवलकरांची अपॉइंटमेंट घेऊन ठेवतो. तुला मी त्यांच्याकडे घेऊन जाईन. मग तू त्यांना सीडॅक भेटीचे आमंत्रण दे. फक्त यावेळी जास्त कुणाला सांगू नको." मी यावेळेला पडत्या फळाची आज्ञा मानून धोका पत्करायचे ठरवले. मी यावेळेला कुणालाच या प्लॅनविषयी सांगितले नाही.

कॉन्फरन्स संपली आणि दूस-या दिवशी ठरल्या प्रमाणे रेगे मला त्यांच्या लाल दिव्याच्या गाडीमधून प्रमोद नवलकरांच्या बंगल्यावर घेऊन गेले. तो माझा लाल दिव्याच्या गाडीमधला १ला आणि शेवटचा प्रवास...
प्रमोद नवलकरांना भेटायला मी अत्यंत साध्या कपड्यात (म्ह० नॉन कॉर्पोरेट वेषात - नो टाय, नो शूज) गेलो होतो. बरोबर कोणतेही अधिकृत निमंत्रण किंवा कागदपत्र नव्हते. प्रमोद नवलकर कचेरीत फोनवर अधिका-यांवर खेकसतच आले. पण रेग्यांना बघितल्यावर त्यांचा पारा उतरला. त्यांनी मी औपचारिक निमंत्रण दिल्यावर कोणताही वेळ न दवडता डायरी बघून एक आठवड्यानंतरचा दिवस सांगितला. मी पण तो मुकाट्याने स्वीकारला. मी लगेचच पुण्याला परतलो.

रेग्यांनी दिलेल्या "हिण्ट"मुळे मी प्रमोद नवलकरांना भेटलो आणि त्यांना संस्थाभेटीचे आमंत्रण दिले व त्यांनी ते स्वीकारले आहे या विषयी मात्र कुणाशीही बोलायचे नाही असे ठरवले होते. रेग्यांनीच सांगितले होते की "भेट निश्चित झाली की तुला नवलकरांच्या कार्यालयातून अधिकृतपणे निरोप येईल. मगच तू सगळ्यांना सांग."
झालं. आठवडा पुढे सरकू लागला आणि निरोप येईना तशी माझ्या मनातली उत्कंठा, दड्पण आणि भीति वाढायला लागली. शेवटी नियोजित दिवसाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी ४ वाजता मला पुणे जिल्हापरिषद कार्यालयातून फोन आला की "उद्या ठरल्याप्रमाणे मंत्रीमहोदय तुमच्या संस्थेला भेट देतील. तयारीत राहा."
मी फोन आदळला पण हर्षातिशयाने. तडक भटकरांचे ऑफिस गाठले आणि त्यांना सांगितले. त्यांचा चेहेरा खाड्कन उतरला आणि बघण्यासारखा झाला होता. ते माझ्या नजरेला नजर देऊ शकले नाहीत. त्यांनी माझ्याकडे न बघता मला विचारले,

"Who is going to receive him at the airport?"

मी त्यांच्याकडे प्रतिप्रश्नार्थक नजरेने बघितले. मनातून मला स्वत:ला जायला आवडले असते, पण भीडेखातर गप्प बसलो. कोणत्याही सरकारी संस्थेत यशस्वी व्हायचे म्हणजे पुढे-पुढे करता आले पाहिजे आणि आपण केलेल्या कष्टांचे श्रेय आपण न घेता इतर श्रेयलंपटाना देता आले पाहिजे. मी तिथेच मार खायचो.

"Coordinate it with Mr. Parelkar". भटकरांनी मला फर्ममावले. परेलकर म्हणून एक गृहस्थ आमच्या संस्थेचे तेव्हा रजिस्ट्रार होते.

मी परेलकरांकडे गेलो तेव्हा त्यांचा पण बातमीवर विश्वास बसला नाही. त्यांनी तर मी विमानतळावर जाऊ नये असे स्पष्टच सांगितले. आता मात्र मी या हलकटपणामुळे मनातून खूप चिडलो. मी तडक रेग्यांना फोन लावला.
रेग्यांनी मला अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितले की "मंत्र्यांच्या स्वागताला तूही जाऊ नको आणि मी पण जात नाही. माझा वासुदेव जाईल". वासुदेव म्हणजे वासुदेव जोशी, रेग्यांचे विश्वकोश निर्मिती मंडळातील स्वीय-सचिव.
नवलकरांची भेट पार पडली पण विजय भटकरांच्या नाराजीची छाया त्यावर स्पष्ट पडलेली होती. या भेटीत नवलकरांनी उत्साह भरपूर दाखवला पण कुमारकोश प्रकल्पाच्या मंजुरीबद्दल नवलकरांनी एक चकार शब्द काढला नाही. मंजुरीची लढाई अजुनही बाकी होती. मंत्र्यांचे स्वागत करायला स्वत: न जाता स्वत:च्या पी०ए० ला पाठवणा-या रेग्यांची ताकद आणि भटकरांचा हलकटपणा मला परत एकदा अनुभवायचे योग शिल्लक होते. पण त्या विषयी नंतर कधीतरी...
May be an image of 3 people and people standing
Bharat Mumbaikar, Padmakar Pandit and 2 others