राजीव उपाध्ये - सप्टेंबर २००८
धर्मांतर हा माझ्या कुतुहलाचा विषय आहे. त्यात हिंदूचे धर्मांतर हा तर विशेष
कुतुहलाचा विषय. हिदूंना वाटत असलेल्या धर्मांतराच्या चिंतेची मला नेहमीच गम्मत
वाटत आली आहे.
काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ते गणेशोत्सवाचे दिवस होते. पुण्यातील एका
मानाच्या गणपतीतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात एका विद्वानाचे "धर्मांतराची
समस्या" या विषयावर प्रवचन होते. वर म्हटल्याप्रमाणे, हा कुतुहलाचा विषय
असल्यामुळे मी या कार्यक्रमास उपस्थित राहिलो होतो. शुभ्र वेष, शुभ्र दाढी आणि
तुळतुळीत टक्कल असलेले प्रमुख वक्ते पूर्वाश्रमीचे अमेरीकेत एमेस केलेले संगणक
अभियंते होते. आता त्यांनी आपले आयुष्य धर्मप्रचारासाठी वाहून घेतले होते. त्या
विद्वान महाशयानी आपल्या व्याख्यानाची सुरुवात चातुर्वण्याच्या "नव्या"
व्याख्येपासून करायला घेतली. चातुर्वण्यातील प्रत्येक वर्णाचा नवा अर्थ
उपस्थितांपुढे तल्लीन होऊन उगाळत असताना एका विघ्नामुळे या महाशयांची निरूपण
समाधी भंग पावली.
तो दिवस गणपती विसर्जानाचा होता. सदर कार्यक्रम ज्या ठिकाणी चालू होता तेथे
बर्याच रहदारीचा एक रस्ता आहे. नेमकी त्यावेळी रस्त्यावरून एक मिरवणूक जाऊ
लागली होती. ढोल-ताशांच्या गजरात प्रवचन-स्थळी लावण्यात आलेला ध्वनिक्षेपक
निरूपयोगी ठरला आणि साहजिकच माननीय वक्त्यांची निरूपण-समाधी भंग पावली.
त्यांच्यातला दूर्वास तत्क्षणी जागा झाला आणि चडफडत त्यांनी शापवाणी उच्चारली -
"These all are real shudras!" एका विद्वानापुढे निर्माण झालेले विघ्न, तो
विघ्नहर्ता पण दूर करू शकत नव्हता. त्या नव-शूद्रांना आपण कोणते पाप केले याचे
भान नव्हते. मनातल्या मनात मी पण टिळकांवर चिडलो होतो. त्यांनी पुच्छविहीन
माकडांच्या हाती दिलेले कोलित ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवण्यास उपयोगी
पडले पण त्याने एक नवे शूद्रत्व निर्माण केले होते...
हिंदूच्या धर्मांतराचा मुद्दा जेव्हा जेव्हा ऐरणीवर येतो तेव्हा तमाम
हिंदूत्ववादी एक गोष्ट लक्षात घ्यायला विसरतात.
हिंदूधर्माकडे आकर्षित होऊन तो स्वीकारणार्यांची संख्या किती आणि त्याचा
तिरस्कार निर्माण होऊन तो सोडणार्यांची संख्या किती? या मूळ प्रश्नाला आणखी
काही पदर आहेत. उदा. एखाद्या हिंदू नसलेल्या व्यक्तीने हिंदू
व्हायचे ठरवले तर वर्णाश्रम व्यवस्थेत त्याचे नवे स्थान कोणते? या प्रश्नाचे
समाधानकारक उत्तर मला अजून तरी मिळाले नाही. असो.
मला असं वाटतं, धर्माचं यश तो किती वर्षे टिकून आहे यापेक्षा तो किती पसरला आहे
या निकषावर तपासायला हवं. धर्म टिकून राहतो तो त्याने निर्माण केलेल्या
मानसिकतेच्या आणि दहशतीच्या जोरावर आणि तो वाढतो त्याने सोडवलेल्या
प्रश्नांच्या जोरावर.
काही दिवसांपूर्वी मी रिक्षातून जात होतो. रिक्षा, टेंपो किंवा ट्रकमध्ये जी
वाङ्मय निर्मिती दिसते ती गुंफाचित्रांचा आधुनिक आविष्कार आहेत असे मला वाटते.
मी ज्या रिक्षातून जात होतो ती येशूच्या वचनांनी आणि चित्रांनी सजवली होती
. त्यामध्ये एका छोट्या चित्राकडे माझे लक्ष वेधले गेले
. त्या चित्रात वधस्तंभावरील येशू रेखाटला होता. पण हा येशू आजवर बघितलेल्या
येशूंपेक्षा निराळा होता. कारण त्याच्या अंगावर जे उत्तरीय होते ते मात्र
भगव्या रंगाचे होते. पाव खाऊन हिंदू बाटले गेले पण भगवे उत्तरीय घेतलेला येशू
मात्र न बाटता येशूच राहिला होता...
Regards
Rajeev Upadhye
---------------------------
www.yuyutsu.biz
http://rajeev-upadhye.blogspot.com/
--------------------------
1 टिप्पणी:
लेख वाचला, आवडला देखील, पण परिपूर्ण असा नाही वाटला...(हे तुम्हास सांगण्या इतका मी मोठा नाही), कारण हा विषय एवढ्या मोठा आणि गंभीर आहे, त्यामुळे कदाचित थोडक्यात आटोपून घेतलेला विषय पूर्ण असा नाही वाटला. तुमची लेखणी आणि कार्य असेच उजाळत जाऊ....धन्यवाद...!!!
टिप्पणी पोस्ट करा