सोमवार, २३ मार्च, २००९

मंगळ, शनी व हर्षलची आगामी भ्रमणे

(सूचना - सर्व राशी अंश सायन आहेत. जिज्ञासूनी आवश्यकता असल्यास निरयन करून
घ्यावेत.)

आजच सकाळी CNN कडून एक मेलबॉक्समध्ये बातमी येऊन थडकली आणि ती अशी :-

"-- An airplane crashed near Butte, Montana, killing at least 17 people, the Federal Aviation Administration confirmed"

विमान कोसळणे ही मामुली आणि 'हे काय रोजचेच आहे' म्हणून दूर्लक्ष करण्यासारखी घटना नाही. पण या बातमीमुळे मी आकाशातील ग्रह बघण्यास उद्युक्त झालो हे मात्र खरे. एवढा मोठा अचानक भीषण अपघात म्हणजे कुठे तरी मंगळ आणि शनी कार्यरत असणार।' अचानक', 'अकस्मात' 'उद्‌ध्वस्त करणे' ही हर्षलची खास वैशिष्ट्ये आणि म्हणून गोचरीचे ग्रह तपासले. ते असे आहेत -

दिनांक २३ 3 २००९

मंगळ ६-१२ मीन
शनी १७-१५ कन्या (व)
हर्षल २३-१० मीन

म्हणजे मंगळ लवकरच म्हणजे १५ एप्रिल रोजी हर्षलशी २४-१६ मीनेत युती करणार आहे. त्या अगोदर मंगळाचा शनीशी प्रतियोग ५ एप्रिल रोजी १६-२२ मीनेमध्ये होत आहे. साहजिकच संपूर्ण एप्रिल महिना मानसिक क्षोभ, तडकाफड्की निर्णय, कलह, अपघात आणि इतर चिंता निर्माण करणार्‍या घटनानी भरलेला राहील.

कोणतेही नवीन कार्य, प्रकल्प शक्यतो संपूर्ण एप्रिलमध्ये हाती घेऊ नये असा माझा सर्वाना सल्ला आहे. कारण तसे केल्यास त्या कार्यावर या अशुभ योगांची छाया कायमची पडेल.

मंगळ, शनी व हर्षल यांनी आगामी काळात जो धुमाकूळ घातला आहे तो गेल्या १० जुलैला झालेल्या शनी-मंगळ युतीच्या दर्जाचाच आहे. त्या योगामध्ये दिल्ली, बंगलोर येथे झालेल्या घातपाती कारवाया विसरून चालणार नाही.

मंगळ, शनी व हर्षलच्या भ्रमणांचा सर्वात जास्त त्रास कोणाला?

या प्रश्नाचे उत्तर मध्यबिंदू ज्योतिषाच्या मदतीने अचूक देता येते. आज (म्हणजे दि. २३ मार्च २००९ रोजी) मंगळ आणि हर्षलचा मध्यबिंदू १४-४४ मीने मध्ये आहे. तो १५ एप्रिलरोजी हर्षलशी २४-१६ मीनेत युती करे पर्यंत सुमारे १० अंशाचे क्षेत्र प्रभावित करतो. केवळ मीनेतीलच नव्हे तर मिथुन, कन्या, धनु या राशी मध्येपण १४-४४ ते २४-१६ या अंशात्मक क्षेत्रावर मंगळ आणि हर्षलचा मध्यबिंदू केंद्र आणी प्रतियुती या योगांद्वारे प्रभाव टाकतो.

त्यामूळे ज्यांच्या पत्रिकेत १४-४४ ते २४-१६ मीन, मिथुन, कन्या, धनु हे क्षेत्र प्रभावित झाले आहे - म्हणजेच पत्रिकेतील एखादा ग्रह या अंशात आहे त्यांना एप्रिल महिना कटकटीचा ठरणार आहे. त्यात जर रवि, चंद्र, लग्न व ख-मध्य हे या क्षेत्रात पडले असतील तर या ग्रहांच्या भ्रमणांची फले जास्तच त्रासदायक मिळतील.अपघात आणि गुन्हेगारी हा या घटनांचा स्थायीभाव असेल.

आता उदाहरण म्हणून जन्मरवीचे घेऊ.

रवीची गती रोज अंदाजे १ अंश इतकी असते. मंगळ-हर्षल युतीपर्यंत म्हणजे १५ एप्रिल पर्यंत रवी १० अंश पुढे सरकेल.

रवि दरवर्षी ५ मार्च रोजी मीनेमध्ये १४-४४ अंशावर येतो. तसेच दरवर्षी ७ सप्टेंबर रोजी कन्या राशीत, ५ जून रोजी मिथुन राशीत व ६ डिसेंबर रोजी धनु राशीत १४-४४ अंशावर येतो. तसेच १५ मार्च रोजी २४-१६ मीनेत, १५ जून रोजी मिथुन राशीत, १६ डिसेंबर रोजी धनु राशीत व १७ सप्टेंबर रोजी कन्या राशीत २४-१६ अंशावर
येतो.

तेव्हा ज्यांचे जन्मदिनांक ५ -१५ मार्च, ७ -१७ सप्टेंबर, ५ -१५ जून व ६ -१६ डिसेंबर या दरम्यान आहेत, त्यांच्या जन्मरवीशी गोचर मंगळ आणि हर्षलचा मध्यबिंदू युती, प्रतियुती, व केंद्र हे योग करतो. इतर ग्रहांची Janus 4.१ या सॉफ्टवेअरच्या मदतीने अशीच गणिते करून भाकीतात अचूकता आणता येते.


मंगळ-हर्षल=जन्मरवि या समीकरणाचा अर्थ एबर्टिनने पुढीलप्रमाणे दिला आहे.

"A sound physique capable of sudden extra-effort, a person who is able to act quickly.- A sudden adjustment to new circumstances and conditions in life, injury, accident, operation, birth."

तसेच मंगळ-हर्षल=जन्मचंद्र या समीकरणाचा अर्थ एबर्टिनने पुढीलप्रमाणे दिला आहे.

"Energy or power of life governed by feeling, the desire to achieve something very big, ambition.- Special effort expended by a woman (birth). – Accident or injury happening to girls and woman."

चंद्र हा भावनांचा कारक ग्रह असल्यामुळे भावनिक क्षोभाच्या घटना असा या समीकरणाचा अर्थ लावता येतो.

मंगळ-हर्षल=जन्मलग्न या समीकरणाचा अर्थ एबर्टिनने पुढीलप्रमाणे दिला आहे-

"An excitable person with the inclination to commit acts of violence.- An upsetting event, accident, physical injury, (arrest)."

मंगळ-हर्षल=जन्मख-मध्य या समीकरणाचा अर्थ एबर्टिनने पुढीलप्रमाणे दिला आहे-

"An inflexible character, the desire for independence, a person "putting the pistol to someone's head", an act of violence, extraordinary achievements.- The execution of drastic and violent measures, injury, accident , operation."


टीप - मध्यबिंदूची समीकरणे कशी मांडतात हे समजावून घेण्यासाठी या ब्लॉगला पुन:
जरुर भेट द्या.

सोमवार, १६ मार्च, २००९

अर्धकेंद्र योग

आमचे विद्वान ज्योतिर्विद मित्र धोण्डोपन्त आपटे यानी त्यांच्या ब्लॉगवर केलेले खालिल विधान आम्हाला अतिशय धक्कादायक वाटले. ते विधान असे, "तसेच अर्धलाभयोग, अर्धकेंद्रयोग वगैरे फलिताच्या दृष्टीने गौण योग सुद्धा आहेत."

अर्धलाभ योगाचा माझा अभ्यास कमी आहे (म्हणून त्याविषयी बोलणे उचित नाही), पण संपूर्ण मध्यबिंदू ज्योतिषाचा डोलारा अर्धकेंद्र योगावर उभा आहे असे म्हटले तरी चालेल. पुढे जाउन सांगायचे झाले तर अर्धार्धकेंद्र योग (२२.५ अंश) पण मध्यबिंदू ज्योतिषात कुशल ज्योतिषी सर्रास वापरतात.

अर्धकेंद्र योगाचा विचार करताना पुढे दिलेल्या गोष्टी प्राधान्याने विचारात घ्याव्या लागतात-

० अर्धकेंद्रयोगात कोणते ग्रह आहेत?

म्हणजे दोन शीघ्रगती ग्रह किंवा दोन अतिमंदगती ग्रह (युरे., नेप., प्लुटो) आपापसात अर्धकेंद्र योग करत असतील तर ते गौण ठरतात. पण एक मंदगती ग्रह आणि एक शीघ्रगती ग्रह असा योग होत असेल तर अर्धकेंद्रयोग केंद्र योगाइतकेच ताकदवान ठरतात. उदा - रवि-शनी, रवि-युरेनस, रवि-नेपच्युन, रवि-प्लुटॊ (गोचरीने प्लुटॊ रवीशी अर्धकेंद्र योग करत असेल तर मानहानी, आयुष्याची दिशा बदलणे इत्यादि घटना घडताना दिसतात). माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव न्यायालयीन प्रकरणात (सेंट किट्स?) गुंतले गेले तेव्हा प्लुटो गोचरीने त्यांच्या जन्मरवीबरोबर अर्धकेंद्र योग करत होता. माझ्या एका परिचिताने याच योगावर आपले MBBS संपल्यावर चांगले मार्क असुनही मेडिसीन सोडून genetics मध्ये जायचा निर्णय घेतला.

बुध-नेप अर्धकेंद्र योगातील व्यक्ती एकतर खॊटे बोलतात किंवा स्वत: स्वत:ची दिशाभूल करण्याकडे त्यांची प्रवृत्ती असते.

० अर्धकेंद्र योगासाठी २ अंश अथवा त्याहून कमी दीप्तांश घेतले तर हमखास त्यांचे
प्रत्यंतर येताना दिसते.

अर्धकेंद्र योगाचा एक विलक्षण अनुभव नुकताच आला. माझा एक मित्र माझ्याकडे पत्रिका बघायला आला होता. बोलता बोलता मी सहज त्याच्या काही मित्रांची चौकशी केली. तेव्हा त्याने आपल्या एका मित्राचे वैवाहिक जीवन अत्यंत अस्थिर बनल्याचे सांगितले. मी अधिक चौकशी केल्यावर असे कळले की आमच्या या मित्राची बायको अलिकडे (४-५ वर्षे) हिस्टरीक होते व हिंसक बनते. मला उत्सुकता निर्माण झाली आणि अंदाज केला की पत्रिकेत चंद्र-प्लुटॊचा केंद्र अथवा अर्धकेंद्र योग असला पाहिजे. त्यावर मी माझ्या मित्राला फोनवरून या जोडप्याची जन्मतारीख इ. माहिती मागवायला सांगितले. ती अशी -

बायको नवरा
जन्म- ४ सप्टे १९७५ १८ जुलै १९७३
वेळ - १०-५५ रात्र ११-१५ सकाळी
स्थळ - मुंबई पुणे


या जोडप्यात बायकोच्या पत्रिकेत चंद्र-प्लुटॊ अर्धकेंद्र हा योग असून शनीच्या भ्रमणात म्हणजे साडेसातीत तो तीव्रफलदायी बनला.

पत्रिकामेलन या अंगाने विचार करण्यासाठी वरील जोडप्याचे उदाहरण अतिशय उत्तम आहे. शिवाय शनी-नेपचूनचा मध्यबिंदू जन्मरवीशी अर्धार्धकेंद्र योग करतो जो चिकट आजारपण दाखवतो. पण याचा विचा्र पुढे कधितरी...

रविवार, १५ मार्च, २००९

एबर्टिनचे मध्यबिंदू ज्योतिष- ३ (क्रमश:)

एबर्टिनच्या मध्यबिंदू जोतिषाचा अभ्यास करण्यासाठी काही उपयुक्त साधने

पूर्वी, म्हणजे संगणक नसताना, एबर्टिनच्या मध्यबिंदू जोतिषाचा अभ्यास कागदावर गणिते करून केला जायचा. आता संगणक उपलब्ध झाल्याने त्यातला किचकटपणा आता गेला आहे. म्हणून मध्यबिंदू ही कल्पना समजल्यावर योग्य सॉफ्टवेअरच्या मदतीने हे तंत्र आपल्याला अभ्यासता येईल.

मध्यबिंदू ज्योतिषाचा आज अनेक व्यावसायिक सॉफ्ट्वेअरमध्ये समावेश केलेला आहे. मी स्वत: Janus 4.1 हे सॉफ्ट्वेअर वापरतो पण त्याची किंमत खूप ($150/ फक्त) आहे. म्हणून सुरुवातीच्या अभ्यासाला उपयोगी अशी काही उदार व्यक्तीनी फुकट उपलब्ध करून दिलेली साधने वापरणे योग्य ठरेल.

ऍलन एडवॉलचे ऍस्ट्रोविन (Astrowin) हे सॉफ्ट्वेअर फुकट असून या अभ्यासासाठी
उत्तम आहे. त्याची लिंक इथे देत आहे -
http://www.softpedia.com/get/Others/Home-Education/Astrowin.shtml

याशिवाय आणखी एक् सॉफ्टवेअर पाश्चात्य ज्योतिष-अभ्यासकांत खूप प्रसिद्ध आहे. त्याचे नाव Astrolog. हे सॉफ्टवेअर पण फुकट उपलब्ध असुन या http://www.astrolog.org/astrolog.htm लिंकवरून उतरवून (डाउनलोड करून) घेता येईल. Astrolog मध्ये मध्यबिंदूची प्राथमिक गणिते करून मिळतात. या सॉफ्ट्वेअरवर अवलंबून असणार्‍याना एबर्टिन-तंत्र अधिक सुलभपणे अभ्यासता यासाठी मी स्वत: एक सॉफ्टवेअर १९९९ साली लिहीले. ते त्याच्या मॅन्युअलसह http://www.geocities.com/hollywood/academy/7519/hamw3.0.zip या लिंकवर फुकट उपलब्ध करून दिले आहे.

याशिवाय या तंत्राची अभ्यासकांना उपयुक्त चर्चा खालील वेबसाईटवर उपलब्ध आहे -

१. http://astromedicine.com/health.htm
२. http://www.cosmoastrology.com/
३. http://junojuno2.tripod.com/
४. http://members.tripod.com/~junojuno2/urast.htm
५. http://www.uranian-institute.org/uranbiblio.htm

मंगळवार, १० मार्च, २००९

एबर्टिनचे मध्यबिंदू ज्योतिष - २ (क्रमश:)

मध्यबिंदू कसे काढतात?


मागच्या लेखात मी राशी-भाव कल्पनांना तार्किक आधार नाही असे विधान मी केले होते. ते बर्‍याच जणाना आवडले नसायची शक्यता आहे. पण आज मध्यबिंदू या कल्पनेचा परिचय करून घेतल्यावर ते आपल्याला समजावून घेता येईल.

मध्यबिंदू ही कल्पना पत्रिका मांडायच्या पाश्चात्य पद्धतीच्या मदतीने जास्त चांगली समजते. पाश्चात्य पद्धतीच्या गोलाकार मांडणीत पत्रिकेतील प्रत्येक अंश स्पष्ट मांडता येतो. त्यामुळे योग (aspects) अत्यंत व्यवस्थित दाखवता येतात. तसेच राशींचे आणि भावांचे आरंभ आणि अंत पण व्यवस्थित कळतात. दोन किंवा अधिक पत्रिका एका वेळेस बघून त्या जुळतात की नाही व गोचर भ्रमणांचे जन्मग्रहांशी होत असलेले योग हे पण बघणे अतिशय सोपे होते.

साहजिकच कोणतीही दिशाभूल होण्यास आणि त्यामुळे भाकित चुकण्यास पाश्चात्य पद्धतीच्या गोलाकार मांडणीत कमीत कमीत वाव असतो. खाली दिलेल्या आकृतीवर टिचकी मारल्यास पाश्चात्य पद्धतीची पत्रिका मोठी करून बघता येईल.


आकृती .

गोलाकार पत्रिकेत ग्रह आणि राशी लिहिण्यासाठी चिन्हांचा वापर करतात. ही चिन्हे माहिती असणे या साठी आवश्यक आहे. ही चिन्हे आंतरराष्ट्रीय प्रमाण म्हणून मान्यता पावली आहेत. ही चिन्हे खरे ज्योतिषीच समजतात. मुहूर्त काढणारे भिक्षुक ही चिन्हे समजू शकत नाहीत. त्यांना ज्योतिष किती कळते हाही एक मॊठा प्रश्नच आहे.

मध्यबिंदू काढायच्या दोन पद्धती आहेत एक म्हणजे गणिताने आणि दूसरी म्हणजे भूमितीने (यात कागदावर पत्रिका मांडून ग्रह मांडले जातात व मध्यबिंदू काढले जातात.)

आकृती


समजा एका पत्रिकेत रवि ० अंश मेष असा आहे आणि चंद्र ० अंश तूळ राशीत आहे तर रवि आणि चंद्र यांचा मध्यबिंदू काढण्यासाठी ग्रहांचे अंश-राशी पूर्ण अंशात लिहिले जातात. येथे रविचे पूर्ण अंश ० येतात तर चंद्राचे पूर्ण अंश १८० येतात.

चंद्राचे आणि रविचे अंश या दोन्ही अंशांची बेरीज केली करून दोनाने भागले तर जो भागाकार येतो तेथे रवि-चंद्राचा मध्यबिंदू मिळतो. त्यात १८० अंश मिळवले असता आणखी एक मध्यबिंदू मिळतो.

वर आकृती ब मध्ये मंगळ-हर्षल हा मध्यबिंदू १९ अंश ३८ कला मीनेत आहे. या मध्यबिंदूशी रवीची युति होत आहे. गुरू-नेपच्यूनच्या मध्यबिंदूशी पण रवीची युति होत आहे.

कागदावर मध्यबिंदू काढायची पद्धत सध्या संगणकामुळे वापरली जात नाही. ग्रहांचा असा मध्यबिंदू काढल्यानंतर होणारा सर्वात मोठठा फायदा म्हणजे हे मध्यबिंदू ग्रह (राहू-केतूंसारखे) म्हणून वापरता येतात. कारण या बिंदूना पण ग्रहांप्रमाणे आवर्तन (भ्रमणकाल) असते. हे बिंदू वक्री ग्रहांप्रमाणे वक्री आणि मार्गी होतात या आवर्तनातून दोन ग्रहांच्या जोडीचे गुणधर्म आणि त्यांचा पत्रिकेतील आणि जातकाच्या आयुष्यातील आविष्कार तपासता येतो.

लग्न, ख-मध्य (दशमभाव आरंभबिंदू), ते प्लुटॊ पर्यंत एकंदर ७८ मध्यबिंदू पत्रिकेत तयार होतात. प्रत्येक बिंदूचा मानसिक, शारीरिक व सामाजिक पातळीवर आविष्कार होत असतो. याचे खुलासेवार अर्थ एबर्टिनने आपल्या कोझी (Combination of Stellar Influences) या पुस्तकात दिले आहेत.

क्रमश:

मंगळवार, ३ मार्च, २००९

एबर्टिनचे मध्यबिंदू ज्योतिष-१

भारतीय ज्योतिषांच्या भविष्यकथनाच्या काही खोडी आहेत. त्यापैकी एक खोड म्हणजे ज्या गोष्टीला 'भारतीय' असे लेबल डकवता येईल अशा सर्व गोष्टींविषयी कमालीचा दूरभिमान. भारतीय ज्योतिषापलिकडे ज्योतिषाची अनेक प्रभावी तंत्रे आहेत याचे आपल्या ९९% ज्योतिषांना भानच नसते. त्यामुळे त्यांचा वापर तर दूरच... असो.

आजपासून मी अशाच एका ज्योतिषातील तंत्राविषयी लिहीणार आहे. हे तंत्र पश्चिमेत ज्योतिष अभ्यासकांत अतिशय प्रसिद्ध आहे. भारतीय ज्योतिषांनी मात्र त्याची दखल घेतलेली नाही. या तंत्राच्या अनुषंगाने कोणताही अभ्यास, चर्चा होताना इथे दिसत नाही. फार काय या लोकप्रिय ज्योतिष-तंत्रासंबंधीची पुस्तके भारतात अजून मला बघायला पण मिळालेली नाहीत.

पारंपरिक ज्योतिषांतील अनेक वादग्रस्त कल्पनांना बाजूला करून ज्योतिषातील 'ग्रहांच्या भौमितिक रचना' या मध्यवर्ती कल्पनेचा विस्तार करणारे "मध्यबिंदू ज्योतिष" हे आल्फ्रेड विटे आणि राईनहोल्ड एबर्टिन या दोघा जर्मन ज्योतिषांनी विकसित केले.

१८७८ साली जन्माला आलेला आल्फ्रेड विटे व्यवसायाने सर्व्हेअर आणि हौशी आकाश-निरीक्षक होता. त्याने १ल्या महायुद्धात भाग घेतला होता. लढाईच्या धुमश्चक्रीत तो सैन्याच्या हालचालींची भाकीते वर्तवत असे. त्याची बरीचशी भाकीते चुकू लागल्यामुळे त्याने ज्योतिषातील प्रचलित कल्पना तपासायला सुरुवात केली. ज्योतिषात प्रचलित असलेली 'योग' ही कल्पना संकुचित असल्याचे त्याच्या लक्षात आले आणि त्याने 'मध्यबिंदू' आणि काही काल्पनिक ग्रहांची कल्पना मांडली. त्यापैकी मध्यबिंदू ही संकल्पना अनेकजणानी सखॊल अभ्यास केल्यामुळे जास्त प्रसार पावली. याला मोठा हातभार डॉ राईनहोल्ड एबर्टिनने लावला.
डॉ राईनहोल्ड एबर्टिन

डॉ राईनहोल्ड एबर्टिन हा स्वत: एक (माणसांचा) डॉक्टर होता. माणसाच्या आयुष्यात दिसून येणार्‍या अनेक चक्रीय घटनांनी त्याला आकाशस्थ ग्रहांच्या भ्रमणांशी सांगड घालण्यास प्रवृत्त केले. पारंपरिक ज्योतिषात वापरल्या जाणार्‍या अनेक कल्पना - उदा. भाव, राशी या भ्रांत (किंवा अ-वास्तव!) कल्पना आहेत असे त्याचे मत होते. कारण, सायन आणि निरयन ही दोन राशीचक्रे प्रचलित ज्योतिषात वापरली जातात. एकंदर भाव पद्धतींची संख्या १५ पेक्षा जास्त आहे. असे असताना कोणती भाव पद्धत वापरायची? बरे जी फलादेश करण्यास उपयोगी पडते ती वापरायची असे जरी मानले तरी ज्योतिषाकडे येणार्‍या प्रत्येक जातकासाठी प्रत्येकवेळेस सर्व भावपद्धती तपासणे व्यवहार्य नसते. कालनिर्णयाबाबत वापरण्यात येणार्‍या 'दशा' पद्धती बद्दल असेच सांगता येइल. दशा पद्धतीला कोणताही वास्तव आधार नाही. केवळ अनुभव येतो या भाबड्या समजुतीमुळे 'दशा' वापरल्या जातात. आमच्या ऋषीना जास्त अक्कल होती ही अशीच एक भारतीयांची भाबडी समजूत 'दशा' जीवंत राहण्यास कारणीभूत ठरली आहे. परिणामत: लहान मुले जशी बर्‍याचवेळा चुकीची पद्धत वापरून गणितांची बरोब्बर उत्तरे काढतात, त्याप्रमाणेच दशा पद्धतीच्या अचूक भाकीतांबद्दल सांगता येईल. ज्योतिषातील अ-व्यवहार्य कल्पना टाकून दिल्यावर, संकल्पनांची पुनर्बांधणी करून ज्योतिषाची उपयुक्तता वाढवता येईल का याचा विचार राईनहोल्ड एबर्टिनने केला.
कित्येक हजार पत्रिकांचा अभ्यास केल्यावर त्याच्या असे लक्षात आले की


० केवळ युति, केंद्रादि योग मानवी जीवनातील घटनांचा मेळ घालण्यास पुरेसे पडत नाहीत.
० भाव, राशी या कल्पनाना तार्किक आधार नाही
० ग्रहांच्या विशिष्ट रचनानी पत्रिकेत अन्यत्र संवेदनशील बिंदू (sensitive points) तयार होतात. हे बिंदू ग्रहांच्या गोचर भ्रमणांनी सक्रिय होतात तेव्हा तदानुषंगिक ग्रहांच्या तत्त्वानुसार घटना घडायची शक्यता असते.

एखाद्या भौमितिक रचनेत अंतर्भूत होणार्‍या ग्रहांच्या समूहाचा एकत्रित विचार हे एबर्टीनच्या तंत्राचे मोठ्ठे बलस्थान! एखाद्या लज्जतदार पाककृतीची चव जशी त्यामध्ये वापरलेल्या मसाल्यातील घटकांवर अवलंबून असते त्याप्रमाणे आयुष्यात घडणार्‍या घटनेत वेगवेगळी बीजतत्त्वे (key principles) प्रकट होतात. या तत्त्वांचा एकत्रित विचार ग्रहांच्या बीज-तत्त्वाना एकत्र मांडून करता येतो आणि संभाव्य घटनेच्या स्वरुपाची रचना करता येते.

कोणतेही तंत्र योग्य साधनांशिवाय पूर्णपणे उपयोगात आणता येत नाही. ग्रहांच्या समूहाचा एकत्रित विचार अचूक पणे करण्यासाठी "९० अंश- तबकडी" (90 degree dial) आणि एखाद्या कालावधीतील ग्रहांच्या भ्रमणांचा विचार करण्यासाठी "४५ अंश आलेखीय पंचांग" (45 degree graphical ephemeris) या दोन साधनांची पण एबर्टीनने निर्मिती केली. आज संगणकाच्या उपलब्धतेमुळे ही दोन्ही साधने जास्त परीणामकारकपणे वापरता येतात.

आपल्या तंत्राचा अभ्यास सोपा व्हावा यासाठी एबर्टीनने अनेक पुस्तके लिहिली. त्यातील The Combination of Stellar Influences हे पुस्तक "कोझी" या नावाने पश्चिमेतील ज्योतिर्विदांमध्ये प्रसिद्ध आहे. मध्यबिंदू ज्योतिष नव्याने अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्याला या पुस्तकामुळे लीलया आत्मसात करता येते.

कोणत्याही गूढ गोष्टीना (अंतर्ज्ञान, साधना, गुरुकृपा) थारा नसल्यामुळे एबर्टिनचे मध्यबिंदू ज्योतिष झपाट्याने लोकप्रिय झाले. आजही भारतात याचे अभ्यासक तर जेमतेम मूठभरच असतील. ज्योतिषाचे मराठी अभ्यासक या तंत्राच्या अभ्यासाला प्रवृत्त झाले तर एकंदरच ज्योतिषाची कुचेष्टा कमी होण्यास मदत होईल अशी आशा वाटते.

राजीव उपाध्ये
ईमेल - upadhye.rajeev@gmail.com