गुरुवार, २२ मार्च, २०१२

बंधुराजांसाठी पत्रिकामेलन

माझ्या एका मामेभावाला सध्या "कर्तव्य आहे". हा माझा भाऊ चांगला शिकलेला आहे म्हणजे अमेरीकेत चांगल्या विद्यापीठात संगणक अभियांत्रिकीत एमेस केलेला आहे. शिवाय मायक्रोसॉफ्ट मध्ये गेले ५-६ वर्षे तरी टिकून आहे. माझ्यावर त्याच्यासाठी पत्रिकामेलन करायची जबाबदारी आलेली आहे. हे आमचे बंधुराज ज्या मुलींची माहिती पसंत पडेल त्या मुलींचे जन्मटिपण मला कळवतात. मग मी त्याला पत्रिका जुळते की नाही हे कळवतो.

नुकतेच माझ्या भावाने मला चार मुलींची जन्मटिपणे पाठविली आणि माझे मत मागितले. मी त्याला दोन पत्रिका जुळत असल्याचे आणि उरलेल्या दोन जुळत नसल्याचे सांगितले. आणि नेमके झाले असे की न जुळणार्‍या पत्रिकेतली एक मुलगी त्याला खूप आवडली होती तिच्या इतर माहितीवरून. त्याने मला मेल पाठवून विचारले की "दादा, मला तू नको म्हटलेल्या मुलींपैकी एक खूप आवडली आहे. तू का नाही म्हणतोयस ते जरा खुलासेवार सांगशील का?"

वास्तविक या मुलीला ज्योतिषाच्या दृष्टीकोनातून नाही म्हणताना मला अवघड गेले. त्याचे कारण सर्वाना कळावे म्हणून या लेखाचा प्रपंच.

या मुलीच्या मूळ पत्रिकेत टोकाचे चांगले आणि त्रासदायक असे योग आहेत (अर्थात चांगले योग असल्यामुळेच तीचे आयुष्य असे घडले की ती माझ्या भावाला पसंत पडली. यात शंकाच नाही). अशा परिस्थितीत उपवर वधू आणि उपवर मुलगा यांच्या पत्रिकेतले प्रत्येक ग्रह दूसर्‍या पत्रिकेतील ग्रहांची कसे interact करतात हे आधुनिक ज्योतिषी बघतात आणि संभाव्य नातेसंबंधातील चढ-उतारांचा अंदाज बांधतात. या संभाव्य नातेसंबंधाची कल्पना जातकाला दिल्यावर जातकाने आपल्याला काय झेपेल वा काय झेपणार नाही याचा विचार करून निर्णय घेणे अपेक्षित असते. पण आपल्याकडे हा निर्णय ज्योतिषाला घ्यायला भाग पाडले जाते. असो.

या माझ्या भावाला आवडलेल्या मुलीच्या मूळ पत्रिकेत काही महत्वाचे योग आहेत ते असे -
* ख-मध्याजवळ ६ अंशातील शुक्र-मंगळ युती, या मंगळाचा हर्षल बरोबर केंद्र योग, शुक्राचा नेपच्यून बरोबर नवपंचम योग आणि प्लुटो बरोबर लाभ योग (हे दोन्ही योग जोरदार आहेत). एकंदर मामला नुसता रोमॅंटीकच नाही तर या व्यक्तीची सेक्सची गरज above average आहे हे नक्की. पण शुक्राने तयार केलेली शुक्र=मंगळ -शनी ही रचना कामसुखात वैफल्य आणि असमाधान दाखवते.
* लग्नाशी अंशात्मक युतीमुळे ताकदवान झालेला शनि - हा शनी ताकदवान असल्यामुळे मूळ पत्रिकेतील कोणत्या मध्यबिंदू रचनेत शनि अंतर्भूत आहे हे पहावे लागते. ते बघितले असता षोडषांशात शनि=शुक्र-नेपच्यून तसेच शनि= रवि-शुक्र या मध्यबिंदू रचना तयार झालेल्या दिसतात. या पण रचनांची फले वरीलप्रमाणेच म्हणजे कामसुखात वैफल्य आणि असमाधान दाखवते.
* चंद्र-प्लुटो २ अंशातील केंद्रयोग - भावनिक प्रक्षोभाची प्रवृत्ती
* बुध-नेपच्यून केंद्रयोग - स्वत:ला किंवा इतरांना फसवत राहण्याची प्रवृत्ती.

थोडक्यात या मुलीची एकदोन तरी प्रेमप्रकरणे बर्‍यापैकी पुढे (सर्व अर्थानी!) जाऊन फसलेली असणार.

पण एव्हढ्यावर ही पत्रिका मी तरी नाकारणार नाही. कारण लग्नानंतर अनेक लोक बदलू शकतात. पण त्यासाठी एकमेकांच्या पत्रिका खर्‍या अर्थाने पूरक असायला हव्या. त्यासाठी वर म्हटल्या प्रमाणे एका पत्रिकेतील प्रत्येक ग्रह दूसर्‍या पत्रिकेतील ग्रहांशी कसे interact करतो ते पहायला हवे. यासाठी या पत्रिका एकमेकांसमोर मांडल्या असता पुढीलप्रमाणे ग्रहयोग दिसतात-यात डावीकडील चिन्हे माझ्या भावाच्या पत्रिकेतील ग्रहांची यादी आहे. मधली यादी ग्रहयोगांची चिन्हे आहेत. आणि उजवीकडील चिन्हे मुलीच्या पत्रिकेतील ग्रह दर्शवतात (ही सर्व चिन्हे आंतरराष्ट्रीय असून ज्याना कळत नाहीत तो खरा ज्योतिषी नाही). या यादीवर जर नीट नजर टाकली तर असे दिसेल की मुलीच्या पत्रिकेतील बलिष्ठ शनि माझ्या भावाच्या रवि आणि शुक्राशी युति करतो.

माझ्या मते ही युति या दोघांच्या संसाराला किंवा नातेसंबंधाना मारक आहे कारण यात पत्नी डॉमिनेटींग होतेच शिवाय कुटुम्बसुख कमी होऊन आर्थिक अडचणी कायम उभ्या राहतात. आता कुटुम्बसुख कमी म्हणजे भांडणे होतीलच असं नाही तर एकमेकांचा सहवासाच्या संधी कमी. नवरा-बायको वेगवेगळ्या गावात काम करत असतील तर वरील प्रमाणे शुक्राचे योग असलेली व्यक्ती आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ राहण्याची शक्यता अमेरीकेसारख्या देशात कमीच..

तेव्हा मी माझ्या भावाला दिलेला पुढे न जाण्याचा सल्ला तुम्हाला पटतोय का ते पहा...

२ टिप्पण्या:

साधक म्हणाले...

ते सगळं खरं हो. पण त्या मुलीची जन्मवेळ बरोबर आहे हे कशावरुन? तुमच्या भावाला प्रोसेस बदलायला सांगा. काही वेळा लग्नानंतर मुली सांगतात की आम्ही दिलेली जन्मवेळ अंदाजे होती म्हणून. मग काय सगळे ग्रह आणि कोष्टके केरात. आधी वेळ शुद्ध करुन घ्या.लोकांना अंदाजे वेळ आणि अचूक वेळ यातला फरक समजत नाही. त्या मुलीला नकार देण्या आधी तिची वेळ कन्फर्म करुन घ्या. करेक्शन पद्धतीने व तिला विचारुन दोन्ही पद्धतीने.

Rajeev Upadhye म्हणाले...

साधक,

तुम्ही मांडलात तो मुद्दा बरोबर आहे. आजकाल पत्रिका मॅनिप्युलेट करायची प्रवृत्ती वाढली आहे. पण यातली व्यावहारीक अडचण अशी की आधुनिक पद्धतीने जन्मवेळ दूरुस्त करायची पद्धत बरीच वेळखाऊ आहे. मुलीचा माझ्याशी संपर्क नसल्यामुळे जन्मवेळ दूरुस्त करणे जवळजवळ अशक्य आहे. दूसरा भाग असा की जन्मवेळ चुकीची असली तर लग्न, ख-मध्य आणि चंद्र बदलतील पण बाकीचे ग्रह बदलणार नाहीत. त्यामुळे या केस मध्ये बरेचसे ग्रह-योग तसेच राहतात. त्यामुळे माझा निष्कर्ष बदलत नाही.

प्रतिसादाबद्दल आभार आणि पाडव्याच्या शुभेच्छा!

-राजीव उपाध्ये