सोमवार, ९ एप्रिल, २०१२

दशा पद्धतीबद्दल माझे काही आक्षेप

भारतीय ज्योतिषात जातकाच्या पत्रिकेतल्या एखाद्या घटनेचा कालनिर्णय करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या दशा आणि महादशा मला खटकतात. मी माझ्या प्रॅक्टीसमध्ये त्या वापरत नाही. "ऋषीमुनीना जास्त अक्कल होती" या गृहीतकावर ठाम श्रद्धा असणारी मंडळी मला शिव्या देतील आणि त्या झेलायची माझी आनंदाने तयारी आहे.

या दशा पद्धतीचा शोध घेत असताना मला अशी माहिती कळली की ४० पेक्षा अधिक दशापद्धती अस्तित्वात आहेत. पण विंशोत्तरी दशा ज्योतिषी अधिक वापरतात. म्हणजे वेदनाशामक ओषधे अनेक उपलब्ध आहेत पण ब्रुफेन जास्त वापरले जाते. पण ब्रुफेन परिणामकारक ठरत नाही तेव्हा डॉक्टर इतर पर्यायांचा विचार करतात. तसा (भारतीय) ज्योतिषी इतर पर्यायांचा विचार करताना दिसत नाहीत.

पण मला जो मुद्दा मांडायचा आहे तो वेगळाच आहे. दशा पद्धतीमध्ये ज्या क्रमाने दशा येतात तो क्रम कसा व का अस्तित्वात आला आणि दशांच्या आवर्तनाचा कालावधी कसा निश्चित केला गेला आहे, याबद्दल कोणीच कुठे बोलताना दिसत नाही. म्हणजे आहे हे असे आहे, पटलं तर बघा. अशातला प्रकार. ज्योतिषाला शास्त्र म्हणून प्रतिष्ठा मिळायला ज्या अडचणी येतात, त्यापैकी ही एक.

दूसरा मुद्दा असा की जास्त अक्कल असणारे हे शास्त्रकार आज जर पुनर्जन्म घेऊन परत जन्माला आले तर या दशा पद्धती आहेत तशा स्वीकारतील की त्यात सुधारणा करतील? या सुधारणा करताना ते तर्काचा आणि आधुनिक साधनांचा आधार घेतील की आपापल्या लहरीपणे करतील? हा प्रश्न उपस्थित करण्याचे कारण म्हणजे हर्षल, नेप्च्यून आणि प्लुटो या अलिकडे सापडलेल्या ग्रहांचा दशा पद्धतीत अंतर्भाव करायचा कोणताही प्रयत्न किंवा विचार झाल्याचे मला तरी ठाउक नाही. ज्या हवामान खात्याचे अंदाज आपण चेष्टेवारी नेतो ते हवामान खाते सुद्धा त्यांच्या वापरातील मॉडेलमध्ये कालानुरुप बदल करत असते. डॉक्टर सुद्धा ब्रुफेनचा उपयोग होत नसेल तर वेगळे पर्याय शोधतात. "तुम्ही आणि तुमची डोकेदुखी" म्हणून सोडून देत नाहीत. कोणतही उपयुक्त मॉडेल अथवा डिझाइन हे विस्तारक्षम असायलाच हवं...

सांगायचा मुद्दा एव्हढाच की दशापद्धत ही कल्पनाविलासावर आधारीत असून त्यात सुधारणेला वाव नाही कारण तिचा विस्तार कालानुरुप होऊ शकत नाही. आज अस्तित्वात असलेल्या ४०हून अधिक दशापद्धती अशा विस्तारक्षम मॉडेल मधून विकास पावल्या आहेत का, याचे उत्तर आत्ता तरी नाही असेच द्यावे लागेल.

मात्र गोचर पद्धतीवर आधारीत कालनिर्णय करताना त्यात कालानुरुप मूळ गृहितकांशी सुसंगत असा विस्तार झालेला आहे कारण हर्षल, नेपच्यून, प्लुटो या ग्रहांच्या भ्रमणांचा अंतर्भाव त्यात झालेला आहे. गोचर भ्रमणांवर आधारीत कालनिर्णय हा कल्पनाविलासावर आधारित कालनिर्णय नाही.

तेव्हा "ऋषीमुनीना जास्त अक्कल होती" असा युक्तीवाद कोणी करायला लागला तर त्यात किती तथ्य आहे हे कळणे तुम्हाला फारसे अवघड वाटायला नको.

1 टिप्पणी:

Rajeev Upadhye म्हणाले...

माझे एक मित्र (आय आय टी मधील) श्री मंगेश महाजन यांनी मला वरील लेखावर खालील प्रतिक्रिया एफबी वर कळवली - " I have studied dasha paddhati for more than 25 years with various masters in India, and I do not want it to be popular. there is no need for it to be acknowledged as a science.
There are very good reasons why it should not become popular.

As a fact those who are skilled with dashas desire that people should forget them. Many top masters I learned from like Dwaraknaath Oza, Kaliyur Narayan, Narasimhaswami, Annapurna R., and Maya chatopaddhyay... all had one opinion... We hope people forget dasha paddhati."