रविवार, ११ मार्च, २०१२

गणपतीचा शोध

लोकहो,

लहानपणी मी गणपतीभक्त होतो. याचे प्रमुख कारण लंक्यांच्या स्कॉलरशिपच्या क्लास मध्ये संकष्टीला आणि गणेशोत्सवात अथर्वशीर्षाची २१ आवर्तने व्हायची. तेव्हापासून बर्‍यापैकी नियमित पणे अथर्वशीर्षाची आवर्तने मी करत असे. पण "गणपती विघ्नहर्ता नाही तो विघ्नकर्ता आहे, तेव्हा भजायचे असेल तर दूसर्‍या देवाला भज" असे आई म्हणायची. आईला असे कसे विचारले तर उत्तर देता येत नसे मग मला आईचा राग यायचा. पण मी मात्र माझी गणेशभक्ती मी नेटाने पुढे चालु ठेवली होती.

पुढे मी पुण्याला टिळक विद्यापीठात संस्कृत मध्ये विशारद (बीए) करायला जाउ लागलो. दूसर्‍या वर्षी आम्हाला वैदिक साहित्य अभ्यासायला होते. शिकवायला प्रा. सुचेता परांजपेबाई होत्या. त्यांनी आपल्या पूजाविधींमधले अनेक मंत्र निरर्थकपणे शतकानुशतके जपले जात असल्याचे सांगितले. उदा. मंत्रपुष्पांजलीचा आणि गणपतीचा काहीही संबंध नाही, हे कळले तेव्हा मी उडालोच. परांजपेबाईनी असेही सांगितले की वेदांत गणपती कुठेही नाही आणि केवळ गणपती या शब्दामुळे "गणांनां त्वा गणपतिं..." ही ऋचा गणपतीच्या पूजेत ओढून ताणून लोकांनी वापरायला सुरुवात केली. पण हे काहीच नाही, पुढे जे कळले त्यामुळे माझा गणपतीवरच्या श्रद्धेला सुरुंग लागला. परांजपे बाईनी सांगितले की गणपती ही नीच देवता आहे, सूर्य, अग्नि, विष्णु या वैदिक देवतांप्रमाणे ती उच्च देवता नाही. यावर मी वर्गात बाईना प्रश्न केला की नीच देवता म्हणजे काय तर त्यांनी सांगितले की ती अनार्यांची देवता आहे, जसे सोट्या, म्हसोबा, वेताळ या जशा नीच देवता आहेत. मी उडालोच आणि दूसर्‍याक्षणी माझी गणपती वरची श्रद्धा पार उडाली. आई मला जे सांगत होती, त्यात वावगे नसावे असे वाटू लागले.

यानंतर जवळजवळ वीस-बावीस वर्षे गेली. अचानक प्रा. दामोदर कोसंबी या प्रखर बुद्धिमत्तेच्या विद्वानाने लिहीलेल्या मिथ अ‍ॅण्ड रिअ‍ॅलीटी या पुस्तकाचा मराठी अनुवाद वाचत असताना रंजक माहिती कळली की गणपती हा शंकरापासून झालेला पुत्र नव्हे. (म्हणजे तो शंकर-पार्वतीचा अनौरस पुत्र ठरतो.) पुराणकथांमागे आजच्या नीतिमत्तेला न झेपणारे वास्तव लपलेले असते याचा हा एक दाखला होता. याच पुस्तकात लोकदैवतांचे ब्राह्मणीकरण कसे होते याची रोचक चर्चा कोसंबीनी केली आहे. त्यामुळे गणपतीचे काळाच्या ओघात ब्राह्मणीकरण अर्थात status upgradation कसे झाले असावे याचा अंदाज बांधणे फारसे अवघड जात नाही.

तरीही गणपती ही नीच देवता आहे याचा मला अधिकृत पुरावा हवा होता आणि तो मिळवण्यासाठी मी तडफडत होतो. गणपती हा विघ्नकर्ता म्हणजे त्रासदेणारा. ही आईने सांगितलेली माहिती खरी की खोटी हा प्रश्न अधून मधून सतावायचा. पण त्याचेही उत्तर मला काळाच्या ओघात मिळायचे होते. दरम्यान मिसळपाव वरील एक सदस्य श्री श्रावण मोडक यानी लोकायत वाचायला सांगितले. बहुतांश लोकांची अशी समजूत असते की प्राचीन भारतात एकच संस्कृती अस्तित्वात होती ती म्हणजे वैदिक संस्कृती. पण तसे नसून त्यावेळेस वैदिक संस्कृतीला समांतर अशी म्हणजे दासांची (अनार्यांची) संस्कृती पण अस्तित्वात होती ती म्हणजे लोकायत.

अचानक स रा गाडगीळ यांनी लोकयताचा मराठीतून करून दिलेला परिचय वाचनात आला. त्यात गणपतीच्या शूद्रत्वाचे अधिकृत दाखले त्यांनी दिले आहेत. हे दाखले अनेक धर्माग्रंथांचे आहेत. त्यातले महत्त्वाचे म्हणजे मनुस्मृती आणि याज्ञवल्क्य यांच्या स्मृती - हिंदू लॉचे महत्त्वाचे आधारग्रंथ.  गणपती हा विघ्नकर्ता आहे हे अनेक ग्रंथ अधोरेखित करतात.

एक शोधवर्तूळ पूर्ण झाले. माझी आई बरोबर ठरली. ती आज हयात असती तर तिला नक्कीच आनंद वाटला असता.

जाता जाता - गणपती अथर्वशीर्षाचा आणि अथर्ववेदाचा काहीही संबंध नाही अशी माहिती नुकतीच "लोकदैवतांचे विश्व" या रा. चिं. ढेर्‍यांच्या पुस्तकात मिळाली.

मी मात्र आता गणपतीला माझ्या घरातून केव्हाच हद्दपार केला आहे.


पी.एस. २८ एप्रिल २०१२
गणपतीला मी हद्दपार केला ते शूद्र देवता म्हणून असा अनेकजण समज करून घेतील. पण तसे अजिबात नाही. मी त्याला हद्दपार केला त्याचे विघ्नकर्तृत्व सिद्ध झाल्यामुळे. माझी मूळ समस्या वेगळीच आहे. शूद्र देवतांचे ब्राह्मणीकरण/उन्नयन होऊ शकते. गुन्हेगारांचे शुद्धीकरण आणि पुनर्वसन होऊ शकते. धर्मत्याग केलेल्याला धर्मात परत येण्यासाठी धर्माचे दरवाजे उघडे आहेत, पण शूद्रांचे ब्राह्मणीकरण/उन्नयन होऊ शकत नाही. हे काही केल्या पटत नाही... 

२ टिप्पण्या:

load म्हणाले...

kay lihta saheb. Nahi patle ajibat. ganpati tumhala ani amahala sadbudhi dewo hi prarthana!

सतीश लळीत, माध्यमकर्मी, हौशी पुरातत्व संशोधक म्हणाले...

राजीवजी, आपला ब्लॉग प्रथमच पाहिला. आवडला. विषय आणि त्यांची मांडणी छान वाटली. सविस्तर प्रतिक्रिया नंतर देईन. आत्ता थोडा घाईत आहे. गणपती या तथाकथित वैदिक/आर्य दैवताविषयी दिलेली माहिती अचुक आहे. गाणपत्य संप्रदायाबद्दल असल्याला काही माहिती आहे का? महाराष्ट्रात जे अष्टविनायक नावाचे थोतांड आणि स्तोम आहे, ते सर्व गणपती, म्हणजे मुर्त्या या तंत्र गणपतीच्या आहेत. (तांत्रिक पंथातील)(पण यांच्या मते स्वयंभू). खरेतर जो गणपती आज घरोघर पुजतात, तो आणि हे अष्टविनायक यांचा काहीच संबंध नाही. असो. तुमचा ब्लॉग आता वरचेवर बघत जाईन. शुभेच्छा...
satishlalit@gmail.com
mahacmpro.blogspot.in
www.faceboook.com/satishlalit