एबर्टिनने मध्यबिंदू तंत्राबरोबर ज्योतिषात आणखी एक मोलाची भर घातली. याला पाश्चात्य ज्योतिषात ’ग्राफीकल एफिमेरीस’ असे संबोधले जाते. मराठीत आलेखी-पंचांग ही संज्ञा या तंत्रासाठी योग्य ठरेल. या तंत्राचा उपयोग विशिष्ट कालावधीतील ग्रहांची भ्रमणे एखाद्या पत्रिकेशी कशी interact करतात याची एकत्रित कल्पना यावी यासाठी केला जातो. पारंपरिक पंचागात ग्रहांच्या स्थितीची कोष्टके दिली असतात. पण पारंपरिक पंचागातील ही मांडणी एखाद्या पत्रिकेत गोचर भ्रमणांचे होणारे योग एकत्रित पणे तपासण्यास उपयोगी नसते. भाकीतात अचूकता आणण्यासाठी गोचर भ्रमणांचे होणारे योग एकत्रित पणे तपासणे आवश्यक ठरते. तसेच समकक्ष (equivalent) योगांचा एकत्रित अभ्यास ’ग्राफीकल एफिमेरीस’ मध्ये चटकन करता येतो.
आलेखी-पंचागात इष्ट कालावधी साठी उभ्या अक्षावर ० ते ३६०, ० ते १८०, ० ते १२० किंवा ० ते ९० अंश दर्शवले जातात. आणि आडव्या अक्षावर काल दर्शवला जातो. इष्ट कालावधी एक वर्षाचा असेल तर आडव्या अक्षाचे १२ महिन्यांसाठी १२ भाग केले जातात. सोयीचे एकक घेउन दररोज किंवा विशिष्ट अंतराने ग्रहांचे बदलते अंश बिंदू स्थापून दाखवले जातात. आपल्याला हव्या त्या ग्रहांसाठी ही प्रक्रिया पार पडली की जो आलेख तयार होतो, तो आलेख विशिष्ट कालावधीचे ’ग्राफीकल एफिमेरीस’ असते.
खाली उदाहरण म्हणून मंगळ आणि गुरुचे भ्रमण सन २०१२ करता कसे दिसेल ते दिले आहे. याशिवाय अमावस्या-पौर्णिमां पण या आलेखात दर्शविलेल्या आहेत.
या आलेखावर नजर टाकली असता असे लक्षात येईल की -
- मार्च २०१२ मध्ये मंगळ-पौर्णिमेची
- मे २०१२ मध्ये गुरु -सूर्यग्रहणाची अमावस्या यांची युति होते . ही अमावस्या मोठ्या आपत्तीला (भूकंप वगैरे) आमंत्रण देणारी ठरावी. प्रभाव काल +/-५ दिवस.
- नोव्हेम्बर २०१२ मध्ये गुरु- चंद्र्ग्रहणाची पौर्णिमा यांची युति होते. ( ही पौर्णिमा मोठ्या आपत्तीला (भूकंप वगैरे) आमंत्रण देणारी ठरावी. प्रभाव काल +/-५ दिवस )
हे सर्व फलिताच्या दृष्टीने जबरदस्त योग आहेत. पारंपरिक पंचागात अशी एकत्रित माहिती न मिळाल्याने आगामी काळाचा विचार करून अंदाज बांधण्यात चूका होण्यास भरपूर वाव असतो.
आता अशी आरेखित केलेली भ्रमणे जातकाच्य़ा पत्रिकेशी कशी interact करतात हे तपासण्यासाठी काय करतात हे पाहूया. यासाठी आलेखी-पंचागात उजवीकडे जातकाच्या पत्रिकेतील ग्रह त्यांच्या अंशांप्रमाणे उभे मांडतात. असा ग्रह मांडल्यानंतर कालाच्या अक्षाला समांतर अशी एक रेषा काढतात. पत्रिकेतल्या जेव्हढ्या ग्रहांचा विचार इष्ट कालावधीसाठी करायचा तेव्हढ्या ग्रहांची भ्रमणे अशा स्वरूपात मांडली की आलेखी-पंचांग खाली दिल्या प्रमाणे दिसते.
उदाहरण म्हणून मी गुरु, शनि, हर्षल, नेपच्यून, प्लुटो आदि ग्रहांची सन २०१२ मधिल भ्रमणे घेतली आहेत. शिवाय या कालावधीतील ग्रहणे आणि अमावस्या-पौर्णिमां पण यात मांडल्या आहेत. उजवी कडे मांडलेले ग्रह श्री अमिताभ बच्चन यांच्या पत्रिकेतील आहेत. ते सायन राशी चक्रानुसार आहेत. या आलेखावर नजर टाकली तर असे लक्षात येते की सन २०१२ मधिल दोन ग्रहणे (मे आणि नोव्हेम्बर) श्री अमिताभ बच्चन यांच्या हर्षल आणि शनिला सक्रिय करतात. शिवाय त्यांची जन्मवेळ जर बरोबर असेल तर जन्मचंद्र शनीच्या भ्रमणाखाली येतो. माझ्या अंदाजानुसार मेपासून पुढचा काळ श्री बच्चन यांना जास्त त्रासदायक ठरू शकतो.
पूर्वी आलेखी-पंचांग हाताने तयार करत असत आता संगणकामुळे हव्या त्या कालावधीसाठी असे पंचांग चुटकीसरशी तयार करता येते. (माझ्या कडे असलेल्या Janus 4.3 या सॉफ्टवेअरमध्ये या सर्व सोयी आहेत). ग्रहयोगांच्या एकत्रित आणि समग्र अभ्यासास फार मोठी मदत या तंत्रामुळे होते.