शनिवार, २१ एप्रिल, २०१२

इकडचं तिकडचं...


आजच माझ्याकडे आलेल्या जातकांनी मला एका  तान्ह्या मुलीची पत्रिका कराल का? अशी पृच्छा केली. अधूनमधून हा प्रश्न मला केला जातो आणि अशा विनंतीला मी नम्रपणे नकार देतो. खरं तर यात माझेच आर्थिक नुकसान आहे. पण काही तत्त्वे पाळायचीच हा निर्धार असल्याने, मला असे नुकसान झालेले चालते.

तान्ह्या मुलांची पत्रिका करू नका असे सांगण्यामागे माझी निश्चित अशी कारणे आहेत. केवळ तान्ह्याच नाही तर २० वर्षांपर्यंत आणि सत्तरीनंतर (काही अपवाद वगळता) पत्रिका बघू नये असे माझे  स्पष्ट मत आहे. याची कारणे अशी-

विशीपर्यंत व्यक्तीची स्वयंनिर्णयाची क्षमता पूर्णपणे विकास पावलेली नसते. सहसा आईवडिलांवर मुले अवलंबून असतात. सत्तरीनंतर तब्येत ठणठणीत नसेल तर हळुहळु परावलंबित्व यायला सुरुवात होते. अनेक इच्छाना मुरड घालावी लागते. मनमुरादपणे वानप्रस्थाश्रमाचा काल व्यतीत करणे सर्वच ज्येष्ठाना शक्य असते नाही. थोडक्यात या परावलंबीत्वामुळे  एकंदरच संधी आणि निर्णय यावर मर्यादा असतात/यायला लागतात.

सांगायचे तात्पर्य असे की २० ते ७० या मधल्या काळात, सर्वसाधारणपणे स्वयंनिर्णयाचा हक्क बजावू शकणारी व्यक्तीच वेगवेगळ्या शक्यता/संधीना विवेकाने प्रतिसाद देऊ शकते. हे परावलंबी व्यक्तींच्या बाबतीत होऊ शकत नाही. पत्रिका ही केवळ शक्यता दाखवत असल्याने बंदिस्त आयुष्य जगणार्‍या व्यक्तींच्या आयुष्यात या शक्यता प्रत्यक्षात  येऊ शकत नाहीत.

दूसरा मुद्दा असा की पत्रिकेवरून काही ज्योतिषी अशी भाकीते करतात की मुले किंवा ज्येष्ठ यांच्या जीवनावर अशा भाकीतांची दाट छाया पडते. याचा अत्यंत मनस्तापदायक अनुभव भारतीय ज्योतिषांकडून मला स्वत:ला आलेला आहे. (मला वाहनापासून धोका सांगितल्यामुळे मला वयाच्या २३व्या वर्षापर्यंत सायकल चालवायला घरातून परवानगी मिळाली नाही. कल्पना येण्यासाठी मी माझा फक्त एकच अनुभव इथं सांगितला).

तेव्हा घरात नवीन पाहूणा आला तर ज्योतिषाकडे धावत सुटू नका...

२ टिप्पण्या:

lonelypagal म्हणाले...

आपण म्हणता ते खरे आहे.

वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग म्हणाले...

राजीवजी...
आपण म्हणता ते खरे आहे. पण अपवादात्मक परिस्थितीत काही पत्रिका बघणे जरुरीचे आहे. उदा. आजारपण व रोगाचे उपचार त्यातील यश अपयश दशा व दिशा, बालआरिष्टयोग तसेच जातकाच्या आई किंवा वडिलाची केतूची महादशा इत्यादि काही महत्वाचे मुद्दे आहेत. मी सुध्दा मुलाची कुंडली २१ वर्षापर्यत पाहात नाही. जर का पाहिली तर त्याचे पुढिल शिक्षण कोणत्या साईडला आहे त्याचे मार्गदर्शन करतो एवढेच.

Sanjeev Naik
vastuclass@gmail.com