शुक्रवार, २८ डिसेंबर, २०१२

प्रश्नज्योतिष आणि प्रचीतीचे गौड्बंगाल


आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट वाचल्यावर तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की ज्योतिषाचे समर्थनकरणारा मी  असा कसा बदललो? वास्तविक तसे काही नसून ज्योतिषाच्या दीर्घ अभ्यासाने त्यातल्या काही हास्यास्पद गोष्टी कळायला लागतात. विशेषत: प्रश्नज्योतिष आणि कृष्णमूर्तीवाल्यांचे जास्त फावते असे लक्षात आले आहे.

...तर सांगत काय होतो? एक मदारी होता. त्याच्याकडे २-४ माकडे होती. मदारी त्या माकडांना घेऊन गावोगाव हिंडत असे. माकडांनी केलेल्या करमणूकीच्या जोरावर त्याची उपजीविका चालायची.

असाच एकदा फिरत फिरत मदारी एका गावात आला आणि एका वर्दळीच्या ठिकाणी पोचल्यावर तिथे आपला खेळ मांडायचा त्याने विचार केला. खेळासाठी योग्य अशी जागा शोधल्यावर त्याने आपले डमरू वाजवायला सुरुवात केली.

डमरूचा आवाज कानावर पडल्यावर आजूबाजूची रिकामटेकडी मुले हळूहळू गोळा झाली. मदार्‍याने आपले डमरूवादन चालू ठेवले...

ह्ळूहळू गर्दी वाढत गेली.

गर्दी पुरेशी वाढली तेव्हा त्याने आपल्या एका माकडाला रिंगणात आणले आणि त्याला कोलांट्या उड्या मारायला लावल्या. या माकडाच्या कसरती झाल्या तेव्हा लोकानी टाळ्या वाजवल्या. मदार्‍याने आपल्या भागाबाईला ताट घेऊन चंदा गोळा करायला पाठवले. लोकांनी स्वखुषीने खिशात हाताला जे नाणे लागले ते भागाबाईच्या ताटात टाकले.

खेळाचा १ला अंक व्यवस्थित पार पडल्यावर मदार्‍याचा हुरूप वाढला.

मग मदार्‍याने डमरूवर दूसरा ताल धरला. गर्दी वाढली. लोक माना उंचावून पुढचा अंक बघायला सरसावले.

मदार्‍याने दूसर्‍या माकडाला रिंगणात आणले. माकडाने तोंडात चमचा-लिंबू धरून फेर्‍या मारल्या. लोकांनी खूष होऊन टाळ्या वाजवल्या. भागाबाईने परत एकदा ताट फिरवले आणि चंदा वसूल केला.

आज मदार्‍याचे नशीब बहूधा जोरावर असावे. गर्दी एव्हढी वाढली की बाजूच्या झाडावर चढून लोक खेळ बघत होते. मदारी मनोमन सुखावला. त्याने खिशातून एक बिडी काढली आणि शिलगावली.    दोन चार झुरके मारले आणि आज गुंडोपतांला खेळात उतरवावे असा त्याने विचार केला. गुंडोपंत हे मदार्‍याच्या लाडक्या माकडाचं नांव. हे माकड भविष्य सांगायचं. पुरेशी गर्दी जमली की मदारी भविष्य सांगायचा खेळ करायचा.

मदार्‍याने डमरूवर नवा ताल वाजवायला जोरात सुरुवात केली आणि जमलेल्या गर्दीत चुळबुळ झाली. मागच्या लोकानी पुढे मुसंडी मारली.

"साहेबान्‌ मेहेरबान् कदरदान्" चा मंत्रोच्चार करून गुंडोपंताला मदार्‍याने इशारा केला. गुंडोपंताने टुणकन उडी मारली, आपली काळी टोपी डोक्यावर चढवली आणि रिंगणात एक फेरी मारली. मदार्‍याने आपली कळकट पोतडी गुंडोपतासमोर टाकली. गुंडोपंताने पोतडीत हात घातला आणि त्याच्या हाताला भागाबाईची लिपस्टीक लागली. त्या लिपस्टिकने गुंडोपंताने स्वत:ला कपाळाला मोठ्ठे गंध लावले. लोकांनी टाळ्या वाजवल्या...

"साहेबान्‌ मेहेरबान् कदरदान्, यह है दुनिया का मशहूर ज्योतिषी गुंडोपंत. आपमेसे किसीको भी, कोइ भी समस्या हो या मन में प्रश्न हो तो यह उसका उत्तर पंचांग देखकर दे सकता है।"

"क्या गुंडोपंत आज भविष्य बतायेगा?" दोरीला झटका मारून मदार्‍याने प्रश्न केला.

गुंडोपंताने खुषीत रिंगणात फेरी मारली आणि आपली संमती दर्शवली.

"क्या गुंडोपंत कितनी फी लेते हो?" मदार्‍याने दोरीला परत झटका मारला तेव्हा गुंडोपताने त्या कळकट फाटक्या पोतडीतून एक पाटी काढली आणि रिंगणात एक चक्कर मारली. त्या पाटीवर लिहीले होते, "फी रू ५०". लोकांनी परत टाळ्या वाजवल्या.

गर्दीतल्या काही लोकांनी खिसे चाचपायला सुरुवात केली. डमरूचा ताल द्रुतगतीने वाजायला सुरुवात झाली.

"साहेबान्‌ मेहेरबान् कदरदान्, यह दुनिया का मशहूर ज्योतिषी गुंडोपंत. आपमेसे किसीको भी, कोइ भी समस्या हो या मन में प्रश्न हो तो यह उसका उत्तर पंचांग देखकर दे सकता है। खाली पचास रुपये।"

गर्दीमधल्या एकाने खिशात हात घातला आणि पन्नास रुपये काढून हवेत फडकावले तशी भागाबाई ताट घेऊन पुढे गेली. ताटात पन्नासची नोट पडलेली बघून मदार्‍याने गुंडोपंताच्या दोरीला परत एक झटका दिला. माकडाने परत पोतडी गाठली आणि त्यातून एक जुने फाटके पंचांग काढले  अणि त्याची पाने उलटसुलट करायला सुरुवात केली. लोकांनी टाळ्या वाजवल्या. डमरुचा आवाज टिपेला पोचला.

"क्या प्रश्न है भाईसाब का?" मदार्‍याने बिडीचा झुरका मारत विचारले.

"मला नोकरी केव्हा मिळेल?"

मदार्‍याने गुंडोपंताच्या मानेला झटका दिला आणि गुंडोपताने फाटके पंचांग परत चाळले आणि तिनदा टाळ्या वाजवून एक कोलांटी उडी मारली.
कोलांटी उडी हा होकारार्थी कौल होता. तिनदा टाळ्या म्हणजे तिन महिन्यानंतर असा मदार्‍याने कौलाचा अर्थ सांगितला.

तीन महिन्यानंतर नोकरी मिळणार या कल्पनेने आशा पल्लवीत झाल्याने प्रश्न विचारणारा हळुच गर्दीतून नाहीसा झाला. डमरू परत जोरात वाजयला लागले आणि गुंडोपंताला प्रश्न विचारायला अनेक ५०च्या नोटा पुढे आल्या. गुंडोपंताने कुणाला होकारार्थी उत्तरे दिली कुणाला कुणाला नकारार्थी. नकारार्थी उत्तरे देताना गुंडोपंत जमिनीवरचा दगड उचलून प्रश्नकर्त्याच्या दिशेने भिरकावत असे.

तेव्ह्ढ्यात गर्दी अचानक दुभंगली. ओवाळणीचं ताट फुलं आणि केळी घेऊन गावचा पाटील आणी पाटलीण बाई पुढे आल्या. मागच्या खेपेला गुंडोपंत गावात आला होता तेव्हा गावच्या पाटलांने मुलीचं लग्न केव्हा जुळणार असा प्रश्न विचारला होता. सहा वेळेला टाळ्यावाजवून पश्चिमेला कोलांट्या उड्या मारून गुंडॊपताने होकारर्थी कौल दिला होता. आणि नेमके तसेच घडले होते. बरोब्बर सहा महिन्यानी पश्चिमेच्या दिशेने आलेल्या एका स्थळाला पाटलाची मुलगी पसंत पडली आणि पाटलाच्या डोक्यावरचे मोट्ठे ओझे दूर झाले.

पाटलांनी सपत्निक गुंडोपताचा सत्कार केल्यावर मदार्‍याचा भाव आणखी वाढला... मग गर्दी वाढली. अनेक हातांनी नोटा पुढे केल्या. भागाबाईने आपल्या ताटात त्या गोळा केल्या.

कोलांट्या उड्या मारून दमल्यावर गुंडोपंताने दगड भिरकावायला सुरुवार केली तशी गर्दी हळुहळु पांगली. मग मदार्‍याने पण आपला खेळ आवरता घेतला आणि पुढच्या गावाकडे मुक्काम हलवला...

---X---

ही गोष्ट मुद्दाम सांगायचे कारण असे ज्योतिषातील सर्वात आचरट आणि करमणूक करणारा प्रकार म्हणजे प्रश्नज्योतिष. ज्योतिषाच्या या शाखेमध्ये लोकांना पडलेल्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर मिळते या समजुतीपायी या शाखेची लोकप्रियता अमाप वाढली आहे. उदाहरण द्यायचे झाले तर प्रेमप्रकरणाचे घेऊ. समजा २-३ तरूण एका मुलीच्या प्रेमात पडले आहेत. प्रेमातील यश अनेकजणांच्या जीवनमरणाचा प्रश्न असतो. साहजिकच त्यातला सर्वात घायकुतीला आलेला एकजण ज्योतिषाकडे जातो आणि प्रश्न विचारतो. प्रश्नज्योतिष बघणारा त्याला कधी प्रश्नाची वेळ बघून तर कधी अंक द्यायला सांगून काहीबाही पत्रिका मांडतो आणि हो किंवा नाही असे उत्तर देतो.   उत्तर बरोबर आले तर प्रश्नज्योतिषाची आपोआप प्रसिद्धी होते... अगदी मदार्‍याची आणि त्याच्या माकडाची झाली तश्शीच. प्रश्नज्योतिषाने उत्तर देताना त्या मुलीची आणि तिच्या प्रेमात पडलेल्या सर्वांच्या पत्रिका एकत्र बघून जर भाकीत वर्तवले तर ते भविष्य वर्तवणे थोडेफार तर्कसुसंगत ठरेल पण इथे मामला वेगळा असतो.  

हाच प्रकार दूसर्‍या एका उदाहरणाने समजावायचा झाला तर असा सांगता येईल - समजा माझ्या मनात एक समस्या आहे आणि माझी अशी श्रद्धा आहे की नाणे उडवले आणि छाप-काटा केले तर या समस्येतून मार्ग काढायची मला दिशा मिळू शकते. पण मला कुणी सांगितले की ते नाणे  अमुक-तमुक मंत्राने पूजा करून मग उडव म्हणजे नक्की ’अचूक’ उत्तर मिळेल तर तो नक्की आचरटपणा असेल. ... आणि प्रश्नज्योतिषातला आचरटपणा नेमका असाच असतो.

सन २०१३ साठी माझ्या ब्लॉगच्या वाचकाना मनापासून शुभेच्छा!

1 टिप्पणी:

Prakash Ghatpande म्हणाले...

मस्त पोस्ट आहे. कृष्णमूर्तीला काय डिमांड आहे सध्या. हेच लॊजिक फलज्योतिषाच्या इतर अंगालाही लावता येईल.