सोमवार, ३१ डिसेंबर, २०१२

आधीच मर्कट तशात मद्य प्याला ...


प्रश्नज्योतिषावरील माझी या अगोदरची नोंद प्रसिद्ध झाल्यावर बराच थयथय़ाट चालू झाल्याचे कानावर आले. तो अपेक्षितच होता. त्यावरून शाळेत पाठ केलेला "आधीच मर्कट तशात मद्य प्याला ... हा श्लोक आठवला. जे लोक ह्सबे वगैरेंच्या नावाने आचमन करतात त्यांच्यासाठी खालील संदर्भ देणे आवश्यक वाटते.

"नंदीबैलवाले जेव्हा नंदीस घेऊन एखाद्या चौकांत जाहीर कार्यक्रम करीत असतात त्यावेळी त्यांना कोणीही काहीही विचारतात. नंदीवाल्यांना नंदीच्या मार्फत सर्वांचीच उत्तरे द्यावी लागतात. तरच तो दूसर्‍या चौकात कार्यक्रम करू शकतो. थोडीफार अशीच अवस्था कृष्णमूर्तीवाल्याची झाली आहे."

- ज्योतींद्र हसबे, कृष्णमूर्ती प्रश्नसिद्धांत भाग २ पृ १३०, सुमेरू प्रकाशन, १९९२.

हसब्यांची वरील विधाने बरेच काही सांगून जातात. हसब्यांच्या प्रांजल कबुलीला मला मनापासून दाद द्यावीशी वाटते. मला स्वत:ला कृष्णमूर्तीपद्धतीचा कायमच चुकीचा पडताळा आला आहे. मात्र कृष्णमूर्तीवाल्यांच्या अभिनिवेशाचे भरपूर अनुभव आहेत (जालावरचे कृष्णमूर्तीवाले त्या थोर (अभिनिवेश) परंपरेचे पाईक आहेत, यावर दूमत असण्याचे कारण नाही).

मागे एकदा पुण्यात उद्यान प्रसाद कार्यालयात ज्योतिषांचा एक परिसंवाद भरला होता. विषय आता लक्षात नाही. पण कुणीतरी प्रश्नोत्तरांमध्ये  कृष्णमूर्तीपद्धतीच्या अचूकतेसंबंधी प्रश्न विचारला. आयोजकानी प्रथम व. दा. भटांनी प्रश्नाचे उत्तर द्यावे असे सुचवले. व. दा. भटांनी कृष्ण्मूर्तीवाल्यांचे अचूकतेचे दावे अतिरंजित असतात असे म्हटल्यावर त्यांच्या शेजारी बसलेले एक कृष्णमूर्तीभक्त चवताळले. भटांच्या हातातला माईक खेचून घेतला आणि तावातावाने बोलायला लागले. त्यांचे बोलणे काही केल्या थांबेना. बहुधा आपण बोलत आहोत हेच ते विसरून गेले असावेत. शेवटी साउंड सिस्टीमवाल्याला त्या कृष्णमूर्तीवाल्यांचा माईक बंद करायला सांगण्यात आले.

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

कृष्ण्मूर्तीपद्ध्तीच्या भंपकपणाला उजेडात आणल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन!