बुधवार, २७ मार्च, २०१३

कृपाप्रसाद...




मी लग्नाला उभा होतो तेव्हा माझ्या लग्नात काही "अडचणी" अशा होत्या - १. माझे वडील हयात नव्हते २. माझ्या आईचा मेनोपॉज चालू होता (तिच्या अभ्यास, खेळ आणि कला या तिन्ही मधल्या सर्वंकष बुद्धिमत्तेला लग्नाअगोदर आणि लग्नानंतर पोषक वातावरण न मिळाल्याने निर्माण झालेले नैराश्य या कालावधीमध्ये उफाळून आले होते)   ३. लग्नाळु पुरुषांच्या कर्तृत्वाच्या प्रमुख निशाणींपैकी एक, म्हणजे स्वत:चे वाहन (विशेषत: दुचाकी) माझ्याकडे नव्हते. मी ऑफिसात पीएमटीने जायचो हे अनेक मुलींना आणि त्यांच्या आईबापांना रुचायचे नाही (त्यामागची खरी कारणे सांगितली तरी). मला अवघड जागेचे दुखणे आहे की काय हे विचारण्यापर्यंत काही मुलीच्या बापांची मजल जायची. मग मला नकार मिळायचा.

तरीही माझ्याकडे काही प्लस पॉइंटस होते म्हणून मला मला स्थळे मात्र खूप यायची. असंच एकदा  पुण्यातील एका सुखवस्तू कुटुंबातील एकुलत्या एक मुलीचे स्थळ मला एका "हितचिंतकां"नी सुचविले. त्यांच्या सदिच्छेचा आदर करायचा म्हणून मी मुलीला पहाण्याचा कार्यक्रम करण्याचे ठरवले. त्यासाठी मुलीचे वडील मला माझ्या कामाच्या ठिकाणी भेटून गेले. मुलगी एकुलती एक असल्याने पुण्याच्या मध्यवस्तीमधली वडिलोपार्जित प्रॉपर्टी तिलाच मिळणार हे मधाचं बोट लावायला मुलीचे वडील विसरले नाहीत. आणखी एक गंमत म्हणजे बोलताना अनेक वेळा मी आणी माझी मुलगी, आम्ही जिनिअस आहोत, हे वाक्य या गृहस्थांनी वारंवार ऐकवले.

मग मी एका दिवशी या कुटुंबाला भेटायला गेलो. मी गेलो तेव्हा दिवाणखान्यात मुलीचे आईवडील आणि एक  धोतर, काळा कोट, काळी टोपी अशा वेषातील वयस्कर गृहस्थ माझी भेट घेण्यास उपस्थित होते.

मुलीच्या वडिलांनी प्रथम आईची ओळख करून दिली. मी हात जोडून नमस्कार केला. मग त्या वयस्कर गृहस्थांकडे हाताने निर्देश करून म्हणाले, " हे आमच्या कुटुंबाचे आध्यात्मिक गुरु. हे निष्णात वैद्य आणि ज्योतिषी पण आहेत. आमचं लग्न झाल्यानंतर "हिला" दिवस राहात नव्हते. अनेक निष्णात डॉक्टरांचे उपचार निरुपयोगी ठरल्यामुळे आम्ही हताश झालो होतो. तेव्हा आम्हाला या गुरुंजींचे नाव सुचविण्यात आले. म्हणून आम्ही यांच्याकडे गेलो आणि मग यांनी माझ्या पत्नीवर उपचार केले आणि हिला दिवस राहीले. आमची लेक यांच्या कृपाप्रसादाने झाली असल्यामुळे आम्ही तिच्याविषयीचे कोणतेही निर्णय घेताना यांचा सल्ला घेऊन मगच पुढे जातो."

अशी ओळख करून दिल्यावर त्या आध्यात्मिक गुरुजीनी आपल्या तिरळ्या नजरेने माझ्याकडे एक प्रश्नार्थक कटाक्ष टाकला आणि म्हणाले "पुढेही ही सगळे निर्णय घेताना मला विचारल्याशिवाय घेणार नाही. काय गं?" असा प्रश्न करून मग त्यानी दिवाणखान्याच्या दारात उभ्या असलेल्या उपवर मुलीला विचारल्यावर तिने पण गोड हसून आपली संमती दर्शवली.

मग कांदेपोहे आणि चहा झाला. आमच्या गप्पा पुढे चालू राहिल्या. गप्पामध्ये अध्यात्मिक गुरुजींचा पुढाकारच जास्त होता. माझ्या डोक्यात मात्र "पुढेही ही सगळे निर्णय घेताना मला विचारल्याशिवाय घेणार नाही. काय गं?" हे वाक्य परत  परत पिंगा घालत होते. पुरेशा गप्पा आणि चवकशा झाल्यावर मग मी आईशी बोलून मुलीला भेटावे असे ठरले आणि ही भेट मी आटोपती घेतली.

घरी आल्यावर आईला जे घडले ते सांगितले तेव्हा आई भाजी चिरत होती. भाजी चिरता चिरता आई म्हणाली, "अरे, या माणसाचा "कृपाप्रसाद" म्हणजे ही मुलगी या माणसाची तर नाही ना? आणि भविष्यात सगळे निर्णय ही मुलगी या म्हातार्‍याच्या सल्ल्याने घेणार म्हणजे आपल्या बोकांडीपण त्याला बसवणार. तेव्हा तू काय ते ठरव" असे म्हणून आईने तिला ठाऊक असलेल्या कृपाप्रसादांच्या काही रंजक कथा सांगितल्या. आयव्हीएफ आणि तत्सम तंत्रज्ञान अस्तित्वात येण्या अगोदर "कृपाप्रसाद" ही समाजाने स्वीकारलेली एक उपचार पद्धती होती.

दोन दिवस माझ्या डोक्यातून "पुढेही ही सगळे निर्णय घेताना मला विचारल्याशिवाय घेणार नाही" हे वाक्य काही केल्या डोक्यातून जात नव्हते.

मग "तुमचा काय विचार आहे" असे विचारायला मुलीच्या वडीलांचा फोन आला तेव्हा मी नम्रपणे नकार सांगून मोकळा झालो...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: