सोमवार, ८ एप्रिल, २०१३

मराठी विश्वकोशाची विश्वासार्हता
महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या मराठी विश्वकोशातील माझे पणजोबा कै विठठल सीताराम गुर्जर यांच्या वरील कै. स गं मालशे यांनी लिहीलेली नोंद नुकतीच वाचली. मला ही नोंद धेडगुजरीपणे, अर्धवट माहितीवर, एकंदर "उरकून" टाकायचे अशा थाटात लिहीलेली  वाटली. या एका नोंदीवरून विश्वकोशातील इतर नोंदींच्या दर्जाचा अंदाज बांधला तर मराठीला ज्ञानभाषा करण्याच्या उद्देशाने तयार केला गेलेला विश्वकोश कितपत विश्वासार्ह मानायचा असा प्रश्न पडतो,

-------------विश्वकोशातील नोंद----------------------------------------
गुर्जर, विठ्ठल सीताराम : (१८ मे १८८५ – १९ सप्टेंबर १९६२). मराठी कथाकार. जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील कशोळी ह्या गावी. मुंबईच्या एल्फिन्स्टन स्कूलमधून प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर एल्फिन्स्टन कॉलेजात ते दाखल झाले; बी. ए. मात्र झाले नाहीत. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचे हे शिष्य होत. मासिक मनोरंजनाचे संपादक काशीनाथ रघुनाथ मित्र हे त्यांचे स्नेही होते. त्यांच्या उत्तेजनाने; तसेच वंग कथाकार प्रभात कुमार मुखर्जी ह्यांच्या कथा मुळातून वाचता याव्यात ह्या इच्छेने गुर्जरांनी बंगाली भाषेचा व्यासंग केला. काही वर्षे मासिक मनोरंजनाच्या संपादनकार्यात ते सहभागी होते.

द्राक्षांचे घोंस (१९३६) हा त्यांचा एकच कथासंग्रह प्रसिद्ध झालेला असला, तरी त्यांनी लिहिलेल्या कथांची संख्या सु. ७०० आहे. मासिक मनोरंजन, विविधवृत्त  इ. नियतकालिकांतून त्या प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या बऱ्याचशा कथा अनुवादित-रूपांतरित आहेत. त्यांत पाल्हाळही आढळतो. तथापि १९२० नंतरच्या मराठी कथेला नीटस रूप देण्यात आणि रंजक वळण लावण्यात गुर्जरांच्या कथेने महत्त्वाचा हातभार लावलेला आहे.

बंगालीवरून त्यांनी काही कादंबऱ्या मराठीत आणल्या. शब्दशः भाषांतरे करण्याऐवजी रोचक रूपांतरे करण्याकडे त्यांचा कल होता. मूळ बंगाली कथा-कादंबरीकार आणि गुर्जरांनी त्यांच्या साहित्यकृतींची केलेली रूपांतरे ह्यांपैकी काही पुढीलप्रमाणे :रमेशचंद्र दत्त -जीवनसंध्या (१९०९); प्रभातकुमार मुखर्जी - संसार असार (१९१४), पौर्णिमेचा चंद्र (१९२०), स्वप्नभंग (१९३७), नागमोड (१९४६); शरत्‌चंद्र चतर्जी -देवदास (१९३७), चरित्रहीन (२ भाग, १९४८-४९), शेवटचा परिचय (१९४९); रवींद्रनाथ टागोर - संगम (१९३५).

गुर्जरांनी काही नाटकेही लिहिली; परंतु त्यांपैकी एकही यशस्वी झाले नाही. गडकऱ्यांच्या एकच प्याला ह्या नाटकासाठी त्यांनी रचिलेली पदे मात्र लोकप्रिय झाली. कशोळी येथेच ते निवर्तले.

--------------------------------------------------------

या नोंदीबद्दल माझे ठळक आक्षेप असे:
० गुर्जर कशोळीचे  नसून कशेळीचे रहिवासी होते

० ही नोंद तयार करण्यासाठी कोणती माहिती आधार म्हणुन वापरली याचा उल्लेख (इंटरेनेट आवृत्तीमध्ये तरी) नाही.

० "बी. ए. मात्र झाले नाहीत." - मला घरातून कळलेल्या माहितीनुसार कै. गुर्जर आजारपणामुळे बीए पूर्ण करू शकले नाहीत. कै गुर्जर ज्या काळात बीए करत होते त्याकाळात शिक्षणात अनंत अडचणी होत्या. आर्थिक अडचणी, घरच्या जबाबदार्‍यांपासून ते पटकी, विषमज्वरासारखे तेव्हा जीवघेणे ठरणारे आजार शिक्षण अर्धवट ठेवण्यास पुरेसे असायचे. मात्र बीए न होऊ शकलेल्या गुर्जरांचा "द्राक्षांचे घोंस" हा कथासंग्रह मुंबई विद्यापीठाने एमए साठी नेमला होता, ही माहिती देण्याचे मालशे यांनी टाळले आहे. मला हा खोडसाळपणा वाटतो.

० कोणतीही चरित्रात्मक नोंद ही संतुलित असावी अशी माफक अपेक्षा ठेवणे गैर ठरणार नाही. संतुलीत म्हणजे चरित्रनायकाची बलस्थाने योग्य त्या पद्धतीने नोंदली जायला हवीत.  कै. स. गं. मालशे गुर्जरांच्या बलस्थानांकडे साफ कानाडॊळा करतात. वयाच्या ५१ व्या वर्षापर्यंत गुर्जरांनी तीसहजार पृष्ठांचे लिखाण केले असे त्यांच्या १९३६ साली प्रसिद्ध झालेल्या "धृव" मासिकातील मुलाखतीमध्ये संपादकांनी म्हटले आहे. ही मुलाखत कै. म. ना. अदवंतांनी लिहिलेल्या आणि साहित्य अकादमी तर्फे प्रसिद्ध झालेल्या गुर्जरांच्या चरित्रात यथामूल समाविष्ट केलेली आहे. गुर्जरांनी लिहीलेल्या तीसहजार पृष्ठांचा उल्लेख अक्षरी आहे (म्हणजे एक शून्य चुकून जास्त पडले असंही म्हणायला जागा नाही). आज कुणालाही तीसहजार या आकडयावर विश्वास ठेवणे किती कठीण जाईल याची मला पूर्ण कल्पना आहे.

० वरील नोंदीत मालशे म्हणतात की गुर्जरांनी लिहीलेल्या गोष्टींची संख्या ७०० आहे. मराठीतील नामवंत कादंबरीकार कै. दत्त रघुनाथ कवठेकर यांनी मला शाळेत असताना "तुझ्या पणजोबांनी एक हजार गोष्टी लिहील्या" असे माझ्या पाठीवर हात ठेवून सांगितले होते. तेव्हा १००० हा आकडा ऐकूनच मला किती अभिमान वाटला होता ते मी शब्दात सांगू शकणार नाही. कै. म. ना. अंदवंतांनी लिहीलेल्या चरित्रात गुर्जरांनी स्वत: मांडलेल्या हिशेबात ८००हून अधिक गोष्टी लिहील्याचे म्हटले आहे. याशिवाय त्यांनी लिहीलेल्या कांदंबर्‍या, नाटके, प्रहसने हे वेगळेच.
 चरितार्थासाठी एव्ह्ढा मोठा लेखनप्रपंच एखादी व्यक्ती करते तेव्हा ती व्यक्ती लेखनाला मागणी असल्याशिवाय नक्कीच करणार नाही. स्वत: गुर्जरांनी प्रकाशकांचा कधीही अनुनय केला नाही. आणि त्यांच्या हिशेबी स्वभावाचे जे किस्से मी घरात ऐकले आहेत त्यावरून त्यांनी मोबदल्याशिवाय लिखाण केले नसणार हे नक्की. तेव्हा गुर्जरांच्या गोष्टींची संख्या कमी करून कै. मालशे यांनी काय साधले असेल? याला कर्तृत्वावरून बोळा फिरविण्याचा नतद्रष्ट्पणा एव्हढेच म्हणावे लागेल.

० " त्यांत पाल्हाळही आढळतो." - हे पाल्हाळ मूळकथेतून आले की गुर्जरांनी घुसडले याबद्दल मालशे "ब्र"ही काढत नाहीत.

० "गुर्जरांनी काही नाटकेही लिहिली; परंतु त्यांपैकी एकही यशस्वी झाले नाही." - गुर्जरांचे संगीत नंदकुमार हे नाटक त्यातल्या संगीतासाठी गाजले. गंधर्व नाटक मंडळीने या नाटकांचे प्रयोग केले. नुकत्याच गाजलेल्या "बालगंधर्व" या चित्रपटात याचा ओझरता उल्लेख आहे. हे नाटक आकाशवाणीच्या पुणे केंद्राने जतन केले आहे आणि माझ्या विनंतीवरून दोन वेळा प्रसारित पण केले होते.

२ टिप्पण्या:

Salil म्हणाले...

एकंदरीत कठीण आहे सगळे. मुळातच विश्वकोशाची गरज काय आणि तो कुठे मिळतो आणि कधी पूर्ण होणार ह्याबद्दलच मला शंका आहे. ह्यापेक्षा मराठीची ऑक्ष्सफर्डच्या इंग्रजी सारखी डिकक्ष्शनरी काढायला हवी होती. पण तेवढी झेप ह्या सध्याच्या साहित्यिकांमध्ये आहे असे मला अजिबात वाटत नाही. शासनाच्या तुकड्यांवर जगणे आणि एकदाका होईना संमेलानाधक्ष्य होणे हीच ह्यांच्या जीवनाची इतिकर्तव्यात.

mannab म्हणाले...

कै वि सी गुर्जर यांच्याविषयीची विश्वकोशातील नोंद आणि त्यातील त्रुटी हा लेख आवडला. मासिक मनोरंजनच्या १९१० सालच्या दिवाळी अंकातील टीकाकार ही त्यांनी लिहिलेली गोष्ट मला आजही आठवते. ते एक विलक्षण प्रतिभेचे कथाकार होते. त्यांच्याविषयी मराठी विश्वकोशातील नोंदी जास्तीत जास्त अचूक असाव्यात हे आपले म्हणणे पटते. आपला हा लेख सर्वांनी आवर्जून वाचावा अशी शिफारस मी आपल्या समविचारी मित्रांमध्ये करत आहे.
- मंगेश नाबर