शुक्रवार, १० मे, २०१३

[श्रद्धांजली] गायला लावणारा अवलियाआयुष्याला पूर्णत्व कशामुळे येत असावं...सर्वसाधारणपणे ९९ टक्के लोक उत्तर देतील की ध्येयपूर्तीमुळे, स्वप्नपूर्तीमुळे. मला मात्र माझ्या आयुष्याचे पूर्णत्व अनेकदा घेतलेल्या दिव्यत्वाच्या अनुभूतीमध्ये आहे असे वाटते. ही दिव्यत्वाची अनूभुती मला अनेकांकडुन मिळाली. त्यातली एक महत्वाची व्यक्ती म्हणजे उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर म्हणजे आमचे छोटे उस्ताद.

संगीतामध्ये माझ्या अशा ज्या आवडी आहेत त्या मला कुणामुळे लागलेल्या नाहीत. समीक्षकांनी, देवपित्यांनी उधळलेल्या स्तुतीसुमनानी प्रभावित होऊन माझी आवड विकास पावली नाही. मी माझ्या आवडीचे श्रेय कुणालाही देऊ इच्छित नाही. माझी आवड अत्य़ंत बेसावध क्षणी, केवळ योगायोगाने आलेल्या दिव्यत्वाच्या अनुभवाने निर्माण झाली आणि विकास पावली. दिव्यत्वाच्या अनुभूतीचे एक खास वैशिष्ट्य असतं. हा अनुभव तुमच्यात कायमस्वरूपी अंतर्बाह्य उलथापालथ घडवून आणतो. एक वानगीदाखल उदा देतो. रविशंकरांची सतार रेडीओमुळे सतत कानावर आदळून आवडायला लागली होती (आवडायलाच हवी, नाही आवडली तर लोक तुच्छपणे बघतात). पण १९८४ मध्ये आमच्या घरी टिव्ही आला, तेव्हा प्रथम उस्ताद झिया मोईदुद्दीन डागर यांचे रूद्रवीणावादन ऐकले आणि सतार मनातून उतरली ती कायमची.

मल्लिकार्जून मन्सूर, केसरबाई, एमणी शंकरशास्त्री, झिया मोईदुद्दीन डागर आणि त्यांचे धाकटे बंधु उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर हे असेच मला अत्यंत बेसावध क्षणी भेटलेले दिव्यात्मे. त्यांनी नंतर मला कधीच सोडले नाही.

उस्ताद झिया फरिदुद्दीन डागरांच्या बाबतीत पण असेच काहीसे झाले. १९९० मध्ये स्पीकमॅकेने आमच्या आयायटीत एक मोठा संगीत महोत्सव आयोजित केला होता. मला केवळ गाणं ऐकायला प्रा. सहस्रबुद्ध्यांनी रजा मंजूर केली होती. सकाळच्या सत्रामध्ये झिया फरिदुद्दीन डागर आणि साथीला गुंदेचा बंधू गायला बसले होते. त्यांनी जवळजवळ दीड्तास जौनपुरी आणि मग हिंडोल गायला. त्या गायनाने आमच्या बॅडमिंटन हॉलचे छ्प्पर फाडून अंतराळाला गवसणी घातली होती. त्यानंतर माझ्या मनाचा एका मोठा भाग उस्तादांच्या बुलंद (हा शब्द फारच तोकडा आहे) गायकीने व्यापून टाकला होता. हे गाणं परत परत कसं ऐकायला मिळणार या भावनेने अस्वस्थ व्हायला व्हायचे. पुढे या दिव्य गायकाशी आपला बादरायण का होईना, पण संबंध निर्माण होईल, ही कल्पना पण मनाला शिवली नव्हती. हळुहळु गुंदेचा बंधुंच्या कॅसेट प्रकाशित व्हायला लागल्या. आणि काही प्रमाणात माझी डागर गायकीची तहान काही प्रमाणात भागली गेली. या काळात मला कंठसंगीत शिकायची अनिवार ओढ निर्माण झाली होती. शिकायची तर ज्या गायकांच्या माझ्यावर प्रभाव पडला होता त्यांचीच गायकी असं मी मनाशी ठरवले होते.

पुढे अनेक वर्षे गेली. सुमारे २००१ च्या सुमारास पुण्यात वीणा फौंडेशन नावाच्या एका संस्थेने एक मैफल आयोजित केली होती. उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर आणि त्यांचे शिष्य उदय भवाळकर एकत्र गाणार होते. भवाळकरांचे नाव वाचनात आले होते, पण गाणं ऐकले नव्हते. मी या मैफलीला जायचे मनोमनोमन पक्के केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उदय भवाळकरानी आपल्या गुरुजींची ओळख करून दिली. त्यात त्यांनी म्हटले, "उस्ताद आमच्या चुकांबद्दल आम्हाला कधीच रागवले नाहीत". हे वाक्य ऐकल्यावर कुठेतरी मला "इथे आपले जुळु शकते" ही भावना जागी झाली. नंतर त्याच कार्यक्रमात एक मजेशीर प्रसंग घडला. गायनासाठी मंचावर झिया फरिदुद्दीन डागर आणि उदय भवाळकर स्थानापन्न झाल्यावर उस्तादांनी प्रमुख पाहुण्यांकडे गाणे सुरु करण्यासाठी अनुमती मागितली आणि विचारले,

"काय गाऊ?"

"चंद्रकंस" प्रमुख पाहुण्यांनी फर्माईश केली.

"कौनसा चंद्रकंस, तिन तरहसे चंद्रकौस गा सकता हूं" - उस्ताद उत्तरले

"बिना षड्ज का" पाहूण्यानी बहूधा खवचटपणा केला असावा.

"देखो, जिंदगीभर षड्ज नही लगाऊंगा" - उस्तादांनी प्रत्युत्तर दिले आणि उपस्थित हास्यकल्लोळात बुडुन गेले.

आयुष्यभर ’सा’ न लावायचे आह्वान घेणं म्हणजे काय असतं हे फक्त जे गाणं शिकले आहेत त्यांनाच कळले तर कळेल.

हा कार्यक्रम संपला. मग मी घरी येताना उदय भवाळकरांना गाणं शिकवाल का असं विचारायचं मनोमन ठरवलं. माझं नशीब इतकं बलवत्तर की भवाळकरांनी मला होकार दिला. आणि आमची तालीम सुरु झाली. पहाटे पांच ते नऊ-साडेनऊ कधी दहा. उदयजींच्याकडचं संगीताचं शिक्षण मी आजवर घेतलेल्या संगीतशिक्षणापेक्षा पूर्ण वेगळं ठरलं. उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर उदयजींच्या तालमीतून हळुहळु उलगडत गेले आणि ते आमचे आजे-गुरुजी बनले!

"बेशरम हो के गाना" हा आमच्या गुरुजींनी दिलेला १ला मंत्र. आपल्या परंपरेचा कोणताही दुरभिमान, इतर कलाकारांना तुच्छ लेखणे, या सगळ्या गोष्टी भवाळकरांच्याकडे नव्हत्या आणि मला ते प्रकर्षाने जाणवले. मी कधीकधी गुरुजी म्युझिकरुम मध्ये नसताना धृपद परंपरेत गायले न जाणारे राग धृपदशैलीत आणता येतात का हे बघायचा प्रयत्न करायचो. पण त्याबद्दल उदयजींनी कधीही डॊळे वटारले नाहीत. "डोक्यात गाणे असते ते चूक का बरोबर याचा विचार न करता अगोदर बाहेर काढायचे आणी मग स्वरतालाच्या दुरुस्त्या करायच्या" हा दुसरा गुरुमंत्र मला उदयजींकडे मिळाला. विद्यार्थ्याच्या पूर्णपणे कलाने शिकवणारे उदयजी अत्यंत नम्रपणे छोट्या उस्तादांनी (झिया फरिदुद्दीन डागर) आम्हाला पण असंच शिकवलं, असं ते नम्रपणे कबूल करतात.

माझ्या मूळ प्रवृत्तीला हे भावल्यामुळे धृपदात एव्हढा ओढला गेलो की मला ख्याल खूपच उथळ आणि पचपचीत वाटायला लागला. मी अधिकाधिक धृपद ऐकायला लागलो. छोट्या उस्तादांचे धृपद ऐकताना एक महत्त्वाची गोष्ट जाणवली ती म्हणजे त्यांचे गाणं ऐकताना मी हळुहळु गाता व्हायला लागलो. उस्ताद एखादी स्वरकल्पना मांडत तेव्हा तिचा विस्तार मनात स्फुरायला लागला. रात्री बेरात्री दोन-तीन वाजता गाणे डोक्यात रूंजी घालायला लागायचे आणि मी तानपुरा काढुन गायला बसायचो. भारतीय योगशास्त्रात जी शक्तिपात ही कल्पना आहे तिचाच मी हा एकप्रकारे अनुभव घेत होतो.

उदयजींच्याकडे छोट्या उस्तादांचे येणेजाणे असे. ते आले की आम्हाला ज्योतीताईंचा फोन यायचा. मग हातातले काम टाकून उस्तादांचे गाणे ऐकायला मिळेल या आशेने आम्ही तिकडे धाव घ्यायचो. वेगवेगळ्या विषयांवर उस्ताद गप्पा मारत असत. आपल्या शिष्याबरोबर चेष्टामस्करी त्यांना वर्ज्य नव्हती. एकदा आमच्यापैकी एकाने त्यांना विचारले, "उस्ताद तुम्ही किती रियाझ करायचा?" त्यावर ते म्हणाले, "तुम्हाला खरं सांगू की खोटं सांगू?"

"खरं आणि खोटं, दोन्ही सांगा" आमच्यापैकी कुणीतरी म्हणाले.

"खोटं उत्तर आहे, १८-१८ तास! आणि खरं उत्तर आहे ३ ते ४ तास!" हा प्रांजलपणा मला संगीतशिक्षणाला गूढत्वाने क्लीष्ट बनविणार्‍या प्रवृत्तीना छेद देणारा तर वाटतोच पण इतर कोणत्याही कलाकारात मला तो दिसलेला नाही.

असाच एक प्रसंग.

ज्योतीताईंचा फोन आला की "उस्ताद गायला बसले आहेत. शक्य असेल तर लगेच या". मी हातातले काम टाकून गुरुजींच्या घराकडे धाव घेतली. छोटे उस्ताद आणि आमचे गुरुजी एकत्र गात होते. १२ अंगांनी धृपद कसे गायले जाते याचे खुलासेवार स्पष्टीकरण आणि गाणे असे दोन्ही रंगत चालले होते. आमच्या भाग्यवान गुरुजींचे संगीतशिक्षण कसे झाले असेल याचा तो सोहळा एकप्रकारे आमच्या समोर उलगडला गेला होता... आणि एका अत्यंत अनपेक्षित उत्कट क्षणी उस्तादांनी गाणे थांबवले आणि उदयजींच्या हातातल्या तंबोर्‍याला वाकून नमस्कार केलाच, पण पुढच्या क्षणी उदयजींच्या पायांना पण स्पर्श केला...

आता मला सांगा शिष्याचे पाय धरणारा गुरु तुम्ही कधी बघितला आहे. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की या प्रसंगाचा मी साक्षीदार होतो...