रविवार, २७ ऑक्टोबर, २०१३

"गोल्डमेडल"



ही गोष्ट आहे मी कॉलेजात असतानाची...

तेव्हा शुद्ध गणितात चमकणार्‍या ईश्वराच्या लाडक्या पुत्रांबद्दल माझ्या मनात एक असूया निर्माण झाली होती. या माझ्या मनातल्या असूयेने  मी त्यावेळेला गणितात गोडी वाढविण्यासाठी काहीसे दिशाहीन प्रयत्न करत होतो. ते बघुन माझा एक मित्र मला म्हणाला,
"तुला प्युअर मॅथ्समध्ये interest असेल तर माझ्या बरोबर प्रा. श्रीराम अभ्यंकरांकडे चल. ते उत्तेजन देतात आणि मदत पण करतात".

मला ती कल्पना आवडली आणि आम्ही एका दिवशी दुपारी ४ वाजता प्रा. अभ्यंकरांच्या घरी जाऊन थडकलो. बुट, चपला काढुन दिवाणखान्यात दारावर टक्टक करून पाऊल टाकले तेव्हा एका दिवाणावर बनियन, पायजमा अशा पोषाखात उशीवर हनुवटी टेकवुन पालथे पडलेले प्रा. अभ्यंकर दिसले. आमची चाहुल लागताच, न उठताच त्यानी "या बसा" केले.

मित्राने माझी ओळख करून दिली. प्रा. अभ्यंकरांनी लोळतच प्राथमिक चवकशी सुरु केली...

"काय सध्या वर्गात कोणता टॉपिक चालला आहे?"
"Determinants, Sir" - माझा मित्र उत्तरला...
"काय रे Determinants म्हणजे काय रे"?

आम्ही दोघांनी पाठ केलेल्या व्याख्या घडाघडा म्हणुन दाखवल्या.

मग  प्रा. अभ्यंकरांनी आणखी एक प्रश्न विचारला. आमच्याकडुन जसजशी उत्तरे मिळाली तेव्हा प्रश्नांची पातळी अधिकाधिक अवघड होत गेली. प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी कागद-पेन वापरायची परवानगी नव्हती. पुस्तके बरोबर नव्हती म्हणुन ती पण बघायचा प्रश्न नव्हता.

प्रश्नांची उत्तरे जेव्हा चुकली तेव्हा प्रा. अभ्यंकरांनी प्रश्नांची फोड केली किंवा पुनर्रचना केली. पण आमच्याकडुन बरोबर उत्तर मिळवायचेच आणि मग पुढचा प्रश्न टाकायचा हा उद्योग चालु ठेवला.

हे सर्व चालु असताना दिवाणावर उशीला कवटाळुन लोळणे चालुच होते. कधी नव्हे एव्हढे माझ्या डोक्याने सलग उत्तरे द्यायचे काम केल्याने डोक्याला मुंग्या यायला सुरुवात झाली आणि मग होता होता रात्रीचे आठ वाजले.

ते दिवस मोबाईलचे नव्हते. घरी आई-वडील वाट बघतील किंवा उशीर झाला म्हणुन रागवतील म्हणुन आम्ही प्रा. अभ्यंकरांना मध्येच थांबवले आणि परत यायची अनुमती मागितली. त्यावर प्रा. अभ्यंकरांनी गृहपाठ म्हणुन आणखी दोन प्रश्नांची उत्तरे शोधुन यायला सांगितले.

आम्ही उठुन बुट-चपला घालायला गेलो तेव्हा प्रा. अभ्यंकर दिवाणावरुन उठले आणि दारापाशी निरोप द्यायला आले आणि म्हणाले,
"तुमच्यापैकी प्युअर मॅथ्स पुढे कोण करणार?"

मी धीर करून म्हणालो,
"सर, प्युअर मॅथ्स करणं हे फक्त गणितात गोल्डमेडल मिळवणार्‍या ईश्वराच्या लाडक्या पुत्रांच काम..."

त्यावर प्रा. अभ्यंकर हसले आणि म्हणाले,
" एक मिनिट, जरा थांब... महाराष्ट्रात किती विद्यापीठे आहेत?"

अचानक वेगळाच प्रश्न आल्याने बुटाच्या नाड्या बांधता-बांधता माझी भंबेरी उडाली.
"पुणे, मुंबई, नागपुर, शिवाजी आणि मराठवाडा... " आम्ही पट्‍कन हिशेब मांडला.

"...आणि संपूर्ण भारतात अशी किती विद्यापीठे असतील" - प्रा अभ्यंकरांचा पुढचा प्रश्न.

"अंदाजे दीडशे-दोनशे" मी उत्तरलो.

"आता बघ प्रत्येक विद्यापीठात दरवर्षी बीएस्सीला एक आणि एमेस्सीला एक अशी दोन पदके दिली जात असतील. म्हणजे दरवर्षी भारतात साधारणपणे ४०० गोल्डमेडल्स दिली जातात. म्हणजे गेल्या १० वर्षांत एकंदर ४००० हजार गोल्डमेडॅलिस्ट भारतात तयार झाले. हे सगळे कुठे गेले? हे काही करताना दिसत नाहीत?"

मी "हे काही करताना दिसत नाहीत?" हे वाक्य ऐकुन नि:शब्द आणि थक्क झालो आणि त्याक्षणी माझ्या  मनातला प्युअर मॅथ्सबद्दल असलेला न्यूनगंड नाहिसा झाला. घरी परत येताना आम्ही त्या प्रश्नोत्तर संवादाची उजळणी केली तेव्हा केवळ तोंडी उत्तरे देतदेत त्या चार तासात जी मजल गाठली त्या जाणीवेने अंगावर मूठभर मांस नक्कीच चढले होते.

विज्ञानप्रचाराच्या नावाखाली स्वत:ला प्रसिध्दीच्या झोतात ठेवुन परीकथा पाडणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ वेगळे आणि विचारशक्ती फुलवुन भयगंड घालवणारे प्रा. अभ्यंकर निराळे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: