रविवार, २० जुलै, २०१४

जीवसृष्टीचा शोध : निरर्थक उद्योग


माणुस अवकाशात जीवसृष्टीचा पृथ्वी व्यतिरिक्त शोध घेण्याचा प्रयत्न करतो आहे. पण माझ्या काही मूलभूत शंका आहेत...

समजा जीवसृष्टीचा शोध लागलाच तर ते जीव आपल्यापेक्षा मूलत: वेगळे असतील का? एकपेशीय जीव, प्राणी आणि वनस्पती यापेक्षा तिथे निराळी जीवसृष्टी असु शकेल का? मला वाटतं नाही. याची मुख्य कारणे अशी की, तिथली मूलद्रव्यं, तिथले पिरीयॉडिक टेबल आपल्यापेक्षा वेगळे नसणार. साहजिक ही मूलद्रव्ये विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट नियमांनी तीच संयुगे निर्माण करणार. कदाचित त्यांचे प्रमाण कमी-जास्त बदलेल, जसे वाळवंटात पाण्याचे प्रमाण कमी असते.

थोडक्यात निसर्गाचे मूलभुत नियम तिकडे वेगळे असायचे कारण नाही. आता हाच युक्तीवाद पुढे खेचला तर असे लक्षात येते की अंतराळातील जीवसृष्टी आपल्यापेक्षा फार वेगळी असेल असं नाही फक्त तेथील वातावरणानुसार काही जीवांचे प्राबल्य असेल. उदाहरणार्थ, अंतराळातील एखादा ग्रह जर फक्त पाण्याने आच्छादलेला असेल तर तिथे कदाचित फक्त जलचरच सापडतील. कदाचित तिथले काही जलचर पृथ्वीवर अस्तित्वात नसतील किंवा यायचे असतील. एव्हढेच... पण पाण्याखाली वसती करून राहणारा मानव तिथे अस्तित्वात यायची शक्यता किती. मला वाटतं शून्य. कारण पृथ्वीवर अजुन मनुष्य पाण्याखाली वस्ती करू शकत नाही.

थोडक्यात पृथ्वीवर कोट्यवधीवर्षात निसर्गनियमांच्या मर्यादांनी जे घडु शकलेलं नाही ते अवकाशातील जीवसृष्टीमध्ये पण घडु शकायची शक्यता पण शून्यच वाटते. निसर्गाचे नियम तिथे पण तेच असल्याने त्याच्या मर्यादा पण त्याच असणार.

म्हणुनच मला अंतराळातील जीवसृष्टीचा शोध एक निरर्थक उद्योग वाटतो...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: