मंगळवार, ८ मार्च, २०१६

आधार



चार्वीचा शाळेतला एक मित्र आहे. अनुप्रियम... त्याचा मला खुप हेवा आणि कोतुक वाटते. तो हूषार आहेच पण उत्तम चित्रे काढतो. यावर्षी म्हणजे १२वीच्या वर्षी (त्याच्या भावाचे दहावीचे) त्याचे वडिल अचानक गेले. पण या पठ्ठ्याने हा प्रसंग शांतपणे झेलला आणि आत्ता NID आणि UCEED च्या प्रवेशपरीक्षा  उत्तम तर्‍हेने पास झाला आहे.

नुकतीच त्याच्या वॉलवर नजर टाकली तेव्हा कुणाचे तरी सांत्वनपर शब्द दिसले,
"Be brave beta we all are with you"

का नाही हेवा वाटणार?

मला त्याच्यासारखे खंबीर का बनता आले नाही या विचाराने अजुन अधुनमधुन अस्वस्थ व्हायला होते.

माझे वडिल मी आय.आय.टीत असताना गेले तेव्हा मी पूर्णपणे कोसळून गेलो. मी १२ वीत परिक्षेच्या अगोदर १ महिना असताना माझ्या वडिलांना दूसरा ऍटॅक आला तेव्हा डॉकटरांनी स्पष्ट सांगितले होते, "येईल तो दिवस आपला समजा. केव्हा काय होईल ते सांगता येणार नाही."

त्यानंतर भयानक मानसिक अस्वस्थतेत आम्ही सहा वर्षे लढा दिला. रात्री मला आणि आईला दचकुन जाग यायची तेव्हा वडिलांचा श्वासोच्छवास चालु आहे की नाही हे बघुन परत झोपी जात असु.

त्यादिवसात वडिलांच्या (हलकट आणि नीच) नातेवाईकांकडुन कसलाच आधार नव्हता. होता तो आईच्या आई-वडिलांकडुन आणि वडिलांच्या ऑफिसमधल्या सहकारी आणि मित्रांकडुन.

वडिलांचे अंत्यसंस्कार उरकुन स्मशानातुन बाहेर पडता-पडता चुलत्याची अस्वस्थता लपली नाही. त्या थेरड्याला वडिलकीची भूमिका कधीच निभावता आली नाही, पण भावाची चिता विझली नाही तोच पुतण्या परदेशी जाणार का याची काळजी त्याला अस्वस्थता करत होती...

घरी आल्यावर दू:ख मोकळे करायची पण सोय नव्हती. ’फंडाचे पैसे किती मिळतील’ आणि ’घर विकुन टाका’  इथपर्यंत चौकशा आणि सल्ले चहुबाजुनी येत होते. अभ्यासात लक्ष लागत नव्हते तेव्हा विचारपूस करणे राहिले बाजुला, त्यात भरीसभर म्हणुन आय.आय.टीत विळदकर नावाच्या एका प्राध्यापकाने मी ड्रग्ज घेतो का अशी अफवा पसरवायला कमी केले नव्हते (माझ्या सुदैवाने माझ्या मित्रांनी तेव्हा त्याला गप्प बसवले होते). अशा असंख्य गोष्टी आहेत.

मला चार्वीच्या मित्रासारखे खंबीर राहता आले नाही याची कारणे मला आता हळुहळु समजत आहेत. त्याच्या आजुबाजुला खच्ची करणारी माणसे नाहीत ... पितृछत्र हरवले असले तरी नशीबवान आहे तो...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: