शनिवार, २२ जुलै, २०१७

इच्छापूर्ती

कुणी काहीही म्हणोत, निसर्गाने मला पुस्तकी हूशारी दिली नसली तरी सुपीक डोके भरपूर दिले आहे. आईवडिलांनी आणि शाळेत कवठेकरसरांनी त्यांच्या कुवतीनुसार माझ्या सुपीक डोक्याची भरपूर मशागत केली. दूर्दैवाने ही सुपिकता मोजायची तेव्हा पद्धतही नव्हती आणि त्यासाठी प्रगतीपुस्तकात रकानाही नव्हता. असता तर माझा नंबर १ला नक्की आला असता.

शाळेत असताना अनेक वेडगळ कल्पनांना बोलुन दाखवायची हक्काची जागा म्हणजे कवठेकरसरांचा हॉबीक्लब! कल्पनाशक्तीला खर्‍या अर्थाने पंख देणारी जागा तेव्हा पुण्यात एकाच शाळेत होती, ती म्हणजे नूमविमधला कवठेकरसरांचा हॉबीक्लब! कवठेकरसरांची दूसरी एक देणगी म्हणजे आमच्या संगीतद्वेष्ट्या घरात जन्म घेऊन त्यांच्यामुळे मला शास्त्रीय संगीताची गोडी लागली आणि माझ्या पणजोबांचे म्हणजे कै. विठ्ठल सीताराम गुर्जरांचे मोठेपण, कवठेकरसरांच्या वडिलांनी म्हणजे कै. दत्त रघुनाथ कवठेकरांनी सांगितल्यामुळे मला कळले.

तर या हॉबीक्लबमध्ये आम्ही आठवीत आणि नववीत असताना बरेच उद्योग केले! बर्‍याच गोष्टी करण्याचे भरपूर मनसुबे पण केले (त्यातले एक म्हणजे खराखुरा म्हणजे १६ मिमि प्रोजेक्टर हाताळून सगळ्यांना खरा सिनेमा दाखवायचा आनंद कवठेकर सरांमुळे मिळाला.). मी तेव्हा आणखी दोन गोष्टीनी खूप झपाटून गेलो होतो - एक म्हणजे ट्रान्समीटर आणि दूसरे म्हणजे स्टीम-इंजिन! या दोन गोष्टीसाठी मी बराच हट्ट, आदळआपट पण केलेली आहे. पण ट्रान्समीटर करू देण्यास कवठेकरसर त्यातल्या कायद्याच्या कटकटीमुळे राजी नव्हते. स्टीम-इंजिन करायला हरकत नव्हती पण योग्य सामग्री आणि त्यासाठी लागणारे वर्कशॉप मिळणे तेव्हा जरा अवघड होते. स्टीम-इंजिनचा आराखडा करण्यात मी असंख्य तास घालवले. साहित्य गोळा करण्यासाठी अनेक वर्कशॉपचे उकिरडे पालथे घातले. घरात कचरा गोळाकरण्यासाठी मार पण खाल्ला. कधी सिलेंडर साठी पाईपचा योग्य तुकडा मिळायचा तर कधी पिस्टन साठी. हे दोन्ही मिळाले तर फ्लायव्हील साठी योग्य धातूचा तुकडा मिळत नसे. वडिलांनी मला सांगितले होते की, "तुझे सगळे साहित्य गोळा झाले की मला सांग. मग मी ते जोडण्यासाठी योग्य वर्कशॉप शोधून देईन." एखादा योग्य तुकडा सापडला की वडिलांना आणि कवठेकरसरांना दाखवायचा आणि त्यांचे मत घ्यायचे हा तेव्हा नेम होता. तेव्हा दोघेही मला नाउमेद न करता गंभीरपणे सूचना करत असत. हे साहित्य गोळा करताकरता दहावी झाली. अकरावीत गेलो. अकरावीत असताना वडिलांना १ला हार्ट अटॅक आला आणि आयुष्य विस्कळीत झाले. मग सगळी स्वप्ने बासनात बांधून ठेवावी लागली होती. त्यात स्टीम एंजिनचे स्वप्न पण गुंडाळले गेले आणि अडगळीत गेले...

आज हे आठवायचे कारण म्हणजे आज सकाळी ऍमेझॉन वर घोटाळत असताना एक खेळणे दिसले. बराच वेळ निरखले तेव्हा मी ४० वर्षापूर्वी डिझाईन केलेल्या स्टिम-एंजिनला कुणी तरी प्रत्यक्षात आणून विकायला ठेवले होते. किंमत रुपये ३००० फक्त. खालच्या प्रतिसादात कुणीतरी आपल्या सत्तरीतल्या वडीलांना ते भेट दिले तेव्हा त्यांना झालेला आनंद वर्णन केला होता. मी बराच वेळ त्या खेळण्यात हरवून गेलो होतो, तेव्हा शेजारी बसलेल्या बायकोला कळेना नवरा एव्हढा एका खेळण्यात का हरवला आहे. तेव्हा मी तिला वरील सर्व हकीकत सांगितली अन् म्हणालो घ्यावे की न घ्यावे कळत नाहीये. आणि मग एक सुखद आश्चर्याचा धक्का बसला...

बायकोने हुकूम सोडला, "घेऊन टाक. माझी तुला वाढदिवसाची भेट!" :D
मग बायकोने कंप्युटरचा ताबा घेऊन लगेच ऑर्डर पण केले आहे.

आयुष्यात मी कदाचित एखादी महागडी कार घेईनही. पण या खेळण्याची सर त्या गाडीला नसेल. Thanks you Aparna!! :D

असो, आयुष्याचा एकंदर ताळेबंद मांडला तर पूर्ण झालेल्या स्वप्नांची संख्या अपूर्ण स्वप्नांपेक्षा किंचित जास्तच आहे. स्वप्ने बघायला शिकविण्यात आईवडिलांचे आणि कवठेकर सरांचे योगदान मोठ्ठे आहे...

शनिवार, १ जुलै, २०१७

प्राणायाम आणि संगीताचे पारंपरिक शिक्षण



प्राणायामाबद्दल मला लहानपणापासून एक जबरदस्त आकर्षण आणि कुतूहल होते. पण तेव्हाच्या प्रचलित समज आणि गैरसमजामुळे (लहान मुलांनी प्राणायाम करू नये, तो ’गुरु’च्या मार्गदर्शनाखालीच करावा, इ० इ०) प्राणायामाचा पूर्ण फायदा कधीच मिळवता आला नाही. पण सध्या डॉ. दीक्षितांबरोबर करत असलेल्या एका लेखनप्रकल्पामुळे प्राणायामाचे आकर्षण परत एकदा जागे झाले आहे

डॉ. दीक्षितांनी सांगितलेल्या तंत्रानुसार मला प्राणायामाच्या सरावाचा फायदा तात्काळ झाला असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही. सध्या मला ७०%-८०% वेळा रक्तदाब आणि हृदयगति हूकमी (at will) कमी करून नियंत्रणात आणता येते. फेबुवर मी माझ्या प्राणायामोत्तर रक्तदाबाच्या आकड्यांचे फोटो शेअर केले आहेतच पण जनुकीय पातळीवर होणारा फायदा वेगळाच (तो मोजायचा खर्च रु २०,०००/ असल्याने सध्या तो विचार लांबणीवर टाकला आहे).

पण सांगण्यासारखा गमतीचा भाग आणखी वेगळाच आहे...

काही वर्षांपूर्वी उदय भवाळकरांच्याकडे धृपद शिकत असताना आम्ही आवाजाच्या तयारीसाठी पहाटे पाच वाजता तंबोरे घेऊन खर्जाचा सराव करत असू. पहाटे पाच वाजता उठून खर्जाचा अभ्यास करण्यामागे परंपरेचे एक तर्कशास्त्र आहे - पहाटेची वेळ मंद्रसप्तकातल्या सुरांच्या अभ्यासाठी आदर्श असते. मन स्वरावर एकाग्र करता येते वगैरे वगैरे.

पण खरी गंमत पुढे आहे...

थोडा खोल विचार केला तेव्हा असे लक्षात आले की खरजाचा अभ्यास हा एक उत्तम प्राणायाम आहे.  त्याचा शारीरपातळीवर होणारा परिणाम मात्र शरीर शांत करणारा आणि मेंदू बंद करणारा आहे. होय! मेंदू बंद करणारा आहे. प्राणायाम २० मि.पेक्षा जास्त वेळ करायचा नसतो. पण आमचा खर्जाचा अभ्यास  पहाटे पाचला सुरु होऊन सातवाजेपर्यंत चालत असे. म्हणजे प्राणायामाच्या ओव्हरडोसमुळे आम्ही खर्जाचा अभ्यास करून जेव्हा इतर रियाज करायचो तेव्हा आमचा मेंदू अर्धसुप्त किंवा पूर्णसुप्त नक्कीच असायचा. थोडक्यात ब्रेकवर पाय ठेवून गाडी ऍक्सिलरेट करण्याचा प्रकार...

सांगायचे तात्पर्य एव्हढेच की वर्षानुवर्षे मेंदूला inefficient करून मग तालमात्रांची गणिते सोडवत जे पुढे मोठे धृपदीये झाले ते केवळ थोरच नाहीत तर निसर्गाचा एक महान चमत्कार आहेत. एखादी कला काळाच्या ओघात जेव्हा टिकत नाही अशी ओरड जेव्हा होते तेव्हा त्यामागे डोके बंद करणारी शिक्षणपद्धती तर नसेल?