बुधवार, २० मे, २०२०

डी जीवनसत्त्व

डी जीवनसत्त्व
==========

काही वर्षांपूर्वी जेव्हा डी जीवनसत्त्वाबद्दल नवे ज्ञान निर्माण झाले आणि माझ्या वाचनात आले तेव्हा मी ते वाटायला सुरुवात केली होती. माझी तेव्हा यथेच्छ टिंगलटवाळी झाली.


इतकच नव्हे तर तेव्हा डॉ०ना न सांगता मी माझी डी जीवनसत्त्वाची चाचणी करून घेतली होती. आणि (प्रथमच केलेल्या) चाचणीत डी जीवनसत्त्व प्रचंड कमी आढळले होते म्हणून डॉ० ना दाखवले तेव्हा "न विचारता चाचणी केली" म्हणून डॉक्टरांनी कपाळाला आठ्या पाडून डोळे वटारले होते...पण आज मी शहाणा ठरलो आहे आणि निर्लज्जपणे स्वत: स्वत:चीच पाठ थोपटून घेताना मला अतिशय आनंद होत आहे.

या डी जीवनसत्त्वाने माझ्याबाबतीत झालेला एक महत्त्वाचा चमत्कार म्हणजे मला अचानक अंडी पचायला सुरुवात झाली. तेव्हापासून आजतागायत मला अंडी पोटात गेली नाही तर जीव कासाविस होतो. विश्वास बसत नसेल तर माझ्या बायकोला विचारावे...

ॲलोपथी समस्येच्या मुळाशी जात नाही असे बोलले जाते. पण जनुकीय पातळीवर काम करणारी औषधे आणि द्रव्ये मुळाशीच काम करतात अशी आता माझी ठाम समजूत आहे. डी जीवनसत्त्व जनुकीय पातळीवर आणि म्हणून असंख्य आघाड्यांवर काम करते.

अजुनही बरेच मूर्ख लोक डी जीवनसत्त्वाची चाचणी करायला, तसेच त्याचा पूरक पुरवठा करायला नाखूष असतात. सूर्यप्रकाशात हे जीवनसत्त्व तयार होत असले तरी सध्याच्या काळात सूर्यप्रकाश आणि तो मिळवण्यासाठी आवश्यक असलेला वेळ आणि जागेची अनुपलब्धता, कातडीचा वर्ण, अंग उघडे न टाकण्याबद्दलच्या (विशेषत: स्त्रियांच्या बाबतीत) आचरट कल्पना यामुळे आपण कायम याबाबतीत वंचित राहतो.

आज करोनाच्यासाथीमध्ये काही डॉक्टर डी जीवनसत्त्व आपल्या आजुबाजुच्या लोकांना भेट म्हणून वाटा असे सांगतात, तेव्हा आपले सरकार याबाबत मूग गिळून गप्प राहते याचे वाईट वाटते.

गुरुवार, ७ मे, २०२०

एका न झालेल्या पुस्तकाविषयी


नुकताच प्राणायामाच्या अभ्यासातला एक महत्त्वाचा टप्पा गाठला (माझ्या रक्तदाब आणि हृदयगतीच्या प्रगतीचे फोटो नुकतेच इथे टाकले होते). माझ्या दृष्टीने माझ्यासाठी ही एक मोठी उपलब्धी किंवा खरं सांगायच तर एक सिद्धीच आहे (कारण या टप्प्यावर किंवा इथुन पुढे तांत्रिकदृष्ट्या काही औषधांपासून मी मुक्त होऊ शकतो - जे मी सध्या तरी डॉ.च्या सल्ल्याशिवाय करणार नाही). पण या टप्प्यावर काही ठळक अनुभव इथे सांगायचे आहेत.

माझ्या परिचयातले काही जण कुजकटपणे "अरे, तुझ्या त्या पुस्तकाचे काय झालं?" असं विचारत असतात. एका डॉक्टरांनी तर  (डॉ. दीक्षितांना उद्देशून) "रेडिओलॉजिस्ट हे खरे डॉक्टर नसतात" असं सांगून माझा बुद्धीभेद करायचा प्रयत्न केला होता. एका ग्रुपमध्ये एक योगाभ्यासक प्राणायामावरील जुनाट, कालबाह्य ज्ञान लेखांद्वारे प्रसृत करत होते. तिथे आमची प्राणायामावरची लेखमाला मी प्रसृत केली तेव्हा हे योगाभ्यासक अस्वस्थ झाले. त्यांनी ज्ञान आणि माहिती असा सवतासुभा निर्माण करून आमची लेखमाला माहितीपूर्ण असली तरी ते "ज्ञान नव्हे" असा संदेश देऊन स्वत:चे महत्त्व वाढवायचा प्रयत्न केला. आपल्यासमोर आलेली माहिती कोणत्या प्रक्रियेतून निर्माण झाली आहे किंवा ज्ञान आणि माहिती यांच्यात काही परस्पर संबंध असतो (विशेषत: आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नियतकालिकात वेगवेगळ्या जागतिक विद्यापीठामध्ये झालेले ताजे संशोधन हे केवळ माहिती नसते तर ते अत्यंत शिस्तबध्दपणे केलेले, जिज्ञासेने केलेले ज्ञानसंपादन असते, हे समजाऊन घेण्य़ाची कुवत त्या योगाभ्यासकांमध्ये आणि त्या समूहाच्या सदस्यांमध्ये नव्हती.

फार थोडे, अगदी मूठभर वैद्यकीय व्यावसायिक प्राणायामावर नि:संदिग्ध, अभ्यासपूर्ण मत मांडू शकतात असा माझा अनुभव/निरीक्षण आहे. बहुतांश वैद्यकीय व्यावसायिक आणि त्यांची ’रि’ ओढणारे विज्ञानवादी "हे अजून पुरेसे सिद्ध झालेले नाही" असे म्हणून प्राणायामावर बोळा फिरवण्याची हूशारी तत्परतेने दाखवतात. यांना डॉक्टर का मानावे, असा मला आता प्रश्न पडतो. असो.

प्राणायामाच्या अभ्यासात सर्वसामान्य लोकांना येणारी महत्त्वाची अडचण म्हणजे त्यांना स्वत:मध्ये घडून येणा-या बदलांचे निरीक्षण करता येत नाही आणि मग motivation संपते आणि monotony ने प्राणायाम नीरस आणि कंटाळवाणा बनतो. सध्या लॉकडाऊनमुळे माझी पत्नी आणि मुलगी माझ्याबरोबर प्राणायाम करतात. Pulse oximeter सारख्या स्वस्त आणि महत्त्वाच्या साधनाने त्यांना प्राणायामाचा हृदयगतीवर होणारा महत्त्वाचा परिणाम दिसल्याने त्यांचा उत्साह टिकून राहिला आहे.

आमची लेखमाला संपली तरी मी ताजे संशोधन वाचत राहिलो. Autonomous nervous system चा शरीरातील अवाढव्य पसारा, शरीरातील सूक्ष्म व्यवहारांवरील नियंत्रण अचंबित करणारे आहे. त्यामुळे एक महत्त्वाची गोष्ट निश्चितपणे सांगता येते - एखाद्या व्यक्तीला प्राणायामाचा विवक्षित फायदा होईल की नाही, हे अनेक कारणांनी निश्चितपणे सांगता आले नाही तरी काही ना काही फायदा नक्कीच होईल - कुणाची रक्तदाबाची औषधे सुटतील किंवा कमी होतील तर एखाद्याचा उद्या येऊ शकणारा हार्ट ॲटॅक किंवा कॅन्सर एकतर येणारच नाही किंवा पुढे ढकलला जाईल, किंवा एखाद्याचा मधुमेह नियंत्रणात राहिल किंवा बरा होईल. प्राणायामाचे निंदक याच गोष्टीची कुचेष्टा करतात. पुढे ढकललेल्या किंवा टाळल्या गेलेल्या धोक्याचं महत्त्व समजायची कुवत निसर्गाने दूर्दैवाने सर्वाना समान दिलेली नाही.

मंडळी, तेव्हा आमचं पुस्तक झालं नाही हा आमचा पराभव नसून आम्ही ज्या समाजाच्या भल्यासाठी ते लिहीले होते त्या समाजाचा पराभव आहे (आम्ही आमचे भले करून घेतले आहेच), हे कळले तरी पुरे...