शनिवार, १० जून, २०२३

सत्त्वपरीक्षा

 सत्त्वपरीक्षा

========


-राजीव उपाध्ये


आयुष्यात सहनशीलतेची परीक्षा घेणारे प्रसंग तुम्ही कसे हाताळता? अशा प्रसंगात आपले कोण आणि परके कोण हे मात्र नक्की समजतात.


गेल्या वर्षी याच महिन्यात अपर्णाने (बायकोने) स्विगीवरून भेळ मागवली आणि एकदोन दिवसात हळूहळू तिची तब्येत बिघडायला सुरुवात झाली. प्रथम मळमळ आणि पोट बिघडणे ही सामान्य लक्षणे होती आणि प्राथमिक उपचारांनी बरे वाटेल, अशी अपेक्षा होती. पण नंतर लक्षणांची तीव्रता वाढून अपर्णाला ताप भरला. सुरुवातीला ताप साधा वाटला पण तो वाढला आणि त्यात अपर्णाचे बोलणे असंबद्ध होऊ लागले आणि ऑक्सीमिटरवर ऑक्सीजनची पातळी बघितली, तेव्हा मात्र मी घाबरलो आणि तिला हॉस्पिटलमध्ये जाऊ या, असे सुचवले. अपर्णाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचे नव्हते कारण घरातलं सगळं रूटीन बिघडेल, असा त्या अवस्थेत तिचा युक्तिवाद होता. 


खालावलेली ऑक्सीजन पातळी आणि असंबंद्ध बोलणे यामुळे मी पूर्णपणे हादरलो होतो आणि उशीर करणे माझ्या अंगलट येऊ शकले असते. शक्य तेव्हढ्या शांतपणे मी तिला पटवायचा प्रयत्न केला पण तो फोल ठरला. हळूहळू माझा धीर सुटायला लागला आणि मग मी नाईलाज झाला तेव्हा आवाज चढवला. खूप थयथयाट केला तेव्हा अपर्णा हॉस्पिटलमध्ये यायला तयार झाली. हॉस्पिटलमध्ये चाचण्या केल्यावर साधी कावीळ असे निदान झाले आणि डॉक्टरांच्या अपेक्षेप्रमाणे ताप २-३ दिवसात निघाला पण.) पण मुद्दा असा आहे की माझा थयथयाट त्यावेळेला कुणी रस्त्यावर ऐकला असता तर या बाईचा नवरा हिला किती छळतो, असा प्रश्न अनेकांना पडला असता. पण त्या अगोदर मी बराचवेळ शांतपणे समजावून सांगण्याचा केलेला प्रयत्न रस्त्यावर कुणाला कधीच कळला नसेल.


माझ्या सहनशक्तीची पराकोटीची परीक्षा मी माझ्या आईच्या मेनोपॉजमध्ये दिली. 


८६ साली वडील गेल्यानंतर आईची तब्येत हळूहळू ढासळायला सुरुवातीला झाली. भविष्याविषयीच्या अनेक स्वप्नांवर पाणी अगोदरच पडले होते. जे काही करायचे ते पुण्यात राहूनच करावे लागणार होते. "आईला सोडून दे" असे सांगणारे काही महाभाग मला तेव्हा भेटले. त्यांचे ऐकले असते तर नक्की काय आणि किती साधले असते, हे ठरवणे आता अवघड आहे. पण आईकडच्या नातेवाईकांनी मात्र मला कच्चे सोलून खाल्ले असते, हे मात्र नक्की...


आईच्या तेव्हाच्या मानसिक स्थितीला काही मानसिक आघातांची किनार होती, तसेच एका सुपरस्टीशनची पण त्याला किनार होती (माझ्या आयुष्यात ज्यांनी माती कालवली त्यात ज्योतिषांचा सहभाग खूप आहे). लायकी असून आपले आयुष्य वाया गेले, ही आईची भावना त्यात प्रमूख होती (हा त्यातला खरा तथ्याचा भाग. आईला जवळून ओळखणारे सर्व हे निर्विवाद मान्य करायचे.). तिचं सगळं वैफल्य माझ्यावर निघत होते. एकूलता एक असण्याचा हा दोष...


आज उशीरा का होईना मला आयुष्यातल्या बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असल्याने retrospectively आईला समजून घेता येते, पण तेव्हा मात्र मी एका वणव्यात सापडलो होतो. तेव्हाचे मित्र तर असून नसल्यासारखे होते (आई तेव्हाही त्यांना "हे तुझे फक्त सुखाचे सोबती" असे म्हणायची. प्रत्यक्षात ते सुखाचे सोबती तरी होते का असा प्रश्न आता पडतोच). पण मनातली घालमेल बोलून दाखवायला दूर्दैवाने एकही योग्य जागा नव्हती. 


मला जेव्हा हे असह्य होई तेव्हा मी आमच्या तेव्हाच्या फॅमिली डॉक्टरांना भेटायचो. मग त्या मला Restyl घ्यायला सांगायच्या किंवा "आईला सायकियाट्रिस्टकडे घेऊन जा" म्हणून थंडपणे सांगायच्या. पण आईचे वागणे असे का आहे याबद्दल एक अवाक्षर त्या बोलल्या नाहीत. मी दोन सायकियाट्रिस्टकडे तिला घेऊन पण गेलो. पण अशा पेशंट बरोबर रॅपो निर्माण करणे ही डॉक्टरांची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यात ते सपशेल अपयशी ठरले. आज मला त्यांची आठवण झाली की पायातली चप्पल काढावीशी वाटते. पण  दिवसामागून दिवस जात होते. अधूनमधून आईची मनस्थिती खूप छान असायची. माझं संस्कृत तिच्यापेक्षा चांगलं होतं, याचा तिला अभिमान होता.  तिने दिलेला वाचनाचा आणि पाठांतराचा किडा मी जोपासला याचा पण तिला अभिमान होता. मी पुस्तकांची चळत घेऊन आरामखुर्चीत वाचत बसलो की तिला भारी कौतूक वाटायचे. मुलांनी आईवडीलांच्या पुढे गेलेच पाहिचे, हे आईने माझ्यावर मनावर बिंबवलेले महत्त्वाचे तत्त्व.  त्याच सुमारास माझ्या संगणकीय संगीतावरील कामाला भरपूर प्रसिद्धी मिळाल्याने अधूनमधून ती सुखावायची, पण ते सुख फार काळ टिकत नसे. 


असंच एकदा आईच्या मानसिक स्थितीने कमालीचा तळ गाठला होता आणि माझ्या आय० आय० टी० मधल्या एका डॉक्टर मित्राचा मला फोन आला की तो पुण्यात आहे आणि त्याला मला भेटायचे होते. आय० आय० टी० मध्ये मला जे काही थोडे चांगले मित्र मिळाले, त्यात हा एक होता. त्याची आई त्याच्या लहानपणी गेली होती आणि तरीही तो डॉक्टर झाला आणि आय० आय० टी० मध्ये एम०टेक० करायला आला, याचे माझ्या आईला खूप अप्रूप होते. आई त्याची वरचेवर चवकशी करायची.  आम्ही विद्यापीठात भेटलो, तेव्हा त्याने आईची चौकशी केली तेव्हा माझा चेहेरा कावराबावरा झाला आणि मी उत्तर देण्याचे टाळू लागलो. मग त्याने खोदूनखोदून चवकशी केली आणि मला म्हणाला, "मी आजच संध्याकाळी तुझ्या आईला येऊन बघतो". मी अतिशय हताशपणे त्याला "हो" म्हटले. 


त्या दिवशी आम्ही दोघेजण एकत्र घरी गेलो आणि आईची ओळख करून दिली. "हा डॉक्टर गौतम! माझा हॉस्टेल मधला मित्र! तुला भेटायला आला आहे".  आईचा चेहेरा किंचित उजळला. त्याने आईशी गप्पा मारता मारता तब्येतीची चौकशी करायला सुरुवात केली आणि मी चहा करायला आत गेलो. चहा आणि गप्पा झाल्यावर गौतम म्हणाला, "चल जरा पाय मोकळे करून येऊ. मग त्याने मला सांगितले की आईची परिस्थिती भयानक वाईट आहे कारण तिचा "मेनोपॉज" चालू आहे. त्या दिवशी आयुष्यात मला १ल्यांदा मेनोपॉज हा शब्द मला समजला आणि आईला काय होत आहे, हे समजले.


डॉक्टर गौतम म्हणाला, "तुला ताबडतोब आईला चांगल्या गायनेकॉलिस्ट किंवा सायकियाट्रिस्ट्कडे घेऊन जावे लागेल." मग मी त्याला माझे सायकियाट्रिस्ट्चे आलेले अनुभव सांगितले. परिस्थिती कठिण बनली होती. त्यावर डॉ० गौतमने मला सुचविले की मी आमच्या फॅमिली डॉक्टरांना परत भेटावे आणि त्यांना आमच्या भेटीत काय झाले हे सांगावे. गरज पडल्यास त्याने परत पुण्याला येऊन डॉक्टरांना भेटायची तयारी दाखवली. सुदैवाने ती वेळ आली नाही. मात्र यानंतर आमच्या फॅमिली डॉक्टरांनी त्यांची हटवादी भूमिका सोडली आणि मला एक मार्ग सूचवला. पुढे त्याचा ब-याच प्रमाणात मला उपयोग पण झाला. अधूनमधून त्या मला "आईचा फूल बॉडी चेक-अप करून घे" असा आग्रह करायच्या, पण आईला ते मान्य नसे. "उद्या काही निघाले आणि मी अंथरूणाला खिळले तर तुझ्या लग्नाचे कोण बघेल?" असा आईचा मला प्रश्न असे आणि माझ्याकडे त्याचे उत्तर नसे...


पुढे त्याच परिस्थितीमध्ये माझे लग्न झाले आणि आईच्या ढासळेल्या तब्येतीचा/व्यक्तीमत्त्वातील बदलाचा परिणाम माझ्या वैवाहिक आयुष्यावर पण व्हायचा तो झाला. एका प्रसंगानंतर आई अचानक भयानक मलूल होऊ लागली. हे मलूल होणे इतके विचित्र होते की मला काय करावे करेना ते कळेना. एक दिवस मात्र हद्द झाली. आईला पातळ नीट नेसता आले नव्हते. मी तिला सांगितले, तेव्हा ती ते स्वीकारायला तयार नव्हती, आणि तशीच बाहेर जायला निघाली, तेव्हा मी घाबरलो आणि अक्षरश: आरडओरडा, आदळआपट करून तिला थांबवले. लगेच आमच्या फॅमिली डॉक्टरांना फोन केला. त्यांनी तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये न्यायला सांगितले. त्या परिस्थितीमध्ये मी आईला ब-याच प्रयत्नानंतर कसेबसे जोशी हॉस्पिटलमधे नेले. प्राथमिक चाचण्यानंतर तातडीचा एम०आर०आय० स्कॅन केला तेव्हा निदान झाले - "शेवटच्या स्टेजचा rapidly advancing ग्लायोमा!"


आईच्या शेवटच्या दिवसात सख्खा मामा अमेरीकेहून, सख्खी मावशी नाशिकहून धावून आले. आईच्या ऑपरेशनच्या वेळी आजीने आईकडच्या सर्व नातेवाईकांची फौज उभी केली.  एके दिवशी  जोशी हॉस्पिटलमधे  रात्री मामाने  आईवर झालेल्या मानसिक आघातांबद्दल मला सविस्तर सांगितले (मानसिक आघात हे कॅन्सरचे एक प्रमुख कारण असतात असे मला पुढे सिप्ला कॅन्सर सेंटरमध्ये लावलेल्या पोस्टरमुळे आणि डॉक्टर बावडेकरांच्या आत्मचरित्रामुळे समजले). पण तोपर्यंत उशीर झाला होता. ते अगोदरच सांगितले असते तर आमचे नाते वेगळे आणि समृद्ध झाले असते पण आता जर-तर ला काही अर्थ नाही. 


हे सर्व आज लिहायचे कारण - सत्त्वपरिक्षेच्या प्रसंगात सहनशीलता संपते, मग काहीही करून उद्दीष्ट साधायचे असते.   उंटावरून शेळ्या हाकणारा समाज फक्त  आपल्याला दूषणे देण्यासाठी असतो. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: