रविवार, ३० जून, २०२४

महाजनस्य संसर्गः

 महाजनस्य संसर्गः 

=========


राजीव उपाध्ये, जून २०२४



पञ्चतंत्रात एक श्लोक आहे - 


महाजनस्य संसर्गः कस्य नोन्नतिकारकः।

पद्मपत्रस्थितं तोयं धत्ते मुक्ताफलश्रियम्॥


अर्थ- मोठ्या लोकांचा सहवास कुणाला प्रगतीकारक नसतो? कारण कमळाच्या पानावर पडलेले पाणी मोत्यांची शोभा धारण करते. 


अर्नोल्ड टॉयन्बी नावाचा एक इतिहासकार म्हणतो की दोन संस्कृतीची जेव्हा टक्कर होते, तेव्हा बलिष्ठ (dominant) संस्कृतीच्या चालीरिती कनिष्ठ संस्कृतीवर प्रभाव पाडतात आणि झिरपतात आणि मानवी समाज उत्क्रांत होत राहतो. 


सध्या हे मानववंशशास्त्रीय वास्तव राजकीयदृष्ट्या गैरसोईचे वास्तव आहे. कुणीतरी आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, हे स्वीकारणे कमीपणाचे, अस्मितेला धक्कादायक मानले जाते. कारण ते "समते"च्या तत्त्वाविरुद्ध आहे. त्यामुळे आपल्यापेक्षा श्रेष्ठ संस्कृती, समूह यांचा द्वेष, तिरस्कार करणे जास्त रूळले आहे. ते एक ’नवसामान्य’ बनले आहे.


जीवसृष्टीत मानव अनेक कारणांनी शीर्षस्थानी किंवा श्रेष्ठ मानला जातो. ज्ञानप्राप्तीचे आणि त्याचे विश्लेषण करून उपयोग करण्याचे विशेष कौशल्य मानवा इतके इतर प्राण्यात विकसित झालेले दिसत नाही. वेगवेगळ्या गरजांसाठी वेगवेगळी हत्यारे बनविणे आणि त्यांचा उपयोग करणे, हे पण इतर प्राण्यामध्ये विकसित झालेले दिसत नाही. वेगवेगळ्या कलांचा विकास, पर्यावरणावरील प्रभुत्व, गुंतागुंतीची समाजरचना मानवा इतकी कळपात राहणार्‍या प्राण्यात नसते. शिवाय परिस्थितीशी जुळवून घेण्यात मनुष्यप्राण्याचा नंबर १ला लावावा लागतो. 


हे सगळे ठिक आहे. पण मला एक प्रश्न पडतो तो असा की मानवानंतर सर्वात वेगाने उत्क्रांत प्राणी या जीवसृष्टीत कोणता?  मी एआयच्या मदतीने या प्रश्नाचा शोध घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा मला पुढील उत्तरे मिळाली -


० चिंपांझी आणि बोनोबो कुळातील माकडे

० डॉल्फिन 

० हत्ती

० कावळे

० ऑक्टोपस 


यासाठी नक्की कोणते निकष कसे लावले आहेत ते कळायला मार्ग नाही, पण मला ही उत्तरे पटली नाहीत. याचे कारण म्हणजे हत्ती आणि माकडे सोडली तर बाकीचे प्राणी पाळले जात नाहीत. हत्ती आणि माकडे  पाळली जात असली तरी त्याचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मानवी संपर्कात येऊन जी वर्तन विषयक उत्क्रांती होणे अपेक्षित आहे , ती या दोन प्रजातींमध्ये दिसत नाही.


मानवी संपर्कात येऊन मोठ्याप्रमाणावर उत्क्रांत होत असलेला प्राणी म्हणजे कुत्रा आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. गेले काही वर्षे समाजमाध्यमांच्या कृपेने मी जगभरच्या पाळीव कुत्र्यांच्या वर्तनाची निरीक्षणे करीत आहे. कुत्र्यांचे मानवीकरण ज्या वेगाने होत आहे, तितके इतर कोणत्याच प्राण्याचे मानवीकरण होताना दिसत नाही. गाई,बैल, घोडे आणि हत्ती हे विशिष्ट हेतूने पाळले जातात. त्यांच्यात आणि त्यांच्या मालकात भावबंध पण निर्माण होतात (हे अगदी वाघसिंहासारख्या हिंस्र पशूमध्ये पण दिसते.). पण त्यांच्यात मानवी संपर्कामुळे, मानवीकरण कुत्र्यांच्या इतके वर्तनवैविध्य दिसत नाही. मानवाशी सर्वात जास्त जनुकीय साधर्म्य असलेले कपिबांधव वर्तनवैविध्यामध्ये मानवानंतर असायला हवे होते. पण ते तसे झालेले दिसत नाहीत. ही आश्चर्याची गोष्ट नाही का?


मी वर कुत्र्यांचे मानवीकरण असा शब्द वापरला, तो मुद्दामून वापरला. त्यात केवळ ’पाळणे’ अभिप्रेत नसते. मानवीकरणाचा परीघ पाळण्यापेक्षा बराच मोठा आहे. पाळणे हे मला संकुचित वाटते - त्यात त्या प्राण्याच्या मूलभूत गरजा भागवून त्याकडून कामे करून घेतली जातात. मानवीकरणात तो जीव मानव असे समजून त्याला वागवले जाते.  मानवीकरण केलेल्या कुत्र्यांमध्ये अशी श्रमांची अपेक्षा असतेच असे नाही (याला अपवाद विशिष्ट कोशल्ये शिकवले गेलेले म्हणजे - सैन्य, पोलिसदलातील कुत्रे, तसेच अपंग व्यक्तीना सोबत करण्यासाठी शिकवलेले सर्व्हिस डॉग्ज, गुरे राखण्यासाठी पाळले गेलेले बॉर्डर कॉली सारखे श्वान इ०). 


कुत्र्यांच्या मानवीकरणाचा विस्तार कुठपर्यंत झाला आहे, हे बघणे रंजक आहे-


० कुत्र्यांच्या वंशावळी ठेवल्या जातात


० कुत्र्यांना ज्या मानवी कुटुंबात ’दत्तक’ घेतले जाते, त्यांची कुलनामे बहाल केली आहेत.


० अनेक कुटुंबात लहान मुलांच्याबरोबर कुत्र्यांच्या पिलांना आणून वाढवले जाते. असे एकत्र वाढलेल्या मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे कुत्र्याबरोबर भावनिक नाते अजोड असते. 


० कुत्र्यांचा वाढदिवस साजरा करणे हे तर सर्रास आहे. काही अतिउत्साही आणि हौशी लोक कुत्र्यांची लग्ने पण लावतात. पण हे माझ्या पहाण्यात फार नाही. 


० अलिकडे विशेषत: कुत्र्यांना माणसाप्रमाणे कपडे, बूट घालून नटवले जाते. केसाळ कुत्र्यांच्या वेण्या बांधल्या जातात. स्कूटर, सायकल सारख्या वाहनाने फिरायला जाताना कुत्र्याना हेल्मेट, गॉगल पण घातले जातात. भविष्यात कुत्र्यांना "नग्नावस्थेत" फिरायला नेऊ नये असे कायदे झाले तर तो मानवीकरणाचा कळस ठरेल. कदाचित नवे "विनयभंग" त्यातून निर्माण व्हायची शक्यता आहे.


० काही हौशी लोक त्यांच्या कुत्र्यांसाठी खास झोपण्यासाठी खास पलंग, जेवायला छोटी टेबल-खुर्ची वगैरे जामानिमा बाळगतात. 


० कुत्र्यांची सलून आणि पार्लर हे आता खूपच रूळले आहेत. 


० कुत्र्यांसाठी उद्याने, शाळा आणि हॉटेल्स खुप बघायला मिळाली. भारतात हा प्रकार अजून रूळलेला दिसत नाही. विमानप्रवासात अनेक जण कुत्र्यांना अगदी केबिन मध्ये बरोबर घेऊन प्रवास करतात. 


वरील प्रत्येक विस्तारशाखेत मोठी आर्थिक उलाढाल होत असते. पण तो मुख्य मुद्दा नाही, तर मुख्य मुद्दा मानवीकरणातून कुत्र्यांचा झालेला बौध्दिक, भावनिक आणि शारीरिक/वर्तन विकास हा आहे.


अन्न, निवारा आणि जिव्हाळा मिळाल्याने कुत्रा माणसाला ’समर्पित’ करतो आणि आपल्यावर आवलंबून असलेले कुणीतरी जीव लावणारे मिळाल्याने माणसाचा ’अहं’ सुखावतो, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हे माझ्यामते कुत्रा आणि माणसाच्या अनोख्या नात्याचे गुपित आहे.

 

कुत्र्यांचा बौध्दिक, भावनिक आणि शारीरिक/वर्तन विकास


मी जालावर शोध घेतला तेव्हा सर्वात बुद्धिमान कुत्र्यामध्ये बॉर्डर कॉली आणि पुडल या प्रजाती सर्वात बुद्धिमान असल्याचे मानले गेले आहे. "चेसर" नावाची कुत्री आतापर्यंत सर्वात बुद्धिमान मानली गेली आहे (https://www.youtube.com/watch?v=tGlUZWNjxPA). तिची स्मरणशक्ती, शब्दसंग्रह, शोधक्षमता अचाट असल्याने ती अनेकांच्या अभ्यासाचा विषय झाली आहे. 


पण अनेक कुत्र्यांना अल्पप्रमाणात संख्याज्ञान पण असते असे मानले जाते आणि माफक प्रमाणात अनेक काही कुत्री  शिकवल्यानंतर सोपी आकडेमोड (बेरजा आणि वजाबाक्या) करू शकतात. काही कुत्री "फुली गोळा" सारखे खेळ त्यांच्या मानवी मित्रांबरोबर खेळताना बघायला मिळतात. पण काही कुत्री डॉज बॉल, लपाछपी इ० खेळ पण खेळू लागली आहेत. स्केट बोर्ड वर स्केटींग करणार्‍या श्वानांची संख्या मोठी आहे. 


पालकांबरोबर  श्वानांना संवाद साधता यावा यासाठी काही बटन दाबून रेकॉर्ड केलेला संदेश ऐकवण्यासाठी उपकरणे उपलब्ध आहेत. ती वापरून श्वान आश्चर्यकारक संवाद साधतात. बाहेरून आल्यावर घरात येताना पाय पुसून घरात येणारी कुत्री बघून मी वेडा व्हायचा बाकी होतो.


मी सर्वात थक्क झालो ते चिनी पुडल या प्रजातीमुळे. मला कधीकधी हे श्वान चिनी लोकांनी प्रयोगशाळेत "जनुकीय बदल" घडवून विकसित केले असावेत अशी शंका येते.[१,२] 


अशी शंका येते याचे कारण चीन हे कसलेही नैतिक विधीनिषेध न बाळगणारे (एका दृष्टीने क्रुर) राष्ट्र आहे.  चिनी पुडल चतुष्पाद राहीलेले नसून आता ते द्विपाद झाले आहेत. हा मोठा बदल प्रयोग शाळेत जनुकीय बदल "गुपचुप" घडवून आणल्याशिवाय शक्य नाही असे मला वाटते.  प्रयोगशाळेतील सर्वच संशोधन जगासमोर येत नसते. 


उंदीर आणि डुकरांच्या गर्भात मानवी मूळपेशी/जनुक  कृत्रीमपणे भरून प्रत्यारोपणासाठी अवयव मिळविण्यावर संशोधन चालू आहे. त्यामूळे असे प्रयोग खासगी/गुप्तपणे कुत्र्यांवर झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.


हे चिनी पुडल श्वान काय काय करत नाहीत? ते संगीताच्या तालावर नाचतात, अंथरूण घालतात, पंखे चालू करतात. ते आपल्या बाजूला वळवून घेतात. अगदी खोलीचे दार बंद करतात, तसेच कड्या उघडतात. लहान मुलांच्या अंगावरील पांघरूण पण सारखे करतात. त्यांच्या पालक/मालकांची छोटीछोटी कामे पण करतात. 


कुत्री माणसासारख्या भावना व्यक्त करतात, काही तर माणसासारखे स्मित करू लागले आहेत. हस्की कुळातील काही श्वान "आय लव्ह यु"  सारखी वाक्ये उच्चारतात (म्हणजे तशी नक्कल करतात. काही कुत्रे मालक नसताना घरातील पियानो वाजवून गायचा प्रयत्न करतात. 


टिव्ही वर कार्टून बघणे हा अनेक कुत्र्यांचा विरंगुळा आहे. ते बघत असताना त्यांना डिस्टर्ब केले तर ते नाराजी व्यक्त करतात. इतकच नाही तर खेळाच्या सामन्यातील उत्कंठावर्धक क्षणांना तितकाच प्रतिसाद देतात.


आपल्या पालकांचा मृत्यू झाल्यास श्वान पण दू;खी होतात. त्यांच्या खोड्या काढल्यास ते नापसंती दर्शवतात. 


कुत्र्यांच्या प्रतिभेचे प्रदर्शन घडवणारे डॉग शो, ब्रिटन गॉट टॅलेण्ट सारख्या कार्यक्रमातून दिसणारे  अनेक करामती करून दाखविणारे श्वान बघितल्यावर मन अचंबित होते. जनुकीय संपादनाच्या बदलामुळे भविष्यातील कुत्रे मानवी वाणीने बोलू लागले तर मला आश्चर्य वाटणार नाही.


मात्र अशा रितीने उत्क्रांत झालेला कुत्रा अजुनही आपल्या जातभाईना मानवाबरोबर कसे वागायचे याचे शिक्षण देत नाही. मानव त्याला अजुनही त्याच्या इच्छेनुसार "प्रजोत्पादन" करू देत नाही.  त्यामुळे अवगत केलेल्या गुणांचे जनुकीय संक्रमण पुढील पिढीत होत नाही.  कुत्र्यांच्या उत्क्रांतीमध्ये हे काही अपूर्णता ठेवणारे दुवे आहेत, असे मला वाटते.


आधुनिक श्वानांचे हे मानवसदृश वर्तन (near human behaviour) बघितल्यावर कुत्रा माणसानंतरचा उत्क्रांत प्राणी न मानणे ही एक प्रकारची लबाडी आहे, असे मानावे लागते. माणसाशी जुळवून घेणार्‍या कुत्र्यांचा हा विकास बघितल्यावर मी वर उल्लेख केलेला श्लोक किती चपखल आहे, हे पटल्याशिवाय राहणार नाही. 



१. https://www.newscientist.com/article/2330283-gene-edited-dogs-created-from-cloned-skin-cells-for-the-first-time/


२. https://ocm.auburn.edu/experts/2019/10/010117-designer-dogs-breeding.php




परिशिष्ट - 


माझा हा पण लेख मी नेहेमीप्रमाणे डॉ० दीक्षितांना वाचायला दिला होता. त्यांनी बर्‍याच उपयुक्त टिप्पण्या केल्या. त्या इथे स्वतंत्रपणे देत आहे.


० प्रथम कुत्रा मानवी संपर्कात आला, मग मानवी समूहांबरोबर राहून कित्येक हजार वर्षे उत्क्रांत होत राहीला.  (हे मला पटतं कारण अधर्वट टाकून दिलेली शिकार किंवा अन्न कुत्र्यांना त्यांची गरज भागविण्यासाठी आयती पर्वणी ठरली असणार -रा०उ०)


० कुत्र्यांसाठी अगदी पंचतारांकित हॉटेल्स, शाळेत नेण्या-आणण्यासाठी व्हॅन किंवा बसेस, खास टीव्ही चॅनेल्स, पोहण्य़ाचे तलाव इ० विकसित केले आहेत.


० आज समाजमाध्यमांमुळे दिसून येणारा कुत्र्यांमधील वर्तनविकास प्रयोगशाळेत इतक्या मोठ्या प्रमाणावर कधीही बघायला मिळणार नाही. त्यामुळे समाजमाध्यमांवर लोकांनी हौसेने टाकलेल्या क्लिपा कुत्र्यांच्या वर्तनविकासाच्या संशोधनात महत्त्वाचे साधन ठरतात.


० इतर विकासाबरोबरच कुत्र्यांमधील मानवी भाषेची आकलन क्षमता आश्चर्यकारक आहे. 


० अलिकडे काही कुत्र्यांना कॅन्सरसारखे आजार अगोदरच कळतात, असे लक्षात आले आहे. विशेष शिक्षण दिलेले कुत्रे वृद्धाना उत्तम सोबत करतात.


रविवार, २ जून, २०२४

लैंगिक वर्तन

एका गृहस्थांनी मला मानवी लैंगिक-वर्तनावर नुकतीच चावी मारली.
मानवी लैंगिक-व्यवहाराचे कोडे सोडवताना काहीतरी भोज्जा (संदर्भबिंदू) पकडणे आवश्यक ठरते. दोन प्रमुख भोज्जे या संबंधीच्या चर्चेत वैयक्तिक जडणघडणीनुसार निवडले जातात-
१ ला भोज्जा - "सुसंस्कृत मानवसमाज"
"सुसंस्कृत" मानवसमाजाने निर्माण केलेल्या नैतिकतेच्या, धार्मिक जटिल कल्पना कायम निसर्गाविरूद्ध केलेल्या आचरणाचे उदात्तीकरण करतात. मग "ब्रह्मचर्य", "षड्रिपू" सारख्या कल्पना गळी उतरवून जे आऊटलायर्स यात यशस्वी होतात त्यांना डोक्यावर घेतले जाते. याशिवाय नैतिक-अनैतिकतेच्या कल्पना प्रत्येक संस्कृतीनुसार बदलतात, त्यामुळे उडणारा गोंधळ वेगळाच...
"सुसंस्कृत" मानव समाजाला आपण मूलत: माकडे आहोत हे स्वीकारायला जड जाते. आपण विचार करणारे असल्यामुळे जीवसृष्टीत आपले स्थान वेगळे आहे अशी एक भ्रामक कल्पना त्यात अंतर्भूत असते. प्रत्यक्षात माणसाचे असंख्य प्रश्न निसर्गापासून फटकून राहण्यातून निर्माण होतात, याचा पूर्णपणे सर्वांना विसर पडलेला असतो.वैज्ञानिक सत्ये चटण्या कोशिंबिरीसारखी तोंडी लावायला वापरली जाते.
आपण विचार करू शकतो म्हणून प्रत्येक निसर्गाच्या प्रत्येक व्यवहारावर नियंत्रण मिळवू शकतो, हा दर्प अशा लोकांमध्ये सहसा असतो.
हा भोज्जा पकडणार्यांचा जीवशास्त्राशी ३६ आकडा असतो. ही माणसे वैज्ञानिकांपेक्षा धर्मगुरूंना जास्त मानतात. स्वत:च्या प्रश्नांची उत्तरे शोधतांना धर्माचा आधार घेतल्याने, आयुष्याचा ताबा आपोआप धर्मगुरूंकडे दिला जातो, हे विसरले जाते.
एकंदर आग "रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी" असा प्रकार असतो.
२ रा भोज्जा - मानवी जीवशास्त्र
हा भोज्जा पकडला तर मानवी लैंगिक-व्यवहाराचे कोडे बर्यापैकी अलगद सुटते. प्रथम निसर्गाला मानवी समाजाचे नियम कळत नाहीत, तो त्याच्या नियमांनी पुढे जातो. हे (काहीसे गैरसोईचे) वास्तव स्वीकारणे आवश्यक ठरते. या शिवाय "मानव हा विचार करणारा" प्राणी असला तरी ती क्षमता अनेक कारणांनी सर्वांमध्ये समान विकसित होत नाही. किंबहुना ही क्षमता बहुसंख्य लोकात विकसितच होत नाही. त्यामुळे सर्वांकडून या धारणेला योग्य असे "विवेकप्रधान" वर्तन होत नाही. ज्यांना जीवशास्त्र पचवता येते, त्यांनाच हे कळू शकते.
आपण मूलत: माकडे असल्यामुळे आपले लैंगिक वर्तन आपल्या कपिकुळातील जातभाईंसारखेच असणार आहे, हे एकदा स्वीकारले की भ्रामक कल्पनांच्या गुंत्यात अडकावे लागत नाही. नीतिप्रधान उत्तरे शोधण्याऐवजी कल्पक पण गरजांना न्याय देतील अशी उत्तरे शोधण्याकडे कल असतो. उदा० लैंगिक भूक भागविणारी खेळणी वरील गटातील लोकांना अनैतिक, अभिरुचीहीन वाटतील पण २ र्या जीवशास्त्रवादी गटाला याचे काही वावगे वाटणार नाही. जीवशास्त्रवादी गट नीति-अनीतिच्या सुटसुटीत कल्पनांचा आदर ठेऊन पुढे जातो. मग "सुरक्षित आणि संमती" घेऊन केलेले लैंगिक आचरण "भोगवाद" न ठरता गरजांची पूर्तता करणारे ठरते.
जगात वेगवेगळ्या ठिकाणी साजरे केले जाणारे "लैंगिकतेचे उत्सव" मग वावगे/चूकीचे वाटत नाहीत. "नग्नतेची" किळस वाटत नाही. तसेच हीरामंडीतील श्रीमंत पुरूषांना "शिक्षण" देणार्या, जर्मनीतील सर्वात जुन्या कुंटणखान्यातील इन्कमटॅक्स भरणार्या, अमेरिकेतील कुंटणखान्यातील पी०एच०डी० झालेल्या ’वेश्यांचे’ कौतूक वाटल्याशिवाय राहात नाही.
राजीव उपाध्ये