एका गृहस्थांनी मला मानवी लैंगिक-वर्तनावर नुकतीच चावी मारली.
मानवी लैंगिक-व्यवहाराचे कोडे सोडवताना काहीतरी भोज्जा (संदर्भबिंदू) पकडणे आवश्यक ठरते. दोन प्रमुख भोज्जे या संबंधीच्या चर्चेत वैयक्तिक जडणघडणीनुसार निवडले जातात-
१ ला भोज्जा - "सुसंस्कृत मानवसमाज"
"सुसंस्कृत" मानवसमाजाने निर्माण केलेल्या नैतिकतेच्या, धार्मिक जटिल कल्पना कायम निसर्गाविरूद्ध केलेल्या आचरणाचे उदात्तीकरण करतात. मग "ब्रह्मचर्य", "षड्रिपू" सारख्या कल्पना गळी उतरवून जे आऊटलायर्स यात यशस्वी होतात त्यांना डोक्यावर घेतले जाते. याशिवाय नैतिक-अनैतिकतेच्या कल्पना प्रत्येक संस्कृतीनुसार बदलतात, त्यामुळे उडणारा गोंधळ वेगळाच...
"सुसंस्कृत" मानव समाजाला आपण मूलत: माकडे आहोत हे स्वीकारायला जड जाते. आपण विचार करणारे असल्यामुळे जीवसृष्टीत आपले स्थान वेगळे आहे अशी एक भ्रामक कल्पना त्यात अंतर्भूत असते. प्रत्यक्षात माणसाचे असंख्य प्रश्न निसर्गापासून फटकून राहण्यातून निर्माण होतात, याचा पूर्णपणे सर्वांना विसर पडलेला असतो.वैज्ञानिक सत्ये चटण्या कोशिंबिरीसारखी तोंडी लावायला वापरली जाते.
आपण विचार करू शकतो म्हणून प्रत्येक निसर्गाच्या प्रत्येक व्यवहारावर नियंत्रण मिळवू शकतो, हा दर्प अशा लोकांमध्ये सहसा असतो.
हा भोज्जा पकडणार्यांचा जीवशास्त्राशी ३६ आकडा असतो. ही माणसे वैज्ञानिकांपेक्षा धर्मगुरूंना जास्त मानतात. स्वत:च्या प्रश्नांची उत्तरे शोधतांना धर्माचा आधार घेतल्याने, आयुष्याचा ताबा आपोआप धर्मगुरूंकडे दिला जातो, हे विसरले जाते.
एकंदर आग "रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी" असा प्रकार असतो.
२ रा भोज्जा - मानवी जीवशास्त्र
हा भोज्जा पकडला तर मानवी लैंगिक-व्यवहाराचे कोडे बर्यापैकी अलगद सुटते. प्रथम निसर्गाला मानवी समाजाचे नियम कळत नाहीत, तो त्याच्या नियमांनी पुढे जातो. हे (काहीसे गैरसोईचे) वास्तव स्वीकारणे आवश्यक ठरते. या शिवाय "मानव हा विचार करणारा" प्राणी असला तरी ती क्षमता अनेक कारणांनी सर्वांमध्ये समान विकसित होत नाही. किंबहुना ही क्षमता बहुसंख्य लोकात विकसितच होत नाही. त्यामुळे सर्वांकडून या धारणेला योग्य असे "विवेकप्रधान" वर्तन होत नाही. ज्यांना जीवशास्त्र पचवता येते, त्यांनाच हे कळू शकते.
आपण मूलत: माकडे असल्यामुळे आपले लैंगिक वर्तन आपल्या कपिकुळातील जातभाईंसारखेच असणार आहे, हे एकदा स्वीकारले की भ्रामक कल्पनांच्या गुंत्यात अडकावे लागत नाही. नीतिप्रधान उत्तरे शोधण्याऐवजी कल्पक पण गरजांना न्याय देतील अशी उत्तरे शोधण्याकडे कल असतो. उदा० लैंगिक भूक भागविणारी खेळणी वरील गटातील लोकांना अनैतिक, अभिरुचीहीन वाटतील पण २ र्या जीवशास्त्रवादी गटाला याचे काही वावगे वाटणार नाही. जीवशास्त्रवादी गट नीति-अनीतिच्या सुटसुटीत कल्पनांचा आदर ठेऊन पुढे जातो. मग "सुरक्षित आणि संमती" घेऊन केलेले लैंगिक आचरण "भोगवाद" न ठरता गरजांची पूर्तता करणारे ठरते.
जगात वेगवेगळ्या ठिकाणी साजरे केले जाणारे "लैंगिकतेचे उत्सव" मग वावगे/चूकीचे वाटत नाहीत. "नग्नतेची" किळस वाटत नाही. तसेच हीरामंडीतील श्रीमंत पुरूषांना "शिक्षण" देणार्या, जर्मनीतील सर्वात जुन्या कुंटणखान्यातील इन्कमटॅक्स भरणार्या, अमेरिकेतील कुंटणखान्यातील पी०एच०डी० झालेल्या ’वेश्यांचे’ कौतूक वाटल्याशिवाय राहात नाही.
राजीव उपाध्ये
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा