मंगळवार, १६ एप्रिल, २०२४

देशाचे भवितव्य

 देशाचे भवितव्य 

========



-राजीव उपाध्ये, एप्रिल २०२४



माझ्या काही धारणा (किंवा भूमिका) मी वारंवार तपासत असतो. माझी एक भूमिका अनेकांना, त्यातही भगव्या विचारसरणीच्या लोकांना माझी एक भूमिका अजिबात आवडत नाही. ही भूमिका म्हणजे - 


"भारत या देशाला फारसे भवितव्य नाही."


यात बहुतेक तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा बराच समावेश असतो. बरं या लोकांना स्वच्छ आणि लांबचा विचार अजिबात करता येत नाहीच, लिखाण तर दूरची गोष्ट. लगेच हमरीतुमरीवर येतात. 


"भारताला फारसे भवितव्य नाही", या माझ्या धाडसी दाव्याला काही महत्त्वाचे आधार आहेत. ज्या वेगाने देशापुढचे प्रश्न गंभीर बनत जा्त आहेत, त्यात तेल ओतणारे घटक म्हणजे बेसुमार लोकसंख्या, जागतिक तापमान वाढ (विशेषकरून विषुववृत्ताजवळचे स्थान), कल्पकतेचा अभाव.


०भारतातील बेसुमार लोकसंख्येने  लोकशाही राज्यव्यवस्था जवळपास कोलमडून पडली आहे असे कधीकधी मला वाटते. याचा अर्थ असा नाही की मी एकाधिकारशाहीचा समर्थक आहे. पण नागरिकांच्या उत्पादकतेच्या (क्षमतेच्या) व्यस्त प्रमाणात अस्मिता जाग्या होणे, सरकारकडून बेफाम आणि अवाजवी अपेक्षा, मर्यादित साधनसंपत्ती, भ्रष्ट नोकरशाही अशा ठळक कारणांनी लोकशाहीला चुना लागतो.


० जागतिक तापमान वाढीचा देशाच्या भवितव्याशी संबंध काय? असा प्रश्न कुणालाही पडेल. पण याचे भान असणारे एक टक्का जरी निघाले तरी डोक्यावरून पाणी गेले असे म्हणावे लागेल.


भारताचा मोठा भूभाग विषुववृतालगत असल्याने जागतिक तापमान वाढीने आपण जास्त पोळले जाणार आहोत. वाढत जाणारा उन्हाळा उर्जेची गरज वाढवणार, उर्जेचे उत्पादन मर्यादित आणि उत्पादन/वितरण खर्चातील वा्ढीने समाजातील मोठा घटक सुखाची झोप मिळवण्यापासून वंचित राहणार, कडक उन्हाळ्याने केवळ आर्थिक गणिते कोलमडणार नाहीत तर बहुसंख्य लोकांच्या उत्पादकतेवर तसेच मानसिक स्वास्थ्यावर त्याचा परिणाम झाल्याने अनेक समस्या गंभीर बनतात. धार्मिक उन्माद वाढतो. विवेक संपतो. 


चिडेचिडेपणा वाढला किंवा लोकांचा संयम संपतो, टोकाचे पाउल उचलले जाते आणि अपघात, गुन्हेगारी वाढते. भारतीय समाजाची असंवेदनशीलता करोनाकाळात भरपूर दिसली आहे.


केवळ उन्हाळाच नाही तर पावसाळ्याचे चक्र पण जागतिक तापमान वाढीने कोलमडल्याचे आपण बघत आहोत. अवकाळी पावसाने होणार्‍या नुकसानाने शेतकर्‍यांच्या कष्टावरून जेव्हा बोळा फिरतो तेव्हा खूप अस्वस्थ व्हायला होते. नद्यानाल्यांना येणारे पूर, भूस्खलनाने होणारे नुकसान असे वाढलेल्या पावसाचे पण अनेक तोटे आहेत.


० असे गुंतागुंतीचे प्रश्न सोडवायला जी कल्पकता लागते, त्या कल्पकतेची उपासना आपल्याकडे शून्य आहे. हे फार धाडसी विधान आहे आणि मी ते पूर्ण जबाबदारीने केले आहे.  कल्पकता विकसित होण्यासाठी वेगळ विचार करावा लागतो, वेगळा विचार करणार्‍या लोकांचा आदर ठेवणारा समाज तयार व्हावा लागतो. आजचा भारतीय समाज वेगळा विचार स्वीकारू शकत नाही, तो लगेच हिंसक बनतो. 


सह्याद्रीमध्ये हिंडल्याशिवाय वेताळ टेकडी किती छोटी आहे याची समज येत नाही आणि हिमालयात हिंडल्याशिवाय सह्याद्रीचे छोटेपण कळत नाही. कल्पकतेचे पण तसेच आहे. 


समाजमाध्यमांच्या कृपेने आज शतकानुशतके कल्पकतेची उपासना करणार्‍या चीनी कल्पकतेचे दर्शन झाल्यावर आपण भारतीय किती छोटे आहोत हे समजते. चीनी कल्पकतेचे सामर्थ्य त्यांच्या पेटंटच्या संख्येत प्रतिबिम्बित झाले आहे. वेगळ्या विचाराला दंडित करणारी भारतीय मानसिकता चीनशी कल्पकतेची बरोबरी कधीही करू शकणार नाही, याचा मला ठाम विश्वास वाटतो. शतकानुशतकांचा कल्पकतेचा बॅकलॉग भरून काढणार कसा. आपले सामर्थ्य पेटंटमध्ये नसून फक्त टेंपलच्या संख्येत आणि संपत्तीत एकवटले आहे. कटु आहे पण सत्य आहे.


भगव्या मानसिकतेच्या मंडळीना या कटू सत्याची जाणीव करून दिल्यावर खुप राग येतो. मग ते खालच्या पातळीवर उतरून धमक्या द्यायला सुरुवात करतात. "झालेले काम तुम्हाला दिसत नाही का?" असे विचारतात.


या मूर्खांना मला इतकेच सांगायचे आहे समस्या ज्या वेगाने वाढत आहेत त्या प्रमाणात उपाय शोधण्याचा वेग नगण्य आहे. जे काम झाले आहे ते आवश्यक होते, पण पुरेसे नक्कीच नाही...


० वरील सर्व घटकांबरोबर आणखी एक चिंताजनक घटक म्हणजे भारतीय समाजाचे ढासळलेले आरोग्य - शाळेतल्या मुलांना येणारे हृदयविकाराचे झटके, त्याबरोबरच भारत आता कर्करोगाची जागतिक राजधानी बनल्याचे वृत्त कुणाला अस्वस्थ करत नसेल तर तुमचा भावनिक मृत्यू झाल्याचे खुशाल समजावे. कदान्नाला मिळणारी प्रतिष्ठा, सास्थ्य बिघडवणार्‍या जीवनशैलीचे नारायण मूर्तीसारख्या व्यक्तीकडून होणारे बेजबाबदार आणि अक्षम्य समर्थन भारतीय समाजाच्या आरोग्याचे प्रश्न सोडविण्याच्या पलिकडे नेतात.  


गेले कित्येक वर्षे टीकेचा विषय असलेला माझा "किडक्या प्रजेचा" सिद्धान्त आता "बियॉण्ड डाऊट" सिद्ध झाला आहे...





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: