राजेश वैद्य माझा आयआयटीमधला मित्र. मी त्याला बराच सीनिअर पण आम्ही हॉस्टेल तीनच्या एकाच विंगमध्ये राहात होतो. गेली अनेक वर्षे तो अमेरीकेत आहे. नुकतेच आम्ही फेसबुकमुळे एकमेकांच्या संपर्कात आलो. त्याने अमेरीकेत नुकतेच घर खरेदी केले आहे. त्याला गृहप्रवेशाच्या पूजेसाठी मुहूर्त काढून हवा होता. अमेरीकेत जी मंडळी भिक्षुकी करतात ती सहसा त्यांना सोयीचे दिवस मुहूर्त म्हणुन ठोकून देतात. हा प्रकार आपल्याकडे पण चालतो. एखाद्या भिक्षुकाला अमुक एक मुहूर्त चांगला का ते विचारा. तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळाले तर मी पैज हरायला तयार आहे. कारण यजमानाने कोणताही प्रश्न विचारणे पुरोहित वर्गाला सोयीचे नसते.
आपण परंपरेने शुभ मानलेले दसरा, गुढी पाडवा इत्यादि दिवस नेहमीच शुभ असतात असे नाही, असे मला माझे एक आजोबा (कै) वेदमूर्ती रामचंद्रभट्ट हर्डीकर यांच्याकडून प्रथम समजले. मी तेव्हा खूप लहान म्हणजे फक्त आठवीत असल्याने असे कसे हा प्रश्न आमच्या रामूमामांना विचारायचे धाडस झाले नाही. शिवाय त्यावेळेस ज्योतिषाची आवड पण निर्माण झाली नव्हती. पण पुढे ज्योतिषाच्या अभ्यासात प्रगती झाल्यानंतर रामूमामांच्या म्हणण्यामागची कारणे समजली. मी यापूर्वी माझ्या ब्लॉगवर अशाच एका अशुभ गुढीपाडव्याबद्दल लिहीले आहे.
राजेश वैद्यच्या गृहप्रवेशासाठी मुहूर्त काढायची माझी तयारी होती. पण मी त्याला माझे मुहूर्त भिक्षुकांना तसेच जुन्या मताच्या मंडळीना पटत नसल्याची कल्पना दिली. यजमानाने काढलेला मुहूर्त स्वीकारायची भटजी/पुरोहित मंडळींची तयारी नसते. मागे एकदा माझे गुरुजी विख्यात धृपद गायक पंडित उदय भवाळकर यांना मी गृहप्रवेशासाठी मुहूर्त काढून दिला होता. योगायोगाने ती अमावस्या निघाली. पण ती अमावस्या जोरदार शुभ होती. विशेषत: आमच्या गुरुजींच्या पत्रिकेत अत्यंत शुभ फलदायी होती. पण सामान्य भटजी लोकांना एव्हढे सूक्ष्म ज्योतिष कुठुन कळणार. त्यांनी केवळ अमावस्या म्हणून त्या दिवशी पोरोहित्य करायचे नाकारले.
मुहूर्ताचा विषय निघाला आहे म्हणून मला आणखीन एक गंमत आठवली. काल रविवार होता. माझ्या घराजवळच्या दोन मंगलकार्यांमध्ये लग्नाची धामधूम होती. दोन्ही कार्यालये ऑक्युपाईड म्हणजे लग्नाचा मुहूर्त - ज्यांची लग्ने कालच्या मुहूर्तावर लागली त्यांच्या पत्रिकेत सध्या चालू असलेली मंगळ-हर्षल प्रतियुति नवदांपत्याला कशी आहे याचा विचार मुहूर्त काढताना केला गेला असेल का याबद्द्ल मी साशंकच आहे. मंगळ-हर्षल प्रतियुतीचे राहू दे. ऐन शनि-मंगळ युति शून्य अंशात असताना लोकांनी लग्ने लावली आहेत. माझ्या त्यांना शुभेच्छा!
राजेश वैद्यने मला मुहूर्तासाठी पुरेसा कालावधी दिला होता. त्याला येत्या ऑगस्टमध्ये पहिल्या पंधरवडयातला मुहूर्त हवा होता. दोन आठवड्यांचा कालावधी मुहूर्तासाठी तसा पुरेसा आहे पण काही लोक म्हणतात की "एखादा चांगला रविवार किंवा गुरुवार बघा". अशी अट घातल्यावर मला कपाळाला हात लावण्याशिवाय गत्यंतर नसते. आधुनिक पद्धतीने मुहूर्त काढताना जेव्हढ्या व्यक्ती प्राधान्याने प्रभावित होतात, त्या सर्वांच्या पत्रिका बघणे आवश्यक ठरते. उदा. लग्नाचा मुहूर्त काढायचा असेल तर वधू आणि वरांची दोघांची पत्रिका बघून मग त्या दोघांना शुभ ग्रहयोग असतील तो दिवस वैवाहिक आयुष्यात प्रवेश करण्यासाठी योग्य ठरते. आता माझ्या मित्राच्याबाबतीत त्याच्या पत्नीची पत्रिका गृहप्रवेशाच्या मुहूर्तासाठी कर्ती/जबाबदार व्यक्ती म्हणून आवश्यक ठरते. म्हणून त्या दोघांच्याही जन्मतारखा इ० नोंदी मी मागवून घेतल्या.
क्रमश:...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा