"अस्सल सांस्कृतिक"
=============
मानववंशशास्त्र हा माझ्या अत्यंत आवडीचा विषय! समाजातील, संस्कृतीमधील बदलांची निरीक्षणे करायला मला आवडते.
नुकताच ब-याच वर्षांनी पुण्यातल्या एका "अस्सल सांस्कृतिक" कार्यक्रमाला गेलो होतो. "अस्सल सांस्कृतिक" कार्यक्रम हे पुण्यातल्या एखाद्या पेठेत मंगल कार्यालयातच असतात. सदाशिव किंवा शनिवार पेठेतील कार्यक्रम भौगोलिक माहात्म्यामुळे अस्सलतेमध्ये काकणभर सरसच असतात. लग्न आणि मुंजीनंतर पुरस्कार समारंभ आणि मग व्याख्यान सहसा "अस्सल सांस्कृतिक" कार्यक्रमात मोडतात.
कोणत्याही "अस्सल सांस्कृतिक" कार्यक्रमाला चहापान असेल तर जरा कार्यक्रमाचे गांभीर्य वाढते आणि चहाबरोबर बिस्किटे असली तर मग विचारू नका. नदी अलिकडच्या (पश्चिम पुण्यातील) काही उच्चभ्रू संस्थामध्ये चहापाना बरोबर भजी पण मी खाल्लेली आहेत. तात्पर्य, चहापान हे त्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.
परवाच्या "अस्सल सांस्कृतिक" कार्यक्रमात चहाचे पिंप दिसले तेव्हा मला हायसे वाटले. मग बिस्किटांचे ताट आले तेव्हा मी लगेच त्या दिशेने मुसंडी मारली आणि हक्काची बिस्किटे ताब्यात घेतली.
पण तेव्हा मला एक धक्का बसला. चहापानातील चहाचे कप चिनीमातीचे जाऊन आता कागदी आले आहेत. पण इथपर्यंत ठीक आहे. पण त्या कपाचा आकार आता "घोटभर" म्हणण्या इतका पण राहीला नाही हे वास्तव अस्वस्थ करणारे होते.
यानंतर मात्र पुढे काय वाढून ठेवले आहे, या चिंतेने माझ्यातला मानववंशशास्त्रज्ञ व्यथित झाला. भविष्यात पूजेच्या पळीने लवकरच चहा तीर्थासारखा उपस्थितांना दिला जाणार असे चित्र डोळ्यासमोर तरळू लागले.
पुणेरी "अस्सल सांस्कृतिक" कार्यक्रमातील चहापान हा अलौकिक घटक मूळ स्वरूपात टिकविणे प्रत्येक अस्सल पुणेकराचे आद्य कर्तव्य आहे...
-राजीव उपाध्ये
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा