सोमवार, २५ डिसेंबर, २०२३

श्रेष्ठकनिष्ठ

श्रेष्ठकनिष्ठ
=====

--राजीव उपाध्ये, डिसे २०२३

सध्या हे श्वानशिशु आह्वानांचे व्हिडीओ बरेच नियमितपणे फेसबुकवर बघायला मिळत आहेत. हे कुणी सहज गंमत म्हणून तयार करत आहे की हे काही प्रयोग आहेत कळायला मार्ग नाही. पण आपल्या जीवसृष्टीच्या सदस्यांच्या अस्तित्वावर यामुळे बराच उजेड पडतो.


आधुनिक सुसंस्कृत मानव समाजात श्रेष्ठकनिष्ठ हा भेदभाव निंद्य/त्याज्य मानला गेला आहे. पण निसर्गाला समाजाचे नियम समजत नाहीत. तो त्याच्याच मगदूराप्रमाणे प्रकट होत राहतो. हे कटू सत्य आहे. आपल्या क्षमता आपले श्रेष्ठकनिष्ठत्व ठरवतात, हे मान्य करावेच लागते.

वरील प्रयोग कशासाठी केले जात असतील याविषयी मी काही अंदाज बांधले आहेत. 

१ला अंदाज  - केवळ श्वानांच्या वर्तनाचा अभ्यास. पण मनुष्यप्राणी स्वार्थी असल्याने ही शक्यता असली तरी इतकाच उदात्त हेतू यात असेल असे वाटत नाही. 
२ रा अंदाज - क्षमतेनुसार श्वानांचे वर्गीकरण करून त्यांची  "योग्य" किंमत ठरवता यावी यासाठी 
३ रा अंदाज - वेगवेगळ्या जातीच्या श्वानशिशुंना या चाचण्या लावून त्यातून निवडलेल्या पिल्लांची रवानगी योग्य कामासाठी करता यावी यासाठी (उदा० जर्मन शेपर्ड जातीच्या श्वानांमध्ये उत्तम श्वान निवडून ते सैन्यदल, पोलिस इत्यादि ठिकाणी पोचविणे केवळ अशा चाचणीमुळेच शक्य आहे)


"उद्दीष्टासाठी मुसंडी मारून ते साध्य करणारे" हे सर्वश्रेष्ठ मानता येईल का?

इथे मला या प्रयोगाशी सुसंगत असा एक अनुभव सांगावासा वाटतो - माझी मुलगी जेव्हा शाळेत होती तेव्हा मी अनेकदा तिला आणायला जायचो. तिच्या शाळेत एक "कडक" नियम होता (मला या नियमाचा भयानक राग यायचा). शाळेची घंटा वाजली की धावत सुटायचे नाही, हा तो नियम. तरी पण हा नियम तोडून काही मुले (सर्व वयाची) शाळा सुटली की धावत बाहेर यायची. ही मुले सहसा अभ्यासात आणि अभ्यासेतर उपक्रमात  पण पुढे असायची, असा मी माझ्यापुरता निरीक्षणे करून निष्कर्ष काढला होता. तो बरोबर होता. या वरील व्हिडीओमुळे माझे निष्कर्ष परत अधोरेखित झाले आहेत.

त्यानंतर नंबर लागतो तो चिकटपणे ध्येय प्राप्तीसाठी झगडणारे - म्हणजे भर्तृहरीच्या "उत्तमजनां" प्रमाणे कितीही विघ्ने आली तरी हातातले काम टाकून न देणारे... असो.

आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो - मुंबईसारख्या शहरात लोकल स्टेशनमध्ये शिरताक्षणी मुसंडीमारून आत शिरणारे चाकरमाने श्रेष्ठ मानायचे का? 

माझ्या मुलीच्या शाळेतील जी मुले नियमांचा आदर केल्यामुळे "मागे" राहात असत त्यांना कनिष्ठ मानायचे का?

तुमच्या उद्दीष्टाचे लाभार्थी जेव्हढे जास्त तेव्हढे तुमच्या मुसंडीचे महत्त्व जास्त आणि तेव्हढे तुम्ही श्रेष्ठ! पण मग नियम पाळणारे, कायद्याला भिणारे दुय्यम स्थानावर जातात आणि विचित्र समस्या उत्पन्न होते. 

पण नाही...  नियमांचा किंवा कायद्याचा आदर करणे हे विकसित मेंदू्चे निदर्शक असल्याने (याविषयी मी लवकरच सखोल लिहीणार आहे) ते पण तितकेच "श्रेष्ठ" ठरतात. कारण असे जीव समूहाच्या स्थैर्याला/स्थिर विकासाला हातभार लावतात.

तेव्हा आपले श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्व ठरवायचे तर हा प्रश्न स्वत:ला अवश्य विचारा - मी मुसंडी मारली तर फायदा कुणाला आणि किती? मी कायदा पाळला तर फायदा कुणाला आणि किती?








 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: