गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०२४

*ब्राह्मणांच्या बौद्धिक विकासाची जीवशास्त्रीय कारणे*

*ब्राह्मणांच्या बौद्धिक विकासाची जीवशास्त्रीय कारणे*

=========================


-राजीव उपाध्ये (१४.०२.२०२४)


पर्यावरणातील आह्वानांनुसार मानसिक जडणघडणीत, शरीररचनेत अथवा अवयवात बदल घडून येणे हे जीवसृष्टीमध्ये सर्रास घडून येते. त्याची असंख्य उदा० आजूबाजूला माणसांमध्ये पण बघायला मिळतात. भारतात गुजराती समाजात उद्योग रक्तात भिनलेला आहे असे म्हटले जाते. भारतात पश्चिम किनार्‍यावर सिद्दींचे वंशज धावपटू म्हणून प्रसिद्ध आहेत [१]. दक्षिण आशियातील बजाऊ ही जमात प्राणवायुशिवाय पाण्यात बुड्या मारून मासेमारी करण्यासाठी प्रसिद्ध आहे [२]. अशी असंख्य उदा० देता येतात.


भारतीय समाजात ब्राह्मण दीर्घकाल समाजाच्या शीर्षस्थानी राहीले, हे आज कुणीही नाकारणार नाही. फार काय, याचमुळे ब्राह्मण इतर समाजबांधवांच्या तिरस्कारास पात्र ठरले. पण ब्राह्मणांचा तिरस्कार हा मला वर्गात अभ्यास करून  १ल्या येणार्‍या मुलांचा तिरस्कार वाटतो. वर्गात अभ्यासात पुढे असणारी मुले त्यांचे स्थान टिकविण्यासाठी भलेबुरे मार्ग अवलंबतातच. ब्राह्मणांनी पण तेच केले. पण इतरांना वाटणार्‍या तिरस्काराचे उदासिनीकरण (न्युट्रलायझेशन) करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आणि त्यामुळेच आजचे ब्राह्मण मोठ्या सामाजिक नामुष्कीला तोंड देत आहेत.


ब्राह्मणांच्या वर्चस्वाची समाजशास्त्रीय़ मीमांसा भरपूर झाली आहे. त्यात मला पडायचे नाही कारण तो चावून चोथा झालेला विषय आहे, त्यात नवे असे काही हाती लागणे मुष्कील आहे. पण त्या पलिकडे काही कारणे असू शकतात. 


*खरं तर बुद्धी, दीर्घायुष्य ही एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नाही.* पण एखाद्या मानवसमूहात काही गुणांचे प्रमाण लक्षणीय़ वाढलेले दिसत असेल तर ते का? याचे कोडे कोणत्याही चौकस व्यक्तीला सतावत राहते. 


*आपल्याकडे जे नाही ते जर दुसर्‍या कुणाकडे असेल तर वैषम्याची भावना निर्माण होते. उदा० पैसा, ताकद, आरोग्य/स्वास्थ, रुप इ० इ० ब्राह्मणांचा तिरस्कार माझ्यामते मुख्यत: त्यांच्या बुद्धीमुळे होतो, असे म्हटले तर वावगे ठरू नये.* ब्राह्मणांना त्यांची बुद्धी निसर्गत: मिळाली की काळाच्या ओघात विकसित झाली? या प्रश्नावर थोडा उजेड टाकायचा हा एक छोटा प्रयत्न...

 

ज्यू, जपानी लोकांत आढळून येणा‌र्‍या दीर्घायुष्याची करणे शोधायचा प्रयत्न बराच झाला आहे. पण माझ्या आतापर्यंतच्या वाचनात/अभ्यासात ब्राह्मणांच्या बौद्धिक विकासाची जीवशास्त्रीय कारणे शोधायचा प्रयत्न कुणी केल्याचे आढळले नाही आणि तसा शिस्तबद्ध अभ्यास कुणी करेल असे ही वाटत नाही. कारण अशा  अभ्यासाला निधी उपलब्ध होईल असे वाटत नाही. कारण चुकुनमाकुन अशा संशोधनाने ब्राह्मणांच्या श्रेष्ठत्वावर शिक्कामोर्तब केलेच तर त्यासारखे अप्रिय (पोलिटिकली इन्करेक्ट) सध्याच्या काळात दुसरे काहीही नाही. 


त्यामुळेच मला ब्राह्मणांच्या बौद्धिक विकासाविषयी जे जीवशास्त्रीय विचार मांडायचे आहेत, त्यांच्याकडे काही  तर्कनिष्ठ अटकळी/अंदाज या कोनातूनच बघितले जावे. त्याची प्रेरणा मला आधुनिक चेता/मस्तिष्क विज्ञान, ध्यानावर झालेले संशोधन[३] यातून मिळाली आहे. *बुद्धी फक्त ब्राह्मणांकडे असते असा ही दावा मला करायचा नाही.* कारण बुद्धीचे अनेक पैलू असतात आणि ते वेगवेगळ्या परिस्थितीनुसार विकसित होतात. त्यामुळे असा कुणी तर्क किंवा आरोप केलाच तर तो मात्र एक निर्बुद्धपणा ठरेल.* महत्वाचे म्हणजे माझ्या मर्यादांचे मला पूर्ण भान आहे.*


भारत, आर्यावर्त, हिंदुस्थान इ० नावाने ओळखल्या गेलेल्या भूप्रदेशात मानवी संस्कृतीला स्थिरावायला बरेच पोषक वातावरण मिळाले. या संस्कृतीमध्ये जो अग्निपूजक समाज होता, त्याने केलेल्या वाङमय निर्मितीचे जतन करण्यासाठी, लेखनकला विकसित न झाल्यामुळे, फक्त मौखिक परंपरेचा पर्याय उपलब्ध होता. मौखिक परंपरेने कोणत्याही माहितीचे जतन करणे किती अवघड आहे, हे समजून घेणे इथे अतिशय आवश्यक आहे. 


रस्त्यावरील कोणत्याही १०० माणसांना त्यांनी शालेय जीवनांत पाठ केलेल्या कविता म्हणून दाखवायला सांगा. १ली ते १०वी या प्रत्येक इयत्तेमधील एक अशा दहा कविता म्हणून दाखविणारी १० माणसे तरी सापडतील का, याची मला शंका आहे. आणि समजा सापडली तर कर्तव्य म्हणून पाठांतर केलेली आणि आवड म्हणून पाठ केलेली माणसे वेगळी आहेत असे लक्षात येईल. कवितेचा अर्थ, चाल, लय आवडली तर पाठांतर सोपे होते. 


आधुनिक चेताविज्ञान असे सांगते की एकाग्रतेने मेंदूच्या उपाग्रखण्डाचा (prefrontal lobe) वेगाने विकास होतो. ज्या संवेदनांवर एकाग्रता जास्त होते त्यासंबंधी मेंदुच्या भागाशी उपाग्रखण्डाच्या जोडण्या वाढतात आणि मेंदूचा विकास होतो. जसे खेळात स्नायविक हालचाली नियंत्रित करणारा गतिबाह्यक आणि उपाग्रखण्डाबरोबर विकसित होतो [४]. संगीतात श्रवणशक्ती आणि काही भाषासदृश कौशल्यांचा विकास होतो. नृत्यकलेत अवकाश, संगीत, लय-ताल यांच्याशी संबंधित जाणीवा आणि स्मृती इ० केंद्रे जोडण्या निर्माण होऊन विकसित होतात[५]. गमतीचा आणि महत्त्वाचा मुद्दा असा की सध्याच्या काळात स्मृतीभ्रंश आणि तत्सम आजारांचा सामना करण्यासाठी जे व्यायाम तयार केले गेले आहेत, त्यात याच कल्पना केंद्रस्थांनी आहेत.


वैदिक संस्कृतीने निर्माण केलेले प्रचंड वाङमय जतन करण्यासाठी ब्राह्मणांना मेंदूचा मोठ्या प्रमाणावर वापर अतिशय एकाग्रतेने आणि कर्तव्यबुद्धीने करावा लागला. शतकानुशतके वेदसंहितांचे रक्षण करण्यासाठी जटा/घनपाठादी तंत्रे वापरली गेली. ही तंत्रे समजून घेतली [६] तर असे लक्षात येईल की संहितांमधला एकही शब्द हरवू नये हा या मागचा महत्त्वाचा उद्देश. वैदिक संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या गायत्री मंत्राच्या घनपाठाचे सादरीकरण या दुव्यावर पहाता येईल.  हे सर्व पाठ करताना मेंदूला जो व्यायाम होतो, त्यामुळे ब्राह्मणांमध्ये उपाग्रखण्डाचा वेगाने विकास झाला. वैदिक शिक्षण गुरुगृही आठव्या वर्षी चालू होई. बरेचसे वैदिक शिक्षण प्रजननपूर्व काळात होत असल्याने विकसित मेंदूशी संबंधित काही जनुकीय बद्दल पुढच्या पिढ्यांमध्ये संक्रमित होत राहिले आणि त्यामुळे पुढच्या पिढ्यांना फायदा झाला. परिणामी ब्राह्मण अधिकाधिक बुद्धिमान होत राहिले.


जेव्हा ब्राह्मणांचे पारंपरिक व्यवसाय मागे पडले तेव्हा या उत्क्रांतीला काही कारणांनी खीळ बसली. पण या जनुकीय बदलांचा फायदा  मात्र पुढल्या  पिढ्यांना बर्‍याच प्रमाणात झाल्याचे दिसून येते. पण हा फायदा अनंतकाळपर्यंत ब्राह्मणांना मिळेल का? या प्रश्नाचे उत्तर नाही असे द्यावे लागेल. कारण आता जनुकीय विद्राव्यता (genetic dilution) सांस्कृतिक अभिसरणामुळे खुप वाढली आहे. एकदोन स्तोत्रे मुलांना पाठ करायला लावून हे परत साधता येईल का? या प्रश्नाचे उत्तर पण नाही असे द्यावे लागेल. पिढ्या न पिढ्या सतत काही वर्षे काही संहितांची पारायणे करायची आणि एकदोन स्तोत्रे मुलांना पाठ करायला लावायची यात संख्यात्मक आणि गुणात्मक फरक नक्कीच आहे. त्यामुळे ब्राह्मणांचे बलस्थान (*वैदिकपठणाने विकसित पावलेला उपाग्रखण्ड*) काळाच्या ओघात सहज नाहीसा होईल. जनुककोषावर बाहेरून होणारे आघात (ताण, प्रदूषण, कुपोषण) देखिल यांस कारणीभूत ठरणार आहेत, हे विसरता कामा नये.


मी इथे मांडलेल्या या कल्पना conjecture स्वरूपाच्या असल्यामुळे बर्‍याच लोकांना (ब्राह्मणत्वाचा न्यूनगंड असलेल्यांना आणि ब्राह्मणांचा द्वेष करणार्‍यांना) हास्यास्पद वाटतील, पण त्यांनी एखादे अपरिचित काव्य "घनपाठाचे तंत्र" वापरून पाठ करायचा प्रयत्न करावा आणि मग मला सांगावे.




संदर्भ:

[१] https://www.youtube.com/watch?v=ped-uIlw_24

[२] https://www.scientificamerican.com/article/human-sea-nomads-may-have-evolved-to-be-the-worlds-elite-divers/

[३] https://www.youtube.com/watch?v=7CBfCW67xT8&rco=1

[४] https://www.apa.org/monitor/2019/03/athletic-brain

[५] https://www.frontiersin.org/articles/10.3389/fnhum.2017.00566/full

[६] https://www.youtube.com/watch?v=Ti4d31KGN1w

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: