रविवार, ३ फेब्रुवारी, २००८

<<< एक कोडे >>>

एक कोडे

आधुनिक मानवाच्या काही श्रद्धा मला नेहेमी कोड्यात टाकतात. याचे मला कधी हसू
येते तर कधी त्यांची कीव करावीशी वाटते. उदाहरणच सांगायचे झाले तर मानवाची इतर
प्राणी जगतापासून स्वत:ला वेगळे ठेवण्याची धडपड... आधुनिक मनुष्यप्राणी स्वत:ला
इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ समजतो. या श्रेष्ठत्वाचे तो अनेक त‍र्हांनी समर्थन
करतो. हे श्रेष्ठत्व टिकवण्यासाठी अनेक भल्याबु‍र्‍या मार्गांचा अवलंब आजवर
त्याने केला आहे. माणसाचा 'विकास' पावलेला मेंदू हा या समर्थनाचा मुख्य आधार
आहे.

या विकास पावलेल्या मेंदूने प्रश्न सोडवले किती आणि निर्माण केले किती? असा जर
शोध घ्यायचा प्रयत्न केला तर प्रामाणिकपणे उत्तरे देणे अनेकांना कठीण जाईल.
उदाहरण जर घ्यायचे झाले तर धार्मिक तेढीचे घेता येईल. माणसाचा विकास पावलेला
मेंदू युद्ध, दहशतवाद, मूलतत्त्ववाद हे प्रश्न अजिबात हाताळू शकत नाही. आज
कुणालाही दुर्धर आजारांनी ग्रासलेले असले तर आधुनिक वैद्यकीय उपचार उपलब्ध
आहेत. पण ते वेळेवर मिळतील कि नाही याची खात्री देता येत नाही. आणि जर ते
मिळालेच तर ते उपचारच जीवावर उठतील का हे पण सांगता येणार नाही. मुंबईच्या
लोकल्सना बॉंब स्फ़ोटापासून कुणीही वाचवू शकत नाही किंवा एखाद्या विमानाचे अपहरण
होईल का हे पण कुणाला सांगता येणार नाही.

थोड्क्यात सांगायचे झाले तर आजवर सतावणा‍र्‍या प्रश्नांची जुजबी आणि तात्पुरती
उत्तरे सापडली की माणसाचा विकास पावलेला मेंदू सुखावतो. हे प्रश्न ज्यांना कधिच
सतावणार नाहीत अशा अलिप्तपणे जगणार्‍या मनुष्येतर प्राण्यांना मात्र तॊ हीन
लेखतो. कारण मला वाटत की माणसाचं मनुष्यत्त्व प्रश्न निर्माण करण्यात अडकलं
आहे. आता हेच बघा ना, मनुष्येतर प्राण्यांचे मूळ प्रश्न - आहार निद्रा मैथुन -
हे त्यांच्या मेंदूचा विकास न पावल्याने सीमित राहिले आहेत.


आता मला हे सांगा आपल्या अस्तित्वाचे प्रश्न सीमित असणं हे लक्षण श्रेष्ठपणाचे
की भ्रष्टपणाचे? विकासाचे की अधोगतीचे? या प्रश्नाचे उत्तर ठाउक असून दिले
नाहीत तर तुमच्या डोक्याची शंभर शकले होऊन ती तुमच्याच पायाशी लोळू लागतील...

राजीव उपाध्ये
-------------------------
http://rajeev-upadhye.blogspot.com/
www.yuyutsu.biz
-------------------------

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

श्रीयुत राजीव वेताळ,अद्याप एकाही मुंगी-माशी चिमणी-कावळा
श्वान-शुकर गज-अश्व सिंह-व्याघ्रादिच काय पण तथाकथित उत्क्रांती
सिद्धांतानुसार समकक्ष मर्कटानेही ‘बघा हा श्रेष्ठ मानव, वाहवा
मानवा धन्य आहेस बा तू, नाहीतर आम्ही..... असे म्हटलेले नाही.
तर अशा स्वयंघोषीत श्रेष्ठत्वाची कोण मिराशी ? खेरीज आदि
शंकराचार्यानीही म्ह्टलंय ...ततः किम ? ------विक्रमादित्य