शुक्रवार, ८ फेब्रुवारी, २००८

ऐशी तैशी - स्त्रीमुक्तीची आणि मातृत्वाची

माझ्या परिचयाच्या एका वकीलीण बाईंशी एकदा सहज गप्पा मारता मारता ऐकायला
मिळालेली एका मुक्त आणि कर्तबगार मुलीची ही रंजक कथा...

ही मुक्त स्त्री अतिशय हूषार आणि त्यामुळे उच्चविद्याविभूषित होती. साहजिकच या
सर्वाला साजेल अशी गलेलठ्ठ पगाराची नोकरी पण तीला होती. याच नोकरीत यथावकाश
तिच्याच एका सहका‌र्‍याशी झालेल्या ओळखीचे रुपांतर प्रेमात होऊन त्यांचे लग्न
ठरले आणि थाटामाटात पार पडले.

त्या दोघांचा झक्क असा राजाराणीचा संसार सुरू झाला. रोज सकाळी दोघे एकत्र बाहेर
पडत, सकाळचे जेवण दोघे ‍ऑफिसातच घेत. संध्याकाळी कामाच्या रगाड्यानुसार वेळी
अवेळी फ्लॅटवर केवळ झोपण्यासाठी परत येत.

यात मोठा चमत्काराचा भाग असा की थोड्याच दिवसानी या राजाराणीला बाळाच्या
आगमनाची चाहूल लागली आणि बाळाचे आगमन झाले तेव्हा मात्र आपल्या मुक्त आणि
कर्तबगार नायिकेच्या घोड्दौडीला अचानक लगाम बसला. बाळ थोडे मोठे झाले तसे
त्याच्या आईला मात्र स्वस्थ बसवेना. Customer Satisfaction चा घोष आणि
डेडलाईनला लोंबकळणारी बढतीची गाजरं राजाराणीला खुणावू लागली. जीवाची घालमेल
जेव्हा फारच वाढली तेव्हा मात्र त्या मातापित्यानी आपल्या सहा महिन्याच्या
बाळाला पाळणा घरात ठेवायचा नि‍र्णय घेतला. खुप आटापिटा करून एक मनासारखे पण
घरापासून थोडे दूर पाळणाघर त्यांना मिळाले. सकाळी पाच-साडेपाच वाजता बाहेर पडून
बाळाला पाळणाघरात सोडायचे, मग जिम करून ऑफिसात जायचे आणि येताना नउ वाजता
बाळाला घ्यायला जायचे असा नेम चालू झाला.

पण हे चक्र फार दिवस टिकणार नव्हते... बाळ थोडे मोठे झाले आणी एक विचित्र
समस्या निर्माण झाली.

दिवसभर पाळणाघरात राहिल्यामुळे फक्त रात्री आपल्याला घेऊन जाणारे राजाराणी आपले
कॊण हे काही त्याला कळेना. ते आपल्याला घरी नेतात आणि मग एसी लावून लगेच झोपून
का जातात हे त्याला कळेना. बाळ थोडे आणखी मोठे झाले तेव्हा मात्र त्याने
थयथयाट करून या प्रकाराचा निषेध नोंदवायला सुरूवात केली. आता मात्र राजाराणीला
कळले की कुठेतरी काहीतरी चुकतय. मात्र प्रश्न गंभीर होऊ लागल्यावर छातीवर दगड
ठेवून त्या कर्तबगार माउलीने नोकरीचा राजीनामा दिला.

Customer satisfaction ची दमदार आह्वाने झेलणारी ही मुक्त आणि कर्तबगार
स्त्री पॊटच्या गोळ्याचे संगोपन करतांना ठेचकाळू लागली, चिडचिडू लागली. सहन
होईना तेव्हा बाळाचा आणि मातृत्वाचा तिरस्कार करू लागली... आणि मग ... ही गोष्ट इथेच संपली.

1 टिप्पणी:

Unknown म्हणाले...

Tumcha mudda agadi kalvala vatnyasarkha aahey pan nustich tika aahey ....tyat kahi bhavana nahit kinva solution nahi.
Hich goshta jara namrapaney mandta aali aasti .....ani pratyek changlya goshiche dushparinam hi astat ...aapwad astat......but u r not considering the larger picture.
Tumche phatkal likhan vachun vatata tumcha janma nakkich march/april madhla asava!
Kadhikadhi jara namra vhayla harkat nahi ........tabyet bari rahatey :)