शुक्रवार, २३ डिसेंबर, २०१६

भान



भान

-----


एक काळुंद्री वखवखली

सशाला बघुन हरखली
सशाने पुसले तोंडाला पान
काळुंद्रीचे सुटले भान...

सोमवार, ५ डिसेंबर, २०१६

पुतळा







समजा तुम्ही एक शिल्पकार आहात आणि

तुम्हाला एका व्यक्तीचा छोटा अर्धाकृती पुतळा घडवायचा आहे.


समजा तुम्ही त्या व्यक्तीकडे जाता आणि मग तुमची

अर्धाकृती पुतळा घडवायची इच्छा व्यक्त करता.

मग ती व्यक्ती तुम्हाला (आनंदाने) सांगते

"हो घडवा की"

मग ती व्यक्ती नंतर तुम्हाला म्हणते,

"मला पुतळा चालेल पण

तो पूर्णाकृती हवा."


मग तुम्ही साधकबाधक विचार करता आणि

पूर्णाकृती पुतळा बनवायला करायला तयार होता.


पण मग नंतर ती व्यक्ती म्हणते

मला माझा पुतळा बनविण्यासाठी

इतके इतके लक्ष रुपये मानधन हवे

कारण पुतळा बनविण्यासाठी मी माझा वेळ खर्च

करणार. आणि माझ्या वेळाला किंमत आहे, वगैरे वगैरे...

(थोडक्यात मला पुतळा पण हवा आणि मानधन पण हवे).


मग तुम्ही काय कराल?

गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

आईस...

आईस,

आज तुझ्याशी खुप बोलावसं वाटतय...

जग आता खूप बदलले आहे आणि तुझ्या मूल्यांची आता पीछेहाट झाली आहे. तू हयात असतीस तर तुला हे पचवता आले असते का? याचे उत्तर आज तरी माझ्याकडे नाही. तुझ्या अखेरच्या दिवसात जगाने मला एक महत्त्वाची गोष्ट शिकवली. ती म्हणजे -

सभ्यपणा हा एकप्रकारचा कमकुवतपणा असतो.


प्रगती हा नात्याच्या यशाचा एक महत्त्वाचा निकष आहे, असे मला वाटते. ज्या मूर्खांनी आपली फक्त भांडणे बघितली, त्यांना हे कळणार नाही की ती कोणत्या परिस्थितीत झाली. तसेच त्या भांडणांमुळे माझी प्रगती थांबली नाही, तर  तुझी काही स्वप्ने पुरी करता आली. समाजाला न्यायाधीशाच्या भूमिकेत बसायची तीव्र हौस असते पण साक्षीपुरावे तपासायची क्षमता आणि इच्छा नसते.

आजकाल मला पंचतंत्रातल्या, यज्ञासाठी बोकड नेणार्‍या ब्राह्मणाला भेटलेल्या ठगांच्या गोष्टीची आठवण करून देणारी माणसे खूप भेटतात. तू हयात असताना सांगितल्याप्रमाणे, "तुझी आई कशी वाईट", हे मनावर बिंबवायचे खूप प्रयत्न झाले. महत्त्वाचे पुरावे हाती लागले नसते तर मला कदाचित "माझी आई वाईट", हे मला स्वीकारणे मला भागच होते. या लोकांचा दिशाभूल करण्यात हातखंडा असतो. अशी माणसे "अर्धा ग्लास भरलेला आहे"  असे मानणार्‍या व्यक्तीला मानसिक रुग्ण ठरवायला कमी करत नाहीत.

बाकी आपल्या गोतावळ्यात ’भानुमतीचा मुलगा’ या ओळखीने मला जी किक् मिळाली आहे, तशी किक् ’कोण्डो विठ्ठल उपाध्यांचा मुलगा’ म्हणुन कधीच मिळाली नाही.

असो. चार्वीने तुझी चेहेरेपट्टी घेतली असल्याने तुझी आठवण तिच्यामुळे सर्वानाच होते आणी राहील. तुझ्या अनेक लकबी तिच्यात कुठुन आल्या हे एक मोठ्ठे कोडे आहे.

जाता जाता - तू कितीही वाईट असलीस तरी मला "अटक" घडवुन आणायचे जे दोन desparate प्रयत्न झाले त्यातुन मी केवळ तू होतीस म्हणून वाचलो, याची जाणीव मला आयुष्यभर राहील.

तुझा

राजीव






बुधवार, २६ ऑक्टोबर, २०१६

गप्पा



काल रात्री लेकीशी गप्पा मारल्या...


"बाबा, वेडे लोक फक्त जर्मनीत नसतात. ते भारतात पण असतात" - चार्वी

"का? काय झालं? " - मी

"आमच्या इथल्या एका सिनिअरचा एक प्रोजेक्ट काय आहे माहिती आहे का तुम्हाला?" - चार्वी
"तू सांगितलंस तर कळणार ना मला" - मी
"त्याने आमच्या वापरलेल्या सॅनिटरी नॅपकीनचे फोटो काढुन मागितले आहेत... ईऽऽऽयु" - चार्वी
"कशाला?" - मी किंचित दचकून विचारले
"ते फोटोवापरून त्यांना एक आर्टवर्क तयार करायचे आहे. पिरीयडस् बद्दलचा अवेअरनेस वाढविण्यासाठी..." - कन्यारत्न


मला क्षणभर आर्ट्वर्कच का installation का नाही असा प्रश्न ओठावर आला होता. पण तो मी दाबून टाकला आणि मग तिला तशाच एका दूसर्‍या प्रोजेक्ट्ची आठवण करून दिल्यावर ती ठिकाणावर आली.


मग मी तिला म्हटले,

"हे बघ, ही कल्पना त्याने प्रथमच वापरली असती तर त्याला आपल्याकडे नक्की वेड्यात काढले असते. पण असंच अगोदर परदेशात झाले असल्याने त्याला फार त्रास होणार नाही".


मग तिला ते पटले आणि मी पण कन्या सुस्थळी पडल्याने सुखावून झोपी गेलो...

सोमवार, १० ऑक्टोबर, २०१६

पिंक, स्त्रीमुक्ती आणि वंश



पिंक’ या सिनेमाच्या निमित्ताने माझ्या एका सिद्धान्ताला परत एकदा पुष्टी मिळाली. तो सिद्धान्त असा -"बर्‍याचदा स्त्रिला काय हवं ते ती स्पष्टपणे सांगत तरी नाही किंवा तिला काय हवं ते कळत तरी नाही." कायद्याला स्त्रिच्या संमतीची व्याख्या करता आलेली नाही, यातुन हीच गोष्ट अधोरेखित होते. या निमित्ताने माझ्या एका मित्राची ( Narendra Damle ) प्रतिक्रिया मात्र बोलकी आहे. तो म्हणतो. - पुरुषाला स्त्रिच्या नकाराचा आदर करणे जसे शिकविणे जरूरीचे आहे तसेच स्त्रियांना स्पष्ट होकार द्यायला शिकवणे पण जरूरीचे आहे. असो...

 या माझ्या वर दिलेल्या सिद्धांतामध्ये मला आता आणखी थोडी भर घालावीशी वाटते. ती अशी - "काही (मंदबुद्धी) स्त्रियांना, स्त्रियांच्या बाजुने बोलले तरी कळत नाही."

माझ्यामते, स्त्री पुरुषाचा वंश चालु ठेवते, हे समाजाला सोईस्कर असे "मानीव सत्य" आहे. निसर्ग नियमानुसार वंश फक्त स्त्रीचाच असतो आणि पुरुष त्यात जनुकीय वैविध्यता आणतो. अनेक जीवांमध्ये वंशसातत्यासाठी पुरूषाची आवश्यकता नसते. ’य’ गुणसूत्राशिवाय, केवळ काही जनुक अनेक सस्तन प्राण्यत लिंग निश्चितीसाठी पुरेसे असतात (https://www.sciencedaily.com/releases/2016/09/160930080716.htm). तेव्हा स्त्रिला जेव्हा स्वत:चा वंश चालु करून सांभाळता येईल, तेव्हा ती खरी स्त्रीमुक्ती ठरेल. पण बर्‍याच मंदबुद्धी जीवांना हे जीवशास्त्र कुठुन कळणार. पण मी त्यांच्याबद्दल अपार करूणा बाळगुन आहे.

शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०१६

जलतैल न्याय


तेल आणि पाणी एकत्र करून कितीही घुसळले तरी तेल, तेल राहते आणि पाणी, पाणीच राहते. ते एकजीव होऊ शकत नाहीत. हा दृष्टांन्त सांगायचे कारण म्हणजे आय आय टीवर लादलेले आरक्षण. या लादलेल्या आरक्षणाचे परिणाम तपासायचे कष्ट कुणी घेतले आहेत असे दिसत नाही.

चार्वीच्या  (माझ्या मुलीच्या) एका मित्राला आणि आमच्या एका परिचितांच्या मुलाला आय आय टीत प्रवेश (जनरल प्रवर्ग) मिळाला आहे. त्यांच्याकडुन आरक्षणातुन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या हकिकती समजतात, तेव्हा समाजातील काही घटकांवर **प्रगती लादण्याने** काय साधले जात आहे याचा जमाखर्च मांडायची गरज आहे, असे वाटते.

इथे सविस्तर वृतांत देणे शक्य नाही पण आरक्षणातुन आलेल्याना मिळालेल्या संधीची किंमत न कळणे, जबाबदारीचे भान नसणे आणि त्यातुन येणारा बेजबाबदारपणा आणि नैराश्य हे प्रमुख प्रश्न आहेत. त्यातुन ही मुले (आरक्षण) ज्यांना अभ्यास करायचा आहे, त्यांना पण अभ्यास करू देत नाहीत, असे कानावर आले आहे. याचा मुख्य परिणाम म्हणजे वर्गभेदाला मूठमाती मिळण्या ऐवजी तो अधिक प्रखर बनल्याने, आय आय टी सारख्या संस्थांचे नुकसान जास्त होणार आहे.

anyone listening?

रविवार, ८ मे, २०१६

’मदर्स डे’च्या निमित्ताने

माल्कम ग्लॅडवेलच्या ’ब्लिन्क’ नंतर गर्ड गायगरेन्झरचे ’गट फिलिंग्ज’ हे पुस्तक माझ्या वाचनात आले. ’गट फिलिंग्ज’ हे पुस्तक मला ’ब्लिन्क’पेक्षा जास्त आवडले. ’गट फिलिंग्ज’ मध्ये मॉरल बिहेव्हीअर या प्रकरणाच्या सुरुवातीला दुसर्‍या महायुद्धाच्यावेळचा एक प्रसंग सांगतो -

१३ जुलै १९४२ रोजी जर्मन राखीव पलटण १०१ चा तळ पोलंडमध्ये होता. त्या दिवशी भल्या पहाटे संपूर्ण पलटणीला एका खेड्याबाहेर नेण्यात आले. शस्त्रास्रानी सज्ज पण पुढे काय आहे याची कसलीही कल्पना नसलेले ५०० सैनिक ५३ वर्षीय विल्हेल्म ट्रॅप नावाच्या त्यांच्या आवडत्या कंमांडर भोवती गोळा झाले होते. अत्यंत अस्वस्थपणे कमांडर ट्रॅपने घोषणा केली की त्याच्यावर आणि त्याच्या पलटणीवर एक अत्यंत भयंकर आणि निर्दय जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्या खेड्यातले १८०० ज्यू नाझीविरोधी गटांच्या कारवयांमध्ये गुंतले होते. पलटणीला आदेश असा मिळाला होता की त्या खेड्यातल्या पुरुषांना छळ छावण्यांमध्ये हलवायचे आणि उरलेल्यांना म्हणजे स्त्रिया, लहान मुले, वृद्ध इत्यादीना जागेवरच गोळ्या घालुन मारायचे.

आदेशाचे वाचन करताना विल्हेल्म ट्रॅपच्या डोळ्यातुन अश्रु ओघळायला लागले होते. त्याच्यावर अशी जबाबदारी यापूर्वी कधीही टाकण्यात आली नव्हती. आदेशाचे वाचन संपल्यावर ट्रॅपने आपल्या सैनिकाना एक पर्याय देऊन आश्चर्याचा धक्का दिला. त्याने सांगितले की ज्या ज्येष्ठ अधिकार्‍याना ही जबाबदारी घेणे जड जाईल असे वाटते त्यांनी खुलेपणाने बाजुला व्हावे.

ट्रॅपने काही क्षण वाट बघितली आणि सुमारे डझनभर अधिकार्‍यांनी ट्रॅपने दिलेला पर्याय स्वीकारला आणि उरलेल्यानी ’कर्तव्य’पालनाचा पर्याय स्वीकारला.

गायगरेन्झरने या आणि आणखी काही उदाहरणांची चर्चा करून असे प्रतिपादन केले आहे की सहसा बहुतांश लोकांची प्रवृत्ती ’मूळ पर्याया’ला चिकटून राहायची असते. परंपरेला आणि authorityला  चिकटणारे लोक परंपरेने दिलेल्या पर्यांयांच्या पलिकडे सहसा जाऊ शकत नाहीत. ते का याचे इथे चपखल उत्तर मिळते.

आज हे आठवायचे कारण म्हणजे मदर्स डे... काहीवर्षांपूर्वी माझ्या शेवटच्या नोकरीमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर मिटींगमध्ये जर सिगरेटी फुंकणार असेल तर मी मिटींगला येणार नाही असे ठणकाऊन सांगायची धमक (आणि इतर अनेक मांजरांच्या गळ्यात घंटा बांधायची हिम्मत)  ज्या genes मुळे मला मिळाली, त्या माझ्या आईला आजच्या मदर्स डे निमित्त अभिवादन.

मंगळवार, ५ एप्रिल, २०१६

बॉण्ड

पैतृक वारसा हा संपत्तीशी निगडीत असतो म्हणुन तो समाजाने महत्त्वाचा मानला आहे. पण जनुकीय वारसा कर्माशी निगडीत असतो. त्यात आईच्या कर्तृत्वावर आणि आईकडुन मिळणा-या वारशावर समाज *सहसा* बोळा फिरवतो.


ज्या मूर्ख, अक्कलशून्य अतिशहाण्याना माझ्या आईच्या घराण्याशी असलेला माझा बॉण्ड डाचत असतो त्यांच्यासाठी ही डॉ. दीक्षितांची माझ्या वॉलवरील पोस्ट झणझणीत अंजन ठरावी. Thx ड्र. Jay Dixit!


"Your Kundalini : From the data you provided - the ovum which eventually became you was formed in your mother's ovary while she was a fetus in the grandmothers uterus was around mid April of 1937. So by this date you are around 80 years of age now ( and me over 100 !!). From 1937 for next 26 years it grew very little but it did receive the hits and some damage from free radicals, toxins, etc., just like other mothers normal cells and stem cells, etc. until it was fertilized ( but it was not like it was frozen and preserved, so its aging like any other biological tissue is real, so part of you is 80 years of age. If you believe in concept of soul, then your soul also began then - sperm probably has very little contribution to the soul or your cosmic connection to the universe).


Your mother's womb is like a "3 D printing machine" once the instructions for you- all 1.5 billion pairs of DNA and countless epigenetic markers fabricated by your grandmother were handed down to your mother ( and other 1.5 B received from your father with a powerful "master switch gene" SRY ), the printer went in action , over the course of next 9 months- your mother printed about 2 to 3 trillion of your cells when you were born from the instructions she received ( over 100 billion were just brain cells, and another 100 billion were heart cells, reproductive DNA of these cells unlike other cells was sealed tight shut, so it will never open and these cells will only grow, but never will reproduce like other cells). This 3D printer is however, not water tight- some of the mothers "adult" cells escaped from placenta and anchored in your body forever, but never your fathers cells are inside you- confusing your immune system for the rest of your life. She also gave your very specific "probiotics" or gut bacteria to colonize your inside and outside of the skin once you were born (Fetal skin and gut is sterile in the womb)."



मंगळवार, ८ मार्च, २०१६

आधार



चार्वीचा शाळेतला एक मित्र आहे. अनुप्रियम... त्याचा मला खुप हेवा आणि कोतुक वाटते. तो हूषार आहेच पण उत्तम चित्रे काढतो. यावर्षी म्हणजे १२वीच्या वर्षी (त्याच्या भावाचे दहावीचे) त्याचे वडिल अचानक गेले. पण या पठ्ठ्याने हा प्रसंग शांतपणे झेलला आणि आत्ता NID आणि UCEED च्या प्रवेशपरीक्षा  उत्तम तर्‍हेने पास झाला आहे.

नुकतीच त्याच्या वॉलवर नजर टाकली तेव्हा कुणाचे तरी सांत्वनपर शब्द दिसले,
"Be brave beta we all are with you"

का नाही हेवा वाटणार?

मला त्याच्यासारखे खंबीर का बनता आले नाही या विचाराने अजुन अधुनमधुन अस्वस्थ व्हायला होते.

माझे वडिल मी आय.आय.टीत असताना गेले तेव्हा मी पूर्णपणे कोसळून गेलो. मी १२ वीत परिक्षेच्या अगोदर १ महिना असताना माझ्या वडिलांना दूसरा ऍटॅक आला तेव्हा डॉकटरांनी स्पष्ट सांगितले होते, "येईल तो दिवस आपला समजा. केव्हा काय होईल ते सांगता येणार नाही."

त्यानंतर भयानक मानसिक अस्वस्थतेत आम्ही सहा वर्षे लढा दिला. रात्री मला आणि आईला दचकुन जाग यायची तेव्हा वडिलांचा श्वासोच्छवास चालु आहे की नाही हे बघुन परत झोपी जात असु.

त्यादिवसात वडिलांच्या (हलकट आणि नीच) नातेवाईकांकडुन कसलाच आधार नव्हता. होता तो आईच्या आई-वडिलांकडुन आणि वडिलांच्या ऑफिसमधल्या सहकारी आणि मित्रांकडुन.

वडिलांचे अंत्यसंस्कार उरकुन स्मशानातुन बाहेर पडता-पडता चुलत्याची अस्वस्थता लपली नाही. त्या थेरड्याला वडिलकीची भूमिका कधीच निभावता आली नाही, पण भावाची चिता विझली नाही तोच पुतण्या परदेशी जाणार का याची काळजी त्याला अस्वस्थता करत होती...

घरी आल्यावर दू:ख मोकळे करायची पण सोय नव्हती. ’फंडाचे पैसे किती मिळतील’ आणि ’घर विकुन टाका’  इथपर्यंत चौकशा आणि सल्ले चहुबाजुनी येत होते. अभ्यासात लक्ष लागत नव्हते तेव्हा विचारपूस करणे राहिले बाजुला, त्यात भरीसभर म्हणुन आय.आय.टीत विळदकर नावाच्या एका प्राध्यापकाने मी ड्रग्ज घेतो का अशी अफवा पसरवायला कमी केले नव्हते (माझ्या सुदैवाने माझ्या मित्रांनी तेव्हा त्याला गप्प बसवले होते). अशा असंख्य गोष्टी आहेत.

मला चार्वीच्या मित्रासारखे खंबीर राहता आले नाही याची कारणे मला आता हळुहळु समजत आहेत. त्याच्या आजुबाजुला खच्ची करणारी माणसे नाहीत ... पितृछत्र हरवले असले तरी नशीबवान आहे तो...

मंगळवार, १ मार्च, २०१६

एक घरवापसी


आत्ता १५-२० मि. पूर्वीचा प्रसंग...

मारूतीमंदिरपाशी आलो आणि लाल सिग्नल पडला आणि अडकलो. सिग्नल हिरवा होईपर्यंत डोळ्यासमोर घडलेला प्रसंग.

माझ्या उजव्या बाजुला  सिग्नलपोलपाशी एक १६-१७ वर्षाचा गुलाबफुल विक्रेता आणि एक किचेन आणि तत्सम खेळणी विक्रेता यांच्याबरोबर एका पंचेचाळीशीच्या मनुष्याचा काहीतरी संवाद चालु होता. पंचेचाळीशीचा मनुष्य जोरजोरात बोलत असल्याने लक्ष वेधले गेले.

"अरे हे गळ्यात काय घातलंय माहिती आहे का तुला?" पंचेचाळीशीचा मनुष्य बहुधा कार्यकर्ता असावा. त्याने गुलाबफुल विक्रेत्याच्या गळ्यातल्या लॉकेटला उद्देशुन प्रश्न विचारला होता.

गुलाबफुल विक्रेता हसत हसत काहीतरी पुटपुटला. मला ते रस्त्यावरच्या गाड्यांच्या आवाजात ऐकु आले नाही.

"अरे, हा मेलेला मनुष्य आहे. मेलेल्या माणसाला असा कुणी गळ्यात घालतात का? आपण माणुस मेल्यावर त्याला घरात ठेवतो का?

ते दोघे काळेकभिन्न विक्रेते काहीही कळत नसल्याने हसत-हसत काहीतरी पुटपुटत होते. पण काय ते मात्र कळत नव्हते. त्यामुळे माझी उत्सुकता मात्र वाढत चालली होती.

"अरे या मेलेल्या माणसाला गळ्यात घालण्यापेक्षा मी तुम्हाला चांगला ॐ उद्या आणुन देतो. तो गळयात घाला" सिग्नलला गर्दी वाढल्यामुळे कार्यकर्त्याला आता चेव चढला आणि त्याचा आवाज आणखी वाढला.

नंतरचा संवाद मात्र गाड्यांच्या कलकलाटामुळे ऐकु आला नाही पण बघबघेपर्यंत त्या कार्यकर्त्याने तो गळयातला "मेलेला माणुस" खेचुन काढला. तेव्हढ्यात सिग्नल हिरवा झाला आणि मला तिथुन निघावे लागले.

रात्रीच्या अंधारात भरगर्दीत  चाललेल्या या घरवापसीने मनात बरीच प्रश्नचिन्हे चमकायला लागली होती...

बुधवार, २७ जानेवारी, २०१६

देऊळ


आमच्या सोसायटीच्या समोर २ मोठे टॉवर आणि एक मंगल कार्यालय झाले आणि आमच्या समोरच्या रस्त्याची गल्ली झाली. यथाकाल गल्लीच्या तोंडाचा काही रिक्षावाल्यानी ताबा घेतला आणि तिथे आपला स्टॅण्ड सुरु केला. काही दिवसांनी रिक्षास्टॅण्डला स्थैर्य प्राप्त झाले आणि एका रिक्षासंघटनेचा बोर्डपण लागला. पुढे काय होणार याचा मी अंदाज बांधला आणि माझा अंदाज खरा ठरला...

रिक्षावाल्यानी दत्ताचे देऊळ बांधायचा संकल्प सोडला. बहुधा आमच्या सोसायटीने हरकत घेतली म्हणून रिक्षावाल्यानी पलिकडच्या बाजुला छोटे दत्तमंदिर बांधायला घेतले. रिक्षावाल्याना दत्त का प्रिय आहे हे मला न उलगडलेले कोडे आहे. नुकतीच दत्तजयंती झाली तेव्हा रिक्षावाले माझ्याकडे आले, तेव्हा मी त्यांना मला शक्य होती तेव्हढी वर्गणी पण दिली.

परवाच मी रुपालीत जाण्यासाठी रिक्षा घेतली, तेव्हा एका रिक्षावाल्याशी गप्पा मारायला सुरुवात केली.

मी विचारले, "काय हो, सगळ्या रिक्षास्टॅण्डवर दत्त जास्त करून दिसतो. ते का?"

"काय माहित नाही साहेब?"

"पण मग गावात एव्हढी देवळे अगोदरच असताना आणखी ही देवळे कशासाठी?"

"काय आहे साहेब, कामावर निघताना कुठेतरी डॊकं टेकवले की मन प्रसन्न राहतं साहेब".

मग मी त्याला विचारले,

"अहो पण डोकं टेकवायला आपल्या घरात देव असतोच की... घरातला देव काय मन प्रसन्न ठेवायला कमी पॉवरफुल असतो का?"

रिक्षावाला आता एकदम गडबडुन गेला आणि मग स्वत:ला सावरून मोठ्याने हसला आणि म्हणाला,

"देवळाच्या निमित्ताने आमच्या व्यवसायातली चार लोकं एकत्र येतात आणि बांधलेली राहतात"

मग रिक्षावाल्याने मला वेगवेगळ्या रिक्षास्टॅण्डवरचे रिक्षावाले कायकाय उपक्रम चालवतात, ते त्याने मला सांगितले. त्यावर घरातला देव नाक्यावरच्या चार लोकांना एकत्र आणण्यास असमर्थ आहे एव्हढाच मी त्यातुन निष्कर्ष काढला आणि मग मला त्याला अधिक प्रश्न विचारण्यात मला पण, का कुणास ठाऊक, रस उरला नाही.

तोपर्यंत रुपाली आली होती... रिक्षातला वेताळ मग रुपालीत जाउन लोंबकळु लागला.

मंगळवार, १९ जानेवारी, २०१६

अजब

 मध्यंतरी माझ्या परिचयाच्या एका आजींना त्यांच्या आप्तांनी आमच्या घराजवळच्या वृद्धाश्रमात ठेवले होते. मी मला शक्य होते म्हणुन आणि वृद्धांशी माझे जुळते म्हणून या आजींना नियमित भेटायला जात असे. यामुळे तिथल्या इतर वृद्धांशी सहजच गप्पा होत. मी प्रामुख्याने श्रोता ही भूमिका त्यांच्यात निभावायचो आणि या लोकांसाठी तेव्हढेही खुप होते...

पुढे काही दिवसांनी माझ्या परिचयाच्या आजीना त्यांच्या आप्तानी अमेरिकेला न्यायचे ठरवले. वृद्धाश्रमातील लोकांनी एक छोटा निरोप समारंभ पण केला. तेव्हा एक आजी माझ्याकडे येऊन म्हणाल्या, "या आता इथुन जाणार असल्यातरी तुम्ही आमच्यासाठी येत चला हं. आपली ओळख आता चांगली झालीच आहे." मला त्यात वावगे वाटले नाही म्हणुन मी पट्‍कन ’हो’ म्हणुन टाकले.

नंतर काय वाटले कुणास ठाउक, माझं मन मला म्हणाले की माझ्या परिचयाच्या आजींच्या नंतर त्या वृद्धाश्रमात जाण्यासाठी आपण संचालकांची रितसर परवानगी काढावी. तो वृद्धाश्रम पेशाने मानसोपचार तज्ज्ञ असलेल्या एक बाई चालवत असत.

मी त्या वृद्धाश्रमाच्या संचालिकेला फोन करुन सर्व सांगितले आणि रितसर परवानगी मागितली. त्यावर संचालिकेने मला सांगितले
"तुम्ही त्या आजीना भेटायला अजिबात येऊ नका. त्यांची केस जरा विचित्र आहे. तुम्हाला भेटायचे असेल तर इतरांना भेटा."

ज्या आजीनी मला "येत जा" म्हणुन सांगितले त्यांना टाळुन इतरांना भेटणे अशक्य असल्याने मी माझा वृद्धसेवेचा प्लॅन मग गुंडाळुन ठेवला.

विचित्र केस म्हणजे काय तर त्यांच्या आप्तांनी आजीना ’वेडं’ ठरवुन वृद्धाश्रमात आणुन टाकले होते असे उडत उडत कानावर आले होते. आजी मात्र एकदम खणखणीत गप्पीष्ट होत्या. ज्या काय गप्पा झाल्या त्यात कुठेही ’वेडे’पणा किंवा तर्‍हेवाईकपणाचा मागमूस नव्हता. पण त्याना समाजापासून असे तोडुन काय साधणार होते हे त्या वृद्धाश्रमाची संचालिकाच जाणे...

शुक्रवार, १५ जानेवारी, २०१६

"टवाळी"


नारळीकरांच्या टवाळीवरून एक आठवण जागी झाली ...

१९९३-९४ च्या भटकरांनी माझे रखडवलेले प्रमोशन करायचेच असा विडा एका सहकारी-हितचिंतकाने उचलला.

हा माझा सहकारी अत्यंत बुद्धीमान आणि तितकाच विक्षिप्त. अत्यंत गुंतागुतीची differential equations, tensor calculus तास-न-तास हाताने फक्त कागद आणी पेन घेऊन करत बसायची अचाट क्षमता त्याच्यात होती.

त्याने प्रचंड प्रयत्न करून भटकरांना माझ्या प्रमोशनइंटरव्ह्युसाठी राजी केले. प्रमोशन इंटरव्ह्युसाठी मी अशा माणसाला (expert) आणेन की भटकरच काय  त्यांचा बाप पण तोंड उघडु शकणार नाही, हे त्याने मला दिलेले आश्वासन होते.

त्याचा तो अभिनिवेश बघुन मी त्याला विचारले,
"who is in your mind for my interview"

विनाविलंब विचार करता त्याने सांगितले,
"Prof. Govind Swaroop"

प्रा. गोविंद स्वरुप तेव्हा पुणे टिआयएफआर चे संचालक होते.

माझ्या मित्राने एक दिवस त्यांच्या घरी मला त्यांच्याकडे नेले. त्या दिवशी प्रा. गोविंद स्वरुपांच्या घरी विकांत पार्टी होती. मी काहीसा भांबावुन गेलो  होतो. माझ्या प्रमोशनसाठी प्रयत्न करणार्‍या माझ्या मित्राचे मला खुप कौतुक वाटत होते.  पण सावधपणे पार्टीत जमेल तेव्हढा (दारू सोडुन) सहभाग घेत होतो.

त्या दिवशी  त्या पार्टीत मला नारळीकरांची जी ’टवाळी’ बघायला मिळाली त्यानंतर नारळीकरांची माझ्या मनातली प्रतिमा खाड्‍कन उतरली. एक नमूद करणे आवश्यक आहे, ते असे की प्रा. गोविंद स्वरूप त्या टवाळीपासुन अलिप्त होते. त्या टवाळीचे कारण अलिकडे लक्षात आले - त्या सुमारास नारळीकरांच्या steady state theory चे जागतिकपातळीवर थडगे बांधले गेले होते ( अथवा सुरुवात झाली होती).

असो ...

नंतर भटकरांनी गोविंद स्वरूपांसारख्या व्यक्तीला माझ्या बढतीसाठी बोलावण्याची आवश्यकता नाही, असे सांगुन घूमजाव केले. माझी बढती झाली पण ती होउ नये म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न होत होते.

मंगळवार, ५ जानेवारी, २०१६

जे झाडांचे तेच माणसांचं


जमीन, हवा, पाणी दिले म्हणुन
कोणतेही झाड
कुठेही रुजत नाहीत.

जे झाडांचे तेच माणसांचं


सगळी झाडे
एका जागेवरून उपटुन
दूसरीकडे लावता येत नाहीत.

जे झाडांचे तेच माणसांचं

काही झाडे रुजतात आणि
झपाझप वाढतात
काही झाडे जागा झाली की
मग वाढतात

जे झाडांचे तेच माणसांचं

काही झाडे फार वाढणार नाहीत
याची काळजी घ्यावी लागते
कारण ’हवी ती झाडे’ मग
नीट वाढत नाहीत

जे झाडांचे तेच माणसांचं

- राजीव उपाध्ये