शनिवार, १२ जानेवारी, २०१३

विसंगती आणि शंका


एक विसंगती?

धार्मिक भावना भडकतात तेव्हा भडकवणारा दोषी असतो.
मात्र लैंगिक भावना भडकतात तेव्हा भडकणारे दोषी असतात...

एक शंका

निसर्गाने निर्माण केलेल्या स्त्री-पुरुषांच्या लैंगिक रचनेत काही मुदलातच दोष आहे का? म्हणजे बघा अवयव तेच फक्त शुक्राणुंच्या ऐवजी पुरुषाच्या शरीरात बीजांड निर्मिती झाली असती आणि तर पुरुषाचे उद्दीपन मासिकधर्मा पुरतेच मर्यादित राहिले असते. स्त्रीयांच्या शरीरात  अवयव तेच पण फक्त तेथे शुक्राणुंची निर्मिती होऊन फक्त समागमाच्या वेळी त्यांचा उत्सर्ग झाला असता तर आज मोठ्या प्रमाणात दिसणारा लैगिक (गैर)व्यवहार आपोआप नियंत्रित राहिला असता.

निसर्गा तू चूकलास रे बाबा! तुला वठणीवर कसे आणायचे?

शुक्रवार, ४ जानेवारी, २०१३

गुदगुल्या


लोक हो!

सध्या कृष्णमूर्तींच्या गोटात माझ्या नावाने खडे फोडणे चालू असले तरी बाकी माझी नवीन वर्षाची सुरुवात गुदगुल्या करणारी झाली आहे. 

आतापर्यंत मी वेगवेगळ्या निमित्ताने, संशोधनपर निबंध ते  लेख, वृत्तपत्रीय सदर लिहीणे (सकाळ) इत्यादि लेखन केले आहे  (माझ्या पत्रिकेत बुध angular असल्याने ताकदवान झाला आहे). पण मी काढलेले प्रकाशचित्र कधी प्रसिद्ध होईल असे अजिबात वाटले नव्हते.   माझा मित्र आणि गुरुबंधु  चिंतन मधुकर उपाध्याय  याचे मी काढलेले  व्यक्तिचित्र शुभा मुद्गल यांच्या छोटेखानी मुलाखतीसोबत चक्क Times of India मध्ये प्रसिद्ध झाल्याचे कळले तेव्हा मला जवळजवळ हर्षवायुच होणे बाकी होते.

चिंतन आणि मी एकाच वेळेस विख्यात धृपदगायक पंडित उदय भवाळकर यांच्याकडे धृपद शिकत होतो. मला पाठदुखीमुळे धृपदाची तालिम (पहाटे पाच ते दहा) थांबवावी लागल्यामुळे मी माझी क्रिएटिव्ह एनर्जी छायाचित्रणाकडे वळवली.

२०१३ मध्ये शास्त्रीयसंगीताच्या क्षेत्रात ज्यांच्याकडे आशेने बघावे अशांपैकी एक चिंतन आहे, असं शुभाजीनी म्हटलं आहे.

तुम्ही पण चिंतनचे गाणं जरूर ऐका आणि माझ्या त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

शुभा मुद्गलांची टाईम्स मधली मुलाखत

मी चिंतनचे पुण्यात एका मैफलीत काढलेले मूळ व्यक्तीचित्र



Miller of The Dee या सुप्रसिद्ध इंग्लिश कवितेचे मी केलेले मराठी स्वैर रुपांतर



कुण्या नदीच्या तीरावरती एक पिठाची गिरणि वसे
मालक त्या हो पिठगिरणीचा स्वछंदी आनंदि असे
जात्याच्या तो सुरात मिसळी स्वानंदाचे गीत कसे
ना हेवा मी करी कुणाचा, कुणी न माझा करीतसे

कुशल प्रजेचे बघण्या राजा येइ एकदा नदितीरी
श्रमपरिहारक सुरावटी त्या राजहृदयि मात्सर्य भरी
"चुकसी मित्रा" राजा वदला "हेवा वाटे तव मजला,
वैभव सारे भोगत असुनी कष्टि कसा मी? सांग मला"

चकित होउनी गिरणीवाला टोपी काढत घाम पुसे
"खाइ भाकरी मम कष्टांची" वदुनी असे मिष्कील हसे
"कधी न मजला कर्ज कुणाचे, साथ नदीची या जन्मी,
ओघावर त्या गिरणी चाले ऐसे असता काय कमी"

उत्तर त्याचे ऐकुन राजा निजांतरी तो सुखावला
सद्गद हृदये पुन: पुन: हे स्वत:शीच तो पुटपुटला
"ऐशा तुजसम प्रजाननांचे कौतुक वाटे मज मोठे,
पिठमंडित तव टोपी पुढती रत्नजडित मम मुकुट कुठे"

निज सदनी मग येई राजा, मनात त्याच्या हेच असे
"ना हेवा तो करी कुणाचा कुणी न त्याचा करीतसे  --- (पुन:प्रकाशित)

सोमवार, ३१ डिसेंबर, २०१२

आधीच मर्कट तशात मद्य प्याला ...


प्रश्नज्योतिषावरील माझी या अगोदरची नोंद प्रसिद्ध झाल्यावर बराच थयथय़ाट चालू झाल्याचे कानावर आले. तो अपेक्षितच होता. त्यावरून शाळेत पाठ केलेला "आधीच मर्कट तशात मद्य प्याला ... हा श्लोक आठवला. जे लोक ह्सबे वगैरेंच्या नावाने आचमन करतात त्यांच्यासाठी खालील संदर्भ देणे आवश्यक वाटते.

"नंदीबैलवाले जेव्हा नंदीस घेऊन एखाद्या चौकांत जाहीर कार्यक्रम करीत असतात त्यावेळी त्यांना कोणीही काहीही विचारतात. नंदीवाल्यांना नंदीच्या मार्फत सर्वांचीच उत्तरे द्यावी लागतात. तरच तो दूसर्‍या चौकात कार्यक्रम करू शकतो. थोडीफार अशीच अवस्था कृष्णमूर्तीवाल्याची झाली आहे."

- ज्योतींद्र हसबे, कृष्णमूर्ती प्रश्नसिद्धांत भाग २ पृ १३०, सुमेरू प्रकाशन, १९९२.

हसब्यांची वरील विधाने बरेच काही सांगून जातात. हसब्यांच्या प्रांजल कबुलीला मला मनापासून दाद द्यावीशी वाटते. मला स्वत:ला कृष्णमूर्तीपद्धतीचा कायमच चुकीचा पडताळा आला आहे. मात्र कृष्णमूर्तीवाल्यांच्या अभिनिवेशाचे भरपूर अनुभव आहेत (जालावरचे कृष्णमूर्तीवाले त्या थोर (अभिनिवेश) परंपरेचे पाईक आहेत, यावर दूमत असण्याचे कारण नाही).

मागे एकदा पुण्यात उद्यान प्रसाद कार्यालयात ज्योतिषांचा एक परिसंवाद भरला होता. विषय आता लक्षात नाही. पण कुणीतरी प्रश्नोत्तरांमध्ये  कृष्णमूर्तीपद्धतीच्या अचूकतेसंबंधी प्रश्न विचारला. आयोजकानी प्रथम व. दा. भटांनी प्रश्नाचे उत्तर द्यावे असे सुचवले. व. दा. भटांनी कृष्ण्मूर्तीवाल्यांचे अचूकतेचे दावे अतिरंजित असतात असे म्हटल्यावर त्यांच्या शेजारी बसलेले एक कृष्णमूर्तीभक्त चवताळले. भटांच्या हातातला माईक खेचून घेतला आणि तावातावाने बोलायला लागले. त्यांचे बोलणे काही केल्या थांबेना. बहुधा आपण बोलत आहोत हेच ते विसरून गेले असावेत. शेवटी साउंड सिस्टीमवाल्याला त्या कृष्णमूर्तीवाल्यांचा माईक बंद करायला सांगण्यात आले.

शुक्रवार, २८ डिसेंबर, २०१२

प्रश्नज्योतिष आणि प्रचीतीचे गौड्बंगाल


आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट वाचल्यावर तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की ज्योतिषाचे समर्थनकरणारा मी  असा कसा बदललो? वास्तविक तसे काही नसून ज्योतिषाच्या दीर्घ अभ्यासाने त्यातल्या काही हास्यास्पद गोष्टी कळायला लागतात. विशेषत: प्रश्नज्योतिष आणि कृष्णमूर्तीवाल्यांचे जास्त फावते असे लक्षात आले आहे.

...तर सांगत काय होतो? एक मदारी होता. त्याच्याकडे २-४ माकडे होती. मदारी त्या माकडांना घेऊन गावोगाव हिंडत असे. माकडांनी केलेल्या करमणूकीच्या जोरावर त्याची उपजीविका चालायची.

असाच एकदा फिरत फिरत मदारी एका गावात आला आणि एका वर्दळीच्या ठिकाणी पोचल्यावर तिथे आपला खेळ मांडायचा त्याने विचार केला. खेळासाठी योग्य अशी जागा शोधल्यावर त्याने आपले डमरू वाजवायला सुरुवात केली.

डमरूचा आवाज कानावर पडल्यावर आजूबाजूची रिकामटेकडी मुले हळूहळू गोळा झाली. मदार्‍याने आपले डमरूवादन चालू ठेवले...

ह्ळूहळू गर्दी वाढत गेली.

गर्दी पुरेशी वाढली तेव्हा त्याने आपल्या एका माकडाला रिंगणात आणले आणि त्याला कोलांट्या उड्या मारायला लावल्या. या माकडाच्या कसरती झाल्या तेव्हा लोकानी टाळ्या वाजवल्या. मदार्‍याने आपल्या भागाबाईला ताट घेऊन चंदा गोळा करायला पाठवले. लोकांनी स्वखुषीने खिशात हाताला जे नाणे लागले ते भागाबाईच्या ताटात टाकले.

खेळाचा १ला अंक व्यवस्थित पार पडल्यावर मदार्‍याचा हुरूप वाढला.

मग मदार्‍याने डमरूवर दूसरा ताल धरला. गर्दी वाढली. लोक माना उंचावून पुढचा अंक बघायला सरसावले.

मदार्‍याने दूसर्‍या माकडाला रिंगणात आणले. माकडाने तोंडात चमचा-लिंबू धरून फेर्‍या मारल्या. लोकांनी खूष होऊन टाळ्या वाजवल्या. भागाबाईने परत एकदा ताट फिरवले आणि चंदा वसूल केला.

आज मदार्‍याचे नशीब बहूधा जोरावर असावे. गर्दी एव्हढी वाढली की बाजूच्या झाडावर चढून लोक खेळ बघत होते. मदारी मनोमन सुखावला. त्याने खिशातून एक बिडी काढली आणि शिलगावली.    दोन चार झुरके मारले आणि आज गुंडोपतांला खेळात उतरवावे असा त्याने विचार केला. गुंडोपंत हे मदार्‍याच्या लाडक्या माकडाचं नांव. हे माकड भविष्य सांगायचं. पुरेशी गर्दी जमली की मदारी भविष्य सांगायचा खेळ करायचा.

मदार्‍याने डमरूवर नवा ताल वाजवायला जोरात सुरुवात केली आणि जमलेल्या गर्दीत चुळबुळ झाली. मागच्या लोकानी पुढे मुसंडी मारली.

"साहेबान्‌ मेहेरबान् कदरदान्" चा मंत्रोच्चार करून गुंडोपंताला मदार्‍याने इशारा केला. गुंडोपंताने टुणकन उडी मारली, आपली काळी टोपी डोक्यावर चढवली आणि रिंगणात एक फेरी मारली. मदार्‍याने आपली कळकट पोतडी गुंडोपतासमोर टाकली. गुंडोपंताने पोतडीत हात घातला आणि त्याच्या हाताला भागाबाईची लिपस्टीक लागली. त्या लिपस्टिकने गुंडोपंताने स्वत:ला कपाळाला मोठ्ठे गंध लावले. लोकांनी टाळ्या वाजवल्या...

"साहेबान्‌ मेहेरबान् कदरदान्, यह है दुनिया का मशहूर ज्योतिषी गुंडोपंत. आपमेसे किसीको भी, कोइ भी समस्या हो या मन में प्रश्न हो तो यह उसका उत्तर पंचांग देखकर दे सकता है।"

"क्या गुंडोपंत आज भविष्य बतायेगा?" दोरीला झटका मारून मदार्‍याने प्रश्न केला.

गुंडोपंताने खुषीत रिंगणात फेरी मारली आणि आपली संमती दर्शवली.

"क्या गुंडोपंत कितनी फी लेते हो?" मदार्‍याने दोरीला परत झटका मारला तेव्हा गुंडोपताने त्या कळकट फाटक्या पोतडीतून एक पाटी काढली आणि रिंगणात एक चक्कर मारली. त्या पाटीवर लिहीले होते, "फी रू ५०". लोकांनी परत टाळ्या वाजवल्या.

गर्दीतल्या काही लोकांनी खिसे चाचपायला सुरुवात केली. डमरूचा ताल द्रुतगतीने वाजायला सुरुवात झाली.

"साहेबान्‌ मेहेरबान् कदरदान्, यह दुनिया का मशहूर ज्योतिषी गुंडोपंत. आपमेसे किसीको भी, कोइ भी समस्या हो या मन में प्रश्न हो तो यह उसका उत्तर पंचांग देखकर दे सकता है। खाली पचास रुपये।"

गर्दीमधल्या एकाने खिशात हात घातला आणि पन्नास रुपये काढून हवेत फडकावले तशी भागाबाई ताट घेऊन पुढे गेली. ताटात पन्नासची नोट पडलेली बघून मदार्‍याने गुंडोपंताच्या दोरीला परत एक झटका दिला. माकडाने परत पोतडी गाठली आणि त्यातून एक जुने फाटके पंचांग काढले  अणि त्याची पाने उलटसुलट करायला सुरुवात केली. लोकांनी टाळ्या वाजवल्या. डमरुचा आवाज टिपेला पोचला.

"क्या प्रश्न है भाईसाब का?" मदार्‍याने बिडीचा झुरका मारत विचारले.

"मला नोकरी केव्हा मिळेल?"

मदार्‍याने गुंडोपंताच्या मानेला झटका दिला आणि गुंडोपताने फाटके पंचांग परत चाळले आणि तिनदा टाळ्या वाजवून एक कोलांटी उडी मारली.
कोलांटी उडी हा होकारार्थी कौल होता. तिनदा टाळ्या म्हणजे तिन महिन्यानंतर असा मदार्‍याने कौलाचा अर्थ सांगितला.

तीन महिन्यानंतर नोकरी मिळणार या कल्पनेने आशा पल्लवीत झाल्याने प्रश्न विचारणारा हळुच गर्दीतून नाहीसा झाला. डमरू परत जोरात वाजयला लागले आणि गुंडोपंताला प्रश्न विचारायला अनेक ५०च्या नोटा पुढे आल्या. गुंडोपंताने कुणाला होकारार्थी उत्तरे दिली कुणाला कुणाला नकारार्थी. नकारार्थी उत्तरे देताना गुंडोपंत जमिनीवरचा दगड उचलून प्रश्नकर्त्याच्या दिशेने भिरकावत असे.

तेव्ह्ढ्यात गर्दी अचानक दुभंगली. ओवाळणीचं ताट फुलं आणि केळी घेऊन गावचा पाटील आणी पाटलीण बाई पुढे आल्या. मागच्या खेपेला गुंडोपंत गावात आला होता तेव्हा गावच्या पाटलांने मुलीचं लग्न केव्हा जुळणार असा प्रश्न विचारला होता. सहा वेळेला टाळ्यावाजवून पश्चिमेला कोलांट्या उड्या मारून गुंडॊपताने होकारर्थी कौल दिला होता. आणि नेमके तसेच घडले होते. बरोब्बर सहा महिन्यानी पश्चिमेच्या दिशेने आलेल्या एका स्थळाला पाटलाची मुलगी पसंत पडली आणि पाटलाच्या डोक्यावरचे मोट्ठे ओझे दूर झाले.

पाटलांनी सपत्निक गुंडोपताचा सत्कार केल्यावर मदार्‍याचा भाव आणखी वाढला... मग गर्दी वाढली. अनेक हातांनी नोटा पुढे केल्या. भागाबाईने आपल्या ताटात त्या गोळा केल्या.

कोलांट्या उड्या मारून दमल्यावर गुंडोपंताने दगड भिरकावायला सुरुवार केली तशी गर्दी हळुहळु पांगली. मग मदार्‍याने पण आपला खेळ आवरता घेतला आणि पुढच्या गावाकडे मुक्काम हलवला...

---X---

ही गोष्ट मुद्दाम सांगायचे कारण असे ज्योतिषातील सर्वात आचरट आणि करमणूक करणारा प्रकार म्हणजे प्रश्नज्योतिष. ज्योतिषाच्या या शाखेमध्ये लोकांना पडलेल्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर मिळते या समजुतीपायी या शाखेची लोकप्रियता अमाप वाढली आहे. उदाहरण द्यायचे झाले तर प्रेमप्रकरणाचे घेऊ. समजा २-३ तरूण एका मुलीच्या प्रेमात पडले आहेत. प्रेमातील यश अनेकजणांच्या जीवनमरणाचा प्रश्न असतो. साहजिकच त्यातला सर्वात घायकुतीला आलेला एकजण ज्योतिषाकडे जातो आणि प्रश्न विचारतो. प्रश्नज्योतिष बघणारा त्याला कधी प्रश्नाची वेळ बघून तर कधी अंक द्यायला सांगून काहीबाही पत्रिका मांडतो आणि हो किंवा नाही असे उत्तर देतो.   उत्तर बरोबर आले तर प्रश्नज्योतिषाची आपोआप प्रसिद्धी होते... अगदी मदार्‍याची आणि त्याच्या माकडाची झाली तश्शीच. प्रश्नज्योतिषाने उत्तर देताना त्या मुलीची आणि तिच्या प्रेमात पडलेल्या सर्वांच्या पत्रिका एकत्र बघून जर भाकीत वर्तवले तर ते भविष्य वर्तवणे थोडेफार तर्कसुसंगत ठरेल पण इथे मामला वेगळा असतो.  

हाच प्रकार दूसर्‍या एका उदाहरणाने समजावायचा झाला तर असा सांगता येईल - समजा माझ्या मनात एक समस्या आहे आणि माझी अशी श्रद्धा आहे की नाणे उडवले आणि छाप-काटा केले तर या समस्येतून मार्ग काढायची मला दिशा मिळू शकते. पण मला कुणी सांगितले की ते नाणे  अमुक-तमुक मंत्राने पूजा करून मग उडव म्हणजे नक्की ’अचूक’ उत्तर मिळेल तर तो नक्की आचरटपणा असेल. ... आणि प्रश्नज्योतिषातला आचरटपणा नेमका असाच असतो.

सन २०१३ साठी माझ्या ब्लॉगच्या वाचकाना मनापासून शुभेच्छा!

शुक्रवार, १४ डिसेंबर, २०१२

माझी नशीबाची व्याख्या




"नशीब" या संकल्पनेची बर्‍याच सुखजीवीना ऍलर्जी असते. नशीब असं काही असतं हे ते स्वीकारायला ते तयार नसतात.

प्रत्येकजण हा आपापल्या कृतीला जबाबदार असतो, तसेच जीवन हे आपण घेतलेल्या निर्णयानुसार घडत जाते  इत्यादि विचार-मौक्तिक वारंवार यांच्या तोंडून ऐकायला मिळतात. एखाद्याच्या कृतीला आजुबाजुची परिस्थिती, प्रभाव पाडणारे घटक तितकेच जबाबदार असतात, हे यांना मान्य नसते कारण सर्व लोकांची सदद्विवेकबुद्धी बहुधा सर्वकाळ पूर्ण कार्यक्षमतेने काम करत असते असे यात गृहित धरलेले असावे.

नशीब या संकल्पनेची व्याख्या करायची झाली तर कशी करता येइल?  मला असे वाटते की, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील संधींचा विकास आणि/संकोच करणारे सर्व अंतर्बाह्य घटक नशीब म्हणून संबोधता येतील (all the factors internal and/or external that expand or limit opportunities in one's life are collectively called fate.)

शनिवार, १७ नोव्हेंबर, २०१२

सूक्ष्मकथा १ ते ४


सूक्ष्मकथा - १

कालच मला बायकोने विचारले की "तुला स्वत:ची आई आणि आजी सोडून
कोणत्या प्रकारच्या बायका आवडतात?"

मी उत्तरलो, "मला स्वत:च्या प्रगतीबरोबर स्वत:च्या
कुटुंबाची प्रगती साधणार्‍या बायका मला आवडतात."

वेताळ परत झाडवर जाऊन लोंबकळू लागला...

सूक्ष्मकथा - २

माझी कन्या पहिलीत किंवा दूसरीत असताना तिने मला एक शंका विचारली.

"बाबा, सगळे आईबाबा बेबीज् व्हायच्या अगोदर लग्न का करतात?"

मी दचकलो आणि विचारले, "का ग?"

कन्येने खुलासा केला, "बेबीज् व्हायच्या अगोदर लग्न केलं की
मग बेबीजना आईबाबांच्या लग्नाची गंमत एन्जॉय करता येत नाही म्हणून..."

...मग वेताळ परत झाडाला लोंबकळू लागला!

सूक्ष्मकथा - ३

आज झोपेत एक स्वप्न पडलं...

झाडाखाली बसून
ओक्साबोक्शी रडताना कृष्ण दिसला.
मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला
आणि विचारलं,
"अरे काय झालं?"

तो म्हणाला, "मी हरलो.
आण ती गीता. जाळून टाकतो.
सहस्रसूर्यांच्या तेजाशी बरोबरी करणारा मी
एक युद्ध थांबवू शकलो नाही."

पुढे म्हणाला, "त्याने तर असंख्य लढाया थांबवल्या.
आता सांग कोण जिंकलं?"

मला उत्तर देणं भागच होतं.
मग काय?

... मग वेताळ परत झाडावर जाऊन लोंबकळू लागला.

सूक्ष्मकथा - ४

परीक्षेच्या आदल्या रात्री
मेस मधल्या टेबल भोवती
चहाचे घुटके घेत
मित्रांची मैफल रंगली.

विषय निघाला,
कोण कुठे राहतो?

एकजण म्हणाला
"मी दूसर्‍या मजल्यावर"
दूसरा म्हणाला
" मी चवथ्या मजल्यावर"
कुणी म्हणाला
" मी पंधराव्या मजल्यावर"

पंधरापैकी चौदाजण होते,
समुद्रसपाटीपासून
कुठल्या ना कुठल्या मजल्यावर.

चौकशीची सुई
माझ्याकडे वळली
तेव्हा मी शरमलो.
मनातल्या मनात हिरमुसलो

कारण पंधराजणात
मी एकटा होतो
राहात तळमजल्यावर.

तत्क्षणी मानगुटीचा
वेताळ म्हणाला
"अरे तुझा तळमजला कुठे आहे
ठाऊक आहे ना?"

मी म्हटलं,
"अरेच्चा समुद्रसपाटीपासून
५६० मीटर उंचीवर"

वेताळ म्हणाला
"मग कशाला शरमतोस?
हा मी चाललो"

... मग वेताळ परत झाडावर जाऊन लोंबकळू लागला.

गुरुवार, १३ सप्टेंबर, २०१२

दिनांक ३० सप्टेंबर २०१२ ची अभद्र आणि स्फोटक पौर्णिमा


दिनांक ३० सप्टेंबर २०१२  निरयन मीन-कन्या राशीत १३ अंश ४३ मि वर पौर्णिमा होत असून ही पौर्णिमा अत्यंत अभद्र आणि स्फोटक बनली आहे. ही पौर्णिमा स्फोटक बनण्याची करणे पुढील प्रमाणे

० पोर्णिमेच्या चंद्राची हर्षल बरोबर १ अंशात युति
० पोर्णिमेच्या चंद्राचा प्लुटो बरोबर केंद्र योग
० पोर्णिमेच्या अगोदर २५ सप्टेंबर २०१२ रोजी मंगळ-प्लुटो अर्धकेंद्र योग, मंगळ-हर्षल त्र्यर्धकेंद्र योग आणि मंगळ-नेपच्यून केंद्र योग

थोडक्यात २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर हा कालावधी ज्योतिष दृष्ट्या अत्यंत घाणेरडा आहे. मोठे अपघात, घातपात याविषयी बातम्या याकालावधीत जर ऐकू आल्या नाहीत तर ते एक मोठ्ठे आश्चर्य ठरेल.  ज्यांच्या पत्रिकेत निरयन मिथुन-कन्या-धनु-मीन या राशीत १० ते १५ अंश या क्षेत्रात जर एखादा ग्रह किंवा ग्रहयोग होत असेल तर ही पोर्णिमा बरीच त्रासदायक ठरायची शक्यता आहे.

टीप - यावेळेस सायन गणित न करता भारतीय पद्धती प्रमाणे निरयन गणित केले आहे. बरेच मोठे क्षेत्र या ग्रहयोगांच्या प्रभावाखाली येत असल्याने नेहेमीचे जन्मतारखांचे गणित यावेळेस देता येत नाही.

गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१२

पुन: गणपती




गणपती विषयी  मी येथे लिहिलेले आहेच. पण आज आणखी एक नवी माहिती समजली. लेखकाने आपली ओळख मात्र लपवली आहे. http://khattamitha.blogspot.in/2008/01/blog-post_08.html

बुधवार, १५ ऑगस्ट, २०१२

कै. विलासराव आणि शनि-मंगळ युति


विलासराव देशमुखांच्या तब्येतीबद्दल बातम्या यायला लागल्या तेव्हा साहजिकच त्यांची पत्रिका बघायची उत्सुकता निर्माण झाली. नेटवर जन्मटिपण मिळाले पण अशा टिपणांच्या विश्वासार्हतेबद्दल शंका असते, तरी पण जन्मदिवस चुकीचा सहसा असत नाही. जन्मवेळ निश्चितपणे माहित नसल्याने पत्रिकेतील लग्न, ख-मध्य आणि चंद्र यांचा विचार करता येत नाही.

तरीपण पण मी केवळ जन्मतारखेच्या आधारे विलासरावांची पत्रिका मांडली असता रवीचे खालील योग पत्रिकेत दिसतात -

रवि-मंगळ अर्धकेंद्र योग
रवि-प्लुटो लाभ योग
रवि-नेपच्यून नवपंचम योग

यापैकी दूसरा ग्रहयोग जीवनात हरतर्‍हेने यशस्वी करतो. माझ्या अशोक चव्हाणांवरील ब्लॉग नोंदीत मी रवि-प्लुटो योगाबद्दल लिहिले आहे. रवि-मंगळ योगात अमाप उर्जा असते जी राजकारणात उपयोगी येते. या योगावर उद्योजक, खेळाडु विशेष यशस्वी होताना दिसतात. रवि-नेपच्यून नवपंचम योगात करिष्मा, ग्लॅमर  प्राप्त होतात. हर्षल-नेपच्यून-प्लुटो या ग्रंथात प्रसिद्ध ज्योतिषी म दा भट यांनी म्हटले आहे की, " लोककल्याणासाठी वा लोकहितासाठी कष्ट करणार्‍या व्यक्तींच्या पत्रिकेत हा योग बर्‍याच वेळा पहावयास मिळतो". विलासरावानी लातूरसाठी केलेले काम हा याच योगाचा आविष्कार आहे. असो.

ज्योतिषातील काही मूलभूत नियमांचा हा पडताळा बघितल्या नंतर विलासरावांचे आजारपण पत्रिकेत दिसते का याची उत्सुकता मला होती म्हणून ग्रहांची गोचर भमणे बघितली असता जन्मरवीशी गोचर नेपच्यूनचा केंद्र योग चालू असून १ ऑगस्टला तो एक्झॅक्ट म्हणजे अंशात्मक होत असताना  २ ऑगस्टला ही बातमी वाचायला मिळाली. (http://www.esakal.com/esakal/20120802/5496336880228873387.htm). जिज्ञासूंनी नेपच्यूनच्या जन्मरवीशी होणार्‍या योगांसाठी  श्री अमिताभ बच्चन यांच्यावरील नोंद वाचावी. नेपच्यून हा कमकुवतपणा आणि संसर्ग, विषबाधा इत्यादींचा कारक ग्रह आहे.

आजची शनि-मंगळ युति विलासरावाच्या पत्रिकेत जन्ममंगळाशी सात अंशात प्रतियुति करते. शनि-मंगळ युतीने यकृत प्रत्यारोपणाच्या प्रयत्नात अडथळे निर्माण झाले, आणि मी खाली दिलेल्या नोंदीत म्हटल्याप्रमाणे ही  युती विलासरावांसाठी जीवघेणी ठरली.

ईश्वर विलासरावंच्या आत्म्यास शांती देवो!