सोमवार, ३१ डिसेंबर, २०१२

आधीच मर्कट तशात मद्य प्याला ...


प्रश्नज्योतिषावरील माझी या अगोदरची नोंद प्रसिद्ध झाल्यावर बराच थयथय़ाट चालू झाल्याचे कानावर आले. तो अपेक्षितच होता. त्यावरून शाळेत पाठ केलेला "आधीच मर्कट तशात मद्य प्याला ... हा श्लोक आठवला. जे लोक ह्सबे वगैरेंच्या नावाने आचमन करतात त्यांच्यासाठी खालील संदर्भ देणे आवश्यक वाटते.

"नंदीबैलवाले जेव्हा नंदीस घेऊन एखाद्या चौकांत जाहीर कार्यक्रम करीत असतात त्यावेळी त्यांना कोणीही काहीही विचारतात. नंदीवाल्यांना नंदीच्या मार्फत सर्वांचीच उत्तरे द्यावी लागतात. तरच तो दूसर्‍या चौकात कार्यक्रम करू शकतो. थोडीफार अशीच अवस्था कृष्णमूर्तीवाल्याची झाली आहे."

- ज्योतींद्र हसबे, कृष्णमूर्ती प्रश्नसिद्धांत भाग २ पृ १३०, सुमेरू प्रकाशन, १९९२.

हसब्यांची वरील विधाने बरेच काही सांगून जातात. हसब्यांच्या प्रांजल कबुलीला मला मनापासून दाद द्यावीशी वाटते. मला स्वत:ला कृष्णमूर्तीपद्धतीचा कायमच चुकीचा पडताळा आला आहे. मात्र कृष्णमूर्तीवाल्यांच्या अभिनिवेशाचे भरपूर अनुभव आहेत (जालावरचे कृष्णमूर्तीवाले त्या थोर (अभिनिवेश) परंपरेचे पाईक आहेत, यावर दूमत असण्याचे कारण नाही).

मागे एकदा पुण्यात उद्यान प्रसाद कार्यालयात ज्योतिषांचा एक परिसंवाद भरला होता. विषय आता लक्षात नाही. पण कुणीतरी प्रश्नोत्तरांमध्ये  कृष्णमूर्तीपद्धतीच्या अचूकतेसंबंधी प्रश्न विचारला. आयोजकानी प्रथम व. दा. भटांनी प्रश्नाचे उत्तर द्यावे असे सुचवले. व. दा. भटांनी कृष्ण्मूर्तीवाल्यांचे अचूकतेचे दावे अतिरंजित असतात असे म्हटल्यावर त्यांच्या शेजारी बसलेले एक कृष्णमूर्तीभक्त चवताळले. भटांच्या हातातला माईक खेचून घेतला आणि तावातावाने बोलायला लागले. त्यांचे बोलणे काही केल्या थांबेना. बहुधा आपण बोलत आहोत हेच ते विसरून गेले असावेत. शेवटी साउंड सिस्टीमवाल्याला त्या कृष्णमूर्तीवाल्यांचा माईक बंद करायला सांगण्यात आले.

शुक्रवार, २८ डिसेंबर, २०१२

प्रश्नज्योतिष आणि प्रचीतीचे गौड्बंगाल


आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट वाचल्यावर तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की ज्योतिषाचे समर्थनकरणारा मी  असा कसा बदललो? वास्तविक तसे काही नसून ज्योतिषाच्या दीर्घ अभ्यासाने त्यातल्या काही हास्यास्पद गोष्टी कळायला लागतात. विशेषत: प्रश्नज्योतिष आणि कृष्णमूर्तीवाल्यांचे जास्त फावते असे लक्षात आले आहे.

...तर सांगत काय होतो? एक मदारी होता. त्याच्याकडे २-४ माकडे होती. मदारी त्या माकडांना घेऊन गावोगाव हिंडत असे. माकडांनी केलेल्या करमणूकीच्या जोरावर त्याची उपजीविका चालायची.

असाच एकदा फिरत फिरत मदारी एका गावात आला आणि एका वर्दळीच्या ठिकाणी पोचल्यावर तिथे आपला खेळ मांडायचा त्याने विचार केला. खेळासाठी योग्य अशी जागा शोधल्यावर त्याने आपले डमरू वाजवायला सुरुवात केली.

डमरूचा आवाज कानावर पडल्यावर आजूबाजूची रिकामटेकडी मुले हळूहळू गोळा झाली. मदार्‍याने आपले डमरूवादन चालू ठेवले...

ह्ळूहळू गर्दी वाढत गेली.

गर्दी पुरेशी वाढली तेव्हा त्याने आपल्या एका माकडाला रिंगणात आणले आणि त्याला कोलांट्या उड्या मारायला लावल्या. या माकडाच्या कसरती झाल्या तेव्हा लोकानी टाळ्या वाजवल्या. मदार्‍याने आपल्या भागाबाईला ताट घेऊन चंदा गोळा करायला पाठवले. लोकांनी स्वखुषीने खिशात हाताला जे नाणे लागले ते भागाबाईच्या ताटात टाकले.

खेळाचा १ला अंक व्यवस्थित पार पडल्यावर मदार्‍याचा हुरूप वाढला.

मग मदार्‍याने डमरूवर दूसरा ताल धरला. गर्दी वाढली. लोक माना उंचावून पुढचा अंक बघायला सरसावले.

मदार्‍याने दूसर्‍या माकडाला रिंगणात आणले. माकडाने तोंडात चमचा-लिंबू धरून फेर्‍या मारल्या. लोकांनी खूष होऊन टाळ्या वाजवल्या. भागाबाईने परत एकदा ताट फिरवले आणि चंदा वसूल केला.

आज मदार्‍याचे नशीब बहूधा जोरावर असावे. गर्दी एव्हढी वाढली की बाजूच्या झाडावर चढून लोक खेळ बघत होते. मदारी मनोमन सुखावला. त्याने खिशातून एक बिडी काढली आणि शिलगावली.    दोन चार झुरके मारले आणि आज गुंडोपतांला खेळात उतरवावे असा त्याने विचार केला. गुंडोपंत हे मदार्‍याच्या लाडक्या माकडाचं नांव. हे माकड भविष्य सांगायचं. पुरेशी गर्दी जमली की मदारी भविष्य सांगायचा खेळ करायचा.

मदार्‍याने डमरूवर नवा ताल वाजवायला जोरात सुरुवात केली आणि जमलेल्या गर्दीत चुळबुळ झाली. मागच्या लोकानी पुढे मुसंडी मारली.

"साहेबान्‌ मेहेरबान् कदरदान्" चा मंत्रोच्चार करून गुंडोपंताला मदार्‍याने इशारा केला. गुंडोपंताने टुणकन उडी मारली, आपली काळी टोपी डोक्यावर चढवली आणि रिंगणात एक फेरी मारली. मदार्‍याने आपली कळकट पोतडी गुंडोपतासमोर टाकली. गुंडोपंताने पोतडीत हात घातला आणि त्याच्या हाताला भागाबाईची लिपस्टीक लागली. त्या लिपस्टिकने गुंडोपंताने स्वत:ला कपाळाला मोठ्ठे गंध लावले. लोकांनी टाळ्या वाजवल्या...

"साहेबान्‌ मेहेरबान् कदरदान्, यह है दुनिया का मशहूर ज्योतिषी गुंडोपंत. आपमेसे किसीको भी, कोइ भी समस्या हो या मन में प्रश्न हो तो यह उसका उत्तर पंचांग देखकर दे सकता है।"

"क्या गुंडोपंत आज भविष्य बतायेगा?" दोरीला झटका मारून मदार्‍याने प्रश्न केला.

गुंडोपंताने खुषीत रिंगणात फेरी मारली आणि आपली संमती दर्शवली.

"क्या गुंडोपंत कितनी फी लेते हो?" मदार्‍याने दोरीला परत झटका मारला तेव्हा गुंडोपताने त्या कळकट फाटक्या पोतडीतून एक पाटी काढली आणि रिंगणात एक चक्कर मारली. त्या पाटीवर लिहीले होते, "फी रू ५०". लोकांनी परत टाळ्या वाजवल्या.

गर्दीतल्या काही लोकांनी खिसे चाचपायला सुरुवात केली. डमरूचा ताल द्रुतगतीने वाजायला सुरुवात झाली.

"साहेबान्‌ मेहेरबान् कदरदान्, यह दुनिया का मशहूर ज्योतिषी गुंडोपंत. आपमेसे किसीको भी, कोइ भी समस्या हो या मन में प्रश्न हो तो यह उसका उत्तर पंचांग देखकर दे सकता है। खाली पचास रुपये।"

गर्दीमधल्या एकाने खिशात हात घातला आणि पन्नास रुपये काढून हवेत फडकावले तशी भागाबाई ताट घेऊन पुढे गेली. ताटात पन्नासची नोट पडलेली बघून मदार्‍याने गुंडोपंताच्या दोरीला परत एक झटका दिला. माकडाने परत पोतडी गाठली आणि त्यातून एक जुने फाटके पंचांग काढले  अणि त्याची पाने उलटसुलट करायला सुरुवात केली. लोकांनी टाळ्या वाजवल्या. डमरुचा आवाज टिपेला पोचला.

"क्या प्रश्न है भाईसाब का?" मदार्‍याने बिडीचा झुरका मारत विचारले.

"मला नोकरी केव्हा मिळेल?"

मदार्‍याने गुंडोपंताच्या मानेला झटका दिला आणि गुंडोपताने फाटके पंचांग परत चाळले आणि तिनदा टाळ्या वाजवून एक कोलांटी उडी मारली.
कोलांटी उडी हा होकारार्थी कौल होता. तिनदा टाळ्या म्हणजे तिन महिन्यानंतर असा मदार्‍याने कौलाचा अर्थ सांगितला.

तीन महिन्यानंतर नोकरी मिळणार या कल्पनेने आशा पल्लवीत झाल्याने प्रश्न विचारणारा हळुच गर्दीतून नाहीसा झाला. डमरू परत जोरात वाजयला लागले आणि गुंडोपंताला प्रश्न विचारायला अनेक ५०च्या नोटा पुढे आल्या. गुंडोपंताने कुणाला होकारार्थी उत्तरे दिली कुणाला कुणाला नकारार्थी. नकारार्थी उत्तरे देताना गुंडोपंत जमिनीवरचा दगड उचलून प्रश्नकर्त्याच्या दिशेने भिरकावत असे.

तेव्ह्ढ्यात गर्दी अचानक दुभंगली. ओवाळणीचं ताट फुलं आणि केळी घेऊन गावचा पाटील आणी पाटलीण बाई पुढे आल्या. मागच्या खेपेला गुंडोपंत गावात आला होता तेव्हा गावच्या पाटलांने मुलीचं लग्न केव्हा जुळणार असा प्रश्न विचारला होता. सहा वेळेला टाळ्यावाजवून पश्चिमेला कोलांट्या उड्या मारून गुंडॊपताने होकारर्थी कौल दिला होता. आणि नेमके तसेच घडले होते. बरोब्बर सहा महिन्यानी पश्चिमेच्या दिशेने आलेल्या एका स्थळाला पाटलाची मुलगी पसंत पडली आणि पाटलाच्या डोक्यावरचे मोट्ठे ओझे दूर झाले.

पाटलांनी सपत्निक गुंडोपताचा सत्कार केल्यावर मदार्‍याचा भाव आणखी वाढला... मग गर्दी वाढली. अनेक हातांनी नोटा पुढे केल्या. भागाबाईने आपल्या ताटात त्या गोळा केल्या.

कोलांट्या उड्या मारून दमल्यावर गुंडोपंताने दगड भिरकावायला सुरुवार केली तशी गर्दी हळुहळु पांगली. मग मदार्‍याने पण आपला खेळ आवरता घेतला आणि पुढच्या गावाकडे मुक्काम हलवला...

---X---

ही गोष्ट मुद्दाम सांगायचे कारण असे ज्योतिषातील सर्वात आचरट आणि करमणूक करणारा प्रकार म्हणजे प्रश्नज्योतिष. ज्योतिषाच्या या शाखेमध्ये लोकांना पडलेल्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर मिळते या समजुतीपायी या शाखेची लोकप्रियता अमाप वाढली आहे. उदाहरण द्यायचे झाले तर प्रेमप्रकरणाचे घेऊ. समजा २-३ तरूण एका मुलीच्या प्रेमात पडले आहेत. प्रेमातील यश अनेकजणांच्या जीवनमरणाचा प्रश्न असतो. साहजिकच त्यातला सर्वात घायकुतीला आलेला एकजण ज्योतिषाकडे जातो आणि प्रश्न विचारतो. प्रश्नज्योतिष बघणारा त्याला कधी प्रश्नाची वेळ बघून तर कधी अंक द्यायला सांगून काहीबाही पत्रिका मांडतो आणि हो किंवा नाही असे उत्तर देतो.   उत्तर बरोबर आले तर प्रश्नज्योतिषाची आपोआप प्रसिद्धी होते... अगदी मदार्‍याची आणि त्याच्या माकडाची झाली तश्शीच. प्रश्नज्योतिषाने उत्तर देताना त्या मुलीची आणि तिच्या प्रेमात पडलेल्या सर्वांच्या पत्रिका एकत्र बघून जर भाकीत वर्तवले तर ते भविष्य वर्तवणे थोडेफार तर्कसुसंगत ठरेल पण इथे मामला वेगळा असतो.  

हाच प्रकार दूसर्‍या एका उदाहरणाने समजावायचा झाला तर असा सांगता येईल - समजा माझ्या मनात एक समस्या आहे आणि माझी अशी श्रद्धा आहे की नाणे उडवले आणि छाप-काटा केले तर या समस्येतून मार्ग काढायची मला दिशा मिळू शकते. पण मला कुणी सांगितले की ते नाणे  अमुक-तमुक मंत्राने पूजा करून मग उडव म्हणजे नक्की ’अचूक’ उत्तर मिळेल तर तो नक्की आचरटपणा असेल. ... आणि प्रश्नज्योतिषातला आचरटपणा नेमका असाच असतो.

सन २०१३ साठी माझ्या ब्लॉगच्या वाचकाना मनापासून शुभेच्छा!

शुक्रवार, १४ डिसेंबर, २०१२

माझी नशीबाची व्याख्या




"नशीब" या संकल्पनेची बर्‍याच सुखजीवीना ऍलर्जी असते. नशीब असं काही असतं हे ते स्वीकारायला ते तयार नसतात.

प्रत्येकजण हा आपापल्या कृतीला जबाबदार असतो, तसेच जीवन हे आपण घेतलेल्या निर्णयानुसार घडत जाते  इत्यादि विचार-मौक्तिक वारंवार यांच्या तोंडून ऐकायला मिळतात. एखाद्याच्या कृतीला आजुबाजुची परिस्थिती, प्रभाव पाडणारे घटक तितकेच जबाबदार असतात, हे यांना मान्य नसते कारण सर्व लोकांची सदद्विवेकबुद्धी बहुधा सर्वकाळ पूर्ण कार्यक्षमतेने काम करत असते असे यात गृहित धरलेले असावे.

नशीब या संकल्पनेची व्याख्या करायची झाली तर कशी करता येइल?  मला असे वाटते की, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील संधींचा विकास आणि/संकोच करणारे सर्व अंतर्बाह्य घटक नशीब म्हणून संबोधता येतील (all the factors internal and/or external that expand or limit opportunities in one's life are collectively called fate.)

शनिवार, १७ नोव्हेंबर, २०१२

सूक्ष्मकथा १ ते ४


सूक्ष्मकथा - १

कालच मला बायकोने विचारले की "तुला स्वत:ची आई आणि आजी सोडून
कोणत्या प्रकारच्या बायका आवडतात?"

मी उत्तरलो, "मला स्वत:च्या प्रगतीबरोबर स्वत:च्या
कुटुंबाची प्रगती साधणार्‍या बायका मला आवडतात."

वेताळ परत झाडवर जाऊन लोंबकळू लागला...

सूक्ष्मकथा - २

माझी कन्या पहिलीत किंवा दूसरीत असताना तिने मला एक शंका विचारली.

"बाबा, सगळे आईबाबा बेबीज् व्हायच्या अगोदर लग्न का करतात?"

मी दचकलो आणि विचारले, "का ग?"

कन्येने खुलासा केला, "बेबीज् व्हायच्या अगोदर लग्न केलं की
मग बेबीजना आईबाबांच्या लग्नाची गंमत एन्जॉय करता येत नाही म्हणून..."

...मग वेताळ परत झाडाला लोंबकळू लागला!

सूक्ष्मकथा - ३

आज झोपेत एक स्वप्न पडलं...

झाडाखाली बसून
ओक्साबोक्शी रडताना कृष्ण दिसला.
मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला
आणि विचारलं,
"अरे काय झालं?"

तो म्हणाला, "मी हरलो.
आण ती गीता. जाळून टाकतो.
सहस्रसूर्यांच्या तेजाशी बरोबरी करणारा मी
एक युद्ध थांबवू शकलो नाही."

पुढे म्हणाला, "त्याने तर असंख्य लढाया थांबवल्या.
आता सांग कोण जिंकलं?"

मला उत्तर देणं भागच होतं.
मग काय?

... मग वेताळ परत झाडावर जाऊन लोंबकळू लागला.

सूक्ष्मकथा - ४

परीक्षेच्या आदल्या रात्री
मेस मधल्या टेबल भोवती
चहाचे घुटके घेत
मित्रांची मैफल रंगली.

विषय निघाला,
कोण कुठे राहतो?

एकजण म्हणाला
"मी दूसर्‍या मजल्यावर"
दूसरा म्हणाला
" मी चवथ्या मजल्यावर"
कुणी म्हणाला
" मी पंधराव्या मजल्यावर"

पंधरापैकी चौदाजण होते,
समुद्रसपाटीपासून
कुठल्या ना कुठल्या मजल्यावर.

चौकशीची सुई
माझ्याकडे वळली
तेव्हा मी शरमलो.
मनातल्या मनात हिरमुसलो

कारण पंधराजणात
मी एकटा होतो
राहात तळमजल्यावर.

तत्क्षणी मानगुटीचा
वेताळ म्हणाला
"अरे तुझा तळमजला कुठे आहे
ठाऊक आहे ना?"

मी म्हटलं,
"अरेच्चा समुद्रसपाटीपासून
५६० मीटर उंचीवर"

वेताळ म्हणाला
"मग कशाला शरमतोस?
हा मी चाललो"

... मग वेताळ परत झाडावर जाऊन लोंबकळू लागला.

गुरुवार, १३ सप्टेंबर, २०१२

दिनांक ३० सप्टेंबर २०१२ ची अभद्र आणि स्फोटक पौर्णिमा


दिनांक ३० सप्टेंबर २०१२  निरयन मीन-कन्या राशीत १३ अंश ४३ मि वर पौर्णिमा होत असून ही पौर्णिमा अत्यंत अभद्र आणि स्फोटक बनली आहे. ही पौर्णिमा स्फोटक बनण्याची करणे पुढील प्रमाणे

० पोर्णिमेच्या चंद्राची हर्षल बरोबर १ अंशात युति
० पोर्णिमेच्या चंद्राचा प्लुटो बरोबर केंद्र योग
० पोर्णिमेच्या अगोदर २५ सप्टेंबर २०१२ रोजी मंगळ-प्लुटो अर्धकेंद्र योग, मंगळ-हर्षल त्र्यर्धकेंद्र योग आणि मंगळ-नेपच्यून केंद्र योग

थोडक्यात २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर हा कालावधी ज्योतिष दृष्ट्या अत्यंत घाणेरडा आहे. मोठे अपघात, घातपात याविषयी बातम्या याकालावधीत जर ऐकू आल्या नाहीत तर ते एक मोठ्ठे आश्चर्य ठरेल.  ज्यांच्या पत्रिकेत निरयन मिथुन-कन्या-धनु-मीन या राशीत १० ते १५ अंश या क्षेत्रात जर एखादा ग्रह किंवा ग्रहयोग होत असेल तर ही पोर्णिमा बरीच त्रासदायक ठरायची शक्यता आहे.

टीप - यावेळेस सायन गणित न करता भारतीय पद्धती प्रमाणे निरयन गणित केले आहे. बरेच मोठे क्षेत्र या ग्रहयोगांच्या प्रभावाखाली येत असल्याने नेहेमीचे जन्मतारखांचे गणित यावेळेस देता येत नाही.

गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१२

पुन: गणपती




गणपती विषयी  मी येथे लिहिलेले आहेच. पण आज आणखी एक नवी माहिती समजली. लेखकाने आपली ओळख मात्र लपवली आहे. http://khattamitha.blogspot.in/2008/01/blog-post_08.html

बुधवार, १५ ऑगस्ट, २०१२

कै. विलासराव आणि शनि-मंगळ युति


विलासराव देशमुखांच्या तब्येतीबद्दल बातम्या यायला लागल्या तेव्हा साहजिकच त्यांची पत्रिका बघायची उत्सुकता निर्माण झाली. नेटवर जन्मटिपण मिळाले पण अशा टिपणांच्या विश्वासार्हतेबद्दल शंका असते, तरी पण जन्मदिवस चुकीचा सहसा असत नाही. जन्मवेळ निश्चितपणे माहित नसल्याने पत्रिकेतील लग्न, ख-मध्य आणि चंद्र यांचा विचार करता येत नाही.

तरीपण पण मी केवळ जन्मतारखेच्या आधारे विलासरावांची पत्रिका मांडली असता रवीचे खालील योग पत्रिकेत दिसतात -

रवि-मंगळ अर्धकेंद्र योग
रवि-प्लुटो लाभ योग
रवि-नेपच्यून नवपंचम योग

यापैकी दूसरा ग्रहयोग जीवनात हरतर्‍हेने यशस्वी करतो. माझ्या अशोक चव्हाणांवरील ब्लॉग नोंदीत मी रवि-प्लुटो योगाबद्दल लिहिले आहे. रवि-मंगळ योगात अमाप उर्जा असते जी राजकारणात उपयोगी येते. या योगावर उद्योजक, खेळाडु विशेष यशस्वी होताना दिसतात. रवि-नेपच्यून नवपंचम योगात करिष्मा, ग्लॅमर  प्राप्त होतात. हर्षल-नेपच्यून-प्लुटो या ग्रंथात प्रसिद्ध ज्योतिषी म दा भट यांनी म्हटले आहे की, " लोककल्याणासाठी वा लोकहितासाठी कष्ट करणार्‍या व्यक्तींच्या पत्रिकेत हा योग बर्‍याच वेळा पहावयास मिळतो". विलासरावानी लातूरसाठी केलेले काम हा याच योगाचा आविष्कार आहे. असो.

ज्योतिषातील काही मूलभूत नियमांचा हा पडताळा बघितल्या नंतर विलासरावांचे आजारपण पत्रिकेत दिसते का याची उत्सुकता मला होती म्हणून ग्रहांची गोचर भमणे बघितली असता जन्मरवीशी गोचर नेपच्यूनचा केंद्र योग चालू असून १ ऑगस्टला तो एक्झॅक्ट म्हणजे अंशात्मक होत असताना  २ ऑगस्टला ही बातमी वाचायला मिळाली. (http://www.esakal.com/esakal/20120802/5496336880228873387.htm). जिज्ञासूंनी नेपच्यूनच्या जन्मरवीशी होणार्‍या योगांसाठी  श्री अमिताभ बच्चन यांच्यावरील नोंद वाचावी. नेपच्यून हा कमकुवतपणा आणि संसर्ग, विषबाधा इत्यादींचा कारक ग्रह आहे.

आजची शनि-मंगळ युति विलासरावाच्या पत्रिकेत जन्ममंगळाशी सात अंशात प्रतियुति करते. शनि-मंगळ युतीने यकृत प्रत्यारोपणाच्या प्रयत्नात अडथळे निर्माण झाले, आणि मी खाली दिलेल्या नोंदीत म्हटल्याप्रमाणे ही  युती विलासरावांसाठी जीवघेणी ठरली.

ईश्वर विलासरावंच्या आत्म्यास शांती देवो!

शुक्रवार, २७ जुलै, २०१२

"आयमाय"





कालचाच प्रसंग.

माझ्यातल्या माकडाने उत्क्रांतीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले.

सकाळी ११ च्या सुमारास बॅंकेत जाण्याच्या उद्देशाने मी घराबाहेर पडलो तेव्हा आमच्या घराच्या गेट समोर एका मंद्बुद्धी चालकाने भली मोठी बोलेरो वाट अडवून उभी केली होती. गाडीने पूर्ण रस्ता अडवला होता. ड्रायव्हर आसपास कुठेही दिसत नव्हता. मला माझी गाडी बाहेर काढायची असती तर कपाळाला हात मारून घेण्याशिवाय दूसरा कोणताही पर्याय नव्हता.

डोक्यात संतापाची तिडीक गेली. मी गाडीचे चाक पंक्चर करायचे ठरवले. प्रथम घरात जाऊन कॅमेरा आणला आणि गाडीचा एक फोटो काढला. पुरावा म्हणून. नंतर पंक्चर करायला हत्याराची शोधाशोध केली तेव्हा एक हॅण्ड्ड्रील हाताला लागले.

ते घेऊन मी चाकाला भोक पाडायला योग्य जागा शोधायला लागलो आणि नेमका ड्रायव्हर टपकला. मी चाकाला ड्रील लावले न लावले तोच तो भानावर य़ेऊन मला म्हणाला,

"काय करताय राव हे साहेब?"

"गाढवा, तू काय केलं आहेस ते तुला कळतय का?"

"गाढव, कुणाला म्हणता साहेब?"

यावर मी मात्र मी खवळलो. त्याच्या तोंडासमोर ड्रील  रोखून धरले अन म्हणालो,

"एक अक्षर बोललास तर याच ड्रीलने  तुझे डोळे फोडीन"

माझा त्वेष बघून त्या ड्रायव्हरने आपला मूर्खपणा आवरता घ्यायचे ठरवले असावे. एक अक्षर अधिक न बोलता त्याने गाडी तिथून काढायची कार्यवाही सुरू केली.

त्याने माघार घेतलेली पाहून मी पण तत्क्षणी सुखावलो. आणि आजपर्यंत ४८ वर्षांच्या आयुष्यात जे करायला धजलो नाही ते केले.

शुद्ध मराठीत त्याची "आयमाय" उद्धरली.  ड्रायव्हरने काही प्रतिक्रिया दिली नाही.

माझ्या तोंडातून जे शब्द निघाले त्यांची जाणीव झाल्यावर मीच थरथरायला लागलो होतो.

एव्ह्ढे होई पर्यंत स्वत:ला सावरायचा प्रयत्न सुरु केला आणि बॅंकेच्या दिशेने जायला निघालो. जाताना माझ्यातला बुद्ध जागा झाला आणि मानवी वाणीने माझ्याशी बोलू लागला,

"अरे तू त्याच्या गाडीचा नंबर बघितलास ना? तो रात्रभर प्रवास करुन दमून भागून आला असेल. आणि त्याला संडास-बाथरूमची घाई झाली असेल आणि त्यामुळे पटकन जागा दिसली म्हणून त्याने त्याने गेट समोर लावली असेल. काय चूकलं त्याचं, सांग बरं! या प्रश्नाचं उत्तर ठाऊक असून दिले नाहीस तर तुला कधिच निर्वाण प्राप्त होणार नाही..."

मी या निर्वाणीच्या भाषेने दचकलो...

आता मला गप्प बसणे शक्यच नव्हते. मी म्हटले,

"अरे, आत्ता माझ्या घरात आणीबाणीचा प्रसंग असता आणि रूग्ण्वाहिका बोलवावी लागली असती तर त्या ड्रायव्हरचे मलमूत्र उरकेपर्यंत वाट बघत बसायचे का?"

या माझ्या उत्तराने बुद्ध ओशाळला आणि डोळे मिटून त्याने परत मौन धारण केले...

मंगळवार, १७ जुलै, २०१२

दिनांक २ ऑगस्ट २०१२ रोजीची अत्यंत शुभ पौर्णिमा




दिनांक २ ऑगस्ट २०१२ रोजी सायन कुंभ राशीमध्ये १० अंशावर पौर्णिमा होता असून ती गोचर गुरुशी आणि हर्षलशी अत्यंत शुभ योग करते. त्यामुळे ही पौर्णिमा अनेकांना वेगवेगळ्या पातळ्यावर (म्हणजे मूळ पत्रिकेतील ग्रहयोगानुसार) शुभ/लाभदायी ठरण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे मार्गी लागणे, अचानक मार्ग अथवा दिशा सापडणे, नव्या संधी निर्माण होणे, अविवाहित असल्यास प्रतिपक्षाकडून होकार मिळणे अशा अनेक प्रकारची फळे या पौर्णिमेच्या प्रभावाखाली येणार्‍या व्यक्तीना मिळतील.

वक्री बुधाच्या आणि हर्षल-प्लुटो केंद्र्योगाच्या छायेत होणारी ही पौर्णिमा अनेकाना नवा हूरूप आणेल, हे नक्की.

सायन राशीचक्रातील मेष, मिथुन, सिंह, तूळ, धनु, कुंभ  या राशींमध्ये ६-१२ अंश हे क्षेत्र (म्हणजेच निरयन राशीचक्रातील वृषभ, कर्क, कन्या, वृश्चिक, मकर आणि मीन या  राशींमधील  १२ ते १८ अंश हे क्षेत्र) या पौर्णिमेने प्रभावित केलेले असून, या क्षेत्रांत रवी, चंद्र, लग्न, ख-मध्य असलेल्या व्यक्ती, तसेच याक्षेत्रात लाभ-नवपंचमादि योग होणार्‍या व्यक्ती या पौर्णिमेच्या शुभ प्रभावाखाली येतात.

बराच मोठा जनसमुदाय या शुभ पौर्णिमेच्या प्रभावाखाली येत असल्याने मी जन्मतारखांचे गणित यावेळेस देऊ शकत नाही.

सोमवार, १६ जुलै, २०१२

मुहूर्त - भाग २


राजेश वैद्य माझा आयआयटीमधला मित्र. मी त्याला बराच सीनिअर पण आम्ही हॉस्टेल तीनच्या एकाच विंगमध्ये राहात होतो. गेली अनेक वर्षे तो अमेरीकेत आहे. नुकतेच आम्ही फेसबुकमुळे एकमेकांच्या संपर्कात आलो. त्याने अमेरीकेत नुकतेच घर खरेदी केले आहे. त्याला गृहप्रवेशाच्या पूजेसाठी मुहूर्त काढून हवा होता. अमेरीकेत जी मंडळी भिक्षुकी करतात ती सहसा त्यांना सोयीचे दिवस मुहूर्त म्हणुन ठोकून देतात. हा प्रकार आपल्याकडे पण चालतो. एखाद्या भिक्षुकाला अमुक एक मुहूर्त चांगला का ते विचारा. तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळाले तर मी पैज हरायला तयार आहे. कारण यजमानाने कोणताही प्रश्न विचारणे पुरोहित वर्गाला सोयीचे नसते.

आपण परंपरेने शुभ मानलेले दसरा, गुढी पाडवा इत्यादि दिवस नेहमीच शुभ असतात असे नाही, असे मला माझे एक आजोबा  (कै) वेदमूर्ती रामचंद्रभट्ट हर्डीकर यांच्याकडून  प्रथम  समजले. मी तेव्हा खूप लहान म्हणजे फक्त आठवीत असल्याने असे कसे हा प्रश्न आमच्या रामूमामांना विचारायचे धाडस झाले नाही. शिवाय त्यावेळेस ज्योतिषाची आवड पण निर्माण झाली नव्हती. पण पुढे ज्योतिषाच्या  अभ्यासात प्रगती झाल्यानंतर रामूमामांच्या म्हणण्यामागची कारणे समजली. मी यापूर्वी माझ्या ब्लॉगवर अशाच एका अशुभ गुढीपाडव्याबद्दल लिहीले आहे.

राजेश वैद्यच्या गृहप्रवेशासाठी मुहूर्त काढायची माझी तयारी होती. पण मी त्याला माझे मुहूर्त भिक्षुकांना तसेच जुन्या मताच्या मंडळीना पटत नसल्याची कल्पना दिली. यजमानाने काढलेला मुहूर्त स्वीकारायची भटजी/पुरोहित मंडळींची तयारी नसते. मागे एकदा माझे गुरुजी विख्यात धृपद गायक पंडित उदय भवाळकर यांना मी गृहप्रवेशासाठी मुहूर्त काढून दिला होता. योगायोगाने ती अमावस्या निघाली. पण ती अमावस्या जोरदार शुभ होती. विशेषत: आमच्या गुरुजींच्या पत्रिकेत अत्यंत शुभ फलदायी होती. पण सामान्य भटजी लोकांना एव्हढे सूक्ष्म ज्योतिष कुठुन कळणार. त्यांनी केवळ अमावस्या म्हणून त्या दिवशी पोरोहित्य करायचे नाकारले.

मुहूर्ताचा विषय निघाला आहे म्हणून मला आणखीन एक गंमत आठवली. काल रविवार होता. माझ्या घराजवळच्या दोन मंगलकार्यांमध्ये लग्नाची धामधूम होती. दोन्ही कार्यालये ऑक्युपाईड म्हणजे लग्नाचा मुहूर्त - ज्यांची लग्ने कालच्या मुहूर्तावर लागली त्यांच्या पत्रिकेत सध्या चालू असलेली मंगळ-हर्षल प्रतियुति नवदांपत्याला कशी आहे याचा विचार मुहूर्त काढताना केला गेला असेल का याबद्द्ल मी साशंकच आहे. मंगळ-हर्षल प्रतियुतीचे राहू दे. ऐन शनि-मंगळ युति शून्य अंशात असताना लोकांनी लग्ने लावली आहेत. माझ्या त्यांना शुभेच्छा!


राजेश वैद्यने मला मुहूर्तासाठी पुरेसा कालावधी दिला होता. त्याला येत्या ऑगस्टमध्ये पहिल्या पंधरवडयातला मुहूर्त हवा होता. दोन आठवड्यांचा कालावधी मुहूर्तासाठी तसा पुरेसा आहे पण काही लोक म्हणतात की "एखादा चांगला रविवार किंवा गुरुवार बघा". अशी अट घातल्यावर मला कपाळाला हात लावण्याशिवाय गत्यंतर नसते. आधुनिक पद्धतीने मुहूर्त काढताना जेव्हढ्या व्यक्ती प्राधान्याने प्रभावित होतात, त्या सर्वांच्या पत्रिका बघणे आवश्यक ठरते. उदा. लग्नाचा मुहूर्त काढायचा असेल तर वधू आणि वरांची दोघांची पत्रिका बघून मग त्या दोघांना शुभ ग्रहयोग असतील तो दिवस वैवाहिक आयुष्यात प्रवेश करण्यासाठी योग्य ठरते. आता माझ्या मित्राच्याबाबतीत त्याच्या पत्नीची पत्रिका गृहप्रवेशाच्या मुहूर्तासाठी कर्ती/जबाबदार व्यक्ती म्हणून आवश्यक ठरते. म्हणून त्या दोघांच्याही जन्मतारखा इ० नोंदी मी मागवून घेतल्या.

क्रमश:...

शुक्रवार, १३ जुलै, २०१२

मुहूर्त -भाग-१



मुहूर्त या कल्पनेला भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.  भारताबाहेर, पाश्चात्य ज्योतिषात Electional Astrology ही ज्योतिषाची एक शाखा मुहूर्त कल्पनेशी नाते सांगते. Electional Astrology मध्ये विशिष्ट कार्य करण्यास योग्य वेळ/दिवस कोणता याचा शोध घेतला जातो. भारतीय ज्योतिषात एखादा दिवस चांगला किंवा वाईट ठरवताना शुभाशुभ नक्षत्र, वेगवेगळ्या ग्रहांचे "बळ" म्हणजे राजदर्शनकाली रवीचे, विवाहास गुरुचे, युद्ध कार्यात मंगळाचे इत्यादि बघितले जायचे/जाते. चंद्रबळ सर्वकार्यासाठी पहावे असे सांगितले होते (मोघेकृत ज्योतिर्मयूख पृ ३९). "बळ" कल्पना प्राचीन पाश्चात्य ज्योतिषात पण सापडते ((तिथे "बळ" काढायच्या पद्धती निराळ्या आहेत) पण आधुनिक ज्योतिषी मात्र या गुंतागुंतीला फाटा देऊन ज्योतिषातीलच मूळकल्पनांवर आधारित पण सुटसुटितपणे मुहूर्त कसे काढतात याचा विचार मला या वेळी करायचा आहे.

मुहूर्ताच्या या प्राचीन कल्पना तपासल्या तर त्यात बराच गोंधळ दिसतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याला मुहूर्त काढून हवा आहे त्या जातकाच्या मूळपत्रिकेचा फारच उथळ विचार  या जुन्या मुहूर्ताच्या कल्पनांमध्ये दिसतो. उदाहरणार्थ, जन्मराशीपासून चवथा, आठवा आणि बारावा चंद्र सर्व कार्यासाठी वर्ज्य समजावा. जन्मराशीपासून पांचवा चंद्र नवपंचम योग करतो पण तो कार्यनाशक आहे (बोंबला!) पण तो शुक्लपक्षातील असेल तर मात्र शुभ आहे.

एखाद्या दिवशी परस्परविरुद्ध योग आले तर काय करायचे याचे सुटसुटीत दिग्दर्शन मला आजतागायत माझ्या अभ्यासात सापडलेले नाही. याचे उदाहरण म्हणून अमृतसिद्धी योगाचे घेऊ. अमुक वारी अमुक नक्षत्र आले तर  अमृतसिद्धी योग होतो. जसे रविवारी हस्त, सोमवारी मृग, मंगळवारी अश्विनी इत्यादि. पण आता अमृतसिद्धी योग असून चंद्रबळ नसेल तर कार्य करायचे की नाही याचे उत्तर शास्त्रकार देत नाहीत.

थोडक्यात मुद्दा असा की नियमांची सुट्सुटीत उतरंड (heirarchy) उपलब्ध नाही.

सन १९११ मध्ये प्रसिद्ध झालेल्या मोघ्यांच्याच ज्योतिर्मयूख या ग्रंथातील उदाहरण घ्यायचे झाले तर पृ  ४० व ४१ वर काही योग सांगितले आहेत. ते वाचून भरपूर करमणूक होते. "गुरुवारी पुष्यनक्षत्राच्या योगाने झालेला अमृतसिद्धि योग विवाहास वर्ज्य करावा. शनिवारी रोहिणी नक्षत्रामुळे होणारा अमृतसिद्धि योग प्रयाणास वर्ज्य करावा आणि मंगळवारी अश्विनीनक्षत्र आल्याने जो अमृतसिद्धि योग होतो तो गृहप्रवेशास वर्ज्य मानावा. कारण हे योग अत्यंत निंद्य मानिलेले आहेत".  म्हणजे आता बघा की, एखाद्या दिवशी चंद्रबल आहे पण निंद्य अमृतसिद्धि असेल तर काय करायचे याचा खुलासा शास्त्रकारांनी केलेला नाही.

भारतीय ज्योतिषातील नियम आणि अपवाद हे मारूतीच्या शेपटाप्रमाणे अंतरहित आहेत. मला तर कधी कधी पुरोहितांचे फाजिल स्तोम वाढविण्याकरता ते निर्माण करण्यात आले असावेत अशीही शंका येते. जेवढी गुंतागुंत जास्त तेव्हढया जातकाच्या भाबडेपणाचा फायदा घेण्याच्या संधी जास्त (ज्याप्रमाणे कायद्यातील गुंतागुंत वकीलांची पोटे भरते त्यातलाच प्रकार)...असो.

या लेखाच्या  पुढच्या भागात आधुनिक मुहूर्त कल्पनेचा परिचय मी सोदाहरण करून देईन.

गुरुवार, ५ जुलै, २०१२

भाकीताचा पडताळा: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण



दिनांक ६ डिसेंबर २००८ च्या नोंदीमध्ये मी तत्कालीन नवे मुख्यमंत्री श्री अशोक चव्हाण यांच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या जन्मतारखेवरून काही भाकीत केले होते. ते असे होते - "रवि-नेपचूनची युति श्री चव्हाण यांच्या पत्रिकेत असून ती त्यांना हतबल बनवेल. २०१२-१३ सालचे शनीचे या युतीवरील भ्रमण त्यांच्या राजकीय घोडदौडीला खो घालायची शक्यता आहे." याशिवाय असेही मी म्हटले होते की "२६ जानेवारीचे सूर्यग्रहण श्री चव्हाण यांच्या रवि-नेपचून युतीला कार्यरत करते. सूर्यग्रहणाचे परिणाम दीर्घकालीन असतात. तेव्हा श्री चव्हाण यांच्या कडून फार
अपेक्षा ठेवाव्यात असे मला वाटत नाही..." (पहा - http://rajeev-upadhye.blogspot.in/2008/12/blog-post.html)

आज वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार सीबीआयने श्री चव्हाण यांच्यावर आरोपपत्र ठेवले आहे.

मी माझे भाकीत फक्त जन्मतारखेवरून वर्तवले होते. श्री चव्हाण यांची जन्मवेळ व जन्मस्थळ मला उपलब्ध न झाल्याने भाकीतात अचूकता आणण्यास मर्यादा निर्माण झाल्या होत्या. तरीपण उपलब्ध माहीतीवरून वर्तवलेले भविष्य खरे ठरले आहे हे कुणीही नाकारू शकणार नाही.

मंगळवार, ३ जुलै, २०१२

राहु-मंगळ युतीच्या तारखा



माझ्या ब्लॉगच्या बर्‍याच वाचकांनी राहु-मंगळ युतिवरील लेख वाचून मला राहु-मंगळ युति आतापर्यंत कधी जाली होती याची विचारणा केली.   त्यांच्या परिचयातल्या कोट्याधीश (गडगंज श्रीमंत)व्यक्तींच्या पत्रिकेत हा योग आहे का याची उत्सुकता त्यांना आहे. म्हणुन मी सन १९३५ ते १९८५ या कालावधीमध्ये राहु-मंगळ युति केव्हा झाली याचे गणित करून ते पुढे देत आहे. खालील तारखांना (+/- ३ दिवस) ज्यांचे जन्म जाले असतील त्यांच्या पत्रिकेत ही युति आढळून येईल. श्री आल्फी लाव्होइ यांच्या संशोधना प्रमाणे या व्यक्ती कोट्यधीश असायची शक्यता खूप आहे. भारतीय ज्योतिषांच्या मताप्रमाणे यांचे वैवाहिक आयुष्य गढूळ असायची शक्यता आहे.

16 Nov   1935
 31 Aug  1937
 6 Jan   1939
 22 Oct 1940
 8 Aug  1942
 21 May 1944
 18 Sep  1945
 4 Jul    1947
 24 Apr 1949
 16 Feb 1951
 10 Dec  1952
 20 Sep  1954
 7 Feb     1956
 24 Nov   1957
 12 Sep  1959
 26 Jun   1961
 22 Oct 1962
 2 Aug  1964
 22 May 1966
 13 Mar 1968
 3 Jan   1970
 9 Jun   1971
 19 Aug  1971
 24 Sep  1971
 5 Mar 1973
 25 Dec  1974
 14 Oct 1976
 1 Aug  1978
 28 Nov   1979
 14 Mar 1980
 20 Apr 1980
 3 Sep  1981
 22 Jun   1983
 10 Apr 1985

रविवार, २४ जून, २०१२

सप्तमात मंगळ? मंगळ-राहु युति?? घाबरू नका...




भारताबाहेर अनेक जिज्ञासु लोक ज्योतिषातील सत्यासत्यतेचा शोध घेण्यात गुंतलेले आहेत. अमेरीकेतील National Council for Geocosmic Research ही अशीच एक संस्था. या संस्थेचे एक अध्वर्यु श्री आल्फी लाव्होइ हे अनेक वर्षे ज्योतिषात सांख्यिकीवर आधारीत संशोधन करण्यात गुंतलेले आहेत. माझा आणि त्यांचा परिचय नाही पण मी त्यांच्या याहु ग्रुपचा सभासद असल्याने त्यांच्या संशोधनातील प्रगती मला वरचेवर समजत असते. श्री आल्फी लाव्होइ यांनी http://www.astroinvestigators.com/ असे एक कोषस्थळ आपल्या संशोधनाच्या माहितीकरीता तयार केले असून त्यावरही त्यांचे निष्कर्ष पहाण्यासाठी उपलब्ध आहेत.

श्री आल्फी लाव्होइ यांनी करीअर विषयी केलेल्या संशोधनात काही वेधक गोष्टी सापडल्या आहेत. http://www.astroinvestigators.com/documents/NCGR-Careers-02-25-10.pdf या फाईलवर जर एक नजर टाकली तर असे लक्षात येईल की कोट्यधीशांच्या पत्रिकेत सप्तमात मंगळ असायची तसेच राहु-मंगळ युति असायची शक्यता खूप आहे. हे मुद्दाम सांगायचे कारण असे की हे दोन्ही योग आपल्याकडे कुयोग मानले गेले आहेत. (आमचे एक ज्योतिषी मित्र श्री धोण्डोपंत आपटे यांनी राहु-मंगळ युतिबद्दल लिहीलेली ही नोंद वाचावी - http://dhondopant.blogspot.in/2012/05/blog-post_25.html)

आता कोट्यधीशांच्या पत्रिकेत जर वरील दोन योग प्रामुख्याने आढळत असतील तर सप्तमात मंगळ आणि राहु-मंगळ युति  असलेल्या पत्रिका   टाकून द्यायची आवश्यकता नाही.

भारतीय ज्योतिषी श्री आल्फी लाव्होइ यांच्या दर्जाचे संशोधन करत नाहीत म्हणुन चेष्टा आणि टिकेचे बळी ठरतात.

टीप - या संशोधनाबद्दल काही शंका असतील तर त्या श्री आल्फी लाव्होइ यांच्याशी संपर्क साधून निरसन करून घ्यावे. मी माझी मते व्यक्त करताना श्री लाव्होइ यांनी अशा संशोधनासाठी लागाणारी शिस्त काटेकोर पणे पाळली असणार हे गृहित धरले आहे.

शुक्रवार, २२ जून, २०१२

मंत्रालयाची आग, हर्षल-प्लुटो गोचर केंद्रयोग, आणि मध्यबिंदू ज्योतिष

परवाच माझ्या ब्लॉगचे एक वाचक श्री भूषण कोंढाळकर यांनी मला सध्या चालू असलेल्या हर्षल आणि प्लुटो या मंदगती ग्रहांच्या केंद्रयोगावर मी लिहावे असे इमेल पाठवून सूचवले होते. या विषयाच्या अनुरोधाने मजकुराची जुळवाजुळव चालू असताना काल महाराष्ट्राच्या  मंत्रालयातील आगीची बातमी टिव्हीवर झळकली.  माझ्या ब्लॉगचे एक चाहते आणि मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी श्री सतीश लळीत मंत्रालयाच्या इमारतीतून बाहेर पडताना जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्यांच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम पडो हीच सदिच्छा!

काल मला स्वस्थपणे या घटनेचे ज्योतिषशास्त्रीय विष्लेषण करणे जमले नाही पण आज ते निश्चित शक्य आहे.

आधुनिक ज्योतिषात हर्षल reforms, disruption इत्यादींचा कारक ग्रह मानलेला आहे तर प्लुटो हा मोठ्या अपरिहार्यतेचा (inevitable events), तसेच elimination इत्यादि स्वरुपाच्या घटनांचा कारक मानला जातो. प्लुटोचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो ज्या ग्रहांशी योग करतो त्या ग्रहांचे कारकत्वाचा intensely हे विशेषण लागून आविष्कार होतो. कालच्याच घटनेचे उदाहरण घेऊन हे स्पष्ट करायचे झाले तर  inevitable intense (प्लुटो) disruption (हर्षल) हे शब्द अत्यंत चपखल लागू पडतात असे दिसून येईल.

याशिवाय काही पूरक असे ग्रहयोग पण काल सक्रिय होते. त्यात रवि-हर्षल केंद्र्योग अप्लायिंग ७ अंश ५८ मि आणि गोचर लग्नाशी युतिमधील शनि आणि चंद्र अंशात्मक केंद्र्योग हेही काल कार्यरत होते. रवि-हर्षल केंद्र्योगाने कालचा दिवस आणि येणारा ७ दिवसांचा कालावधी, तसेच राजसत्तेशी संबधित घटना या बाबी अधोरेखित झाल्या आहेत.

हे झाले ग्रह्योगांच्या पातळीवर स्पष्टीकरण. पण मध्यबिंदू ज्योतिषाच्या कोनातून या घटनेकडे पाहिले असता खालील मध्यबिंदू रचना काल कार्यान्वित असल्याचे दिसून येईल. या मध्यबिंदू रचनांचा अर्थ पुढे दिला आहे -
मंगळ-शनि = हर्षल
Intense frustration. Coping under duress. Exposure to volatile, challenging and perilous influences. The state of being caught off-guard or suddenly disadvantaged. Defence and attack. Hostile actions; aggravating and debilitating circumstances. Angst. Decisive separations. The experience of loss and grief.

मंगळ-शनि = प्लुटो

Demonstrating the will and intent to meet specific challenges; to completely master and overcome an arduous situation. Defiance; refusing to back down or give in under pressure. Build ups of stress and aggression which are prone to periodic and powerful release. The activation of survival instincts. An awareness of the destructive forces of 'man and nature'. Harmful elements. Collective loss and anguish.

सहसा अशा मोठ्या घटना मध्ये रवि, चंद्र यांचा अंतर्भाव हा असतोच असतो. रविमुळे खालील मध्यबिंदू रचना काल तयार झालेल्या आहेत.

रवि = मंगळ-हर्षल
Quick reflexes, actions and reactions. Sudden bursts of energy and motivation. The ability to call upon physical reserves quickly. Energetic and resourceful. Independent action. Self-determining and wilful. Defiant, impatient and intolerant. A risk taker. A predisposition to injuries, accidents and surgical procedures. Disruptive males.

रवि = मंगळ-प्लुटो
 A person driven to succeed at all cost. Tendency to proceed in a forceful or pushy manner. Ruthlessness. Strong survival instincts and recuperative powers.

यातील सर्व योगांचा बारीकसारीक विचार इथे सविस्तर करता येणं शक्य नाही पण केवळ ग्रहयोगांच्या आधारे बोलायचे झाले तर ही आग यदृच्छया लागली नसून ती लावण्यात आली असावी असे मानायला खूप जागा आहे.

बुधवार, २० जून, २०१२

माझी आवडती राष्ट्र्गीते




मला या राष्ट्रगीतांच्या चाली आणि संगीत संयोजन आवडले. मला त्यांच्यातील राष्ट्रीयत्वा्च्या भावनेचे मूल्यमापन करता येणं शक्य नाही.

1. श्रीलंका
http://youtu.be/JslPiA9mPls

2. पोलंड
http://youtu.be/KQTq07gihqg

3. फ्रेन्च
http://youtu.be/69nNX_fw_po
http://youtu.be/LizrcM7rIk0

4 नाझी जर्मनी
http://youtu.be/OFLe24jh3Yk

मला झुबेन मेहताने कण्डक्ट केलेल्या न्युयॉर्क फिलॉरमॉनिक ऑर्केस्ट्राने वाजवलेले भारतीय राष्ट्रगीत पण आवडले होते. पण ते एकदाच ऐकले होते. ते कुठे सापडत नसल्याने त्यांचा वरील यादीत समावेश नाही.

शुक्रवार, १५ जून, २०१२

प्रसिद्धीचे गौड्बंगाल - एका प्रयोगाची गोष्ट


काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी तेव्हा संगणक-संगीत या विषयात प्रा. एच व्ही सहस्रबुद्धे (एचव्हीएस) यांच्या बरोबर संशोधन करत होतो. एचव्हीएसनी मला या प्रकल्पाच्या आरेखनात बराच मोकळा हात दिला होता. मी मला सुचणार्‍या वेड्यावाकड्या कल्पना सरांना सांगत असे. कधी कधी एचव्हीएस त्यातली हवा काढत तर एखाद्या कल्पनेत तथ्य वाटले तर अधिक तपास करण्यास ते उत्तेजन देत असत. या प्रकारात आमच्यात बराच युक्तीवाद होत असे, आणि त्यातून मला बरेच काही शिकायला मिळाले.

असंच एकदा मी सरांशी बोलताना विधान केले की, "मला अमुक एका गायकाचे गाणे आवडते" असे एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या संगीतातल्या आवडीविषयी सांगते, तेव्हा ती आवड त्या व्यक्तीची खरी आवड नसण्याची शक्यता बरीच आहे. सरांनी मला चमकून विचारले, "तुला नक्की काय म्हणायचे आहे"?

मी त्यावर खुलासा केला की बहुतांश लोकांच्या गाण्यातल्या आवडीनिवडी या जाणीवपूर्वक विकास पावलेल्या नसतात, तर त्या आवडीनिवडी निर्माण होण्यात त्या त्या कलाकाराभोवती निर्माण झालेले वलय कारणीभूत ठरते किंवा संगीतेतर कारणे यात प्रभाव पाडतात.

"Can you elaborate this further" -  एचव्हीएसनी मला चावी मारली.

मी त्यांना म्हटले की, बरेच कलाकार हे लहरीपणासाठी प्रसिद्ध असतात. त्यांच्या स्वभावातील विक्षिप्तपणा कधीकधी आवडायला लागून त्या कलाकाराची कला आवडायला लागली असे होण्याची बर्‍याच जणांच्या बाबतीत शक्यता आहे. मग मी अनेक कलाकारांचे दाखले देऊन माझा मुद्दा त्यांना पटविण्याचा प्रयत्न केला. त्यावर एचव्हीएस म्हणाले की "केवळ एक दावा केला आहे म्हणून हे स्वीकारता येणार नाही. हे प्रयोग करून सिद्ध करता आले पाहिजे".

माझा मुद्दा प्रयोगाने कसा सिद्ध करता येईल या विचारानी माझ्या डोक्याला चालना मिळाली आणि मी काही दिवसानी एका प्रयोगाचा आराखडा सरांच्या पुढे ठेवला. तो साधारणपणे असा होता -

- शास्त्रीय संगीत आवडते पण कळत नाही असे सांगणार्‍या जेव्हढ्या मिळतील तेव्हढ्या व्यक्ती गोळा करायच्या.
- एक प्रसिद्ध आणि अप्रसिद्ध कलाकरांची यादी तयार करायची
- या व्यक्तींना प्रथम वरील यादीतून त्यांना आवडणारे पाच शास्त्रीय गायक/गायिका प्राधान्यक्रमाने घोषित करायला सांगायचे.
- यानंतर या सर्व व्यक्तीना यादीतील गायकांच्या गाण्याचे नमुने निश्चित कालावधीसाठी ऐकवायचे. हे नमूने असे निवडायचे ठरले की त्यातून गायक कोण हे सहज ओळखता येणार नाही. यासाठी प्रत्येक गायकाच्या गाण्याचा सुरवातीला फक्त तंबोर्‍याची साथ असलेला आलापीचा भाग ३० सेकंद ऐकवायचा असे ठरले.
- प्रत्येक तुकडा ऐकल्यावर प्रयोगात सहभागी झालेल्या सदस्यांनी ० ते ५ गुण प्रत्येक गायकाला आपल्या आवडी प्रमाणे द्यायचे. सर्व तुकडे ऐकून झाले की सर्वात जास्त गुण मिळालेल्या तुकड्यांची एक यादी तयार करायची. ही यादी तयार झाली की  प्रत्येक तुकड्यातील कलाकाराचे नाव घोषित करायचे. आणि मग प्रयोगापूर्वी घोषित केलेली आवड आणि प्रयोगोत्तर लक्षात आलेली आवड ही सारखीच की वेगवेगळी हे तपासायचे.

या प्रयोगाला प्रा. एच व्ही सहस्रबुद्धयानी संमती दिली.

हा प्रयोग केल्यानंतर असे लक्षात आले की जवळजवळ सर्वच सहभागींची प्रयोगपूर्व घोषित आवड आणि प्रयोगोत्तर आवड यात मोठ्ठी तफावत आहे. बहुतेक सर्वच जणांनी प्रयोगापूर्वी आवडतात म्हणून घोषित केलेले कलाकार प्रयोगानंतर कमी पसंतीचे ठरवले होते. या प्रयोगातील सर्वच  सहभागी त्यांची गाण्यातली खरी आवड वेगळीच असल्याचे लक्षात आल्याने आश्चर्यचकित झाले.  याला वीसेक वर्षे झाल्यामूळे मला आता आकडेवारीचा तपशील देता येणार नाही. पण माझा दावा खरा ठरला होता.

हे सर्व सांगायचे एव्हढयासाठी की एखादी व्यक्ती प्रसिद्ध होते किंवा आपल्याला आवडते ती तिच्या अंगभूत गुणांमुळेच असे नाही. त्याव्यक्ती भोवती वेगवेगळ्या कारणांनी (मग त्या माकडचेष्टा का असेनात) निर्माण होणारे वलय पण प्रसिद्धीला पूरक ठरते.

सोमवार, ४ जून, २०१२

माझ्या ब्लॉगच्या वाचकाना मोफत मार्गदर्शनाची सुवर्णसंधी


माझ्या ब्लॉगच्या वाचकांना त्यांच्या आयुष्यातील समस्यांविषयी ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शन हवे असल्यास मी मोफत मार्गदर्शन काही कालावधी साठी करून द्यायचे ठरवले आहे. येत्या शनिवारपर्यंत म्हणजे दिनांक ९ जून २०१२ पर्यंत जे वाचक माझ्याशी संपर्क साधतील त्यांनाच ही सेवा उपलब्ध राहील. दिनांक ९ जून २०१२ नंतर संपर्क साधल्यास मोफत सल्ला मिळणार नाही.

- २० ते ७० या वयोगटातील व्यक्तीकरताच ही योजना उपलब्ध आहे.
- आपल्या इमेल मध्ये खालिल माहिती व्यवस्थित दिलेली असावी
१.जन्मदिनांक -
२.जन्मस्थळ -
३.जन्मवेळ -
४.सध्याचे वास्तव्याचे ठिकाण
५.आतापर्यंतच्या आयुष्यातील चांगले आणि वाईट मोठे प्रसंग
६.आपला प्रश्न किंवा समस्येचे स्वरूप

अपुरी माहिती कळविल्यास आपल्या समस्येचा विचार केला जाणार नाही. आपली समस्या/प्रश्न मी अभ्यास केलेल्या तंत्राच्या कक्षेत येत असेल तरच मी आपल्या विनंतीचा विचार करीन.

कोणताही तोडगा सुचविला जाणार नाही.

मोफत सल्ला मिळत आहे म्हणून कुणी मूर्खासारखे प्रश्न विचारल्यास त्यांचा विचार केला जाणार नाही. मार्गदर्शन फक्त इंग्रजीतूनच मिळेल (इंग्रजी समजण्यात अडचण असेल तर संपर्क साधू नये).मला उत्तर देण्यासाठी लागणारा वेळ हा मला मिळालेल्या प्रतिसादानुसार कमी-जास्त असेल.

मोफत मार्गदर्शनाची संधी मी उपलब्ध करुन देत असल्याने माझा निर्णय अंतिम असेल. संपर्कासाठी माझा पत्ता - upadhye [dot] rajeev [AT] gmail.com

गुरुवार, २४ मे, २०१२

माझी पण एक (पाडीव) कविता (काव्यरस - टिंगल)




बळेच शब्दा वेठीस धरूनी भाव नाना वाकवितो
असामान्य वा असो अमान्य बसुनी कविता कवि वितो

बुध्दीची मम झेप नवी ही नेते बरं का दिगंतरी
पाहून तिजला भरेल धडकी प्रिय मित्रा तव हृदंतरी

ग्रहगोलांची अगणित सूत्रे अणुरेणूंची पण तशीच ती
विश्वाच्या व्यापाहून भयंकर जीवघेण्या त्या मात्रांची

रे प्रिय मित्रा हितगुज करण्या मार्ग नवा मी अनुसरला
झटापटीने कविता करता शुद्ध कशाची नुरे मजला

व्याकरणाची फिकीर नसे पण प्रासासाठी व्याकुळता
काकुळतीने पणास लावी पणजोबांचे(*) पुण्य आता



* माझे पणजोबा कै. विठ्ठल सीताराम गुर्जर हे मराठीतले जुन्या पिढीतील नामवंत साहित्यिक होते. कै. राम गणेश गडकर्‍यांचे ते जीवश्च कंठश्च मित्र. गडकर्‍यांच्या 'एकच प्याला' या नाटकातील पदे आणी प्रस्तावना गुर्जरांची आहेत.

मंगळवार, २२ मे, २०१२

भाकिताचा पुन्हा पडताळा

मी खाली दिनांक २९ ०४ २०१२ रोजीच्या नोंदीमध्ये ग्रहणाच्या कालावधीमध्ये मोठ्या आपत्तीचे भाकित केले होते. ते इटलीच्या भूकंपाने खरे ठरले होतेच. त्यात आणखी एका आपत्तीची भर पडली आहे. ही आपत्ती म्हणजे आंध्रात झालेला रेल्वे अपघात.

या शिवाय बल्गेरीयात आणखी एका भूकंप (५.८ रिश्टर स्केल) आजच झाल्याचे वृत्त आहे. http://www.google.com/hostednews/afp/article/ALeqM5gWUuOg2nQhkEusTJyHShLu47T-Tg?docId=CNG.083833085acfb87a2eafecefbd831ed9.4f1

रविवार, २० मे, २०१२

भाकिताची प्रचिती - इटलीतील भूकंप




मी आजच्या सूर्यग्रहणा विषयी खाली केलेल्या भाकिताचा पुन्हा एकदा पडताळा आला आहे. मी खाली मोठ्या भूकंपाचे भाकित केले होते. रिश्टर स्केल्वर ६ इतक्या तीव्रतेचा इटलीत असा भूकंप झाल्याची बातमी आहे.  पाच जण दगावल्याचा बातमीत उल्लेख असून अनेक ऐतिहासिक वास्तूना या भूकंपामुळे हानी पोचली आहे.

ज्योतिष परिपूर्ण शास्त्र नाही म्हणून मला भूकंपाची जागा आणि तीव्रता अचूक सांगता आली नाही. पण मी सांगितलेल्या कालावधित आणि नेमकी वर्तवलेली घटना घडली आहे, हे कुणीही नाकारु शकणार नाही.

रविवार, २९ एप्रिल, २०१२

भाकीते करण्याचे ’ग्राफीकल एफिमेरीस’ (आलेखी-पंचांग) तंत्र



एबर्टिनने मध्यबिंदू तंत्राबरोबर ज्योतिषात आणखी एक मोलाची भर घातली. याला पाश्चात्य ज्योतिषात ’ग्राफीकल एफिमेरीस’ असे संबोधले जाते. मराठीत आलेखी-पंचांग ही संज्ञा या तंत्रासाठी योग्य ठरेल. या तंत्राचा उपयोग विशिष्ट कालावधीतील ग्रहांची भ्रमणे एखाद्या पत्रिकेशी कशी interact करतात याची एकत्रित कल्पना यावी यासाठी केला जातो. पारंपरिक पंचागात ग्रहांच्या स्थितीची कोष्टके दिली असतात. पण पारंपरिक पंचागातील ही मांडणी  एखाद्या पत्रिकेत गोचर भ्रमणांचे होणारे योग एकत्रित पणे तपासण्यास उपयोगी नसते. भाकीतात अचूकता आणण्यासाठी गोचर भ्रमणांचे होणारे योग एकत्रित पणे तपासणे आवश्यक ठरते. तसेच समकक्ष (equivalent) योगांचा एकत्रित अभ्यास ’ग्राफीकल एफिमेरीस’ मध्ये चटकन करता येतो.

आलेखी-पंचागात इष्ट कालावधी साठी उभ्या अक्षावर ० ते ३६०, ० ते १८०, ० ते १२० किंवा ० ते ९० अंश दर्शवले जातात. आणि आडव्या अक्षावर काल दर्शवला जातो. इष्ट कालावधी एक वर्षाचा असेल तर आडव्या अक्षाचे १२ महिन्यांसाठी १२ भाग केले जातात. सोयीचे एकक घेउन दररोज  किंवा विशिष्ट अंतराने ग्रहांचे बदलते अंश बिंदू स्थापून दाखवले जातात. आपल्याला हव्या त्या ग्रहांसाठी ही प्रक्रिया पार पडली की जो आलेख तयार होतो, तो आलेख  विशिष्ट कालावधीचे ’ग्राफीकल एफिमेरीस’ असते.

खाली उदाहरण म्हणून मंगळ आणि गुरुचे भ्रमण सन २०१२ करता कसे दिसेल ते दिले आहे. याशिवाय अमावस्या-पौर्णिमां पण या आलेखात दर्शविलेल्या आहेत.



या आलेखावर नजर टाकली असता असे लक्षात येईल की -

  • मार्च २०१२ मध्ये मंगळ-पौर्णिमेची
  • मे २०१२ मध्ये गुरु -सूर्यग्रहणाची अमावस्या  यांची युति होते .  ही अमावस्या मोठ्या आपत्तीला (भूकंप वगैरे) आमंत्रण देणारी ठरावी. प्रभाव काल +/-५ दिवस.

  • नोव्हेम्बर २०१२ मध्ये गुरु- चंद्र्ग्रहणाची पौर्णिमा यांची युति होते. (  ही  पौर्णिमा मोठ्या आपत्तीला (भूकंप वगैरे) आमंत्रण देणारी ठरावी. प्रभाव काल +/-५ दिवस )



हे सर्व फलिताच्या दृष्टीने जबरदस्त योग आहेत. पारंपरिक पंचागात अशी एकत्रित माहिती न मिळाल्याने आगामी काळाचा विचार करून अंदाज बांधण्यात चूका होण्यास भरपूर वाव असतो.


आता अशी आरेखित केलेली भ्रमणे जातकाच्य़ा पत्रिकेशी कशी interact करतात हे तपासण्यासाठी काय करतात हे पाहूया. यासाठी आलेखी-पंचागात उजवीकडे जातकाच्या पत्रिकेतील ग्रह त्यांच्या अंशांप्रमाणे उभे मांडतात. असा ग्रह मांडल्यानंतर कालाच्या अक्षाला समांतर अशी एक रेषा काढतात. पत्रिकेतल्या जेव्हढ्या ग्रहांचा विचार इष्ट कालावधीसाठी करायचा तेव्हढ्या ग्रहांची भ्रमणे अशा स्वरूपात मांडली की आलेखी-पंचांग खाली दिल्या प्रमाणे दिसते.


उदाहरण म्हणून मी गुरु, शनि, हर्षल, नेपच्यून, प्लुटो आदि ग्रहांची सन २०१२ मधिल भ्रमणे घेतली आहेत. शिवाय या कालावधीतील ग्रहणे आणि अमावस्या-पौर्णिमां पण यात मांडल्या आहेत. उजवी कडे मांडलेले ग्रह श्री अमिताभ बच्चन यांच्या पत्रिकेतील आहेत. ते सायन राशी चक्रानुसार आहेत. या आलेखावर नजर टाकली तर असे लक्षात येते की सन २०१२ मधिल दोन ग्रहणे (मे आणि नोव्हेम्बर) श्री अमिताभ बच्चन यांच्या हर्षल आणि शनिला सक्रिय करतात. शिवाय त्यांची जन्मवेळ जर बरोबर असेल तर जन्मचंद्र शनीच्या भ्रमणाखाली येतो. माझ्या अंदाजानुसार मेपासून पुढचा काळ श्री  बच्चन यांना जास्त त्रासदायक ठरू शकतो.


पूर्वी आलेखी-पंचांग हाताने तयार करत असत आता संगणकामुळे हव्या त्या कालावधीसाठी असे पंचांग  चुटकीसरशी तयार करता येते. (माझ्या कडे असलेल्या Janus 4.3 या सॉफ्टवेअरमध्ये या सर्व सोयी आहेत).  ग्रहयोगांच्या एकत्रित आणि समग्र अभ्यासास फार मोठी मदत या तंत्रामुळे होते.




शनिवार, २१ एप्रिल, २०१२

इकडचं तिकडचं...


आजच माझ्याकडे आलेल्या जातकांनी मला एका  तान्ह्या मुलीची पत्रिका कराल का? अशी पृच्छा केली. अधूनमधून हा प्रश्न मला केला जातो आणि अशा विनंतीला मी नम्रपणे नकार देतो. खरं तर यात माझेच आर्थिक नुकसान आहे. पण काही तत्त्वे पाळायचीच हा निर्धार असल्याने, मला असे नुकसान झालेले चालते.

तान्ह्या मुलांची पत्रिका करू नका असे सांगण्यामागे माझी निश्चित अशी कारणे आहेत. केवळ तान्ह्याच नाही तर २० वर्षांपर्यंत आणि सत्तरीनंतर (काही अपवाद वगळता) पत्रिका बघू नये असे माझे  स्पष्ट मत आहे. याची कारणे अशी-

विशीपर्यंत व्यक्तीची स्वयंनिर्णयाची क्षमता पूर्णपणे विकास पावलेली नसते. सहसा आईवडिलांवर मुले अवलंबून असतात. सत्तरीनंतर तब्येत ठणठणीत नसेल तर हळुहळु परावलंबित्व यायला सुरुवात होते. अनेक इच्छाना मुरड घालावी लागते. मनमुरादपणे वानप्रस्थाश्रमाचा काल व्यतीत करणे सर्वच ज्येष्ठाना शक्य असते नाही. थोडक्यात या परावलंबीत्वामुळे  एकंदरच संधी आणि निर्णय यावर मर्यादा असतात/यायला लागतात.

सांगायचे तात्पर्य असे की २० ते ७० या मधल्या काळात, सर्वसाधारणपणे स्वयंनिर्णयाचा हक्क बजावू शकणारी व्यक्तीच वेगवेगळ्या शक्यता/संधीना विवेकाने प्रतिसाद देऊ शकते. हे परावलंबी व्यक्तींच्या बाबतीत होऊ शकत नाही. पत्रिका ही केवळ शक्यता दाखवत असल्याने बंदिस्त आयुष्य जगणार्‍या व्यक्तींच्या आयुष्यात या शक्यता प्रत्यक्षात  येऊ शकत नाहीत.

दूसरा मुद्दा असा की पत्रिकेवरून काही ज्योतिषी अशी भाकीते करतात की मुले किंवा ज्येष्ठ यांच्या जीवनावर अशा भाकीतांची दाट छाया पडते. याचा अत्यंत मनस्तापदायक अनुभव भारतीय ज्योतिषांकडून मला स्वत:ला आलेला आहे. (मला वाहनापासून धोका सांगितल्यामुळे मला वयाच्या २३व्या वर्षापर्यंत सायकल चालवायला घरातून परवानगी मिळाली नाही. कल्पना येण्यासाठी मी माझा फक्त एकच अनुभव इथं सांगितला).

तेव्हा घरात नवीन पाहूणा आला तर ज्योतिषाकडे धावत सुटू नका...

बुधवार, ११ एप्रिल, २०१२

अमिताभ बच्चन : भाकीताचा पडताळा

मी २० फेब्रुवारीच्या खालील पोस्ट मध्ये एप्रिल २०१२ मध्ये श्री अमिताभ बच्चन यांचा पोटाचा विकार एप्रिल २०१२ मध्ये बळावेल असे भाकीत केले होते.
http://rajeev-upadhye.blogspot.in/2012/02/blog-post_7074.html

वृत्तपत्रातील ताज्या बातम्यावरून हे भाकीत खरे ठरले आहे असे दिसते.
http://www.hindustantimes.com/Entertainment/Tabloid/Big-B-blogs-about-pain-gets-taken-aback-by-media-attention/Article1-838381.aspx

माझ्या ब्लॉगचे एक वाचक आणि माझे कॉलेज मित्र श्री मंदार कुलकर्णी यांनी ते माझ्या निदर्शनास आणुन दिल्याबद्दल त्यांचे आभार!

सोमवार, ९ एप्रिल, २०१२

दशा पद्धतीबद्दल माझे काही आक्षेप

भारतीय ज्योतिषात जातकाच्या पत्रिकेतल्या एखाद्या घटनेचा कालनिर्णय करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या दशा आणि महादशा मला खटकतात. मी माझ्या प्रॅक्टीसमध्ये त्या वापरत नाही. "ऋषीमुनीना जास्त अक्कल होती" या गृहीतकावर ठाम श्रद्धा असणारी मंडळी मला शिव्या देतील आणि त्या झेलायची माझी आनंदाने तयारी आहे.

या दशा पद्धतीचा शोध घेत असताना मला अशी माहिती कळली की ४० पेक्षा अधिक दशापद्धती अस्तित्वात आहेत. पण विंशोत्तरी दशा ज्योतिषी अधिक वापरतात. म्हणजे वेदनाशामक ओषधे अनेक उपलब्ध आहेत पण ब्रुफेन जास्त वापरले जाते. पण ब्रुफेन परिणामकारक ठरत नाही तेव्हा डॉक्टर इतर पर्यायांचा विचार करतात. तसा (भारतीय) ज्योतिषी इतर पर्यायांचा विचार करताना दिसत नाहीत.

पण मला जो मुद्दा मांडायचा आहे तो वेगळाच आहे. दशा पद्धतीमध्ये ज्या क्रमाने दशा येतात तो क्रम कसा व का अस्तित्वात आला आणि दशांच्या आवर्तनाचा कालावधी कसा निश्चित केला गेला आहे, याबद्दल कोणीच कुठे बोलताना दिसत नाही. म्हणजे आहे हे असे आहे, पटलं तर बघा. अशातला प्रकार. ज्योतिषाला शास्त्र म्हणून प्रतिष्ठा मिळायला ज्या अडचणी येतात, त्यापैकी ही एक.

दूसरा मुद्दा असा की जास्त अक्कल असणारे हे शास्त्रकार आज जर पुनर्जन्म घेऊन परत जन्माला आले तर या दशा पद्धती आहेत तशा स्वीकारतील की त्यात सुधारणा करतील? या सुधारणा करताना ते तर्काचा आणि आधुनिक साधनांचा आधार घेतील की आपापल्या लहरीपणे करतील? हा प्रश्न उपस्थित करण्याचे कारण म्हणजे हर्षल, नेप्च्यून आणि प्लुटो या अलिकडे सापडलेल्या ग्रहांचा दशा पद्धतीत अंतर्भाव करायचा कोणताही प्रयत्न किंवा विचार झाल्याचे मला तरी ठाउक नाही. ज्या हवामान खात्याचे अंदाज आपण चेष्टेवारी नेतो ते हवामान खाते सुद्धा त्यांच्या वापरातील मॉडेलमध्ये कालानुरुप बदल करत असते. डॉक्टर सुद्धा ब्रुफेनचा उपयोग होत नसेल तर वेगळे पर्याय शोधतात. "तुम्ही आणि तुमची डोकेदुखी" म्हणून सोडून देत नाहीत. कोणतही उपयुक्त मॉडेल अथवा डिझाइन हे विस्तारक्षम असायलाच हवं...

सांगायचा मुद्दा एव्हढाच की दशापद्धत ही कल्पनाविलासावर आधारीत असून त्यात सुधारणेला वाव नाही कारण तिचा विस्तार कालानुरुप होऊ शकत नाही. आज अस्तित्वात असलेल्या ४०हून अधिक दशापद्धती अशा विस्तारक्षम मॉडेल मधून विकास पावल्या आहेत का, याचे उत्तर आत्ता तरी नाही असेच द्यावे लागेल.

मात्र गोचर पद्धतीवर आधारीत कालनिर्णय करताना त्यात कालानुरुप मूळ गृहितकांशी सुसंगत असा विस्तार झालेला आहे कारण हर्षल, नेपच्यून, प्लुटो या ग्रहांच्या भ्रमणांचा अंतर्भाव त्यात झालेला आहे. गोचर भ्रमणांवर आधारीत कालनिर्णय हा कल्पनाविलासावर आधारित कालनिर्णय नाही.

तेव्हा "ऋषीमुनीना जास्त अक्कल होती" असा युक्तीवाद कोणी करायला लागला तर त्यात किती तथ्य आहे हे कळणे तुम्हाला फारसे अवघड वाटायला नको.

गुरुवार, २२ मार्च, २०१२

बंधुराजांसाठी पत्रिकामेलन

माझ्या एका मामेभावाला सध्या "कर्तव्य आहे". हा माझा भाऊ चांगला शिकलेला आहे म्हणजे अमेरीकेत चांगल्या विद्यापीठात संगणक अभियांत्रिकीत एमेस केलेला आहे. शिवाय मायक्रोसॉफ्ट मध्ये गेले ५-६ वर्षे तरी टिकून आहे. माझ्यावर त्याच्यासाठी पत्रिकामेलन करायची जबाबदारी आलेली आहे. हे आमचे बंधुराज ज्या मुलींची माहिती पसंत पडेल त्या मुलींचे जन्मटिपण मला कळवतात. मग मी त्याला पत्रिका जुळते की नाही हे कळवतो.

नुकतेच माझ्या भावाने मला चार मुलींची जन्मटिपणे पाठविली आणि माझे मत मागितले. मी त्याला दोन पत्रिका जुळत असल्याचे आणि उरलेल्या दोन जुळत नसल्याचे सांगितले. आणि नेमके झाले असे की न जुळणार्‍या पत्रिकेतली एक मुलगी त्याला खूप आवडली होती तिच्या इतर माहितीवरून. त्याने मला मेल पाठवून विचारले की "दादा, मला तू नको म्हटलेल्या मुलींपैकी एक खूप आवडली आहे. तू का नाही म्हणतोयस ते जरा खुलासेवार सांगशील का?"

वास्तविक या मुलीला ज्योतिषाच्या दृष्टीकोनातून नाही म्हणताना मला अवघड गेले. त्याचे कारण सर्वाना कळावे म्हणून या लेखाचा प्रपंच.

या मुलीच्या मूळ पत्रिकेत टोकाचे चांगले आणि त्रासदायक असे योग आहेत (अर्थात चांगले योग असल्यामुळेच तीचे आयुष्य असे घडले की ती माझ्या भावाला पसंत पडली. यात शंकाच नाही). अशा परिस्थितीत उपवर वधू आणि उपवर मुलगा यांच्या पत्रिकेतले प्रत्येक ग्रह दूसर्‍या पत्रिकेतील ग्रहांची कसे interact करतात हे आधुनिक ज्योतिषी बघतात आणि संभाव्य नातेसंबंधातील चढ-उतारांचा अंदाज बांधतात. या संभाव्य नातेसंबंधाची कल्पना जातकाला दिल्यावर जातकाने आपल्याला काय झेपेल वा काय झेपणार नाही याचा विचार करून निर्णय घेणे अपेक्षित असते. पण आपल्याकडे हा निर्णय ज्योतिषाला घ्यायला भाग पाडले जाते. असो.

या माझ्या भावाला आवडलेल्या मुलीच्या मूळ पत्रिकेत काही महत्वाचे योग आहेत ते असे -
* ख-मध्याजवळ ६ अंशातील शुक्र-मंगळ युती, या मंगळाचा हर्षल बरोबर केंद्र योग, शुक्राचा नेपच्यून बरोबर नवपंचम योग आणि प्लुटो बरोबर लाभ योग (हे दोन्ही योग जोरदार आहेत). एकंदर मामला नुसता रोमॅंटीकच नाही तर या व्यक्तीची सेक्सची गरज above average आहे हे नक्की. पण शुक्राने तयार केलेली शुक्र=मंगळ -शनी ही रचना कामसुखात वैफल्य आणि असमाधान दाखवते.
* लग्नाशी अंशात्मक युतीमुळे ताकदवान झालेला शनि - हा शनी ताकदवान असल्यामुळे मूळ पत्रिकेतील कोणत्या मध्यबिंदू रचनेत शनि अंतर्भूत आहे हे पहावे लागते. ते बघितले असता षोडषांशात शनि=शुक्र-नेपच्यून तसेच शनि= रवि-शुक्र या मध्यबिंदू रचना तयार झालेल्या दिसतात. या पण रचनांची फले वरीलप्रमाणेच म्हणजे कामसुखात वैफल्य आणि असमाधान दाखवते.
* चंद्र-प्लुटो २ अंशातील केंद्रयोग - भावनिक प्रक्षोभाची प्रवृत्ती
* बुध-नेपच्यून केंद्रयोग - स्वत:ला किंवा इतरांना फसवत राहण्याची प्रवृत्ती.

थोडक्यात या मुलीची एकदोन तरी प्रेमप्रकरणे बर्‍यापैकी पुढे (सर्व अर्थानी!) जाऊन फसलेली असणार.

पण एव्हढ्यावर ही पत्रिका मी तरी नाकारणार नाही. कारण लग्नानंतर अनेक लोक बदलू शकतात. पण त्यासाठी एकमेकांच्या पत्रिका खर्‍या अर्थाने पूरक असायला हव्या. त्यासाठी वर म्हटल्या प्रमाणे एका पत्रिकेतील प्रत्येक ग्रह दूसर्‍या पत्रिकेतील ग्रहांशी कसे interact करतो ते पहायला हवे. यासाठी या पत्रिका एकमेकांसमोर मांडल्या असता पुढीलप्रमाणे ग्रहयोग दिसतात-



यात डावीकडील चिन्हे माझ्या भावाच्या पत्रिकेतील ग्रहांची यादी आहे. मधली यादी ग्रहयोगांची चिन्हे आहेत. आणि उजवीकडील चिन्हे मुलीच्या पत्रिकेतील ग्रह दर्शवतात (ही सर्व चिन्हे आंतरराष्ट्रीय असून ज्याना कळत नाहीत तो खरा ज्योतिषी नाही). या यादीवर जर नीट नजर टाकली तर असे दिसेल की मुलीच्या पत्रिकेतील बलिष्ठ शनि माझ्या भावाच्या रवि आणि शुक्राशी युति करतो.

माझ्या मते ही युति या दोघांच्या संसाराला किंवा नातेसंबंधाना मारक आहे कारण यात पत्नी डॉमिनेटींग होतेच शिवाय कुटुम्बसुख कमी होऊन आर्थिक अडचणी कायम उभ्या राहतात. आता कुटुम्बसुख कमी म्हणजे भांडणे होतीलच असं नाही तर एकमेकांचा सहवासाच्या संधी कमी. नवरा-बायको वेगवेगळ्या गावात काम करत असतील तर वरील प्रमाणे शुक्राचे योग असलेली व्यक्ती आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ राहण्याची शक्यता अमेरीकेसारख्या देशात कमीच..

तेव्हा मी माझ्या भावाला दिलेला पुढे न जाण्याचा सल्ला तुम्हाला पटतोय का ते पहा...

रविवार, ११ मार्च, २०१२

गणपतीचा शोध

लोकहो,

लहानपणी मी गणपतीभक्त होतो. याचे प्रमुख कारण लंक्यांच्या स्कॉलरशिपच्या क्लास मध्ये संकष्टीला आणि गणेशोत्सवात अथर्वशीर्षाची २१ आवर्तने व्हायची. तेव्हापासून बर्‍यापैकी नियमित पणे अथर्वशीर्षाची आवर्तने मी करत असे. पण "गणपती विघ्नहर्ता नाही तो विघ्नकर्ता आहे, तेव्हा भजायचे असेल तर दूसर्‍या देवाला भज" असे आई म्हणायची. आईला असे कसे विचारले तर उत्तर देता येत नसे मग मला आईचा राग यायचा. पण मी मात्र माझी गणेशभक्ती मी नेटाने पुढे चालु ठेवली होती.

पुढे मी पुण्याला टिळक विद्यापीठात संस्कृत मध्ये विशारद (बीए) करायला जाउ लागलो. दूसर्‍या वर्षी आम्हाला वैदिक साहित्य अभ्यासायला होते. शिकवायला प्रा. सुचेता परांजपेबाई होत्या. त्यांनी आपल्या पूजाविधींमधले अनेक मंत्र निरर्थकपणे शतकानुशतके जपले जात असल्याचे सांगितले. उदा. मंत्रपुष्पांजलीचा आणि गणपतीचा काहीही संबंध नाही, हे कळले तेव्हा मी उडालोच. परांजपेबाईनी असेही सांगितले की वेदांत गणपती कुठेही नाही आणि केवळ गणपती या शब्दामुळे "गणांनां त्वा गणपतिं..." ही ऋचा गणपतीच्या पूजेत ओढून ताणून लोकांनी वापरायला सुरुवात केली. पण हे काहीच नाही, पुढे जे कळले त्यामुळे माझा गणपतीवरच्या श्रद्धेला सुरुंग लागला. परांजपे बाईनी सांगितले की गणपती ही नीच देवता आहे, सूर्य, अग्नि, विष्णु या वैदिक देवतांप्रमाणे ती उच्च देवता नाही. यावर मी वर्गात बाईना प्रश्न केला की नीच देवता म्हणजे काय तर त्यांनी सांगितले की ती अनार्यांची देवता आहे, जसे सोट्या, म्हसोबा, वेताळ या जशा नीच देवता आहेत. मी उडालोच आणि दूसर्‍याक्षणी माझी गणपती वरची श्रद्धा पार उडाली. आई मला जे सांगत होती, त्यात वावगे नसावे असे वाटू लागले.

यानंतर जवळजवळ वीस-बावीस वर्षे गेली. अचानक प्रा. दामोदर कोसंबी या प्रखर बुद्धिमत्तेच्या विद्वानाने लिहीलेल्या मिथ अ‍ॅण्ड रिअ‍ॅलीटी या पुस्तकाचा मराठी अनुवाद वाचत असताना रंजक माहिती कळली की गणपती हा शंकरापासून झालेला पुत्र नव्हे. (म्हणजे तो शंकर-पार्वतीचा अनौरस पुत्र ठरतो.) पुराणकथांमागे आजच्या नीतिमत्तेला न झेपणारे वास्तव लपलेले असते याचा हा एक दाखला होता. याच पुस्तकात लोकदैवतांचे ब्राह्मणीकरण कसे होते याची रोचक चर्चा कोसंबीनी केली आहे. त्यामुळे गणपतीचे काळाच्या ओघात ब्राह्मणीकरण अर्थात status upgradation कसे झाले असावे याचा अंदाज बांधणे फारसे अवघड जात नाही.

तरीही गणपती ही नीच देवता आहे याचा मला अधिकृत पुरावा हवा होता आणि तो मिळवण्यासाठी मी तडफडत होतो. गणपती हा विघ्नकर्ता म्हणजे त्रासदेणारा. ही आईने सांगितलेली माहिती खरी की खोटी हा प्रश्न अधून मधून सतावायचा. पण त्याचेही उत्तर मला काळाच्या ओघात मिळायचे होते. दरम्यान मिसळपाव वरील एक सदस्य श्री श्रावण मोडक यानी लोकायत वाचायला सांगितले. बहुतांश लोकांची अशी समजूत असते की प्राचीन भारतात एकच संस्कृती अस्तित्वात होती ती म्हणजे वैदिक संस्कृती. पण तसे नसून त्यावेळेस वैदिक संस्कृतीला समांतर अशी म्हणजे दासांची (अनार्यांची) संस्कृती पण अस्तित्वात होती ती म्हणजे लोकायत.

अचानक स रा गाडगीळ यांनी लोकयताचा मराठीतून करून दिलेला परिचय वाचनात आला. त्यात गणपतीच्या शूद्रत्वाचे अधिकृत दाखले त्यांनी दिले आहेत. हे दाखले अनेक धर्माग्रंथांचे आहेत. त्यातले महत्त्वाचे म्हणजे मनुस्मृती आणि याज्ञवल्क्य यांच्या स्मृती - हिंदू लॉचे महत्त्वाचे आधारग्रंथ.  गणपती हा विघ्नकर्ता आहे हे अनेक ग्रंथ अधोरेखित करतात.

एक शोधवर्तूळ पूर्ण झाले. माझी आई बरोबर ठरली. ती आज हयात असती तर तिला नक्कीच आनंद वाटला असता.

जाता जाता - गणपती अथर्वशीर्षाचा आणि अथर्ववेदाचा काहीही संबंध नाही अशी माहिती नुकतीच "लोकदैवतांचे विश्व" या रा. चिं. ढेर्‍यांच्या पुस्तकात मिळाली.

मी मात्र आता गणपतीला माझ्या घरातून केव्हाच हद्दपार केला आहे.


पी.एस. २८ एप्रिल २०१२
गणपतीला मी हद्दपार केला ते शूद्र देवता म्हणून असा अनेकजण समज करून घेतील. पण तसे अजिबात नाही. मी त्याला हद्दपार केला त्याचे विघ्नकर्तृत्व सिद्ध झाल्यामुळे. माझी मूळ समस्या वेगळीच आहे. शूद्र देवतांचे ब्राह्मणीकरण/उन्नयन होऊ शकते. गुन्हेगारांचे शुद्धीकरण आणि पुनर्वसन होऊ शकते. धर्मत्याग केलेल्याला धर्मात परत येण्यासाठी धर्माचे दरवाजे उघडे आहेत, पण शूद्रांचे ब्राह्मणीकरण/उन्नयन होऊ शकत नाही. हे काही केल्या पटत नाही... 

शनिवार, ३ मार्च, २०१२

१४ मार्च २०१२ रोजीची अत्यंत शुभ गुरु-शुक्र युती

आगामी काळात लवकरच म्हणजे १४ मार्च २०१२ रोजी सायन वृषभ राशीत ९ अंश ३३ मिनिटांवर (म्हणजेच निरयन मेष राशीत १५ अंश ३२ मि वर ) गुरु-शुक्र युती होत असून हा अत्यंत जोरदार शुभ योग आहे. ही शुभ युती गोचर मंगळ आणि प्लुटो यांच्या बरोबर अंशात्मक नवपचंम योग करत असल्याने विशेष जोरदार शुभ बनली आहे.

या युतीमुळे सायन वृषभ रास ७-११ अंश (निरयन मेष रास १३-१७ अंश), सायन कन्या रास ७ -११ अंश (निरयन सिंह रास १३-१७ अंश), सायन मकर रास ७-११ अंश (निरयन धनु रास १३-१७ अंश) हे क्षेत्र अत्यंत शुभ बनले आहे.

या क्षेत्रात ज्यांच्या जन्मपत्रिकेत लग्न, ख-मध्य किंवा रवि, चंद्रादि व्यक्तिगत ग्रह या क्षेत्रात असतील तर आगामी काळ या जातकांना शुभ जाणार हे नक्की.

आनंददायी घटना एव्हढे शब्द या ग्रह रचनेचा फलादेश सांगण्यास पुरेसे आहेत. कोणताही नवा प्रकल्प सुरु करण्यास हा १२ मार्च ते १४ मार्च हा कालावधी अत्यंत शुभ आहे.

या शिवाय कोणत्याही सनातील खालील जन्मतारखाना ज्यांचे जन्म झाले आहेत त्यांना ही युती अत्यंत शुभ जाईल.

२८ एप्रिल ते २ मे
३० ऑगस्ट ते ४ सप्टेम्बर
२८ डिसेंबर ते २ जानेवारी

लोकहो, या शुभ कालावधीचा जास्तीत जास्त फायदा घ्या!

सोमवार, २० फेब्रुवारी, २०१२

अमिताभ बच्चन आणि ज्योतिष

लोकप्रिय अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्याच्या दूसर्‍या दिवशी आमचे एक ज्योतिषी मित्र श्री. धोण्डोपंत आपटे यांच्या ब्लॉगवर पुढील टिपण वाचायला मिळाले - http://dhondopant.blogspot.in/2012/02/blog-post_12.html

आमच्या ज्योतिषी मित्राचे भाकीत बरोबर आले याचा आम्हाला आनंद झाला पण दूसर्‍याच क्षणी आमचा चिकित्सक स्वभाव जागा झाला. भारतीय ज्योतिषांचा उत्तर बरोबर आले म्हणजे रीत बरोबर असलीच पाहिजे, अशातला प्रकार असतो. तसे हे नसावे असे मानून मी जालावरून श्री अमिताभ बच्चन यांचे जन्मटिपण मिळवले आणि एबर्टिन पद्धतीने पत्रिका माण्डली. आणि मला वेगळेच चित्र दिसले.

धोण्डोपतांच्या मूळ लेखात ते म्हणतात - "ज्यांचे कुंभ लग्न आहे आणि अष्टमात कन्येचा मंगळ आहे, त्या लोकांनी पोटाची काळजी घ्यावी. या लोकांच्या पोटावर येत्या अडीच वर्षात शस्त्रक्रिया संभवते. त्यामुळे पोटाची काळजी घ्यावी (स्वतःच्या).

सुप्रसिद्ध अभिनेते श्री. अमिताभ बच्चन यांचेही कुंभ लग्न आणि अष्टमात कन्येचा मंगळ आहे. श्री. बच्चनसाहेबांनी येत्या अडीच वर्षात पोटाची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांना पोटासंबंधी विकार या काळात संभवतात."

आता अष्टम स्थानाचा संबंध (माझ्या माहितीप्रमाणे) जननेंद्रियांशी मानला गेला आहे. प्रत्यक्षात श्री बच्चन यांच्या पोटावर शस्त्रक्रिया झालेली आहे. एकवेळ, जननेंद्रियाजवळचा पोटाचा भाग असावा म्हणून याकडे दूर्लक्ष करता येऊ शकते. पण ग्रहांची भ्रमणे बघता, धोण्डोपंतानी साडेसातीवरून हे भाकीत कसे वर्तवले हे मला कोडेच आहे.

प्रत्यक्षात, श्री अमिताभ बच्चन यांना
- रवीची आणि चंद्राची अशा दोन साडेसाती चालू आहेत. १+१ =३ अशातला हा भाग असतो. (रवी, चंद्र आणि लग्न यांच्या साडेसाती महत्त्वाच्या असतात. त्यात ख-मध्याचाही विचार व्हायला हवा).

- मूळ जन्मपत्रिकेत लग्न = नेपच्यून = रवी-शनी ही मध्यबिंदू रचना तयार झाली आहे. या रचनेचे फल एबर्टीन पुढील प्रमाणे देतो -lack of vitality.- A mental, emotional or physical crisis. याशिवाय सक्रिय झालेला जन्म पत्रिकेतला रवि आणि मंगळ पुढील रचना दाखवतात.

रवि= मंगळ = शनी - लग्न
"A keen awareness of the lack in freedom of movement, a strong desire
to go one's own ways in life. Difficult circumstances of living,
suffering from conditions of the environment , the process of getting ill,
the act of separation." (COSI, page193)

- सध्या गोचर नेपच्यूनचा जन्ममंगळाशी १३५ अंशाचा षडाष्टक(केंद्रयोगाच्या दर्जाचा) त्रासदायक योग होतो. नेपच्यून हा कमकुवतपणा आणि संसर्ग, विषबाधा इत्यादींचा कारक ग्रह आहे. श्री बच्चन यांचा मंगळ अष्टम स्थानात आहे.
- थोड्याच दिवसात नेपच्यऊन जन्मरवीशी १३५ अंशाचा षडाष्टक योग करेल आणि हा योग वक्री मार्गी भ्रमणाने जवळ्जवळ वर्षभर चालू असल्याने हे दूखणे चिघळणार हे नक्की. त्यात एप्रिल २०१२ मधली पौर्णिमा गोचर नेपच्यूनशी आणि जन्मरवीशी त्रासदायक योग करत असल्याने एप्रिल महिना तब्येतीच्या दृष्टीने त्रासदायकच ठरणार असे वाटते. थोडे पुढे जाऊन म्हणायचे झाले तर हे दूखणे जिवावर बेतणारे ठरु शकते.

शनिवार, ११ फेब्रुवारी, २०१२

शिवाजीचा खरा मोठेपणा

गुणवत्ता ही संस्कृतीसापेक्ष असते का याची चर्चा आमच्या आयायटीच्या माजी विज्ञार्थ्यांच्या ग्रुपवर चालू आहे. त्यात कळलेला एक किस्सा असा: मावळात उद्योग काढताना हताश झालेल्या एका उद्योजकाने काढलेले उद्गार - "शिवाजीचा खरा मोठेपणा औरंगजेबाशी लढण्यात नसून आळशी मावळ्याना एकत्र आणुन त्यांना कामाला लावण्यात आहे."

सोमवार, ३० जानेवारी, २०१२

ज्योतिष - गोचर मंगळ-शनी मध्यबिंदुच्या भ्रमणाचा परवाचाच माझा स्वत:चा अनुभव

नुकतीच पुण्यात एक दुर्दैवी घटना घडली. एका व्यक्तीने शनी-मंगळाच्या भीतीने स्वत:चे कुटुंब संपवले, अशी बातमी वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाली होती. या बातमीवर अनेकांनी अकलेचे तारे तोडले. आयुष्यातील संकटाना धैर्याने सामोरे जा, इत्यादि मते लोक अजूनही व्यक्त करत आहेत. असे फुकटचे बिनबुडाचे सल्ले देणाराना एक गोष्ट लक्षात येत नाही की हे धैर्य या वैफल्यग्रस्त व्यक्तीने नक्की कुठून गोळा करायला हवे होते? अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठेल्यावरून की नारळीकरांच्या आयुकातून? आत्महत्या हा चुकीचा पर्याय आहे, हे नि:संशय पण एखाद्या व्यक्तीच्या सपोर्ट सिस्टीम्स संपल्या तर त्याने येणारे वैफल्य हाताळायला कुणाकडे जायचे? फुकटचे सल्ले देणारांच्याकडॆ?

शनी-मंगळाच्या भ्रमणात नुसते अडथळेच येत नाहीतर तर जिवावर उठणारे प्रसंग उद्भवतात. काही वेळा हे प्रसंग अगोदर कल्पना असेल तर टाळता तरी येतात किंवा ते हाताळण्यासाठी मनाची तयारी ठेवायला ज्योतिषाची मदत होऊ शकते. काही आठवड्यापूर्वी गोचर मंगळ-शनी मध्यबिंदूच्या भ्रमणाचा अभ्यास करत असताना माझ्या असे लक्षात आले की हे भ्रमण लवकरच म्हणजे जानेवारीच्या अखेरीस माझ्या जन्मरवीवरून होणार आहे. या आगाऊ सूचनेमुळे मनात थोडेसे का होईना पण चरकायला झालेच. पण सावधगिरी शक्य तेव्हढी बाळगायची हा निर्धार केला आणि मनातून तो विषय काढून टाकला.
---
परवाच्याच शनिवारची घटना गोष्ट. मी माझ्या कुटुंबा बरोबर नगररोडच्या इन-ऑर्बिट या मॉल मध्ये गेलो होतो. माझा आणि माझ्या मुलीचा तिथे जाऊन पास्ता खायचा बेत होता. माझ्या बायकोला तिथले "मॉड"चे डोनट फार आवडतात. पास्ता फस्त केल्यावर आता काय याचा विचार चालू असताना आमच्या कन्येला तिथे कॅण्डीची टपरी दिसली. तिच्या पिगी बॅंन्केतले पैसे वापरण्याच्या अटीवर मी तिला कॅण्डी घ्यायला परवानगी दिली. कन्येने आम्हा दोघांसाठी आम्हाला आवडतात म्हणून डार्क चॉकलेट घेतले. लेकीच्या औदार्याचे कौतुक करून आम्ही उभयतांनी ते डार्क चॉकलेट खाल्ले आणि मॉलमधल्या सुपर-बझारकडे मोहरा वळवला.

थोड्याच मला छातीत अस्वस्थता वाटायला लागली. छातीत धडधड होऊ लागली. लिजीव घाबरागुबरा झाला. कपाळाला घाम आला. बायकोला मी ताबडतोब खरेदी आटपायला सांगून शौचालय गाठले. तिथुन आल्यावरही धडधड कमी होईना म्हणुन एक बाक शोधला आणि धडधड कमी व्हायची वाट बघत बसलो. एव्हाना ४५ मिनिटे होऊन गेली तरी फार फरक पडला नव्हता तेव्हा मी बायकोला तडक डॉक्टरांकडे निघण्याविषयी सुचवले. गाडी मॉलवरच सोडायची असे ठरवून पटकन रिक्षा पकडली आणि डेक्कन जिमखान्यावरचे प्रयाग हॉस्पिटल गाठले. डॉक्ट रांनी मला इसीजी काढल्यावर लगेच आयसीयु मध्ये दाखल व्हायला सांगितले. डार्क चॉकलेट मधल्या कॅफिनच्या अतिरिक्त (आणि अनियंत्रित) प्रमाणामुळे हा प्रसंग उद्भवला होता. आयसीयुत असताना मला माझी पत्रिका आठवली. योग्य ते उपचार लगेचच केल्याने माझी प्रकृती झपाट्याने सुधारली. दोन तासानी लगेचच आयसीयु मधून बाहेर आलो. दूसर्‍या दिवशी म्हणजे कालच डॉ. प्रयागांच्या राऊंड नंतर मला घरी जायला परवानगी मिळाली.

घरी आल्यावर लॅपटॉप चालू करून माझी पत्रिका उघडून बघितली तर मंगळ-शनी मध्यबिंदू गोचर भ्रमणाने माझ्या जन्मरविवर आला होता. एबर्टिन त्याच्या COSI मध्ये "मंगळ-शनी=रवि" या रचने बद्दल लिहितो - "Weak vitality, the inability to meet all demands or to master all situations,
the necessity to overcome illness.- The illness or the death of members of the male population."