रविवार, २४ नोव्हेंबर, २०१३

खात्री



सर,


तुम्ही फारच विकलांग झाला आहात!


अलिकडे बर्‍याचदा तुम्ही
या देवळाच्या पायरीवर
नाही तर त्या चौकातल्या बाकावर
कुणाला तरी शोधत असता.


जेव्हा जेव्हा मी तुम्हाला
बघतो तेव्हा अजिबात थांबावसं
वाटतं नाही की
चवकशी कराविशी वाटत नाही.


कारणे अनेक आहेत,
पण तो प्रसंग अजुनही चांगला
लक्षात आहे.


"अरे! तुझी स्वप्नं भंग पावली!"
असं तुम्ही बसमध्ये एकदा
भेट झाली तेव्हा हिणवले होते...


कदाचित
माझ्या स्वप्नांमध्ये
तुम्हाला काही वाटा नव्हता
म्हणुन असेल.


पण असो
काळ असा ना तसा,
आज ना उद्या,
न्याय करतो

तुमची भिरभिरती नजर
बघुन माझी
खात्री पटली आहे.

सोमवार, १८ नोव्हेंबर, २०१३

मूल्यमापन


आत्ताच फेसबुकवर एक प्रतिष्ठित प्रोफाइल बघत होतो. त्या प्रोफाइलच्या फोटोत एक मी काढलेला एक फोटो दिसला म्हणुन फोटोवर क्लिक केले आणि प्रतिक्रिया बघितल्या. फोटोवर ~७० लाईक्स आलेले बघुन मला गुद्गुल्या झाल्या. फोटो सदर प्रोफाइलधारकाच्या मित्र यादीतील एका व्यक्तीने शेअर पण केला होता.

असे मी काढलेल्या काही फोटोंच्या बाबतीत झाले आहे. मला माझ्या फोटोंची चोरी झाली तर फारसे वाईट वाट्त नाही. कारण ती माझ्या कामाला मिळालेली एक पावती आहे असे मी समजतो. सदर प्रतिष्ठित व्यक्तीने प्रामाणिकपणे "हा फोटो मी काढलेला नाही" असे घोषित केले असल्याने सध्या माझा पर्दाफाश वगैरे करायचा पण विचार नाही. पण गमतीचा भाग असा की हाच फोटो माझ्या फेसबुकवरील फोटोग्राफी पेजवर टाकलेला आहे आणि तिथे त्याला फक्त २च लाईक्स आलेले आहेत.

थोडक्यात मी केलेले काम मीच केलेले आहे यावर लोक विश्वास ठेवत नाहीत की याला नशीब म्हणायचे की आणखी काही? मला माहित नाही...

हा लहानपणापासुन सातत्याने येणारा हा अनुभव. या प्रकारातला १ला अनुभव मला शाळेत नववीत असताना आला. मला शाळेच्या मासिकात आपले लिखाण यावे अशी माझी तेव्हा खूप इच्छा होती. तेव्हा त्याचे खूप अप्रूप होते हे मात्र खरे. मी तेव्हा माझे पणजोबा कै. विठठल सीताराम गुर्जर यांच्या लेखनकर्तृत्वाने खुप प्रभावित झालो होतो. घरात आई आणि आजोबा त्यांच्या कथा-कादंबर्‍यांच्या गोष्टी अर्धवट सांगुन बाकी भाग मुळापासुन वाचायला प्रवृत्त करायचे. सुदैवाने माझ्या शाळेच्या ग्रंथालयाने माझी ही गरज मोठ्या प्रमाणात भागवली. मी "सावर्‍यातल्या मामांवर" (गुर्जरांवर) लेख लिहायचा मनोदय आजोबाना सांगितला तेव्हा ते मला पणजीकडे (इंदिराबाई गुर्जरांच्याकडे) आणि इतर नातेवाईकांकडे उत्साहाने घेऊन गेले. इंदिराबाई गुर्जरांनी त्यांच्याकडे असलेले फोटो, अत्र्यांनी मराठात लिहीलेला अग्रलेख, ध्रुव मासिकातील मुलाखत आनंदाने दिली.

घरातुन उत्तेजन मिळाल्याने मी तो लेख एका आठवड्यात एकट्याने लिहून पूर्ण केला. नंतर एक दिवस शाळेच्या वार्षिकासाठी मजकुर पाठवा अशी सूचना वर्गावर्गात फिरली तेव्हा मी मांडकेसरांना जाऊन भेटलो आणि लेख देऊन आलो आणी विसरुन पण गेलो. नंतर ३-४ आठवड्यानी मांडकेसर अचानक वर्गावर आले आणि "राजीव उपाध्ये कोण आहे. जरा बाहेर ये पाहू" असं म्हणुन मला बाहेर बोलावले. नंतर त्यांनी माझी प्राथमिक चवकशी केली आणि "तुझ्या घरात कुणी मराठी घेऊन एमए करत आहे का" असा प्रश्न विचारला. मी गोंधळलो. मी एकुलता एक असल्याने भाऊ-बहीण असण्याचा प्रश्न नव्हता. मग मांडके सर पुढे म्हणाले, "हा लेख मला नववीतल्या मुलाने लिहीलेला वाटत नाही. तु हा एखाद्या एमेच्या विद्यार्थ्याकडुन लिहुन घेतला असावा असे वाटते." त्यावर मी मात्र उडालोच. मग मी सरांना लेख लिहीण्यासाठी काय काय कष्ट घेतले ते कसेबसे समजावले. सरांची समजुत पटली असावी. सरांनी मग तो लेख काटछाट करून परत लिहून आण मग मी तो घेईन असे फर्मावले. मी पडत्या फळाची आज्ञा मानुन तो लेख संपादित केला आणि तो छापुन आल्यावर माझ्या आनंदाला पारावर उरला नाही.

पण गमतीचा भाग अजुन पुढेच होता. उन्हाळ्याची सुट्टी लागली आणि मी शिरस्त्याप्रमाणे कवठेकर सरांच्या घरी गेलो तेव्हा सरांनी माझे नेहेमीपेक्षा जास्त कौतुकाने स्वागत केले. सरांनी माझा लेख वाचला होता. सर मला तसेच त्यांच्या दिवाणखान्यात घेऊन गेले. तिथे त्यांच्या वडिलांशी म्हणजे दत्त रघुनाथ कवठेकरांशी गप्पा मारायला प्रा. म. ना. अदवंत आले होते. कवठेकर सरांनी प्रा. अदवंतांशी माझी ओळख करुन दिली आणि नूमवीय वार्षिक अंकातील माझा लेख त्यांना कौतुकाने वाचायला दिला. प्रा. अदवंतांनी त्यातले अक्षर-अन्-अक्षर वाचले आणि म्हणाले, "अभ्यासपूर्वक लिहीला आहेस, एमेचे विद्यार्थी पण असे लिखाण करत नाहीत". मला मांडके सरांबरोबर झालेला संवाद आठवला आणि अंगावर काटा उभा राहीला.

असे प्रसंग नंतर माझ्या आयुष्यात अनेक आले.

मी कॅलिग्राफी करायचो तेव्हा माझ्या कामाचे श्रेय माझ्या एका मित्राला मिळायचे. तो प्रसिद्ध सुलेखनकार प्रा. र. कृ. जोशींचा विद्यार्थी होता. मी र. कृंकडे एक (ती पण एक दिवसाची) कार्यशाळा वगळता शिकलो असं म्हणता येणार नाही. पण त्यांना काम करताना जेव्हा जेव्हा बघितले, तेव्हा र. कृ माझ्या डोक्यात भिनले. आणि त्यामुळे र.कृ. माझे मानस-गुरु बनले.

नंतर मग अचानक एकदा साक्षात र. कृ. जोशीना माझी कॅलिग्राफी दृष्टीला पडली. ते थबकून ती बराच वेळ न्याहाळत होते. मी तिथेच उभा होतो.

र. कृ. नी विचारले, "हे कुणाचे आर्ट्वर्क आहे?"
मी म्हटले, "सर, माझेच आहे"
"अरे! व्वा. कुणाकडे शिकलात?"
"सर, तुमच्याचकडे" असं म्हणुन मी त्यांना वाकुन नमस्कार केला. त्यावर रकृ गोंधळले आणि बाजुची खुर्ची ओढुन बसले आणि म्हणाले
"तुम्ही माझ्याकडे कधी येत होता?"
मग मी त्यांना सर्व खुलासा केला. त्यावर ते प्रसन्नपणे हसले आणि माझ्या इतर कामाची आस्थेने चवकशी केली आणि कॅलिग्राफी पुढे चालु ठेवायला उत्तेजन दिले. असो.

या सर्व प्रसंगांचा मथितार्थ एकच - आपल्या क्षमतेचे नकारात्मक मूल्यमापन करायला हिरीरीने पुढे येणारे शेकड्याने असतात पण खरे मूल्यमापन फकत अशा अनुभवांतुनच होत असते.

रविवार, २७ ऑक्टोबर, २०१३

"गोल्डमेडल"



ही गोष्ट आहे मी कॉलेजात असतानाची...

तेव्हा शुद्ध गणितात चमकणार्‍या ईश्वराच्या लाडक्या पुत्रांबद्दल माझ्या मनात एक असूया निर्माण झाली होती. या माझ्या मनातल्या असूयेने  मी त्यावेळेला गणितात गोडी वाढविण्यासाठी काहीसे दिशाहीन प्रयत्न करत होतो. ते बघुन माझा एक मित्र मला म्हणाला,
"तुला प्युअर मॅथ्समध्ये interest असेल तर माझ्या बरोबर प्रा. श्रीराम अभ्यंकरांकडे चल. ते उत्तेजन देतात आणि मदत पण करतात".

मला ती कल्पना आवडली आणि आम्ही एका दिवशी दुपारी ४ वाजता प्रा. अभ्यंकरांच्या घरी जाऊन थडकलो. बुट, चपला काढुन दिवाणखान्यात दारावर टक्टक करून पाऊल टाकले तेव्हा एका दिवाणावर बनियन, पायजमा अशा पोषाखात उशीवर हनुवटी टेकवुन पालथे पडलेले प्रा. अभ्यंकर दिसले. आमची चाहुल लागताच, न उठताच त्यानी "या बसा" केले.

मित्राने माझी ओळख करून दिली. प्रा. अभ्यंकरांनी लोळतच प्राथमिक चवकशी सुरु केली...

"काय सध्या वर्गात कोणता टॉपिक चालला आहे?"
"Determinants, Sir" - माझा मित्र उत्तरला...
"काय रे Determinants म्हणजे काय रे"?

आम्ही दोघांनी पाठ केलेल्या व्याख्या घडाघडा म्हणुन दाखवल्या.

मग  प्रा. अभ्यंकरांनी आणखी एक प्रश्न विचारला. आमच्याकडुन जसजशी उत्तरे मिळाली तेव्हा प्रश्नांची पातळी अधिकाधिक अवघड होत गेली. प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी कागद-पेन वापरायची परवानगी नव्हती. पुस्तके बरोबर नव्हती म्हणुन ती पण बघायचा प्रश्न नव्हता.

प्रश्नांची उत्तरे जेव्हा चुकली तेव्हा प्रा. अभ्यंकरांनी प्रश्नांची फोड केली किंवा पुनर्रचना केली. पण आमच्याकडुन बरोबर उत्तर मिळवायचेच आणि मग पुढचा प्रश्न टाकायचा हा उद्योग चालु ठेवला.

हे सर्व चालु असताना दिवाणावर उशीला कवटाळुन लोळणे चालुच होते. कधी नव्हे एव्हढे माझ्या डोक्याने सलग उत्तरे द्यायचे काम केल्याने डोक्याला मुंग्या यायला सुरुवात झाली आणि मग होता होता रात्रीचे आठ वाजले.

ते दिवस मोबाईलचे नव्हते. घरी आई-वडील वाट बघतील किंवा उशीर झाला म्हणुन रागवतील म्हणुन आम्ही प्रा. अभ्यंकरांना मध्येच थांबवले आणि परत यायची अनुमती मागितली. त्यावर प्रा. अभ्यंकरांनी गृहपाठ म्हणुन आणखी दोन प्रश्नांची उत्तरे शोधुन यायला सांगितले.

आम्ही उठुन बुट-चपला घालायला गेलो तेव्हा प्रा. अभ्यंकर दिवाणावरुन उठले आणि दारापाशी निरोप द्यायला आले आणि म्हणाले,
"तुमच्यापैकी प्युअर मॅथ्स पुढे कोण करणार?"

मी धीर करून म्हणालो,
"सर, प्युअर मॅथ्स करणं हे फक्त गणितात गोल्डमेडल मिळवणार्‍या ईश्वराच्या लाडक्या पुत्रांच काम..."

त्यावर प्रा. अभ्यंकर हसले आणि म्हणाले,
" एक मिनिट, जरा थांब... महाराष्ट्रात किती विद्यापीठे आहेत?"

अचानक वेगळाच प्रश्न आल्याने बुटाच्या नाड्या बांधता-बांधता माझी भंबेरी उडाली.
"पुणे, मुंबई, नागपुर, शिवाजी आणि मराठवाडा... " आम्ही पट्‍कन हिशेब मांडला.

"...आणि संपूर्ण भारतात अशी किती विद्यापीठे असतील" - प्रा अभ्यंकरांचा पुढचा प्रश्न.

"अंदाजे दीडशे-दोनशे" मी उत्तरलो.

"आता बघ प्रत्येक विद्यापीठात दरवर्षी बीएस्सीला एक आणि एमेस्सीला एक अशी दोन पदके दिली जात असतील. म्हणजे दरवर्षी भारतात साधारणपणे ४०० गोल्डमेडल्स दिली जातात. म्हणजे गेल्या १० वर्षांत एकंदर ४००० हजार गोल्डमेडॅलिस्ट भारतात तयार झाले. हे सगळे कुठे गेले? हे काही करताना दिसत नाहीत?"

मी "हे काही करताना दिसत नाहीत?" हे वाक्य ऐकुन नि:शब्द आणि थक्क झालो आणि त्याक्षणी माझ्या  मनातला प्युअर मॅथ्सबद्दल असलेला न्यूनगंड नाहिसा झाला. घरी परत येताना आम्ही त्या प्रश्नोत्तर संवादाची उजळणी केली तेव्हा केवळ तोंडी उत्तरे देतदेत त्या चार तासात जी मजल गाठली त्या जाणीवेने अंगावर मूठभर मांस नक्कीच चढले होते.

विज्ञानप्रचाराच्या नावाखाली स्वत:ला प्रसिध्दीच्या झोतात ठेवुन परीकथा पाडणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ वेगळे आणि विचारशक्ती फुलवुन भयगंड घालवणारे प्रा. अभ्यंकर निराळे...

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१३

हॊ मी वाईट आहे!



हॊ मी वाईट आहे!

मला माहित आहे की मी "वाईट" आहे
आणि खूप वर्षांपासुन आहे
आणि तसा मी वेडापण आहे...

आयुष्याची पन्नाशी नुकतीच गाठली
आणि माझ्या वाईटपणाचं मूळ
सापडलं...

फार तपशीलात जायची गरज नाही

मी कष्ट करून लिहिलेल्या संशोधन निबंधाला
सहलेखक म्हणुन त्यांचे नाव लावले नाही
मग मी त्यांच्या नजरेत  कायमचा वाईट बनलो.

MD परवानगीशिवाय मिटींग मध्ये
सिगरेटी फुंकुन वात आणे. त्याबद्द्ल नाराजी
दर्शवली तेव्हा मी वाईट ठरलो.

गरजा कमी ठेऊन, चार पैसे गाठीला बांधुन
सन्मानाने जगतो म्हणुन पण मी
वाईटच ठरलो.

त्यांच्या नजरेतुन जग बघत नाही
हा पण माझा एक वाईटपणाच आहे

अशी किती उदाहरणे द्यावीत तेव्हढी थोडीच...

थोडक्यात काय
माझ्या उत्कर्षाची किल्ली
मी सोडुन सर्वांकडे आहे
मी ती घ्यायला जात नाही
मग कुणी मला
कंट्रोल करु शकत नाही

नेमकं तेच
माझ्या वाईटपणाचं
मूळ आहे

बुधवार, २ ऑक्टोबर, २०१३

द विनर इफेक्ट



The Winner Effect

-----------------------




The Winner Effect: The Science of Success and How to Use It हे Ian Robertson चे पुस्तक घेऊन बरेच दिवस झाले होते. खरं तर ते मी माझ्या लेकीसाठी घेतले होते. पण तिला अभ्यासातुन वेळ मिळत नसल्याने मी वाचायला घेतले. पुस्तक मी क्रमश: वाचतोच असं नाही पण या वेळेला १ल्या प्रकरणापासुन वाचताना काही केल्या पकड घेतली जात नव्हती. शेवटी मी अधेमधे चाळत असताना The winner's brain हे प्रकरण रोचक वाटल्याने वाचायला सुरुवात केली.




सभोवतालच्या वातावरणाचा मेंदूच्या जडणघडणीवर परिणाम होतोच, पण यश/अपयश पण त्यावर अवलंबुन असते, असे प्रतिपादन The winner's brain या प्रकरणाची पाने चाळताना आढळल्याने मी अधिक उत्सुकतेने पुढे वाचन चालु ठेवले. अजुन पूर्ण वाचुन झाले नाही पण खालील काही मजकुर वाचल्यावर आजवर अनेक ज्या गोष्टींना अवास्तव महत्व दिले गेले किंवा निरर्थक मानले आहे, ते तसे नक्की नसते.




श्रीकृष्णाचे आणि माझे जाहिर वाकडे आहे. हजार सूर्यांच्या तेजाशी बरोबरी करणारा ( खरं तर गमज्याच ह्या) एक युद्ध थांबवु शकला नाही, हे काही केल्या पटत नाही. मला त्याचा कर्मयोग पण पटत नाही. चातुर्वण्याची तरफदारी तर नाहीच नाही. पण मी त्याला फकत गीतेमधल्या एका श्लोकासाठी माफ करतो. तो श्लोक म्हणजे -

अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम्‌ ।

विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम्‌ ॥




अर्थ यशस्वी होण्यासाठी पांच गोष्टीची आवश्यकता असते. त्या म्हणजे जागा, agent, साधने, प्रयत्न आणि शेवटचे म्हणजे दैव...




यात जागेचे महत्त्व आपल्याकडे "नाचता येईना अंगण वाकडे" सारख्या म्हणी प्रचारात आणुन कमी केले गेले आहे. पण आधुनिक मानसशास्त्रीय प्रयोगांचा हवाला देत केलेल्या प्रतिपादनानुसार यशस्वी होण्यात जागा निर्णायक ठरते. मागे पुणे विद्यापीठातले एकजण मी त्यांच्या हाताखाली पीएचडी करावी म्हणुन हात धुवुन मागे लागले होते. पण माझ्या आयायटितल्या एका प्राध्यपकांनी मला सूचक सल्ला दिला तो मी मानला आणि संभाव्य शोषणापासुन नंतर येणार्‍या वैफल्यापासुन स्वत:ला वाचवले. ( प्रा. अरूण कुमारांनी मला सांगितले होते की, पीएचडी करणे हे एक प्रकारे लग्नासारखे असते. जागेचा आणि ज्या व्यक्तीच्या हाताखाली पीएचडी करायची, त्यांचा कमीतकमी एक वर्षाचा अनुभव असल्याशिवाय त्या फंदात पडु नको. )




The Winner Effect या पुस्तकातला मला पुढे वाचायला प्रवृत्त करणारा मजकूर पुढे देत आहे -




It may seem strange that where you happen to be located determines what changes happen in the brain, and peculiar that Fuxjager's mice should show only these crucial brain changes when they fought at home. But something simillar happned during the Vietnam War, where it was estimated that majority of US service personnel had used heroin and one in five of them were addicted to it. A feared epidemic of returning drug addict did not transpire and most of the addicts did not remain addicts once back home in America. This was major headache for experts in addiction, who regarded heroin addiction as a biologically determined disease that once established, was very difficult to eradicate. [page 65]




...




Siegel's research shows us that very chemistry of our bodies is tuned to the physical, social and psychological environment. [...] Was Mike Tyson's testosterone-fuelled winner effect another example of brain and body chemistry being shaped by environment. [page 67]







Russell Hill and Robert Barton of the University of Durham in England made the discovery about the shirt colours when they studied the results of Athen's Olympics bouts in these blue-red sports. Hill and Barton were able to look just at bouts between competitotors of equal ability - this was possible by looking at their pre-Olympic rankings. And when they did this, an astonishing fact emerged: red shirted competitors won 62 per cent of the time, compared with only 38 percent of the blue shirted competitors. [page 70]




हे सर्व वाचल्यावर आपल्याला प्रसन्न ठेवणार्‍या वातावरणाचे, विधींचे (rituals), श्रद्धांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, हे पटायला हरकत नाही. खच्ची करणारे नातेसंबंध, मित्र-परिचित केवळ "नाते टिकवणे महत्त्वाचे" या हट्टापायी जपणे हा निव्वळ मूर्खपणा आहे असे मला वाटते.




http://www.amazon.in/Winner-Effect-Epz-Edition-Robertson/dp/1408850060/ref=sr_1_4?ie=UTF8&qid=1380690534&sr=8-4&keywords=The+Winner+Effect

शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०१३

संगीतातील हास्यरस



संगीतात हास्य रस नसतो असं म्हणतात. पण या समजाला आह्वान/छेद देतील अशा काही रचना मला अलिकडेच ऐकायला मिळाल्या. कुणाला हसवुन हसवुन मारायचे असल्यास या रचना ऐकवाव्यात. या कलाकृती सादर करणार्‍या कलाकारांच्या प्रयोगशीलतेचे कौतुक करावे तेव्हढे मात्र थोडेच आहे.








http://www.youtube.com/watch?v=GUAnlLnEuXo


http://www.youtube.com/watch?v=NeBqfDL77wA


यातली १ली पाश्चात्य रचनाकार रॉसिनी याच्या "विल्यम टेल" या रचनेवर आधारीत आहे. एक आई तिच्या मुलाना २४ तासात काय काय ऐकवते हे अनिता रेन्फोर्ट या गायिकेने २ मि ५५ से मध्ये बसवले आहे. हे सर्व कुठेही न अडखळता, कागद हातात न धरता सादर करायचे तिचे कौशल्य अचाट आहे.


२ री आणि ३री रचना मात्र भारतीय संगीतावर इंग्लिश शब्द प्रयोगांनी बांधल्या आहेत. २री रचना पोट धरधरून हसवते.


पुण्यात पूर्वी आफळेबुवा म्हणुन एक कीर्तनकार इंग्लिश्मध्ये कीर्तन करायचे त्याची या निमित्ताने आठवण झाली.

सोमवार, ९ सप्टेंबर, २०१३

शुभशकुन



दहा मिनिटापूर्वीची गोष्ट...


आमच्या मायक्रोवेव्हची bottom plate गेले ७-८ वर्षे अड्कून पडली होती. ती दुरुस्त पण होत नव्हती. अनेक कारणांमुळे मायक्रोवेव्ह टाकुन द्यायला मन धजत नव्हते (इतर कार्ये व्यवस्थित चालु होती).


आत्ता एक चमत्कार झाला...


चहा गरम करत असताना अचानक प्लेट फिरायला लागल्याचे दिसले... विवेकवादी कारण एकच- काल चहा प्लेट्शिवाय गरम करताना उतु गेला आणि सांडला (बायकोने कडकड पण केली). तो खालच्या jam झालेल्या प्लेट-होल्डरमध्ये झिरपला आणि वंगण मिळाल्याने प्लेट फेरायला लागली.


काहींच्या मते हा निव्वळ योगायोग...काहींच्या मते हे व्हायचेच होते.


मला मात्र अड्कून साचुन राहिलेली कामे अचानक मार्गी लागल्याने मनाला जी उभारी मिळते तसे काहीसे झाले आहे.


आजी आणि आई म्हणाल्या असत्या, "अरे, हा शुभशकुन आहे"


काहीही असो. मनाची उभारी महत्त्वाची...


शुभशकुन झिंदाबाद...

रविवार, ४ ऑगस्ट, २०१३

दिलासादायक : बायकी हलकटपणाला लगाम...

'बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या महिलांवर खटला चालवा'

“काहीजण सहमतीने संबंध ठेवतात. पण काही बिनसल्यानंतर तक्रार केली जाते आणि नंतर सेटलमेंट करून तक्रार मागेही घेतली जाते. हा सध्या ट्रेण्ड होत चालला आहे. त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याचं” कोर्टाने म्हटलं आहे.

http://www.abpmajha.newsbullet.in/mumbai/103/31978

मला "लवकर बरे व्हा" असा संदेश देणारे, बायकांचा सरसकट कैवार घेणारे तसेच
माझ्याकडे विदा मागणा-या सर्वांची तोंडे आता बंद होतील ही अपेक्षा करतो...

मंगळवार, ३० जुलै, २०१३

राग!

काल माझ्या शाळेतल्या मित्राने मला एका व्याख्यानाचा व्हिडीओ (http://youtu.be/U0S9179jgRc)बघायला सांगितला म्हणुन डाउनलोड करुन आवर्जुन बघितला.
या व्याख्यानाच्या शैलीने आमची पिढी घडवली
या शैलीला नाव काय द्यायचं सुचत नव्हतं
पण आता सुचलं - हे होतं "गद्यगायन"...
आवर्जुन बघायचं कारण
ते दोन गायक होते
पु. ल. देशपांडे आणि वाजपेयी
त्यांनी दोघांनी आळवला "राग सावरकर"
एकाची ग्वाल्हेर गायकी तर दुसर्‍याची गंधर्व गायकी
एकांनी आपली बंदीश कागद (नोटेशन) बघुन मांडली
तर दुसर्‍याने उत्स्फूर्तपणे...
हा "सावरकर" राग उत्तरांगप्रधान,
आलापी फारशी नाही. जयपुरसारखी एकदम उडी मारून बंदीशीला सुरुवात...
"सशस्त्र क्रांति" हा वादी सूर
"राष्ट्रवाद" हा संवादी
"नास्तिकता" "बुद्धीवाद" हे अनुवादी सूर
(सहिष्णुता समभाव हे विवादी सूर...!)
पु लंनी अनुवादी सुरांचे सौंदर्य खुलवले
तर वाजपेयीनी वादी-संवादी
असे पकडले होते...
तर अंदमानतल्या हालअपेष्टांचे सूर तानपुर्‍यावर
असे जुळले होते
अहाहा!
एक मात्र खरं
अशी गद्यगायकी
आजकाल ऐकायला मिळत नाही...
राग सावरकर पण
फारसा कोणी गात नाहीत...
मला मात्र "राग तिलक" फारफार आवडतो...

सोमवार, २९ जुलै, २०१३

सूक्ष्मकथा - ६



मला लोकांची (आणि पर्यायाने समाजाची)
एक गोष्ट कळत नाही...

तुम्ही त्यांच्याबरोबर शर्यतीत भाग घेतला तर
त्यांना तुम्हाला हरवायचे असतं
मग तुम्ही शर्यत जिंकू नये म्हणून
ते काहीही करतात...
अगदी शर्यतीतून बाहेर पण काढतात...

पण नियती गंमत करते,
ती तुम्हाला अशा ठिकाणी ठेवते की
तिथे हारजित काहीही नसतं...

मग हेच लोक
तुम्ही शर्यतीत भाग घेत नाही
म्हणुन तुम्हाला दोष देत राहतात.

गुरुवार, ३० मे, २०१३

वैदिक धर्माचे शास्त्रीय अधिष्ठान किंवा वेदांत विज्ञान कसे आले : एक शोध



जे जे वैदिक आहे ते पूर्णपणे शास्त्रीय आहे आणि म्हणुनच वैदिकधर्म हा एकच धर्म असा आहे की ज्याला पूर्णपणे शास्त्रीय अधिष्ठान आहे. हा महत्त्वाचा साक्षात्कार आत्ताच आम्हाला झाला. केवळ "शहाणे करून सोडावे सकळ जन" हे आमचे ब्रीद असल्यानेच हा स्टेटस-पोस्ट-प्रपञ्च...

संस्कृत मध्ये असलेला विद्‍ हा धातु वेद या शब्दाच्या मुळाशी आहे, हे सर्वाना ठाऊक आहे. पण विद्‍ आणि वेद यांना जोडणारी महत्त्वाची आर्ष संकल्पना म्हणजे विदा (डेटा) होय. वैदिक हा शब्द विदा पासून निर्माण होतो, जसे निसर्ग-नैसर्गिक. सांगायचे तात्पर्य असे की निसर्ग अगोदर असल्याशिवाय नैसर्गिक ही कल्पना अस्तित्वात येऊ शकत नाही त्याप्रमाणेच विदा अस्तित्वात असल्याशिवाय वैदिक, वेदादि संकल्पना निर्माण होऊ शकत नाहीत. विदा म्हणजे आमच्या रानटी ऋषीपूर्वजांनी केलेल्या इंद्रियगम्य निरीक्षणातून जी माहिती गोळा केली ती. विदा अस्तित्वात असल्याशिवाय वेद रचणे आणि वेदांत विज्ञान मांडणे केवळ अशक्य आहे असे आमचे आग्रहाचे मत आहे. विदा साठविण्याची कोणतीही आधुनिक साधने उपलब्ध नसल्याने हे विदाजन्य म्हणजेच वैदिक ज्ञान आमच्या ऋषीपूर्वजांनी मौखिकपद्धतीने जतन आणि संक्रमण करण्याचा उद्योग आरंभिला. कोणत्याही विद्यातून एखादा आलेख, त्यात लपलेले गणिती सूत्र जेव्हा विद्वान/शास्त्रज्ञ बाहेर काढतात (आणि शास्त्रीय नियतकालिकात प्रसिद्ध करतात) तेव्हा विद्याचे महत्त्व तसे संपुष्टातच येते. तद्वतच आमच्या ऋषीपूर्वजांनी गोळा केलेल्या विद्यातून जे ज्ञानकण वेचले, ते सूक्तांच्या रूपाने ग्रथित केल्यावर आमचे ऋषीपूर्वज विदा नष्ट करते झाले. त्यांनी शोधलेल्या जटा-घनपाठादि कल्पना वापरून जर विदा जर जतन केला गेला असता, तर हजारो वर्षे टिकून राहिलेल्या वैदिक परंपरेने दक्षिणेच्या रुपाने केव्हढा मोठा आर्थिक भार मधल्या काळातल्या आश्रयदात्या राजवटींवर टाकला गेला असता, याची कल्पनाच केलेली बरी. मुख्य म्हणजे ऋक्सामयजुर्वेदादि शाखांचे अध्ययन/पठण करणार्‍या ब्राह्मणांप्रमाणे कदाचित विदापठण करणारी ब्राह्मणांची एक (किंवा अधिक) शाखा निर्माण झाली असती.

आज विदापठण अस्तित्वात नसले तरी वेदकाळात विदापठण अस्तित्वात असावे आणि अग्निचयना सारखा विदाचयन असा एखादा विधी वेदकालात अस्तित्वात असावा (जो पुढे वर दिलेल्या कारणांमुळे नाहिसा झाला) असे आमचे आणि आमच्यासारख्या अनेक इंडॉलॉजिस्टांचे मत आहे. विदाचयनाच्या वेळी सूक्त करते ऋषि होमात आज्याची आहुती देत आणि विद्यातील संगती शोधायचा प्रयत्न करत. ही संगती सापडल्यावर त्यांनी जी सूक्ते रचली ती म्हणजे आजचे वेद आणि वेदांतील विज्ञान होय.

असो. सनातन प्रभात सारख्या संस्था, प. वि. वर्तकांसारखे पुण्यश्लोक द्रष्टे हे वेदांतले अमूल्य विज्ञान लोकांना सांगायचा जेव्हा प्रयत्न करतात तेव्हा त्यांची जी निंदा-नालस्ती केली जाते ते बघुन आम्ही व्यथित होतो. पण भविष्यात या भारतवर्षात एक दिवस असा नक्की उगवेल की घराघरात वैदिक-आज्याचा(*) ज्ञानदीप घराघरात पेटेल आणि "विदा दाखवा" अशा सारख्या आरोळ्या ठोकणार्‍या श्री. घासकडवी आणि इतर जालकंटकांची तोंडे कायमची बंद होतील अशी आशा करुयात...

* विदारुपी तुपाचा

रविवार, २६ मे, २०१३

मोकळेपणा...



काल माझ्या मुलीने तिच्या क्लासला दांडी मारली आणि माझ्या देखत तिच्या बाईंना फोनकरून सांगितले. बाईनी तिला कारण विचारले तेव्हा ती अत्यंत सहज म्हणाली, "अहो मॅडम, माझे पिरीयडस् आले आहेत आणी पोट खुप दुखतंय." मला त्या संवादातल्या सहजतेची आणि मोकळेपणाची ( किंचित हेवा आणि) खूप गंमत वाटली. तिचे पिरीयडस् चालु झाले तेव्हा १ल्यांदा तिने अगदी आनंदात मलाच सांगितले होते.

पुरुषांच्या लैंगिक जीवनाबद्दल असा मोकळेपणा मला आजतागायत दिसला नाही. कधी मित्रांनी wetdreams किंवा हस्तमैथुनाबद्दल बोललेले आठवत नाही. पुरुषांची लैंगिक अभिव्यक्ती कायम vulgar स्वरूपातच का बाहेर पडते?

आयायटीत असतानाचा एक प्रसंग. सुटी असल्यामुळे हॉस्टेल बरेच शांत होते. मी व्हरांड्यात फेर्‍या मारताना माझ्या एका मित्राच्या खोलीतून खडखड आवाज ऐकू आला. मला आश्चर्य वाटले म्हणून तिथे रेंगाळलो. पण खडखडाट तसाच चालु राहिला. मग माझं कुतुहल चाळवलं म्हणुन मित्राच्या रुमच्या खिडकीला लावलेल्या फाटलेल्या कागदाच्या छिद्रातुन आजुबाजुला कोणी नाही हे बघुन आत काय चाललंय हे बघितले, तर अनपेक्षितपणे सर्दच झालो. पूर्णपणे नग्नावस्थेत असलेला माझा मित्र एका हातात प्लेबॉय घेऊन दुसर्‍या हाताने आत्मानंदाच्या उपासनेत तल्लीन झाला होता. अनपेक्षित दृष्याने अंगावर शहारे आल्याने मी तिथुन बाजुला झालो.

संध्याकाळी ४ च्या सुमारास हाच मित्र माझ्या रुमवर आला आणि म्हणाला, "चल मी "स्टाफ-सी"ला (कॅण्टीन) चहा प्यायला जातोय, येतोस का?" मी हो म्हटलं आणि त्याच्या बरोबर गेलो. त्याने दोघांसाठी चहा आणला, आणि आम्ही थोड्या इकडच्यातिकडच्या गप्पा मारल्यावर, माझ्यावर नजर रोखून त्याने मला विचारले,

"Can I ask you a question?"

मी होकारार्थी उत्तर दिले.

"राजीव, डु यु मास्टरबेट?" मित्राने मला विचारले.

या अचानक आलेल्या प्रश्नाने मी कावराबावरा झालो आणि इकडेतिकडे बघायला लागलो. तेव्हा आमच्या शेजारच्या टेबलावर बसुन आमचा संवाद ऐकणारे एक प्राध्यापक महाशय उठले आणि आपला चहाचा कप घेऊन दुसर्‍या टेबलावर जाऊन बसले...

शुक्रवार, १० मे, २०१३

[श्रद्धांजली] गायला लावणारा अवलिया



आयुष्याला पूर्णत्व कशामुळे येत असावं...सर्वसाधारणपणे ९९ टक्के लोक उत्तर देतील की ध्येयपूर्तीमुळे, स्वप्नपूर्तीमुळे. मला मात्र माझ्या आयुष्याचे पूर्णत्व अनेकदा घेतलेल्या दिव्यत्वाच्या अनुभूतीमध्ये आहे असे वाटते. ही दिव्यत्वाची अनूभुती मला अनेकांकडुन मिळाली. त्यातली एक महत्वाची व्यक्ती म्हणजे उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर म्हणजे आमचे छोटे उस्ताद.

संगीतामध्ये माझ्या अशा ज्या आवडी आहेत त्या मला कुणामुळे लागलेल्या नाहीत. समीक्षकांनी, देवपित्यांनी उधळलेल्या स्तुतीसुमनानी प्रभावित होऊन माझी आवड विकास पावली नाही. मी माझ्या आवडीचे श्रेय कुणालाही देऊ इच्छित नाही. माझी आवड अत्य़ंत बेसावध क्षणी, केवळ योगायोगाने आलेल्या दिव्यत्वाच्या अनुभवाने निर्माण झाली आणि विकास पावली. दिव्यत्वाच्या अनुभूतीचे एक खास वैशिष्ट्य असतं. हा अनुभव तुमच्यात कायमस्वरूपी अंतर्बाह्य उलथापालथ घडवून आणतो. एक वानगीदाखल उदा देतो. रविशंकरांची सतार रेडीओमुळे सतत कानावर आदळून आवडायला लागली होती (आवडायलाच हवी, नाही आवडली तर लोक तुच्छपणे बघतात). पण १९८४ मध्ये आमच्या घरी टिव्ही आला, तेव्हा प्रथम उस्ताद झिया मोईदुद्दीन डागर यांचे रूद्रवीणावादन ऐकले आणि सतार मनातून उतरली ती कायमची.

मल्लिकार्जून मन्सूर, केसरबाई, एमणी शंकरशास्त्री, झिया मोईदुद्दीन डागर आणि त्यांचे धाकटे बंधु उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर हे असेच मला अत्यंत बेसावध क्षणी भेटलेले दिव्यात्मे. त्यांनी नंतर मला कधीच सोडले नाही.

उस्ताद झिया फरिदुद्दीन डागरांच्या बाबतीत पण असेच काहीसे झाले. १९९० मध्ये स्पीकमॅकेने आमच्या आयायटीत एक मोठा संगीत महोत्सव आयोजित केला होता. मला केवळ गाणं ऐकायला प्रा. सहस्रबुद्ध्यांनी रजा मंजूर केली होती. सकाळच्या सत्रामध्ये झिया फरिदुद्दीन डागर आणि साथीला गुंदेचा बंधू गायला बसले होते. त्यांनी जवळजवळ दीड्तास जौनपुरी आणि मग हिंडोल गायला. त्या गायनाने आमच्या बॅडमिंटन हॉलचे छ्प्पर फाडून अंतराळाला गवसणी घातली होती. त्यानंतर माझ्या मनाचा एका मोठा भाग उस्तादांच्या बुलंद (हा शब्द फारच तोकडा आहे) गायकीने व्यापून टाकला होता. हे गाणं परत परत कसं ऐकायला मिळणार या भावनेने अस्वस्थ व्हायला व्हायचे. पुढे या दिव्य गायकाशी आपला बादरायण का होईना, पण संबंध निर्माण होईल, ही कल्पना पण मनाला शिवली नव्हती. हळुहळु गुंदेचा बंधुंच्या कॅसेट प्रकाशित व्हायला लागल्या. आणि काही प्रमाणात माझी डागर गायकीची तहान काही प्रमाणात भागली गेली. या काळात मला कंठसंगीत शिकायची अनिवार ओढ निर्माण झाली होती. शिकायची तर ज्या गायकांच्या माझ्यावर प्रभाव पडला होता त्यांचीच गायकी असं मी मनाशी ठरवले होते.

पुढे अनेक वर्षे गेली. सुमारे २००१ च्या सुमारास पुण्यात वीणा फौंडेशन नावाच्या एका संस्थेने एक मैफल आयोजित केली होती. उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर आणि त्यांचे शिष्य उदय भवाळकर एकत्र गाणार होते. भवाळकरांचे नाव वाचनात आले होते, पण गाणं ऐकले नव्हते. मी या मैफलीला जायचे मनोमनोमन पक्के केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उदय भवाळकरानी आपल्या गुरुजींची ओळख करून दिली. त्यात त्यांनी म्हटले, "उस्ताद आमच्या चुकांबद्दल आम्हाला कधीच रागवले नाहीत". हे वाक्य ऐकल्यावर कुठेतरी मला "इथे आपले जुळु शकते" ही भावना जागी झाली. नंतर त्याच कार्यक्रमात एक मजेशीर प्रसंग घडला. गायनासाठी मंचावर झिया फरिदुद्दीन डागर आणि उदय भवाळकर स्थानापन्न झाल्यावर उस्तादांनी प्रमुख पाहुण्यांकडे गाणे सुरु करण्यासाठी अनुमती मागितली आणि विचारले,

"काय गाऊ?"

"चंद्रकंस" प्रमुख पाहुण्यांनी फर्माईश केली.

"कौनसा चंद्रकंस, तिन तरहसे चंद्रकौस गा सकता हूं" - उस्ताद उत्तरले

"बिना षड्ज का" पाहूण्यानी बहूधा खवचटपणा केला असावा.

"देखो, जिंदगीभर षड्ज नही लगाऊंगा" - उस्तादांनी प्रत्युत्तर दिले आणि उपस्थित हास्यकल्लोळात बुडुन गेले.

आयुष्यभर ’सा’ न लावायचे आह्वान घेणं म्हणजे काय असतं हे फक्त जे गाणं शिकले आहेत त्यांनाच कळले तर कळेल.

हा कार्यक्रम संपला. मग मी घरी येताना उदय भवाळकरांना गाणं शिकवाल का असं विचारायचं मनोमन ठरवलं. माझं नशीब इतकं बलवत्तर की भवाळकरांनी मला होकार दिला. आणि आमची तालीम सुरु झाली. पहाटे पांच ते नऊ-साडेनऊ कधी दहा. उदयजींच्याकडचं संगीताचं शिक्षण मी आजवर घेतलेल्या संगीतशिक्षणापेक्षा पूर्ण वेगळं ठरलं. उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर उदयजींच्या तालमीतून हळुहळु उलगडत गेले आणि ते आमचे आजे-गुरुजी बनले!

"बेशरम हो के गाना" हा आमच्या गुरुजींनी दिलेला १ला मंत्र. आपल्या परंपरेचा कोणताही दुरभिमान, इतर कलाकारांना तुच्छ लेखणे, या सगळ्या गोष्टी भवाळकरांच्याकडे नव्हत्या आणि मला ते प्रकर्षाने जाणवले. मी कधीकधी गुरुजी म्युझिकरुम मध्ये नसताना धृपद परंपरेत गायले न जाणारे राग धृपदशैलीत आणता येतात का हे बघायचा प्रयत्न करायचो. पण त्याबद्दल उदयजींनी कधीही डॊळे वटारले नाहीत. "डोक्यात गाणे असते ते चूक का बरोबर याचा विचार न करता अगोदर बाहेर काढायचे आणी मग स्वरतालाच्या दुरुस्त्या करायच्या" हा दुसरा गुरुमंत्र मला उदयजींकडे मिळाला. विद्यार्थ्याच्या पूर्णपणे कलाने शिकवणारे उदयजी अत्यंत नम्रपणे छोट्या उस्तादांनी (झिया फरिदुद्दीन डागर) आम्हाला पण असंच शिकवलं, असं ते नम्रपणे कबूल करतात.

माझ्या मूळ प्रवृत्तीला हे भावल्यामुळे धृपदात एव्हढा ओढला गेलो की मला ख्याल खूपच उथळ आणि पचपचीत वाटायला लागला. मी अधिकाधिक धृपद ऐकायला लागलो. छोट्या उस्तादांचे धृपद ऐकताना एक महत्त्वाची गोष्ट जाणवली ती म्हणजे त्यांचे गाणं ऐकताना मी हळुहळु गाता व्हायला लागलो. उस्ताद एखादी स्वरकल्पना मांडत तेव्हा तिचा विस्तार मनात स्फुरायला लागला. रात्री बेरात्री दोन-तीन वाजता गाणे डोक्यात रूंजी घालायला लागायचे आणि मी तानपुरा काढुन गायला बसायचो. भारतीय योगशास्त्रात जी शक्तिपात ही कल्पना आहे तिचाच मी हा एकप्रकारे अनुभव घेत होतो.

उदयजींच्याकडे छोट्या उस्तादांचे येणेजाणे असे. ते आले की आम्हाला ज्योतीताईंचा फोन यायचा. मग हातातले काम टाकून उस्तादांचे गाणे ऐकायला मिळेल या आशेने आम्ही तिकडे धाव घ्यायचो. वेगवेगळ्या विषयांवर उस्ताद गप्पा मारत असत. आपल्या शिष्याबरोबर चेष्टामस्करी त्यांना वर्ज्य नव्हती. एकदा आमच्यापैकी एकाने त्यांना विचारले, "उस्ताद तुम्ही किती रियाझ करायचा?" त्यावर ते म्हणाले, "तुम्हाला खरं सांगू की खोटं सांगू?"

"खरं आणि खोटं, दोन्ही सांगा" आमच्यापैकी कुणीतरी म्हणाले.

"खोटं उत्तर आहे, १८-१८ तास! आणि खरं उत्तर आहे ३ ते ४ तास!" हा प्रांजलपणा मला संगीतशिक्षणाला गूढत्वाने क्लीष्ट बनविणार्‍या प्रवृत्तीना छेद देणारा तर वाटतोच पण इतर कोणत्याही कलाकारात मला तो दिसलेला नाही.

असाच एक प्रसंग.

ज्योतीताईंचा फोन आला की "उस्ताद गायला बसले आहेत. शक्य असेल तर लगेच या". मी हातातले काम टाकून गुरुजींच्या घराकडे धाव घेतली. छोटे उस्ताद आणि आमचे गुरुजी एकत्र गात होते. १२ अंगांनी धृपद कसे गायले जाते याचे खुलासेवार स्पष्टीकरण आणि गाणे असे दोन्ही रंगत चालले होते. आमच्या भाग्यवान गुरुजींचे संगीतशिक्षण कसे झाले असेल याचा तो सोहळा एकप्रकारे आमच्या समोर उलगडला गेला होता... आणि एका अत्यंत अनपेक्षित उत्कट क्षणी उस्तादांनी गाणे थांबवले आणि उदयजींच्या हातातल्या तंबोर्‍याला वाकून नमस्कार केलाच, पण पुढच्या क्षणी उदयजींच्या पायांना पण स्पर्श केला...

आता मला सांगा शिष्याचे पाय धरणारा गुरु तुम्ही कधी बघितला आहे. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की या प्रसंगाचा मी साक्षीदार होतो...

गुरुवार, २ मे, २०१३

श्री. श्याम मानवांचे (आचरट) प्रश्न




(http://shyammanav.blogspot.in/2012/12/blog-post_7.html)

1) फलज्योतिष हे शास्त्र आहे का? 
तुम्हाला शास्त्र म्हणायचे नसेल तर नका म्हणू. पण ज्योतिष एक विद्या मात्र नक्की आहे.

2) पूर्वी फलज्योतिष आणि खगोलशास्त्र एकत्र होते. ग्रीकांपासून, आर्यभट्टापासून ते गॅलिलिओ- कोपर्निकसपर्यंत अनेक सुप्रसिद्ध खगोलशास्त्री ज्योतिषीही होते, पण एकोणिसाव्या शतकात खगोलशास्त्र व फलज्योतिष वेगळे झाले, ते का? 
असंख्य कारणे असू शकतात . शाखा, उपशाखा निर्माण होणे ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. संगणकशास्त्रापासून अनेक नव्या शाखा जन्माला आल्या - संगणक अभियांत्रिकी, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, कृत्रिम मेधा, मानव-यंत्र संवाद इत्यादि.

3) खगोलशास्त्र ही विज्ञानाची व वैज्ञानिक अभ्यासाची महत्त्वाची शाखा झाली. त्याचा अभ्यास जगभराच्या सगळय़ा विद्यापीठांमधून होता; परंतु फलज्योतिष मात्र चोथा समजून विज्ञानाने फेकून दिले. असे का? 

विज्ञान फक्त फलज्योतिषाला चोथा म्हणुन फेकून देत नाही तर मुख्य प्रवाहात नसलेल्या अनेक गोष्टीना चोथा मानते. मुख्यप्रवाहातील अस्तित्व अनेक बाबींवर अवलंबून असते - fashion, politics, funding etc.  कृत्रिम मेधा (Artifitial Intelligence) या शाखेला अनेक जण अजूनही चोथा मानतात (ही शाखा निर्माण झाली तेव्हाही मानत होते). तरीही अनेकजण अनेक विद्यापीठातून या विषयाचा अभ्यास करतात. ज्योतिषाच्या नावाने बोंबाबोंब करणार्‍या एका जागतिक कीर्तीच्या खगोलशास्त्रज्ञाची  थिअरी पण "चोथा" झाल्याचे ऐकून आहे. MD करताना सायकियाट्रीला जाणारे "मेडीसन सोडणारे" (म्हणजे अप्रत्यक्षपणे चोथा) म्हणून हिणवले जातात.  आयायटीत आमच्या वेळेला theoryचे लोक experimentalistना "चोथा" म्हणून हिणवत असत. आय़टिच्या विश्वात coding करणारे testing/debugging करणार्‍याना "चोथा"च समजतात.

तात्पर्य "चोथा होणे" ही भावना सापेक्ष आहे.

4) जगभराच्या 186 वैज्ञानिकांनी, ज्यात 19 नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ आहेत, 'फलज्योतिष हे शास्त्र नाही. तो केवळ काही लोकांचा पोट भरण्याचा धंदा आहे. त्यावर जनतेने विश्वास ठेवू नये,' असे पत्रक काढले व ते जगभर प्रसिद्ध केले. त्याबद्दल 'ज्योतिष अधिवेशनाचे' काय मत आहे? 

मी 'ज्योतिष अधिवेशनाचे' प्रतिनिधीत्व करत नसल्याने या प्रश्नाचे उत्तर देऊ इच्छित नाही.

5) आजचे फलज्योतिषी 9 (किंवा 12) ग्रह मानतात. त्यात राहू, केतू नावाचे ग्रहही मानतात. प्रत्यक्षात राहू-केतू अस्तित्वातच नाहीत. ते ग्रहही नाहीत. तरी ज्योतिषी मात्र आजही जनतेच्या कुंडल्यांमध्ये (होरोस्कोप) राहू-केतू फिरवतच असतात. ते का? कसे? अस्तित्वात नसलेल्या राहू-केतूंना स्थान देणार्‍या कुंडल्या किती विश्वसनीय असू शकतात? व त्या आधारावर उभ्या असणार्‍या फलज्योतिषात कितपत अर्थ असू शकतो?

श्याम मानव आणि ते ज्या गटाचे प्रतिनिधीत्व करतात त्यांच्या अडाणीपणाचा निदर्शक असा हा प्रश्न आहे. "ग्रह" ही तांत्रिक संज्ञा आहे. ज्याप्रमाणे "धातु", "मल", "अग्नि" या आयुर्वेदातील तांत्रिक संज्ञा आहेत. पाणिनीच्या व्याकरणात युस्त्र्याख्यौ नदी (1.4.3) असे एक सूत्र आहे. तेथे ईकारान्त आणि ऊकारान्त स्त्रीलिंगी शब्दाना "नदी" अशी तांत्रिक संज्ञा आहे.

तसेच ज्या बिंदुंचे भ्रमणकाल आणि कक्षा निश्चित झाले आहेत ते सर्व ग्रह मानावेत असा ज्योतिषात संकेत आहे. राहु-केतु, चंद्र-सूर्य या संकेतानुसार ग्रहच ठरतात.

6) चंद्र-सूर्याला ग्रह म्हणून आजही स्थान दिले जाते. चंद्र हा उपग्रह आहे, हे खगोलशास्त्राच्या ज्ञानामुळे पाचव्या वर्गातल्या मुलालाही ज्ञात असते. तरी सुशिक्षित विद्वान ज्योतिषीही चंद्राला ग्रह म्हणूनच कुंडलीत स्थान देतात. अशा अवस्थेत विद्वान ज्योतिष्यांपेक्षा पाचव्या वर्गातल्या मुलांनाही अधिक ज्ञान असते, असे का मानू नये? 

वर दिलेल्या प्र.क्र. ५च्या उत्तरात याचा खुलासा व्हावा अशी अपेक्षा करतो.

7) सूर्य हाही ग्रह म्हणूनच कुंडलीत मांडला जातो व आजही ज्योतिषी पृथ्वीभोवतीच (कुंडलीत) सूर्याला फिरवत असतात. सूर्य हा तारा आहे. तो ग्रह नाही व पृथ्वी इतर ग्रहांसोबत सूर्याभोवती फिरते हे शाळकरी मुलांना जसे शिकवले जाते तसेच ज्योतिष्यांना शिकवावे, प्रसंगी त्यांच्यासाठी स्वतंत्र शाळा काढाव्यात, अशी विनंती आम्ही सरकारला करावी काय? 

कुणी सरकारला कसली विनंती करावी हा ज्याच्या त्याच्या विवेकाचा, उपलब्ध वेळाचा आणि रिसोर्सेसचा प्रश्न आहे. पण याच न्यायाने आयुर्वेदातील संज्ञा, व्याकरणातील संज्ञा पण बदलण्याचा आग्रह धरावा. फक्त ज्योतिषाला बडवणे हे आकसाचे आहे.

8) पृथ्वी हा ग्रह आहे. त्याचा पत्रिकेत ग्रह म्हणून का समावेश नाही? 

Heliocentric astrology या नावाने एक ज्योतिषाची शाखा आहे. त्यानुसार ज्या पत्रिका तयार होतात त्यात पृथ्वी हा ग्रह दाखवला जातो. यात पत्रिकेतील निरीक्षक सूर्यस्थित असतो. ही शाखा मूलत: जागतिक पातळीवर घडणार्‍या मोठ्या घटनांशी संबंधित ग्रहयोगांचा अभ्यास करते.

9) ग्रहाचा मानवी जीवन प्रवाहावर परिणाम होतो असे फलज्योतिषी सांगतात व त्यावरच त्यांचे शास्त्र अवलंबून आहे. याला वैज्ञानिक आधार काय? एकाच स्थळी व एकाच ठिकाणी राहणार्‍या माणसांवर एकाच ग्रहाचे, ते केवळ वेगवेगळ्या वेळी जन्मले म्हणून वेगवेगळे परिणाम कसे होतील? 

मानवी भाषा व्यवहार हा जटिल प्रक्रियेतून निर्माण होतो. निरीक्षण, अनुभव, श्रद्धा आणि त्यांचे वर्णन करायला वापरली जाणारी  भाषा एकमेकांवर सतत प्रभाव पाडतात. मला कोकणात एके ठिकाणी उंच हा शब्द खोल या अर्थाने वापरला जात असल्याचे आढळले. "भयंकर सुंदर" हा अलिकडचा एक प्रयोग. अशी अनेक उदा देता येईल.

आधुनिक ज्योतिषी ग्रहांचे मानवी जीवनावर परिणाम अजिबात मानत नाहीत तर ते ग्रहांनी तयार केलेल्या भौमितिक रचनांची मानवी जीवनातल्या अवस्थांशी सांगड घालून अनिश्चितते आणि अपरिहार्यते विषयी मार्गदर्शन करायचा प्रयत्न करतात.

10) सगळे ग्रह व सूर्य यांची भ्रमणकक्षा व काळ निश्चित आहे. पुढील पाच हजार वा पाच लाख वर्षानंतर तो निश्चित ठरावीकच असणार आहे. याचाच अर्थ ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक मनुष्याचे भविष्य तो जन्मत:च ठरलेले असते. असे असतानाही अनेक ज्योतिषी ग्रहदशा बदलण्याचे व ग्रहांचे अरिष्ट टाळण्यासाठी अनेक पूजा, ताईत, खडे वगैरे उपाय सांगतात व ठरलेले आयुष्य बदलवता येते असेही सांगतात. ते कसे? ग्रहांची दिशा, स्थान व भ्रमण निश्चित असूनही या उपायांनी माणसांचे भविष्य बदलतेच कसे? हे सगळे उपाय म्हणजे सामान्य लोकांना लुबाडण्याची ज्योतिष्यांची एक क्लृप्ती नव्हे काय? मुळात माणसांचं आयुष्य ठरलेलं असतं हे सांगणंच लबाडी नव्हे काय? 

आपल्यामध्ये असलेले जनुक जसे आजुबाजुच्या परिस्थितीनुसार सक्रिय किंवा निष्क्रिय होतात. त्याप्रमाणेच आजुबाजुच्या परिस्थितीनुसार ग्रहयोगांनी सूचविलेल्या शक्यता व्यक्त होतात किंवा अव्यक्त राहतात. उपायांनी समस्येपासून काही काळ लांब राहता येते. आशा टिकून राहायला मदत होते. काही लोक लुबाडण्यासाठी हे वापरतात म्हणून उपाय करणे चूक ठरत नाही. कोणताही शहाणा ज्योतिषी "आयुष्य ठरलेलं असतं " असे सांगणार नाही. आयुष्यातील अनिश्चितता आणि अपरिहार्यता आपण कशी हाताळतो यावर ते अवलंबून असते.

11) माणसाचा जन्म आणि मृत्यू ठरलेला असतो का? ठरलेला नसेल तर फलज्योतिषाला काही आधार उरेल काय? पण जर जन्म ठरलाच असेल तर मनुष्य स्वत: निर्णय घेऊन आजच्या काळात भारतीय कायद्याच्या परवानगीने कृत्रिम गर्भपात करतो व जन्माला येणार्‍या नव्या मनुष्याचे अख्खे आयुष्यच थांबवतो, हे कसे? ठरलेला जन्म कृत्रिम उपायांनी थांबवणारा मनुष्य ग्रहांपेक्षा वा नियंत्यापेक्षा मोठा मानायचा का? 


माणसाचा जन्म आणि मृत्यू ठरलेला असतो का? 

जन्म होणं हा योगायोगाचा भाग आहे. पण प्रत्येक जीवित व्यक्ती कधी ना कधी मरणार हे मात्र नक्की आहे.

ठरलेला नसेल तर फलज्योतिषाला काही आधार उरेल काय? 

जीवन चालू झाल्यावर फलज्योतिषाला आधार निर्माण होतो (माझी भूमिका याच प्रश्नोत्तरात इतरत्र स्पष्ट केलेली आहे). कारण अनिश्चितता आणि अपरिहार्यता हाताळायची क्षमता प्रत्येक व्यक्तीला निसर्गाने समान बहाल केली आहे, असे दिसत नाही.

ठरलेला जन्म कृत्रिम उपायांनी थांबवणारा मनुष्य ग्रहांपेक्षा वा नियंत्यापेक्षा मोठा मानायचा का? 

हा प्रश्न मला खोडसाळ  आणि आचरट वाटतो.

12) मृत्यू ठरलेला असतो का? 

सध्या तरी  प्रत्येक जीवाचा मृत्यू ठरलेला आहे पण मृत्युची तिथी मात्र ठरलेली नाही.

अ) तो जर ठरलेला असेल तर, 1930 साली भारतीय माणसाचे सरासरी आयुष्य केवळ 18 वर्षे होते. आता ते 68 वर्षापेक्षा अधिक झाले आहे. हे अधिकचे सरासरी आयुष्य भारतीयांच्या वाटय़ाला कुठून आले? याचे उत्तर फलज्योतिष्यांना पत्रिकांमध्ये दाखवता येईल का? 

पत्रिकांमध्ये कशाकशाची उत्तरे ज्योतिषानी शोधावित अशी श्री मानव यांची अपेक्षा आहे. मूळात पत्रिका ही एक मानवी जीवनातील  सूचित अवस्थांची एक प्रतिकृती आहे. प्रत्येक प्रतिकृती सर्व प्रश्नांचे उत्तर देते का? घराची पुठ्ठ्याची प्रतिकृती घराचे आयुष्य किती या प्रश्नाचे उत्तर देईल का?

आ) मृत्यू ठरलेला असतो असे मानणारे ज्योतिषी आपल्या घरच्यांना व स्वत:लाही औषधोपचार का करतात? ते डॉक्टरांची मदत का घेतात? जर मृत्यू ठरलेल्या क्षणीच होणार असेल तर डॉक्टरांची मदत घेऊन स्वत:चा व स्वत:च्या नातेवाईकांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करून पैसा फुकट घालविणे मूर्खपणाचे नव्हे का? 

- ज्योतिषी आपल्या घरच्यांना व स्वत:लाही औषधोपचार का करतात? 

मृत्यु ही शक्यता पत्रिका दाखवत असेल तरीही जीवन स्वीकारायचे की मृत्यु हा पण प्रत्येक शुद्धीवर असलेल्या व्यक्तीचा प्रश्न आहे. आणि बेशुद्ध व्यक्तीच्या पत्रिकेत मृत्यु ही शक्यता असेल तर जगवायचे की मरू द्यायचे हा आप्तांचा (आणि कदाचित उपचार करणार्‍या डॉक्टरांचा प्रश्न). पुढे रस्ता बंद आहे असा कुणी सल्ला दिला तर तो न मानता तसंच पुढे जायच की मागे फिरून दुसरा रस्ता पकडायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सल्ला मिळाला म्हणून तो मानलाच पाहिजे असं कुठे लिहीले आहे?

इ) एकाच अपघातात ज्यावेळी शेकडो लोक मरतात त्या वेळी त्या सगळ्यांचा मृत्युयोग असतो काय? नागासाकी-हिरोशिमा अणुस्फोट व सगळ्याच मोठय़ा अपघातांबद्दल काय? तसा पुरावा पत्रिका तपासून देता येईल काय? 

या प्रश्नांची उत्तरे मी सध्या तरी देऊ शकणार नाही कारण मी त्यासाठी आवश्यक असणारा अभ्यास मी केलेला नाही. मात्र लग्नाच्या वर्‍हाडांना होणारे अपघात आणि त्यात मरण पावणार्‍या व्यक्तींच्या पत्रिका तपासून काही अंदाज निश्चित बांधता येतील. आपली संघटना अशा अभ्यास-प्रकल्पाला मदत मिळवून देईल का?

13) अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या पंचवीस वर्षापासून ज्योतिष्यांना सारखी आव्हाने देत आहे, तरी ज्योतिषी ती आव्हाने स्वीकारून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तोंड एकदाचे बंद का करीत नाही? 

उत्तर - अशा आह्वानतून कोणताही ठोस निष्कर्ष काढता येत नाही किंवा निघत नाही. एक ज्योतिषी जिंकला किंवा हरला हे ज्योतिष(शास्त्रा/विद्ये) बद्दल कोणतीही विधाने करण्यास करण्यास पुरेसे नाही. आह्वाने देणारे ज्योतिषाच्या मर्यादांमध्ये त्यांचे आह्वान तयार करत नाहीत, हे कशाच द्योतक? प्रत्येक ज्योतिषी जे दावे करतात त्या दाव्याच्या अनुरोधानेच आह्वान देण्यात यायला हवं. हे दावे प्रत्येक ज्योतिषी जे तंत्र वापरतो त्या तंत्रानुसार बदलु शकतात. हाडाची ऑपरेशन्स करणार्‍या डॉक्टरला आपण हृदयाची शस्त्रक्रिया करायचा चॅलेंज कधी देतो का?

ज्योतिष टाकून द्यायचे असेल तर वेगवेगळ्या पातळ्यांवर संशोधनकरून मग ते टाकून द्यायला हवे. त्यासाठी विज्ञानात जसे aggressively संशोधन होते तसे संशोधन ज्योतिषात व्हायला हवे. त्यासाठी मुळात ज्योतिषातील नियम जास्त चिकित्सक पद्धतीने तयार केले जायला  हवेत. असे सुसंशोधित नियम वापरून मगच आह्वाने स्वीकारायचा विचार करता येईल. मुळात ज्योतिषातील नियम हे व्याकरणाच्या/भाषेच्या नियमांप्रमाणे प्रवाही असतात. नियम बनविण्यासाठी कोणतीही साधने हाताशी नसलेले ज्योतिषी जुने ग्रंथ,  प्रसिद्ध ज्योतिषांची निरीक्षणे/मते आधार म्हणून वापरतात. काही ज्योतिषी स्वत:ची निरीक्षणे नियम बनविण्यासाठी वापरतात. यामुळे अचूक भविष्य वर्तविण्याला आपसूकच मर्यादा पडतात.

14) दोनदा 20-20 पत्रिकांच्या आधारे, माणूस मेलेला आहे की जिवंत आहे व स्त्री की पुरुष आहे हे सांगा. दोन्ही वेळेस उत्तरे 90 टक्क्यांपेक्षा अधिक 95 टक्के अचूक निघायला हवीत. तर 15 लाख रुपयांचे पारितोषिक मिळेल किंवा मानवी जीवनातील, तपासून शहानिशा करता येतील अशा कोणत्याही पाच घटना (लग्न, मूल, नोकरी, शिक्षण, अपघात, बढती वगैरे) वीस पत्रिकांच्या आधारे सांगाव्यात. त्या 90 टक्के खर्‍या ठराव्यात. दोनदा वीस-वीस पत्रिकांची भाकिते 90 टक्के अचूक निघावीत. 15 लाख मिळतील; पण 70 टक्के जरी खरी निघाली (दोनदा 20-20) तरी ते शास्त्र असू शकते असे आम्ही मानू, अशी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन नागपूर समितीने पुणे, धुळे, अमरावती या चारही अ. भा. ज्योतिष अधिवेशनात जाहीर आव्हाने दिली होती. ती आव्हाने स्वीकारून आपली बाजू सत्य असल्याचे ज्योतिष महामंडळ का सिद्ध करू शकले नाही? याचा अर्थ, फलज्योतिषशास्त्र नाही असाच घ्यायचा का? 15) कोणताही महत्त्वाचा ज्योतिषी वा ज्योतिष महामंडळ, या आव्हानानंतर पुढे आले नाही; पण श्री. एम. कटककर नावाचे ज्योतिषी मात्र आव्हान स्वीकारण्याची एक बालिश भाषा घेऊन पुढे आले होते. ते म्हणाले होते, मी माणसांची स्वभाववैशिष्टय़े सांगतो. त्या वेळी अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हे आव्हान एका अटीवर स्वीकारण्याचे मान्य केले. कटककरांसोबत पाचव्या वर्गातील, फलज्योतिषाचे कुठलेही ज्ञान नसलेली कुठलीही 10 मुले बसवू. त्या दहा मुलांना पत्रिका न पाहताच अंदाजे स्वभाववैशिष्टय़े सांगावीत व श्री. कटककर महाशयांनी पत्रिका पाहून स्वभाववैशिष्टय़े सांगावीत. एका जरी शाळकरी मुलाने कटककरांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले, तर मात्र कटककरांनी त्या मुलाची व जनतेची जाहीर माफी मागावी व धंदा बंद करावा. त्या वेळी या प्रतिआव्हानातून एम. कटककरांनी चक्क पळ काढला. तरी असा पळपुटा ज्योतिषी, ज्योतिष महामंडळाच्याच नव्हे, तर अधिवेशनाच्या स्टेजवरही दिमाखाने मिरवतो आहे, हे ज्योतिष्यांना व अधिवेशनाला कितपत भूषणावह आहे? या प्रश्नांची उत्तरं ज्योतिष्यांनी जाहीररीत्या द्यावीत. पण ज्योतिषी या प्रश्नांची उत्तरं न देता ज्योतिष्यावरची टीका म्हणजे हिंदू धर्मावरचा हल्ला अशी ओरड करतात. मग स्वातंर्त्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद हिंदू नव्हते का?

पत्रिका कुणी आणि कधी बघावी याबद्दल माझी भूमिका अशी आहे - २० वर्षांपर्यंत आणि सत्तरीनंतर (काही अपवाद वगळता) पत्रिका बघू नये असे माझे  स्पष्ट मत आहे. याची कारणे अशी-

विशीपर्यंत व्यक्तीची स्वयंनिर्णयाची क्षमता पूर्णपणे विकास पावलेली नसते. सहसा आईवडिलांवर मुले अवलंबून असतात. सत्तरीनंतर तब्येत ठणठणीत नसेल तर हळुहळु परावलंबित्व यायला सुरुवात होते. अनेक इच्छाना मुरड घालावी लागते. मनमुरादपणे वानप्रस्थाश्रमाचा काल व्यतीत करणे सर्वच ज्येष्ठाना शक्य असते नाही. थोडक्यात या परावलंबीत्वामुळे  एकंदरच संधी आणि निर्णय यावर मर्यादा असतात/यायला लागतात.

सांगायचे तात्पर्य असे की २० ते ७० या मधल्या काळात, सर्वसाधारणपणे स्वयंनिर्णयाचा हक्क बजावू शकणारी व्यक्तीच वेगवेगळ्या शक्यता/संधीना विवेकाने प्रतिसाद देऊ शकते. हे परावलंबी व्यक्तींच्या बाबतीत होऊ शकत नाही. पत्रिका ही केवळ शक्यता दाखवत असल्याने बंदिस्त आयुष्य जगणार्‍या व्यक्तींच्या आयुष्यात या शक्यता प्रत्यक्षात येऊ शकत नाहीत.

बाकी पत्रिकेतील प्रत्येक ग्रहयोग/रचना एक घटना कधिच दाखवत नाहीत. प्रत्येक ग्रहयोग/रचना, ज्या core issue कडे निर्देश असतो त्या core issue चा घटनापट (event spectrum), सूचित करते. त्यामुळे पत्रिकेने निर्देशीत केलेला core issue संदर्भाशिवाय उलगडता येत नाही. त्यामुळे "माणूस मेलेला आहे की जिवंत आहे व स्त्री की पुरुष आहे हे सांगा" इ. प्रश्न/आह्वाने मुदलातच आचरट ठरतात.

तरी असा पळपुटा ज्योतिषी, ज्योतिष महामंडळाच्याच नव्हे, तर अधिवेशनाच्या स्टेजवरही दिमाखाने मिरवतो आहे, हे ज्योतिष्यांना व अधिवेशनाला कितपत भूषणावह आहे? 

ज्योतिषाच्या नावाने बोंबाबोंब करणार्‍या एका जागतिक कीर्तीच्या खगोलशास्त्रज्ञाची  थिअरी पण "चोथा" झाल्याचे ऐकून आहे. त्यांच्या थिअरीचा गाजावाजा झाल्यामुळे मिळालेले सन्मान ते त्यांची theory चोथा झाली म्हणुन परत करतील का?.

मंगळवार, ३० एप्रिल, २०१३

जादुटोणाविषयक कायदा



श्री. नरेंद्र दाभोळकर यांची IBN लोकमत वर झालेल्या (http://www.ibnlokmat.tv/showvideo.php?id=287232) मुलाखतीचा काही भाग बघितला आणि मग जादुटोणाकायद्याचा मसुदा काय आहे हे वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली. श्री प्रकाश घाटपांडे यांच्याकडे विचारणा केली तेव्हा त्यानी मला (http://www.mahans.co.in/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=53&Itemid=68) दूवा दिला. तेथिल मजकूर वाचल्यावर पुढील वि़चार डोक्यात आले.




मी उपस्थित केलेले मुद्दे हे कायद्याला विरोध मानले जाऊ नयेत पण पण प्रस्तावित कायद्याने उपस्थित केलेले प्रश्न मात्र मानले जावेत.


<भोंदूबाबा आणि जादूटोणा करणाऱ्या व्यक्तींचा आश्रय घेत आहेत.> याविषयीची आकडेवारी कुठे बघायला मिळेल. उदा अंदाजे किती भोंदूबाबा आणि जादूटोणा करणाऱ्या व्यक्ती आज महाराष्ट्रात कार्यरत आहेत. यातिल आर्थिक उलाढाल साधारण किती? ही आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे की घटते आहे?

<अनिष्ट व अघोरी प्रथा> "अनिष्ट" हा शब्द संदिग्ध आहे. आणि यामुळे गैरवापराची शक्यता वाढते कारण "अनिष्टता" ठरवणार कशी?

नवीन कायदा करण्यासाठी सध्याचे कायदे अपुरे आहेत असं सप्रमाण सिद्ध केलेलं पण दिसत नाही.

आत्ता कायद्याची व्याप्ती १२ कलमांपुरती मर्यादित दाखवली गेली असली तरी पुढे ती व्याप्ती वाढविण्यासाठी चळवळी, आंदोलने, उपोषणे इ दबावतंत्रे अमलात आणली जाउ शकतात. कायद्याची व्याप्ती १२ कलमांपुरतीच राहील ही ग्वाही कोणीच देऊ शकत नाही आणि दिली तरी ते हास्यास्पद ठरेल. ("स्त्रीकडे टक लाऊन बघणे" हे अलिकडे एका कायद्यात अलिकडे घातलेले कलम).

"जारणमारण, करणी किंवा चेटूक" याची व्याख्या केलेली दिसत नाही.

कायद्याचं स्वरूप काळाच्या ओघात कसं बदलेल याचा कायद्याचा गैरवापर कसा होतो, याच्या अनुभवावरून याचा अंदाज बांधणे सोपे आहे. एक वानगीदाखल उदाहरण म्हणून "नवस बोलणे" या प्रथेचं उदा आपण घेऊ. बरं, हे "नवस बोलणे" ही प्रथा जादुटोणा आहे की नाही ठरवण्याचे काम न्यायालयावर सोपवले की तक्रारदार मोकळा होऊ शकतो. "नवस बोलणे" हे जादुटोणा मानता येईल का याचे उत्तर "हो" असे मानले तर मोठ्ठा हाहाकार उडेल. नवस बोलणे हे जर जादुटोणा मानले तर नवसांना उत्तेजन दिले म्हणून देवस्थाने आणि त्यांचे भाविक धोक्यात येऊ शकतात. नरबळी हा जादुटोणा मानावा, असं हा कायदा सुचवितो. पण पशुबळी हा जादुटोणा मानायचा का, या मुद्द्यावर केस ठोकता येऊ शकते.

जादुटोणाकरणार्‍याने "मी अमुक विधी स्वखुषीने करत आहे" असं स्टॅम्पपेपरवर लिहून घेतलं तर तो कायद्याच्या कचाट्यातून मुक्त होऊ शकतो का?

गुरुवार, २५ एप्रिल, २०१३

सुवर्णसिद्ध जल : एक अनुभव



(सूचना: आयुर्वेद, होमिओपथीला सर्पतेल (snake oil) समजणार्‍यांनी हा लेख वाचला नाही किंवा प्रतिसाद दिला नाही तरी चालेल.)


आयुर्वेदांत सोन्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. होमिओपथीमध्ये पण ऑरम-मेट हे औषध शुद्ध सोन्यापासून बनवतात. अलिकडे बरेच आयुर्वेदतज्ञ सुवर्णसिद्ध जल लहान मुलाना द्यायला सांगतात. मला याबद्दल कुतुहल निर्माण झाले असता मी नेट वर शोध घेतला. तेव्हा कुणाचे अनुभव वाचायला मिळाले नाहीत. बरीचशी चर्चा वैद्यामध्येच होताना दिसली. बालाजी तांब्यांबद्दल मला फारसे प्रेम नाही, पण त्यांच्या खालील लेखात आयुर्वेदीय दृष्टीकोनातून सोन्याचे महत्त्व थोडेफार समजले (http://epaper.esakal.com/esakal/20091211/4729257057489860031.htm).

पारंपरिक पद्धतीमध्ये सोन्याची वस्तू पाण्यात टाकून ते पाणी बराच वेळ उकळवावे सांगितले आहे. मी ही पद्धत थोडी बदलली कारण माझ्यादृष्टीने इंधन आणि वेळ वाचविणे हे महत्त्वाचे मुद्दे होतेच पण वेळखाऊ पद्धतीमुळे एखाद्या उपचाराकडे  लोक पाठ फिरविण्याची शक्यता पण निर्माण होते.

मी केलेल्या बदलानुसार अर्धे फुलपात्र प्यायचे पाणी घेतले आणि सोन्याची अंगठी घेतली (सोन्याची तार असलेली वस्तू घेऊ नये कारण ती तापवल्यावर तुटू शकते. माझी एक साखळी अशी तुटली आहे.)

सोन्याची अंगठी गॅसवर तांबडी भडक (red hot) होई र्यंत तापवावी. याला दोन ते तिन मि पुरतात. तापलेली अंगठी मी मग फुलपात्रातील पाण्यात टाकतो. पाण्यात ती चुरचुरुन गार होते.

ही प्रक्रिया मी एकंद्र तिनदा करतो.

अशा रितीने "सुवर्णसिद्ध जल" तयार होते. हे पाणी प्यायल्यावर (मी हा उद्योग रात्री करतो) मला खालील अनुभव ९५% पेक्षा अधिकवेळा आले आहेत (so in my own case I have experienced beyond placebo effect).

o शारीरिक आणि मानसिक तणाव १५-३० मि मध्ये पूर्ण नाहीसा होतो.
० एखादे बेन्झोडायझेपॅम घेतल्याप्रमाणे गाढ झोप लागते.

सोनं हा रासायनिक दृष्ट्या बर्‍यापैकी स्थिर असल्याने जडधातूचे शरीरात होणारे दुष्परिणाम या प्रयोगामुळे होणार नाहीत असे वाटते. मी हा अनुभव शेअर करण्याचे कारण हा प्रयोग जास्तीतजास्त लोक करू शकले तर जास्तीत जास्त परिणाम कळायला मदत होईल.

बुधवार, २४ एप्रिल, २०१३

कथा एका पीएचडीची...



http://www.loksatta.com/sampadkiya-news/ph-d-very-easy-20848/

वरील लेख नुकताच वाचला. तो वाचल्यावर मला एका पीएचडी प्रबंधांची आठवण झाली. गोपनीयतेच्या कारणास्तव सर्व तपशील देत नाही पण बाकी सर्व घटना पूर्ण सत्य आहेत.

मी संगणकीय संगीतावर काम करत असताना डॉ. किरण रेगे (प्रा. मे. पु. रेगे यांचे चिरंजीव) माझे सहकारी आणि एका अर्थाने माझे बॉस पण होते. त्यांनी त्यांच्या शेजारीच माझी बसायची व्यवस्था केली होती. आमच्यामध्ये बरेच विषय कॉमन असल्याने बर्‍याच गप्पा चालायच्या. आम्ही जेवायला पण एकत्र असायचो. असंच एकदा मला डॉ. रेग्यांच्या टेबलावर एक प्रबंध दिसला. मी तो कशासंबंधी आहे, असे विचारल्यावर, "तुला वाचायचा असेल तर वाच आणि मग मला काय वाटते ते सांग", असे म्हणून त्यांनी मला वाचायला दिला.

तो प्रबंध एका पीएचडीच्या विद्यार्थ्याचा होता. त्या प्रबंधाचा विषय तेव्हाचा अत्यंत ज्वलन्त असा संशोधन विषय होता. डॉ. रेग्यांच्याकडे तो प्रबंध तपासण्याकरता आला होता.

तो जाडजुड प्रबंध मी कुतुहलाचा विषय म्हणून वाचायला घेतला. पण मला दोन प्रकरणांपलिकडे जाता आले नाही. लिखाणाच्या क्लिष्ट शैलीमुळे मला प्रतिपाद्य विषय आणि प्रतिपादन यापैकी कशाचाच बोध न झाल्यामुळे ३-४ दिवसांनी डॉ. रेग्यांना तो परत दिला आणि सर्व डोक्यावरून गेल्याचे सांगितले.

माझ्या वाचनानंतर मात्र डॉ. रेग्यांनी तो प्रबंध तपासायला सुरुवात केली. पुढे कित्येक दिवस ते नियमितपणे त्या प्रबंधाचे वाचन करत आणि बारीकसारीक टिपणे काढत. अधूनमधून मला एखाददुसरा प्रश्न विचारत आणि अधुनमधुन मला टिपणे वाचायला देत. अगदी विरामचिन्हांच्या चुकांपासून त्यांनी त्या प्रबंधाच्या सर्व नोंदी त्यांच्या टिपणांमध्ये ठेवल्याचे मी स्वत: बघितले होते. तो प्रबंध तपासून झाला आणि त्यांनी तो टिपणांसह त्यांच्या टेबलावरच्या एका पुस्तकांच्या चळतीमध्ये ठेऊन दिला.

...नंतर बरेच दिवस गेले. एक दिवस अचानक मला भलतीकडून डॉ. रेग्यांनी राजीनामा दिला असल्याचे कळले. ती बातमी ऐकून मला धक्का बसला कारण रोज अनेक विषयांवर एकत्र गप्पा मारताना डॉ. रेग्यांनी राजीनाम्याविषयी ताकास तूर लागू दिला नव्ह्ता. दोन दिवसांनी मी त्यांना हिय्या करून ऐकल्याचे खरे आहे का विचारले, तेव्हा त्यांनी हो असे सांगितले. अमुक अमुक तारीख माझा शेवटचा दिवस आहे, असेही मग म्हणाले.

मला तेव्हा अचानक त्या पीएचडी प्रबंधाची आठवण झाली आणि मी डॉ. रेग्यांना विचारले, "तुम्ही त्या पीएचडी थेसिसचे काय केलेत?"

त्यावर एकदम दचकून मला म्हणाले, "अरे, बरं झालं तू आठवण केलीस". असं म्हणून तो थेसिस त्यांनी शोधून काढला आणि कंप्युटरवर संबंधित विद्यार्थाच्या मार्गदर्शकाला पत्रवजा रिपोर्ट लिहून तयार केला. ते पूर्ण झाल्यावर त्याची एक प्रत छापून मला वाचायला दिली. त्या एक पानी अहवालाचा गोषवारा असा होता -

"मी मूलत: इलेक्ट्रीकल इंजिनिअर असून माझी स्वत:ची पीएचडी अमुक विद्यापीठातून अमुक विषयात केली आहे. त्यानंतर माझी सर्व करीअर टेलीकम्युनिकेशन या विषयात आहे. सध्या मी भारतात मात्र या या विषयात काम करत आहे. केवळ यास्तव हा प्रबंध माझ्याकडे तपासण्यासाठी पाठविण्यात आला असावा, असा माझा अंदाज आहे."

"या प्रबंधात एकूण चार प्रकरणे असून त्यातील चवथ्या प्रकरणाचा संबंध दुरान्वायाने माझ्या सध्या चालू असलेल्या संशोधनाशी लावता येईल. त्यामुळे पहिल्या ३ प्रकरणांवर मी भाष्य करणे योग्य ठरणार नाही. मात्र चवथ्या प्रकरणात मला पीएचडी देण्यालायक काहीही दिसले नाही. याची कारणे पुढीलप्रमाणे ..."

"तरीही या प्रबंधाच्या बाकीच्या परिक्षकांना या प्रबंधाची पहिली ३ प्रकरणे पीएचडी देण्या योग्य वाटली तर या विद्यार्थाला अवश्य पीएचडी देण्यात यावी"

हे वाचल्यावर मला हसु आलं आणि मी ते पत्र डॉ. रेग्यांना दिल्यावर त्यांनी ताबडतोब सही करून लिफाफ्यात घालून ते सीलबंद करून संबंधित विद्यापीठाला पाठवून दिले...

सोमवार, ८ एप्रिल, २०१३

मराठी विश्वकोशाची विश्वासार्हता




महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या मराठी विश्वकोशातील माझे पणजोबा कै विठठल सीताराम गुर्जर यांच्या वरील कै. स गं मालशे यांनी लिहीलेली नोंद नुकतीच वाचली. मला ही नोंद धेडगुजरीपणे, अर्धवट माहितीवर, एकंदर "उरकून" टाकायचे अशा थाटात लिहीलेली  वाटली. या एका नोंदीवरून विश्वकोशातील इतर नोंदींच्या दर्जाचा अंदाज बांधला तर मराठीला ज्ञानभाषा करण्याच्या उद्देशाने तयार केला गेलेला विश्वकोश कितपत विश्वासार्ह मानायचा असा प्रश्न पडतो,

-------------विश्वकोशातील नोंद----------------------------------------
गुर्जर, विठ्ठल सीताराम : (१८ मे १८८५ – १९ सप्टेंबर १९६२). मराठी कथाकार. जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील कशोळी ह्या गावी. मुंबईच्या एल्फिन्स्टन स्कूलमधून प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर एल्फिन्स्टन कॉलेजात ते दाखल झाले; बी. ए. मात्र झाले नाहीत. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचे हे शिष्य होत. मासिक मनोरंजनाचे संपादक काशीनाथ रघुनाथ मित्र हे त्यांचे स्नेही होते. त्यांच्या उत्तेजनाने; तसेच वंग कथाकार प्रभात कुमार मुखर्जी ह्यांच्या कथा मुळातून वाचता याव्यात ह्या इच्छेने गुर्जरांनी बंगाली भाषेचा व्यासंग केला. काही वर्षे मासिक मनोरंजनाच्या संपादनकार्यात ते सहभागी होते.

द्राक्षांचे घोंस (१९३६) हा त्यांचा एकच कथासंग्रह प्रसिद्ध झालेला असला, तरी त्यांनी लिहिलेल्या कथांची संख्या सु. ७०० आहे. मासिक मनोरंजन, विविधवृत्त  इ. नियतकालिकांतून त्या प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या बऱ्याचशा कथा अनुवादित-रूपांतरित आहेत. त्यांत पाल्हाळही आढळतो. तथापि १९२० नंतरच्या मराठी कथेला नीटस रूप देण्यात आणि रंजक वळण लावण्यात गुर्जरांच्या कथेने महत्त्वाचा हातभार लावलेला आहे.

बंगालीवरून त्यांनी काही कादंबऱ्या मराठीत आणल्या. शब्दशः भाषांतरे करण्याऐवजी रोचक रूपांतरे करण्याकडे त्यांचा कल होता. मूळ बंगाली कथा-कादंबरीकार आणि गुर्जरांनी त्यांच्या साहित्यकृतींची केलेली रूपांतरे ह्यांपैकी काही पुढीलप्रमाणे :रमेशचंद्र दत्त -जीवनसंध्या (१९०९); प्रभातकुमार मुखर्जी - संसार असार (१९१४), पौर्णिमेचा चंद्र (१९२०), स्वप्नभंग (१९३७), नागमोड (१९४६); शरत्‌चंद्र चतर्जी -देवदास (१९३७), चरित्रहीन (२ भाग, १९४८-४९), शेवटचा परिचय (१९४९); रवींद्रनाथ टागोर - संगम (१९३५).

गुर्जरांनी काही नाटकेही लिहिली; परंतु त्यांपैकी एकही यशस्वी झाले नाही. गडकऱ्यांच्या एकच प्याला ह्या नाटकासाठी त्यांनी रचिलेली पदे मात्र लोकप्रिय झाली. कशोळी येथेच ते निवर्तले.

--------------------------------------------------------

या नोंदीबद्दल माझे ठळक आक्षेप असे:
० गुर्जर कशोळीचे  नसून कशेळीचे रहिवासी होते

० ही नोंद तयार करण्यासाठी कोणती माहिती आधार म्हणुन वापरली याचा उल्लेख (इंटरेनेट आवृत्तीमध्ये तरी) नाही.

० "बी. ए. मात्र झाले नाहीत." - मला घरातून कळलेल्या माहितीनुसार कै. गुर्जर आजारपणामुळे बीए पूर्ण करू शकले नाहीत. कै गुर्जर ज्या काळात बीए करत होते त्याकाळात शिक्षणात अनंत अडचणी होत्या. आर्थिक अडचणी, घरच्या जबाबदार्‍यांपासून ते पटकी, विषमज्वरासारखे तेव्हा जीवघेणे ठरणारे आजार शिक्षण अर्धवट ठेवण्यास पुरेसे असायचे. मात्र बीए न होऊ शकलेल्या गुर्जरांचा "द्राक्षांचे घोंस" हा कथासंग्रह मुंबई विद्यापीठाने एमए साठी नेमला होता, ही माहिती देण्याचे मालशे यांनी टाळले आहे. मला हा खोडसाळपणा वाटतो.

० कोणतीही चरित्रात्मक नोंद ही संतुलित असावी अशी माफक अपेक्षा ठेवणे गैर ठरणार नाही. संतुलीत म्हणजे चरित्रनायकाची बलस्थाने योग्य त्या पद्धतीने नोंदली जायला हवीत.  कै. स. गं. मालशे गुर्जरांच्या बलस्थानांकडे साफ कानाडॊळा करतात. वयाच्या ५१ व्या वर्षापर्यंत गुर्जरांनी तीसहजार पृष्ठांचे लिखाण केले असे त्यांच्या १९३६ साली प्रसिद्ध झालेल्या "धृव" मासिकातील मुलाखतीमध्ये संपादकांनी म्हटले आहे. ही मुलाखत कै. म. ना. अदवंतांनी लिहिलेल्या आणि साहित्य अकादमी तर्फे प्रसिद्ध झालेल्या गुर्जरांच्या चरित्रात यथामूल समाविष्ट केलेली आहे. गुर्जरांनी लिहीलेल्या तीसहजार पृष्ठांचा उल्लेख अक्षरी आहे (म्हणजे एक शून्य चुकून जास्त पडले असंही म्हणायला जागा नाही). आज कुणालाही तीसहजार या आकडयावर विश्वास ठेवणे किती कठीण जाईल याची मला पूर्ण कल्पना आहे.

० वरील नोंदीत मालशे म्हणतात की गुर्जरांनी लिहीलेल्या गोष्टींची संख्या ७०० आहे. मराठीतील नामवंत कादंबरीकार कै. दत्त रघुनाथ कवठेकर यांनी मला शाळेत असताना "तुझ्या पणजोबांनी एक हजार गोष्टी लिहील्या" असे माझ्या पाठीवर हात ठेवून सांगितले होते. तेव्हा १००० हा आकडा ऐकूनच मला किती अभिमान वाटला होता ते मी शब्दात सांगू शकणार नाही. कै. म. ना. अंदवंतांनी लिहीलेल्या चरित्रात गुर्जरांनी स्वत: मांडलेल्या हिशेबात ८००हून अधिक गोष्टी लिहील्याचे म्हटले आहे. याशिवाय त्यांनी लिहीलेल्या कांदंबर्‍या, नाटके, प्रहसने हे वेगळेच.
 चरितार्थासाठी एव्ह्ढा मोठा लेखनप्रपंच एखादी व्यक्ती करते तेव्हा ती व्यक्ती लेखनाला मागणी असल्याशिवाय नक्कीच करणार नाही. स्वत: गुर्जरांनी प्रकाशकांचा कधीही अनुनय केला नाही. आणि त्यांच्या हिशेबी स्वभावाचे जे किस्से मी घरात ऐकले आहेत त्यावरून त्यांनी मोबदल्याशिवाय लिखाण केले नसणार हे नक्की. तेव्हा गुर्जरांच्या गोष्टींची संख्या कमी करून कै. मालशे यांनी काय साधले असेल? याला कर्तृत्वावरून बोळा फिरविण्याचा नतद्रष्ट्पणा एव्हढेच म्हणावे लागेल.

० " त्यांत पाल्हाळही आढळतो." - हे पाल्हाळ मूळकथेतून आले की गुर्जरांनी घुसडले याबद्दल मालशे "ब्र"ही काढत नाहीत.

० "गुर्जरांनी काही नाटकेही लिहिली; परंतु त्यांपैकी एकही यशस्वी झाले नाही." - गुर्जरांचे संगीत नंदकुमार हे नाटक त्यातल्या संगीतासाठी गाजले. गंधर्व नाटक मंडळीने या नाटकांचे प्रयोग केले. नुकत्याच गाजलेल्या "बालगंधर्व" या चित्रपटात याचा ओझरता उल्लेख आहे. हे नाटक आकाशवाणीच्या पुणे केंद्राने जतन केले आहे आणि माझ्या विनंतीवरून दोन वेळा प्रसारित पण केले होते.

बुधवार, २७ मार्च, २०१३

कृपाप्रसाद...




मी लग्नाला उभा होतो तेव्हा माझ्या लग्नात काही "अडचणी" अशा होत्या - १. माझे वडील हयात नव्हते २. माझ्या आईचा मेनोपॉज चालू होता (तिच्या अभ्यास, खेळ आणि कला या तिन्ही मधल्या सर्वंकष बुद्धिमत्तेला लग्नाअगोदर आणि लग्नानंतर पोषक वातावरण न मिळाल्याने निर्माण झालेले नैराश्य या कालावधीमध्ये उफाळून आले होते)   ३. लग्नाळु पुरुषांच्या कर्तृत्वाच्या प्रमुख निशाणींपैकी एक, म्हणजे स्वत:चे वाहन (विशेषत: दुचाकी) माझ्याकडे नव्हते. मी ऑफिसात पीएमटीने जायचो हे अनेक मुलींना आणि त्यांच्या आईबापांना रुचायचे नाही (त्यामागची खरी कारणे सांगितली तरी). मला अवघड जागेचे दुखणे आहे की काय हे विचारण्यापर्यंत काही मुलीच्या बापांची मजल जायची. मग मला नकार मिळायचा.

तरीही माझ्याकडे काही प्लस पॉइंटस होते म्हणून मला मला स्थळे मात्र खूप यायची. असंच एकदा  पुण्यातील एका सुखवस्तू कुटुंबातील एकुलत्या एक मुलीचे स्थळ मला एका "हितचिंतकां"नी सुचविले. त्यांच्या सदिच्छेचा आदर करायचा म्हणून मी मुलीला पहाण्याचा कार्यक्रम करण्याचे ठरवले. त्यासाठी मुलीचे वडील मला माझ्या कामाच्या ठिकाणी भेटून गेले. मुलगी एकुलती एक असल्याने पुण्याच्या मध्यवस्तीमधली वडिलोपार्जित प्रॉपर्टी तिलाच मिळणार हे मधाचं बोट लावायला मुलीचे वडील विसरले नाहीत. आणखी एक गंमत म्हणजे बोलताना अनेक वेळा मी आणी माझी मुलगी, आम्ही जिनिअस आहोत, हे वाक्य या गृहस्थांनी वारंवार ऐकवले.

मग मी एका दिवशी या कुटुंबाला भेटायला गेलो. मी गेलो तेव्हा दिवाणखान्यात मुलीचे आईवडील आणि एक  धोतर, काळा कोट, काळी टोपी अशा वेषातील वयस्कर गृहस्थ माझी भेट घेण्यास उपस्थित होते.

मुलीच्या वडिलांनी प्रथम आईची ओळख करून दिली. मी हात जोडून नमस्कार केला. मग त्या वयस्कर गृहस्थांकडे हाताने निर्देश करून म्हणाले, " हे आमच्या कुटुंबाचे आध्यात्मिक गुरु. हे निष्णात वैद्य आणि ज्योतिषी पण आहेत. आमचं लग्न झाल्यानंतर "हिला" दिवस राहात नव्हते. अनेक निष्णात डॉक्टरांचे उपचार निरुपयोगी ठरल्यामुळे आम्ही हताश झालो होतो. तेव्हा आम्हाला या गुरुंजींचे नाव सुचविण्यात आले. म्हणून आम्ही यांच्याकडे गेलो आणि मग यांनी माझ्या पत्नीवर उपचार केले आणि हिला दिवस राहीले. आमची लेक यांच्या कृपाप्रसादाने झाली असल्यामुळे आम्ही तिच्याविषयीचे कोणतेही निर्णय घेताना यांचा सल्ला घेऊन मगच पुढे जातो."

अशी ओळख करून दिल्यावर त्या आध्यात्मिक गुरुजीनी आपल्या तिरळ्या नजरेने माझ्याकडे एक प्रश्नार्थक कटाक्ष टाकला आणि म्हणाले "पुढेही ही सगळे निर्णय घेताना मला विचारल्याशिवाय घेणार नाही. काय गं?" असा प्रश्न करून मग त्यानी दिवाणखान्याच्या दारात उभ्या असलेल्या उपवर मुलीला विचारल्यावर तिने पण गोड हसून आपली संमती दर्शवली.

मग कांदेपोहे आणि चहा झाला. आमच्या गप्पा पुढे चालू राहिल्या. गप्पामध्ये अध्यात्मिक गुरुजींचा पुढाकारच जास्त होता. माझ्या डोक्यात मात्र "पुढेही ही सगळे निर्णय घेताना मला विचारल्याशिवाय घेणार नाही. काय गं?" हे वाक्य परत  परत पिंगा घालत होते. पुरेशा गप्पा आणि चवकशा झाल्यावर मग मी आईशी बोलून मुलीला भेटावे असे ठरले आणि ही भेट मी आटोपती घेतली.

घरी आल्यावर आईला जे घडले ते सांगितले तेव्हा आई भाजी चिरत होती. भाजी चिरता चिरता आई म्हणाली, "अरे, या माणसाचा "कृपाप्रसाद" म्हणजे ही मुलगी या माणसाची तर नाही ना? आणि भविष्यात सगळे निर्णय ही मुलगी या म्हातार्‍याच्या सल्ल्याने घेणार म्हणजे आपल्या बोकांडीपण त्याला बसवणार. तेव्हा तू काय ते ठरव" असे म्हणून आईने तिला ठाऊक असलेल्या कृपाप्रसादांच्या काही रंजक कथा सांगितल्या. आयव्हीएफ आणि तत्सम तंत्रज्ञान अस्तित्वात येण्या अगोदर "कृपाप्रसाद" ही समाजाने स्वीकारलेली एक उपचार पद्धती होती.

दोन दिवस माझ्या डोक्यातून "पुढेही ही सगळे निर्णय घेताना मला विचारल्याशिवाय घेणार नाही" हे वाक्य काही केल्या डोक्यातून जात नव्हते.

मग "तुमचा काय विचार आहे" असे विचारायला मुलीच्या वडीलांचा फोन आला तेव्हा मी नम्रपणे नकार सांगून मोकळा झालो...

शनिवार, २ फेब्रुवारी, २०१३

कै वि सी गुर्जरांचे श्रेय




"राम गणेश गडकरी डॉट कॉम" या साईटचे संचालक माधव शिरवळकर यांच्याकडून माझ्या पत्राची तातडीने दखल घेतली गेली आणि त्यांच्याकडून खालील इमेल आले. कै. वि सी गुर्जरांचा पणतू म्हणुन मी आता समाधानी आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मा. राजीव उपाध्ये यांसी,

आपण निदर्शनास आणलेली त्रुटी आता दूर केली आहे. खालील दुव्यावर आवश्यक ती सुधारणा आपल्याला पाहता येईल.

http://ramganeshgadkari.com/egadlari/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=8&Itemid=1

आपणासारख्यांच्या जागरूकतेतूनच वेब माध्यमाची विश्वासार्हता स्थिरावण्यासाठी मदत मिळत असते.
आपले मनापासून आभार.

- माधव शिरवळकर

सोमवार, २८ जानेवारी, २०१३

"एकच प्याला" या नाटकाची पदे


२८ ०१ २०१३

संचालक,
राम गणेश गडकरी डॉट कॉम

मी आपल्या "राम गणेश गडकरी डॉट कॉम" या साईटला भेट दिली. आपला उपक्रम स्तुत्य आहेच पण त्यात एक मोठ्ठी त्रुटी राहून गेलेली आहे. ती आपण कृपया तातडीने ती दुरुस्त करावी ही विनंति.

गडकर्‍यांच्या "एकच प्याला" या नाटकाची पदे (आणि प्रस्तावना) त्यांचे जीवश्च कंठ्श्च मित्र आणि साहित्यिक कै. विठ्ठल सीताराम गुर्जर यांनी लिहीलेली आहेत. आपण तयार केलेल्या  "एकच प्याला" या नाटकाच्या इंटरनेट आवृत्तीत आपण पदे अंतर्भूत केलेली आहेत, पण ती कै. विठ्ठल सीताराम गुर्जर यांची असल्याचा कुठेही उल्लेख मला सापडला नाही. यामुळे केवळ कै. विठ्ठल सीताराम गुर्जर  यांचे केवळ श्रेय नाकारले जात नसून लोकांमध्ये ही पदे गडकर्‍यानी रचली अशी चुकीची समजूत पसरण्याची शक्यता खूप आहे, हे आपण लक्षात घ्याल अशी आशा करतो.

आपण ही चूक लवकरात लवकरात दुरूस्त कराल अशी आशा करतो.

कळावे,
आपला
राजीव उपाध्ये
प्रति: rajeev-upadhye.blogspot.com
       सर्व इंटरनेट फोरम्स
   

रविवार, २७ जानेवारी, २०१३

शिक्षेची जरब



केवळ मराठी वृत्तपत्रात आलेल्या बातम्यावरून  जर जागतिक परिस्थितीचा अंदाज बांधायचा झाला तर भारत सोडून जगात सर्वत्र आलबेल आहे असे वाटायला लागते. पण खरोखर जागतिक परिस्थितीचा अंदाज बांधायचा असेल तर CNN, BBC अशा कुबड्या घ्याव्या लागतात. जागतिक बातम्यांसाठी मी रोज DW हा चॅनेल बघतो. मध्यपूर्वेतल्या अनेक देशातली अस्वस्थतता जर्मन चष्म्यातून मला बघायला आवडते.

सांगायचा मुद्दा असा की, हे जागतिक वृत्त बघितल्यावर मला हळुहळु आपण भारतात तुलनेने सुखी आहोत ही भावना सुखावायला लागते. म्हणजे इतरांचे दु:ख आणि आक्रोश पाहिल्याशिवाय आपले सुख आपल्याला कळत नाही (आणी त्याच न्यायाने इतरांचे सुख बघितल्याशिवाय आपले दु:ख आपल्याला जाणवत नाही.)

नुकतेच दिल्लीत झालेल्या बलात्काराच्या घटनेने देश ढवळून निघाला. ही घटना आपल्या पर्यंत माध्यमांमुळे पोचली तेव्हा आपण अस्वस्थ झालो. पण एक लक्षात घ्या की अधिकृत आकडेवारीनुसार भारतात दर तासाला ~३ बलात्कार होत असतात. हा हिशेब सन २०१० सालच्या पोलिसांकडे नोंदल्या गेलेल्या आकडेवारीवर आधारीत आहे.(संदर्भ - http://www.thehindu.com/multimedia/archive/00948/India_s_rape_crisis_948146a.pdf)

म्हणजे बलात्काराच्या एका वृत्तापुरत्या आपल्या संवेदना जाग्या झाल्या होत्या. दर तासाला होणार्‍या ~३ बलात्कारांचे कुणाला सोयरसुतक नव्हते... आणि नसेल.

बलात्कारासाठी फाशीच्या शिक्षेची मागणी केली गेली. ती मागणी मान्य झाली असती तर ४९८-अ प्रमाणे खोट्या तक्रारींचे प्रमाण नक्कीच वाढले असते. खोट्या तक्रारी आणि खोट्या पुराव्यांनी कितीजण फासावर चढले असते माहित नाही, पण खोट्या कोर्ट्केसेसनी अनेक पुरुष उध्वस्त झाले असते हे मात्र नक्की.

पण मुद्दा तो नाही...

मुद्दा फाशीच्या जरबेचा आहे.  फाशीची शिक्षा आज अस्तित्वात असून दुर्मिळातले दुर्मिळ गुन्हे घडत आहेतच. कसाबच्या फाशीने दहशतवाद कुठे थांबणार आहे. कारण कसाबच्या शिक्षेची वेदना दहशतवाद्यांपर्यंत कधी पोचणारच नाही.

कुणी असं म्हणतात की जन्मठेपेची शिक्षा जास्त वेदनादायक असते. पण लोक म्हणतात "चांगल्या वर्तणुकीच्या" सबबीवर गुन्हेगार लवकर सुटू शकतो. म्हणजे इथेही जन्मठेपेच्या कैद्याने काय "भोगले" हे लोकांपर्यंत ( आणि भावी गुन्हेगारांपर्यंत) पोहोचत नाही. परिणामी नवे गुन्हेगार निर्माण होण्याच्या प्रक्रियेवर कोणताही परिणाम होत नाही.

तात्पर्य एव्हढेच की शिक्षेची जरब बसायला शिक्षेतील वेदना जोपर्यंत मेंदूत नोंदवली जात नाही तोपर्यंत शिक्षेची जरब निर्माण होत नाही. 



सोमवार, २१ जानेवारी, २०१३

खोटे बोलणे आणि ग्रहयोग


मागे एकदा सप्तमातील मंगळ आणि राहु-मंगळ युतिबद्दल आधुनिक संशोधन काय सांगते याविषयी लिहिले होते. हे संशोधन करणारे श्री आल्फी लाव्हॉय यांनी खोटारडेपणा विषयी त्यांना सापडलेले ग्रहयोग एका ज्योतिषांच्या ग्रुपवर नुकतेच प्रसिद्ध केले आहेत. आत्तापर्यंत बुध-नेपच्यूनमध्ये   युति,प्रतियुति, केंद्र आणि अर्धकेंद्र हे योग असतील तर ती व्यक्ती खोटारडी मानली जायची. पण  श्री आल्फी लाव्हॉय यांच्या संशोधनानुसार खोटारडे पणा हा बुध-नेपच्यून योगापुरता मर्यादित नाही. तर तो खालील ग्रहयोगात पण दिसतो. फक्त या ग्रहयोगातील खोटारडेपणाची प्रतवारी वेगवेगळी असणार. त्याचा शोध घ्यायला हवा...असो.

श्री आल्फी लाव्हॉय यांच्यामते खोटारडेपणा दर्शविणारे ग्रहयोग ( युति,प्रतियुति, केंद्र आणि अर्धकेंद्र) ...

चंद्र-गुरु
चंद्र-नेपच्यून
बुध-शनि
शुक्र-नेपच्यून
रवि-गुरु
शुक्र-शनि
मंगळ-हर्षल
गुरु-शनि

यापैकी चंद्र-गुरु आणि रवि-गुरु युति असणार्‍या व्यक्ती खोटे बोलू शकतात हे स्वीकारायला थोडे अवघडे आहे. सहज गंमत म्हणून माझी निंदा-नालस्ती, स्वत:ची अतिरेकी स्तुती करणार्‍या "एका व्यक्ती"ची माझ्या संग्रहातील पत्रिका बघितली तर त्यात रवि-गुरु अर्धकेंद्र योग आणि चंद्र-नेपच्यून आणि गुरु-शनि केंद्र योग सापडले. म्हणजे खोटारडेपणाचा ट्रिपलडोस...

शनिवार, १२ जानेवारी, २०१३

विसंगती आणि शंका


एक विसंगती?

धार्मिक भावना भडकतात तेव्हा भडकवणारा दोषी असतो.
मात्र लैंगिक भावना भडकतात तेव्हा भडकणारे दोषी असतात...

एक शंका

निसर्गाने निर्माण केलेल्या स्त्री-पुरुषांच्या लैंगिक रचनेत काही मुदलातच दोष आहे का? म्हणजे बघा अवयव तेच फक्त शुक्राणुंच्या ऐवजी पुरुषाच्या शरीरात बीजांड निर्मिती झाली असती आणि तर पुरुषाचे उद्दीपन मासिकधर्मा पुरतेच मर्यादित राहिले असते. स्त्रीयांच्या शरीरात  अवयव तेच पण फक्त तेथे शुक्राणुंची निर्मिती होऊन फक्त समागमाच्या वेळी त्यांचा उत्सर्ग झाला असता तर आज मोठ्या प्रमाणात दिसणारा लैगिक (गैर)व्यवहार आपोआप नियंत्रित राहिला असता.

निसर्गा तू चूकलास रे बाबा! तुला वठणीवर कसे आणायचे?

शुक्रवार, ४ जानेवारी, २०१३

गुदगुल्या


लोक हो!

सध्या कृष्णमूर्तींच्या गोटात माझ्या नावाने खडे फोडणे चालू असले तरी बाकी माझी नवीन वर्षाची सुरुवात गुदगुल्या करणारी झाली आहे. 

आतापर्यंत मी वेगवेगळ्या निमित्ताने, संशोधनपर निबंध ते  लेख, वृत्तपत्रीय सदर लिहीणे (सकाळ) इत्यादि लेखन केले आहे  (माझ्या पत्रिकेत बुध angular असल्याने ताकदवान झाला आहे). पण मी काढलेले प्रकाशचित्र कधी प्रसिद्ध होईल असे अजिबात वाटले नव्हते.   माझा मित्र आणि गुरुबंधु  चिंतन मधुकर उपाध्याय  याचे मी काढलेले  व्यक्तिचित्र शुभा मुद्गल यांच्या छोटेखानी मुलाखतीसोबत चक्क Times of India मध्ये प्रसिद्ध झाल्याचे कळले तेव्हा मला जवळजवळ हर्षवायुच होणे बाकी होते.

चिंतन आणि मी एकाच वेळेस विख्यात धृपदगायक पंडित उदय भवाळकर यांच्याकडे धृपद शिकत होतो. मला पाठदुखीमुळे धृपदाची तालिम (पहाटे पाच ते दहा) थांबवावी लागल्यामुळे मी माझी क्रिएटिव्ह एनर्जी छायाचित्रणाकडे वळवली.

२०१३ मध्ये शास्त्रीयसंगीताच्या क्षेत्रात ज्यांच्याकडे आशेने बघावे अशांपैकी एक चिंतन आहे, असं शुभाजीनी म्हटलं आहे.

तुम्ही पण चिंतनचे गाणं जरूर ऐका आणि माझ्या त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

शुभा मुद्गलांची टाईम्स मधली मुलाखत

मी चिंतनचे पुण्यात एका मैफलीत काढलेले मूळ व्यक्तीचित्र



Miller of The Dee या सुप्रसिद्ध इंग्लिश कवितेचे मी केलेले मराठी स्वैर रुपांतर



कुण्या नदीच्या तीरावरती एक पिठाची गिरणि वसे
मालक त्या हो पिठगिरणीचा स्वछंदी आनंदि असे
जात्याच्या तो सुरात मिसळी स्वानंदाचे गीत कसे
ना हेवा मी करी कुणाचा, कुणी न माझा करीतसे

कुशल प्रजेचे बघण्या राजा येइ एकदा नदितीरी
श्रमपरिहारक सुरावटी त्या राजहृदयि मात्सर्य भरी
"चुकसी मित्रा" राजा वदला "हेवा वाटे तव मजला,
वैभव सारे भोगत असुनी कष्टि कसा मी? सांग मला"

चकित होउनी गिरणीवाला टोपी काढत घाम पुसे
"खाइ भाकरी मम कष्टांची" वदुनी असे मिष्कील हसे
"कधी न मजला कर्ज कुणाचे, साथ नदीची या जन्मी,
ओघावर त्या गिरणी चाले ऐसे असता काय कमी"

उत्तर त्याचे ऐकुन राजा निजांतरी तो सुखावला
सद्गद हृदये पुन: पुन: हे स्वत:शीच तो पुटपुटला
"ऐशा तुजसम प्रजाननांचे कौतुक वाटे मज मोठे,
पिठमंडित तव टोपी पुढती रत्नजडित मम मुकुट कुठे"

निज सदनी मग येई राजा, मनात त्याच्या हेच असे
"ना हेवा तो करी कुणाचा कुणी न त्याचा करीतसे  --- (पुन:प्रकाशित)